राहुल
गांधींनी महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर ईव्हीएमपासून मतदारयादीपर्यंत अनेक
आरोपांची सरबत्ती केली; मात्र हे आरोप वास्तवापेक्षा
चुकीचे असल्याचे वारंवार उघड झाले. पुरावे असूनही न्यायालयात न जाण्याचे
हास्यास्पद कारण देत त्यांनी स्वतःच स्वतःचे हसे केले.
युवराज
राहुल गांधींची राजकारणातील हतबलता दिवसागणिक वाढत चालली आहे. सातत्याने येणाऱ्या
अपयशामुळे ही हतबलता टोकाच्या नैराश्यवादाकडे झुकली गेली. आता ही हतबलता
खोटेपणाच्या सर्व मर्यादा पार करू लागली आहे. खोटेपणाशिवाय आपल्याला राजकारणात
तरता येणार नाही, असा समज करून घेऊन युवराजांनी
नोव्हेंबर, २०२४ पासून म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचे निकाल
जाहीर झाल्यापासून एका मागोमाग एक असत्य कथन करण्याचा सपाटा लावला आहे. अशा
खोटेपणातून त्यांची राजकारणातील विश्वासार्हताही दिवसागणिक घटत चालली आहे.
महाराष्ट्र
विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी, शरद
पवार आणि उबाठा या तिघांना सर्वाधिक धक्का बसणे स्वाभाविक होते. लोकसभा निवडणुकीत
महाराष्ट्रात महायुतीवर सरशी मिळवल्यामुळे राहुल गांधी, शरद
पवार आणि उबाठा या तिघांनाही महाराष्ट्राची सत्ता मिळण्याची स्वप्ने पडू लागली
होती. हरयाणातील जनतेने अपेक्षाभंग करत भारतीय जनता पार्टीला पुन्हा बहुमत
दिल्यानंतर राहुल गांधींना राजकारणातल्या बदलत्या वास्तवाची जाणीव व्हायला हवी
होती; मात्र या वास्तवाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे
त्यांना महाराष्ट्रातील निकालाचे सर्वाधिक दु:ख झाले. या अपेक्षाभंगातून डिसेंबर
२०२४ मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील महाआघाडीच्या पराभवाचे खापर ‘ईव्हीएम’वर फोडले.
‘ईव्हीएम’ बद्दलच्या शंकांचा महापूर गेल्या १० वर्षांत आल्यामुळे युवराजांच्या या
शंकेला कोणी गंभीरपणे घेतले नाही. मग त्यांच्या सल्लागारांनी युवराजांना
मतदानाच्या आकडेवारीचा आधार घेत संध्याकाळी पाच नंतर वाढलेल्या मतदानाच्या
टक्क्याविषयी संशय घेण्यास सांगितले. संध्याकाळी पाच नंतर १३ ते १५ टक्के एवढे मतदान
संशयास्पदरित्या वाढले, असा आरोप युवराजांनी मतदानाच्या
आकडेवारीचे कागद पत्रकार परिषदेत सादर करत केला. ज्यांना मतदानाच्या दिवशी कोणत्या
पद्धतीने मतदान होते, कोणत्या पद्धतीने मतदान करून घ्यावे
लागते, याची प्राथमिक जाण आहे, अशा
बूथपातळीवरच्या कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला संध्याकाळी पाच नंतर मतदान का
वाढते, हे ठाऊक असते. सकाळी आठ ते संध्याकाळी पाच या वेळेत
साधारणत: ५० टक्के मतदान होते. त्यानंतर मतदारांच्या रांगा मतदान केंद्राबाहेर
लागतात. खरे तर मतदान वाढण्याची सुरूवात दुपारी तीन वाजल्यापासून होते. दुपारी
तीनच्या आधीपासून उमेदवारांचे कार्यकर्ते कोण-कोणत्या भागातील, वस्तीतील, वसाहतीतील किती मतदान बाकी आहे, याचा आढावा घेऊ लागतात. मग मतदार यादी हातात घेऊन कार्यकर्ते आपले हक्काचे
मतदान करून घेण्यासाठी पळापळ करू लागतात. युवराजांनी आपण मोठा गौप्यस्फोट
केल्याच्या आवेशात निवडणूक आयोगाने पाच वाजेपर्यंत ५८टक्के मतदान झाल्याचे जाहीर
केले होते; मात्र अंतिम आकडेवारीत निवडणूक आयोगाने ६६टक्के
मतदान झाल्याचे घोषित केले, याकडे लक्ष वेधले. या आठ टक्के
मतदानावर युवराजांनी संशय व्यक्त केला. निवडणूक आयोग पाच वाजेपर्यंत झालेले सरासरी
मतदान घोषित करत असते. सहा वाजेपर्यंत मतदान केंद्राच्या आवारात दाखल झालेल्या
सर्व मतदारांना मतदान करू दिले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी रात्री सात, आठ वाजेपर्यंत मतदान चालल्याच्या घटना घडल्या आहेत. हे वास्तव
काँग्रेसच्या गल्ली-बोळातल्या कार्यकर्त्यांना माहीत असते; मात्र
राहुल गांधींच्या एमबीए, सॉफ्टवेअर इंजिनिअर यासारख्या
पदव्या बाळगणाऱ्या सल्लागारांना मतदानाची वास्तव माहिती कधीच ठाऊक होणार नाही. या
सल्लागारांनी युवराजांना पाच नंतर एवढे मतदान वाढलेच कसे? असा
प्रश्न उपस्थित करण्यास सांगितले. त्यानुसार युवराजांनी वाढलेल्या मतदानाविषयी
आपण न्यूटनसारखा मोठा शोध लावल्याचा आव आणत निवडणूक आयोगावर आरोपांच्या फैरी
झाडल्या.
