• ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांचा कांगावा

     



    लोकमतच्या (दि.14) संपादकीय पानावरील थोर विचारवंत प्रकाश बाळ यांचा लेख वाचला. बाळ आणि त्यांच्यासारखे विचारवंत यांचे लेख म्हटले की हिंदु समाज, हिंदुत्व आणि संघ म्हणजे सर्व वाईट आणि त्याशिवाय बाकी सर्व चांगले हे वारंवार नमूद होणारं हे गृहीत धरूनच लेख वाचला. पत्रकारितेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडलेले हे विचारवंत लेखात आव आणतात की, मालद्यातील दंगल आरोप प्रत्यारोपापलीकडे जाऊन पाहिली पाहिजे. त्याच वेळी ते या लेखात 'हिंदू-मुस्लीम दंगल घडवून आणण्याच निमित्तच संघ परिवाराला मिळणार आहे' असं बेजबाबदार आणि पूर्वग्रहाने बरबटलेले विधान कोणत्याही पुराव्याशिवाय करतात.

         या देशात हिंदु मुस्लिम दंगलीचा इतिहास हा संघ निर्माण होण्यापूर्वी पासून आहे, हे त्यांना माहित नसेल असे नव्हे. पण संघाला दूषण दिली नाहीत तर त्यांची धर्मनिरपेक्षता सिध्द होणारं कशी? फार जुन्या इतिहासाचे स्मरण नको... मुंबईत 2012 मध्ये आजाद मैदानावर रजा अकादमीने मोर्चा काढला होता, त्यावेळी दंगल झाली होती. बंदोबस्तावरील पोलीस महिलांचा विनयभंग झाला आणि स्मारकाला मस्तवालपणे लाथा मारण्यात आल्या. त्या दंगलीच्या वेळी काय कारण होती? अशी अजून उदाहरणे देता येतील.

         बाळ पुढे म्हणतात, 'संघपरिवाराची कार्यपध्दती पाहता एखाद्या मंदीराचा मुद्दाम विध्वंस केला जाऊ शकतो एखादा धार्मिक नेत्याचा खून मुद्दाम केला जाऊ शकतो'. असले निव्वळ बाष्कळ आरोप ते या लेखात करतात. खरे तर संघाची अशी बदनामी केल्याबद्दल त्यांना कोर्टातच खेचायला हवे. परंतु, संघाने नेहेमीच 'आपण आपले काम करत रहावे आणि अशा भंपक टीकाकारांकडे लक्ष देऊ नये', असे सहिष्णू धोरण ठेवल्याचा गैरफायदा घेण्याचा हा प्रकार आहे. राहूल गांधी यांनी संघावर आचरट आरोप केल्यानंतर त्यांना न्यायालयात खेचले त्यावेळी त्यांची आणि काँग्रेसची उडालेली तारांबळ फार जुनी नाही.

           अशी अनेक एकांगी आणि अर्धवट विधानं या लेखात आहेत. दहशतवादाला हिंदु मुस्लीम तेढ जबाबदार असल्याचे बाळ सांगतात. आजच जकार्ताला दहशतवाद्यांचा हल्ला झाला. काही दिवसांपूर्वी पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला झाला. अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरचे मनोरे पाडण्यात आले, त्यावेळी कोणती हिंदु-मुस्लीम तेढ होती ? मालद्याच्या दंगलीला मुलामा देण्याचा प्रयत्न ते करतात. दंगल म्हणण्याऐवजी मालद्यातला 'हिंसाचार' पध्दतशीर पणे घडविण्यात आला, असे ते म्हणतात. पुढच वाक्य आहे, 'या प्रकरणात 'धार्मिक ध्रुवीकरणा'ची संधी भाजपाला साधायची आहे.' दंगल झाली कशावरून तर एक महिन्यापूर्वी झालेल्या विधानावरून. 'इस्लाम खतरे मे' चा नारा देऊन लोकं जमवली गेली, अशी मौलिक माहिती बाळ देतात. पण सगळ्याला दोषी मात्र संघ परिवाराला आणि भाजपाला धरतात. याला कावीळ म्हणायचे नाही तर काय म्हणायचे ?

