• चेहरा हरवलेले काँग्रेस नेतृत्व

     

                शकील अहमद आणि पृथ्वीराज चव्हाण या काँग्रेसच्या दोन नेत्यांनी बिहार निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाची चिकित्सा केली आहे. काँग्रेस नेतृत्वाविषयी पक्षामध्ये असंतोष असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा या निकालाने स्पष्ट केल्या आहेत.

              बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या प्रतिक्रिया पाहिल्यावर विरोधक किती हतबल आणि गोंधळलेले आहेत याची कल्पना येते. काँग्रेस, उबाठा, अखिलेश यादव या प्रमुख भाजपविरोधी पक्षांनी बिहारमधील पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडले आहे. बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या तेजस्वी यादव यांनी मात्र संयमित प्रतिक्रिया व्यक्त करत आपल्या हातून काय चुका झाल्या याचा शोध घेऊ, असे सांगत आपल्या पराभवाला निवडणूक आयोग जबाबदार नाही, हेच सूचित केले. तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांची बिहार निवडणुकीत आघाडी होती. तरीही तेजस्वी यादव यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सुरात सूर मिळण्यास नकार दिला, हे महत्त्वाचे आहे. शकील अहमद, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बिहारमधील काँग्रेसच्या लाजिरवाण्या पराभवाला युवराज राहुल गांधी हेच जबाबदार आहेत, असे अप्रत्यक्षरीत्या सांगितले आहे. आपली ताकद ओळखून पक्षनेतृत्वाने ६० ऐवजी ३० जागा लढवायला हव्या होत्या. तसे झाले असते तर पक्षाला आणखी जागा मिळाल्या असत्या. पक्षनेतृत्वाला पक्षाच्या ताकदीविषयी चुकीची माहिती पुरवल्यामुळे नेतृत्वाने तसे निर्णय घेतले, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाल्याचे प्रसिद्ध झाले आहे. उमेदवारी देताना मोठे आर्थिक व्यवहार झाले. त्यामुळेच काँग्रेसच्या जागा कमी झाल्या, असे शकील अहमद यांनी सांगितले आहे. शकील अहमद यांनी तर पक्षाचा राजीनामा देताना युवराज राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या मर्यादांची जाहीर चिरफाड केली आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि शकील अहमद या दोन्ही नेत्यांची विधाने प्रसिद्ध झाल्यावर त्यांचा एकाही काँग्रेस पदाधिकाऱ्याने प्रतिवाद केलेला नाही. याचा अर्थ राहुल गांधी हे ज्या पद्धतीने संघटना बांधणीकडे लक्ष देता निवडणूक आयोगावर दोषारोप करीत आहेत, ही गोष्ट काँग्रेसमधील बहुतांश नेते आणि पदाधिकाऱ्यांना मान्य नसावी. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर हरयाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि बिहार अशा चार राज्यांमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडाला. जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये नॅशनल कॉन्फरस आणि झारखंड मुक्ती मोर्चा या मित्रपक्षांमुळे काँग्रेसला थोडेफार यश तरी मिळाले. बिहारच्या मोठ्या पराभवामुळे काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय राजकारणातील पत प्रचंड घसरली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांना साथीला घेत इंडिया आघाडीची निर्मिती केली. या इंडिया आघाडीतील घटक पक्षांना काँग्रेसचे ओझे जाणवू लागले आहे. त्यामुळे हळूहळू इंडिया आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसशी काडीमोड घेतील, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. आणखी दीड वर्षांनी उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष यांची आघाडी आहे. बिहारमधील अनुभव लक्षात घेऊन अखिलेश यादव यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली तर त्याचे आश्‍चर्य वाटायला नको.