निवडणूक
आयोगाने संध्याकाळी पाच नंतर झालेल्या मतदानाविषयी खुलासा केल्यामुळे युवराजांचा
आरोपांचा हा बारही फुसका निघाला. यानंतर युवराजांनी लोकसभा ते विधानसभा निवडणुकी
दरम्यान महाराष्ट्रात वाढलेल्या मतदारांच्या आकड्यांचा आधार घेत निवडणूक आयोग आणि
भारतीय जनता पार्टीवर आरोप केले. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात एक कोटी मतदार
वाढले,
असा आरोप युवराजांनी केला होता. प्रत्यक्षात महाराष्ट्रात लोकसभा
आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान ४० लाख मतदार वाढले होते, असे
निदर्शनास आले होते. २००९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची केंद्रात व राज्यात सत्ता
असताना महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान ६० लाख हून अधिक मतदान
वाढले होते; मात्र अशा गोष्टी जाणून न घेता सल्लागारांनी
दिलेल्या माहितीच्या आधारे हवेत गोळीबार करणे हा युवराजांचा आवडता उद्योग बनला
आहे. या आरोपानंतर युवराजांनी निवडणूक आयोगावर काँग्रेस समर्थक मतदारांची नावे
वगळल्याचा आरोप केला. या आरोपासाठी युवराजांनी सीएसडीएस लोकनीती या निवडणूक अंदाज
वर्तविणाऱ्या संस्थेच्या आकडेवारीचा आधार घेतला. या संस्थेने रामटेक आणि देवळाली
या विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीनंतर अनुक्रमे ३८ आणि ३६ टक्के मतदार कमी
झाल्याचा आरोप केला होता. निवडणूक आयोगाने सीएसडीएस लोकनीतीचे सहसंस्थापक संजय कुमार
यांना नोटीस पाठविल्यानंतर या संजय कुमारांनी आपण चुकीच्या माहितीच्या आधारे सदर
आरोप केल्याचे मान्य करत निवडणूक आयोगाची बिनशर्त माफी मागितली. निवडणूक आयोगाच्या
मतदार नोंदवणे, मतदाराचे नाव वगळणे, मतदार
यादीतील पत्त्यामध्ये दुरुस्त्या करणे यासारख्या प्रक्रियेत अनेक वर्षांपासून चुका
होत आहेत. या चुका विशिष्ट पक्षाला मदत व्हावी, या हेतूने
केलेल्या नसतात.
अलीकडेच
युवराजांनी काँग्रेस समर्थक मतदारांची नावे निवडणूक आयोग जाणीवपूर्वक वगळत आहे, असा आरोप केला. हा आरोप करताना त्यांनी महाराष्ट्रातील राजुरा विधानसभा
मतदारसंघाचा उल्लेख केला. या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीआधी जवळपास सात हजार
मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आणि काँग्रेस उमेदवाराचा तीन हजार ५४ मतांनी
पराभव झाला, असा युवराजांचा आरोप होता. या मतदारसंघाचे भाजप
आमदार देवराम भोंगळे यांनी या मतदारसंघात असे काही घडलेच नाही, किंबहुना भाजपलाच निवडणुकीआधी बोगस मतदारांची नावे समाविष्ट केली जातील,
असा संशय असल्याने अशा आशयाची तक्रार करण्यात आल्याचे पुराव्यानीशी
दाखवून दिले. मुळात जिथे मतदार कमी केले हा राहुल यांनी आरोप केला, त्या कर्नाटकमधील आळंदमध्ये कॉंग्रेसचाच उमेदवार विजयी झाला. आळंद येथे
कॉंग्रेसच्या मजबूत बूथमध्ये म्हणे टारगेट करून मते हटवली गेली. पण तसे असते तर
कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाला असता का? हटवलीच असती तर
पराभवच झाला असता ना! तसेच जिथे मतदार समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप राहुल यांनी
केला त्या राजुरा येथे कॉंग्रेसच्या मतांमध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत नऊ
हजारांनी वाढ झाली. त्यामुळे आरोप करण्याआधी विषयाचा किमान अभ्यास करावा, असेही राहुल यांना वाटले नाही. स्वत:च स्वत:च्या आरोपांचे हसे करून घेतले.
राजुरा
मतदारसंघात बोगस नावे समाविष्ट केल्याचा आरोप राहुल यांनी केल्यानंतर एका
पत्रकाराने युवराजांना तुमच्याकडे एवढे भक्कम पुरावे असताना तुम्ही न्यायालयात का
जात नाही?
असा प्रश्न केल्यावर युवराज गडबडले. न्यायालयात जाणे हे माझे काम
नाही. ते काम तरुणपिढी करेल, असे हास्यापद उत्तर युवराजांनी
दिले. एकूणात काय तर युवराजांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी खोट्याचा आधार घ्यावा
लागतो आहे; मात्र यातून ते राजकारणातील 'स्टँडअप कॉमेडियन' बनत चालले आहेत, हे मात्र नक्की.
(लेखाची पूर्वप्रसिद्धी – नवशक्ति, २३ सप्टेंबर २०२५)
केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता
No comments:
Post a Comment