        मुळातच बाळ व त्यांच्यासारख्या विचारवंताचा बेगडीपणा सातत्याने उघडला पडतोय. दादरीवरून या देशात असहिष्णूतेच्या नावाखाली एक वादळ उठविण्याचा प्रयत्न झाला होता. देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न होता. तेव्हा तावातावाने रस्त्यावर उतरलेले, पुरस्कार परत करणारे सर्वजण बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर चिडीचूप झाले. मालद्यातील घटना सहिष्णुतेचा अविष्कार आहे, असे या सेक्युलरांना वाटते का ? मालदा येथील थैमानाचा साधा निषेधही करायची हिंमत यांच्यामध्ये नाही. ही त्यांची सहिष्णुता आहे का सवडीशास्त्र आहे ? ही सर्व मंडळी आपआपल्या वातानुकुलीत कक्षात बकध्यान करण्यात मग्न आहेत. जगात सर्वाधिक सहिष्णू देश आणि धर्म भारत व हिंदू हेच आहेत. मुसलमानांना राहण्यासाठी भारतासारखा देश नाही आणि हिंदूंसारखा शेजारी नाही, असे त्या समुदायातील लोक आता जगभरातील घटना पाहून म्हणतात. मुसलमानांमधील ही नवी जाणीव टोचत असल्यानेच बाळ हिंदू – मुस्लिम द्वेषाच्या शिळ्या कढीला ऊत आणण्याचा आणि सेक्युलर राजकारणाची सोय करण्याचा प्रयत्न करत आहेत काय, अशी शंका येते.

    हिंदु ही चिरंतन आणि प्रवाही जीवनपध्दती आहे. कालौघात काही चुकीच्या गोष्टी या प्रवाहात शिरल्या त्या दूर करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याची दखल घेण्याऐवजी हिंदु म्हणजे बुरसटलेले, प्रतिगामी व असहिष्णू ठरवून टीका करण्यात ही मंडळी धन्यता मानत आहेत हे दुर्देवी आहे.

    वैचारीक मोकळेपणा, परस्पर संवाद आणि विवेकवाद ही कुणाची मक्तेदारी नाही. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ढोंगीपणाने हिंदु समाजालाच तत्वज्ञानाचे डोस पाजायचं कधी थांबवणार? हिंदु धर्माची किंवा संघाची बदनामी करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचे दिवस आता गेले. ही अशा विचारवंताची दांभिक मांडणी समाजाने कधीच नाकारायला सुरूवात केली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील झटका हा त्याचा अविष्कार होता. संघाला तुम्ही वाईट म्हणून संघाच्या सर्वव्यापकतेचा सूर्य झाकला जाणारच नाही. शिवशक्ती संगमात लाखो स्वयंसेवकांचा देशभक्तीचा हुंकार ऐकून ते हादरले. आता तेथील महात्मा फुलेंचा वंशज खरा की खोटा आहे, ही चर्चा करीत आहे अशा चर्चेने स्वताच समाधान करून घ्या. पण समाजाने ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांना कधीच नाकारले आहे. संघाच्या राष्ट्रवादाकडे मोठ्या संख्येने लोक आकर्षित होत आहे. अशा स्थितीत याला आकांडतांडवाशिवाय दुसरे नाव नाही. बाकी हे विचारवंत अशा पध्दतीने जितक लिहीतील तितके उघडे पडतील. आम्ही म्हणू तेच सत्य आणि आम्ही मांडू तेच विचार या असहिष्णू वृत्तीने त्यांना ठराविक आत्मप्रौढी कंपूत जागा जरूर मिळेल. संघविचार मात्र समाज स्वीकारत राहिल.

      

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी  लोकमत, 16  जानेवारी 2016)

     

    केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता 


  • You might also like

    No comments:

    Post a Comment