ऑपरेशन सिंदूरबाबत शंका उपस्थित करून काँग्रेसचे नेते राहुल
गांधी आणि त्यांचे सहकारी पाकिस्तानचीच भाषा बोलत आहेत. ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय
सैन्य दलानेच पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. असे असताना ऑपरेशन सिंदूरवर
टीका करणे, हा सैन्यदलाचा अवमान आहे.
पाकिस्तानातील दहशतवादी शक्तींच्या विरोधात भारतीय
सैन्यदलाने संयुक्तरीत्या ऑपरेशन सिंदूरद्वारे केलेल्या कारवाईवर संसदेत नुकतीच
चर्चा झाली. या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्याची मागणी काँग्रेससह सर्व विरोधक
सातत्याने करीत होते. या विषयावर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी नाही, असाही आरोप काँग्रेसचे युवराज आणि त्यांचे
सहकारी करीत होते. या विषयावर विस्ताराने चर्चा करून मोदी सरकारने विरोधकांचा आरोप
खोटा ठरविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या विषयावर काहीच बोलत नाहीत हा राहुल
गांधींचा आक्षेपही सपशेल खोटा ठरला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस.
जयशंकर यांनीही 'ऑपरेशन सिंदूर' आणि
त्यानंतरच्या घडामोडींसंदर्भातील वेगवेगळ्या पैलूंवर विस्ताराने प्रकाश टाकला.
यानिमित्ताने काँग्रेसचा पाकिस्तान धार्जिणा चेहरा पुन्हा देशासमोर आला.
काँग्रेसच्या युवराजांनी लोकसभेत बोलताना
पाकिस्तानविरुद्धची सैन्यदलाची कारवाई का थांबविली असा प्रश्न करताना आपल्या
आजीप्रमाणे, म्हणजे इंदिरा गांधी
यांच्याप्रमाणे शौर्य, धाडस दाखवायला हवे होते, असे मोठ्या ऐटीत सांगितले. १९७१ मध्ये बांगलादेशला पाकिस्तानपासून तोडून
स्वतंत्र राष्ट्र करण्याचे धैर्य इंदिरा गांधी यांनी दाखविले यात शंकाच नाही.
त्यावेळी विरोधी पक्ष असलेल्या जनसंघाने इंदिरा गांधी यांना संपूर्ण पाठिंबा दिला
होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व विरोधी पक्ष इंदिरा गांधी यांच्या पाठीशी
खंबीरपणे उभे आहेत, असे अभिमानास्पद चित्र त्यावेळी दिसले
होते. 'ऑपरेशन सिंदूर' च्या वेळी असेच
चित्र दिसणे अपेक्षित होते; मात्र विरोधी मोदीविरोधासाठी
देशविरोधी भूमिका घेण्यासही विरोधक मागेपुढे पाहत नाहीत, असे
दिसून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणात काँग्रेसच्या या
भूमिकेचा बुरखा टराटरा फाडला. राज्यसभेत याच विषयावरील चर्चेत बोलताना ज्येष्ठ
काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी पहलगाम हत्याकांड घडविणारे दहशतवादी पाकिस्तानचे
कशावरून होते, असा प्रश्न उपस्थित करीत आपल्या पाकिस्तान
प्रेमाचा आणखी एक नमुना सादर केला, तर आणखी एक ज्येष्ठ
काँग्रेस नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती
यांनी लोकसभेत बोलताना 'ऑपरेशन सिंदूर' हा केवळ माध्यमांसाठी केलेला तमाशा होता, अशा
शब्दांत आपल्या भारतीय सेनेचा अवमान करणारी भूमिका मांडली. 'ऑपरेशन
सिंदूर'मध्ये किती अतिरेकी मारले गेले, याची माहिती सरकारतर्फे दिली जात नाही, असे चुकीचे
बोलत प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसच्या परंपरागत पाकिस्तान प्रेमाचा भेसूर चेहरा
जगाला दाखविला. भारतीय सैन्यदलाने 'ऑपरेशन सिंदूर' नंतर लगेचच पत्रकार परिषद घेऊन या कारवाईमागे पाकिस्तानातील दहशतवादी तळ
नष्ट करणे हाच एकमेव हेतू होता, असे स्पष्ट केले होते.