              सक्षम विरोधी पक्ष ही लोकशाही व्यवस्थेची निकड असते. सत्ताधारी पक्षाला जनहिताच्या प्रश्‍नावरून कोंडीत पकडणे हे विरोधी पक्षाचे कर्तव्य असते. २०१४ पासून काँग्रेसने संसद आणि संसदेबाहेर सक्षम विरोधी पक्षाच्या भूमिकेला न्याय दिला नाही. लोकसभेमध्ये सातत्याने गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज वारंवार बंद कसे पडेल, याची काळजी काँग्रेस नेतृत्व गेली ११ वर्षे सातत्याने घेत आहे. २०२४ मध्ये लोकसभेच्या ९९ जागा जिंकल्यानंतर काँग्रेसचे नेतृत्व म्हणजे राहुल गांधी हे हवेत असल्यासारखे वावरू लागले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संसदेत काँग्रेस पक्षाची भूमिका बेमुर्वतखोर झाली आहे. कोणत्या कोणत्या मुद्द्याचा वापर करून लोकसभेचे आणि राज्यसभेचे कामकाज बंद पाडणे हा एक उपचार बनला आहे. राहुल गांधींना याची मुळीच फिकीर नाही. काँग्रेसमध्ये गांधी घराण्याविरोधात बोलण्याची कुणाची शामत नसते. त्यामुळे राहुल गांधींना समजुतीचे चार शब्द सांगण्याची हिंमत काँग्रेसमधील एकही ज्येष्ठ नेता दाखवत नाही. महाराष्ट्रातील पराभव राहुल गांधींच्या जिव्हारी लागला. म्हणूनच महाराष्ट्रातील निकालानंतर राहुल गांधी आपले अपयश झाकण्यासाठी ईव्हीएम, निवडणूक आयोग आणि मतदार याद्या यांना आपल्या पराभवाबद्दल जबाबदार ठरवू लागले. इंदिरा गांधी यांच्या उदयानंतर म्हणजे १९६०-७० नंतर काँग्रेसची संघटना खिळखिळी बनत गेली. गांधी घराण्याने काँग्रेसमध्ये दुसऱ्या फळीचे नेतृत्व तयारच होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली. कर्नाटक आणि तेलंगणाचा अपवाद वगळता काँग्रेसला एकाही राज्यात सत्ता मिळवता आली नाही किंवा सत्ता टिकवता आली नाही. बिहारमध्ये प्रचाराची धामधूम चालू असताना काँग्रेसचे मुख्य प्रचारक असलेले राहुल गांधी अचानक गायब झाले आणि परदेश दौऱ्यावर जाऊन आले. प्रचारामध्ये पक्षाचा मुख्य नेता गायब होणे ही त्याच्या पक्षाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. हरयाणामध्ये सर्व वाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला सत्ता मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात हरयाणात काँग्रेसचा मोठा पराभव झाला. निवडणूक आयोगाच्या मतचोरीमुळे काँग्रेसचा पराभव झाला, असा कांगावा करणाऱ्या राहुल गांधी यांनी झारखंडमध्ये सर्व एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार, असे भाकीत वर्तविण्यात आले होते, याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. मतदार याद्यांमधील अनेक चुका राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदांमध्ये दाखविल्या होत्या. मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या दुरुस्तीची मोहीम हाती घेतली. या मोहिमेविरोधात राहुल गांधींनी आकाशपाताळ एक केले. मतदार याद्यांमधील चुका दुरुस्त करण्याबरोबरच बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना मतदान करण्यापासून प्रतिबंध करणे, तसेच त्यांची नावे मतदार याद्यांमधून वगळणे हाही निवडणूक आयोगाचा उद्देश आहे. हा उद्देश जाणून घेताच युवराज राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यासारख्या मंडळींनी मतदार यादी शुद्धीकरण अभियानाला प्रखर विरोध करणे चालू केले आहे. निवडणूक आयोगावर दोषारोप करताना राहुल गांधी यांनी आपली राजकीय मती किती अल्प आहे, हेच दाखवून दिले. याच पद्धतीने राहुल गांधी राजकारण रेटू लागले, तर इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसशिवाय एकही पक्ष राहणार नाही. भारतीय जनता पक्षाने सुरुवातीपासून पक्षात दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीची नेतेमंडळी तयार होतील, याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. काँग्रेसमध्ये गांधी घराण्याखेरीज कुणीच नेता म्हणून तयार होऊ नये, यासाठी गांधी घराणे सातत्याने प्रयत्नशील असते. बिहारच्या निवडणुकीने काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना अनेक धडे दिले आहेत. काँग्रेस नेतृत्वाने राजकीय समंजसपणाचे धडे बिहारच्या निकालातून खरोखर घेतले तरच या पक्षाला भवितव्य आहे.

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी – नवशक्ती२५ नोव्हेंबर २०२५)

    केशव उपाध्येमुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment