• अती शहाणा त्याचा...

     



         अयोध्या येथील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाण्याचा निर्णय घेतल्यापासून भारतवर्षातील काही विचारवंत, पत्रकार, बुद्धिवंत मंडळींना भयंकर अस्वस्थ वाटायला लागलं. यांची अस्वस्थता पाहून टीव्हीवरील बातम्यात लागणारे जाहिरातीचे शब्द आठवायला लागतात तडफडतंय नि फडफडतंय.. तळमळतंय नि मळमळतंय जळजळतंय नि हळहळतंय अशी या मंडळींची अवस्था झाली. पंतप्रधानांचा हा निर्णय म्हणजे देशाच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेवरील घाव आहे, असा रडका सूर या मंडळींनी लावला.

         स्वातंत्र्यानंतर सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची मागणी पुढे आली; पण त्याला तत्कालिन पंतप्रधान पं. नेहरू यांनी विरोध केला होता, हे आपल्याला माहिती आहेच. यातून चुकीचे संदेश जातील, अशी भीती त्यांना होती. आपण हिंदुंची बाजू घेतो आहोत, असा संदेश जाता कामा नये, हे  त्यांना वाटत होते. नंतरच्या काँग्रेसशासित पंतप्रधानांनी तीच भूमिका घेतली. याचा दुष्परिणाम म्हणजे सेक्‍युलर असणे म्हणजे सतत हिंदु समाजावर टीका करायची आणि मतांसाठी लांगूलचालन करायचे, ही प्रथा रुढ झाली. शहाबानो प्रकरणात थेट न्यायालयाचा निर्णय बदलण्याचा राजीव गांधी यांचा निर्णय हा या अल्पसंख्यांक अनुनयाचा कळस होता.

         सोमनाथ ते अयोध्या हा या देशातील एक प्रवास आहे. अल्पसंख्य विरुद्ध बहुसंख्य असा लढा कायम ठेऊन मतांचे राजकारण करीत आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू होता. तो संपविण्याचा हा प्रवास आहे. ‘सबका साथ, सबका विकास‘ ही नव्या भारताची भूमिका आहे, हाच या प्रवासाचा अर्थ आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी भावनिक एकात्मता महत्त्वाची असते. अयोध्या आंदोलन हे कधीच मुसलमान समाजाच्या विरोधात नव्हते; पण तसे ते असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न काही जणांनी केला.

     

    निवडक धर्मनिरपेक्षता


           आज नेमके हेच वास्तव समाजाने स्वीकारले आहे. मुस्लिम समाजातील अनेकांनी राम जन्मभूमी हिंदुना देण्यात यावी, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळेच आपण पोटतिडकीने एवढे ‘त्रिकालाबाधित सत्यं‘ वारंवार सांगतो आहोत, तरीही सर्वसामान्य माणूस त्याकडे का काणाडोळा करतो ,या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने ही विचारवंत मंडळी हैराण झालीत.  30-31 वर्षांपूर्वी काश्‍मीर खोऱ्यात राहणाऱ्या पंडितांना एका रात्रीत तेथून हाकलण्याचं आवाहन केलं गेलं, अनेक तरुणी, महिलांवर अत्याचार झाले, त्यावेळी यापैकी एकाही विचारवंताला धर्मनिरपेक्ष प्रतिमेवर घाला घातला गेल्याचं वाटलं नाही. आपली राहती घरे, हवेल्या, जमीनजुमला यावर पाणी सोडून ‘अन्नासाठी दाहीदिशा’ अशी अवस्था झालेल्या पंडितांच्या व्यथांसाठी आपली लेखणी झिजवावी, असा विचार विचारवंत पंथाच्या तमाम अग्रणींच्या मनात आला नाही.  राममंदिर हे विशिष्ट धर्मियांची वास्तू पाडून उभारले जात असल्याने देशातील अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटेल, असा शोधही या मंडळींनी लावला आहे. असे युक्तिवाद पाहिले, की या मंडळींना हिंदू नामक संस्कृती अजून कळली नाही, असे म्हणण्यावाचून पर्याय राहत नाही. या देशात बहुसंख्य असणारा हिंदू कधीच धर्मांध नव्हता, हे कधीच त्यांच्या लक्षात येत नाही.

    6 डिसेंबर 1992 नंतर काश्‍मीरमधील जवळपास 50 मंदिरे धर्मांध शक्तींनी पाडून टाकली. त्याचा बदला म्हणून एकाही धार्मिक स्थळावर हल्ला झालेला नाही. हिंदूंची मानसिकता या मंडळींनी ना कधी ओळखली ना जाणून घेण्याची गरज यांना वाटली. राममंदीर उभारणीमुळे देशाची धर्मनिरपेक्ष प्रतिमा संपुष्टात येईल, अल्पसंख्यकांना असुरक्षित वाटेल वगैरे छापाचे ठोकळेबाज युक्तिवाद करणाऱ्या मंडळींनी फाळणीच्या वेळी भारतातील अल्पसंख्याकांची लोकसंख्या किती होती आणि ती सध्या किती आहे, फाळणीच्या वेळी पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची लोकसंख्या किती होती आणि आता किती आहे, याची तुलना करावी. पाकिस्तान निर्मितीवेळी त्या देशात 23 टक्के असणारी अल्पसंख्याकांची लोकसंख्या तीन टक्‍क्‍यांवर आलीय, एवढी एकच गोष्ट भारताच्या उदारमतवादी संस्कृतीवर प्रकाशझोत टाकणारी आहे.

     

    ना विजय, ना पराभव


            सर्वोच्च न्यायालयानेच वादग्रस्त जागी मंदिर होते याचे पुरावे मान्य करीत त्या जागेवर मंदिर उभारण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने कोणाचा विजय झालेला नाही आणि कोणाचा पराभवही झालेला नाही, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली होती.

           न्यायालयाच्या या निर्णयाचे संयमानेच स्वागत केले गेले. भूमिपूजनप्रसंगी केलेल्या भाषणातही एकाही वक्‍त्याने मंदिर बांधून दाखवलंच, असा ‘जितं मया‘चा सूर लावला नव्हता. झाले गेले विसरून जाऊन आता सर्व समाजघटकांचा विश्वास प्राप्त करून विकासाच्या वाटेवर जायचं आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. या देशाची संस्कृती आणि या मातीत घडलेला सामान्य माणूस याचे आकलन या बुद्धिवंतांना अजून होईनासे झाले आहे. त्यामुळेच या मंडळींना बहुसंख्यकांवर अविश्वास दाखविण्याची दुर्बुद्धी होते. वर्षानुवर्षे हेच नाणे वापरल्याने ते गुळगुळीत झाले आहे, याचेही भान या विचारवंतांना राहिलेले नाही.  अशा मंडळींचे थोडक्‍यात पण योग्य मूल्यमापन करण्यासाठी एक म्हण आठवते, अति शहाणा त्याचा… 

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी सकाळ 11 ऑगस्ट 2020)

    केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता


  • You might also like

    No comments:

    Post a Comment