भारतीय सैन्यदलाने अत्यंत अचूकपणे आपले लक्ष्य साध्य करत या कारवाईत पाकिस्तानच्या
आत १०० किमी अंतरावर असलेल्या चार दहशतवादी तळांना लक्ष्य केले आणि पीओकेमधील पाच
तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्याद्वारे, भारतीय सैन्याने 'जैश-ए-मोहम्मद' आणि 'लष्कर-ए-तोयबा'
या दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त केले, अशी
माहिती भारतीय सैन्यदलाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद
घेऊन दिली होती. असे असूनही प्रणिती शिंदे यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीने लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर' हा तमाशा होता, या कारवाईने नेमके काय साध्य झाले, असे प्रश्न करीत
सैन्यदलाच्या कारवाईवरच शंका प्रकट केली. सैन्यदलाचा अवमान करणे ही काँग्रेसची
जुनी खोड आहे.
'ऑपरेशन सिंदूर' नंतर पाकिस्तानने भारतातील नागरी
वस्त्यांना लक्ष्य करीत क्षेपणास्त्र हल्ले केले होते. मात्र भारतीय सैन्यदलाने हे
सर्व हल्ले परतवून लावले. त्यानंतर भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानातील लष्कराच्या
तळांना लक्ष्य करीत आपली ताकद दाखवून दिली. या हल्ल्यांमुळे भयभीत झालेल्या
पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी भारताकडे हल्ले थांबविण्याची याचना केली.
पाकिस्तानला धडा शिकवण्याचे उद्दिष्ट साध्य झाल्याने सैन्यदलाने पाकिस्तानच्या
याचनेनंतर 'ऑपरेशन सिंदूर' तात्पुरते
थांबविण्यात आल्याचेही भारतीय सैन्यदलाने स्पष्ट केले होते. या संपूर्ण
घडामोडींमध्ये सत्ताधारी पक्षाचे नेते, केंद्रातील मंत्री
माध्यमांपुढे येऊन माहिती देत नव्हते. सैन्यदलाच्या कारवाईची, या कारवाईत पाकिस्तानच्या झालेल्या हानीची माहिती भारतीय सैन्य दलाच्या
प्रतिनिधींकडूनच अधिकृतरीत्या दिली जात होती. सैन्यदलाच्या कारवाईची माहिती देताना
अत्याधुनिक पद्धतीने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सुद्धा केले गेले होते. असे असतानाही 'ऑपरेशन सिंदूर' मधून काय साध्य केले, असे विधान लोकसभेसारख्या सर्वोच्च व्यासपीठावर करीत भारतीय सैन्यदलाच्या
शौर्यावरच आपण शंका घेत आहोत, याची शरमही काँग्रेस नेत्यांना
वाटत नाही. 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये
भारताची किती विमाने पाकिस्तानने पाडली, याची माहिती जाहीर
करा, अशी मागणी युवराज राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी
केली होती. भारतीय सैन्यदलाने याबाबतीत स्पष्ट खुलासा यापूर्वीच केला होता.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी, त्यांच्या लष्कराने भारताची
विमाने पाडल्याचा हास्यास्पद दावा केला होता. मात्र त्याचा एकही पुरावा
पाकिस्तानचे राज्यकर्ते देऊ शकले नव्हते. पाकिस्तानचे काय नुकसान झाले याची माहिती
द्या, अशी मागणी करण्याऐवजी राहुल गांधी भारताची किती विमाने
पडली त्याची माहिती द्या, अशी मागणी करीत होते.
'ऑपरेशन सिंदूर' का थांबवले, मोदी
सरकारमध्ये पाकिस्तान विरोधात कारवाई करण्याची हिंमत नाही, अशी
बालिश बडबड करणाऱ्या युवराज राहुल गांधींना २००८ मध्ये मुंबईवरील हल्ल्यानंतर
सोनिया गांधी यांनी गुळमुळीत भूमिका घेतल्यामुळेच भारतीय सैन्य दलाची तयारी असूनही
पाकिस्तानवर कारवाई केली गेली नव्हती, हे आठवणार नाही. १९७१
मध्ये आपल्या आजीने पाकिस्तानचे एक लाखावर सैनिक तसेच सोडून दिले होते, याचेही राहुल गांधींना विस्मरण झाले. फक्त भाजप आणि मोदीविरोधात आपण
पाकिस्तानचीच भाषा बोलत आहोत याचेही युवराजांना काही वाटेनासे झाले आहे.
पाकिस्तानच्या भाषेतील स्वल्पविराम, पूर्णविरामही काढण्याची
तसदी न घेऊन काँग्रेस नेतृत्वाने दहशतवादाचा पाठीराखा असलेल्या पाकिस्तानच्या
साथीने घातक त्रैराशिक राष्ट्रीय राजकारणात जन्माला घातले आहे, याची इतिहासात नोंद होईल.
(लेखाची पूर्वप्रसिद्धी – नवशक्ति, ०५ ऑगस्ट २०२५)
केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता
No comments:
Post a Comment