• राहुलबाबांची "बौद्धिक संपदा" आणि राजकारणाचा अवकाश

        


        राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावणार्‍या सुरत न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेसने आणि काँग्रेसच्या चाहत्या विचारवंतांनी, पत्रकारांनी आकांत सुरु केला आहे. देशातील लोकशाही संपत आली आहे ,देशात जणू हुकूमशाहीच अवतरली आहे, असा आकांत करत या मंडळींनी न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध टीका टिप्पण्णी करत आंदोलन सुरु केले आहे.सुरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना शिक्षा सुनावली आहे. लोकप्रतिनिधीत्व कायद्यात केलेल्या दुरुस्तीनुसार दोन वर्षे शिक्षेच्या न्यायालयाच्या निकालानंतर संबंधित लोकप्रतिनिधीचे सदस्यत्व आपसूक रद्द होते. या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागून त्याला स्थगिती मिळवली तर राहुलबाबांच्या लोकसभा सदस्यत्वावर गदा येत नाही. हा कायदेशीर मार्ग त्वरेने अवलंबण्याऐवजी राहुल गांधी आणि काँग्रेस नेतृत्व न्यायालयाच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर येऊन आंदोलन करत देशाच्या न्याय यंत्रणेवर आपला विश्‍वास नाही, असंच सांगत आहेत. गांधी घराण्यातील व्यक्ती डॉ.आंबेडकरांनी तयार केलेले संविधान, कायदे मंडळाने म्हणजेच संसदेने तयार केलेले कायदे, न्यायालय यापेक्षा मोठ्या आहेत. गांधी घराण्याला देशाचा कायदा लागू होत नाही, असेच या आंदोलनातून भारतीय जनतेच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न चालू आहे. नेहरू-गांधी घराण्याने आणि त्यांची हांजी-हांजी करणार्‍या काँग्रेसने आजवर घटनेचा, लोकशाहीचा आणि न्याय व्यवस्थेचा अनेकदा उपमर्द केला आहे. त्याबाबत नंतर बोलूच .

     

        सुरुवातीला राहुलबाबांचे शिक्षेचे आणि त्यांना अपात्र ठरवण्याचे प्रकरण पाहू. या गदारोळात राहुल गांधी ४ वर्षापूर्वी कर्नाटकातील जाहीरसभेत बोलताना नेमके काय म्हणाले, त्यामागचा त्यांचा हेतू काय होता हेही ध्यानात घ्यायला हवे. त्याचबरोबर राफेल विमान खरेदी व्यवहारात सर्वोच्च न्यायालयापुढे राहुलबाबांनी ४ वर्षापूर्वी कशी बिनशर्त माफी मागितली होती याचे स्मरण करून देणे आवश्यक आहे. ‘चौकीदार चोर है’ हे आपले म्हणणं सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्याचे धडधडीत खोटे विधान राहुल गांधीनी केले होते. राफेल विमान खरेदीला अहवाल देणार्‍या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. या याचिकांच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने काही कागदपत्रासंदर्भात केंद्र सरकारने केलेली विनंती अमान्य केली होती. त्याचा आधार घेत राहुलबाबांनी ‘चौकीदार चोर है’ या घोषणेवर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे, असे विधान केले होते. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. तेव्हा कुठे राहुलबाबांना आपण काय म्हणालो होतो हे कळले. त्यांच्या विधानाचे काय गंभीर परिणाम होणार आहेत, हे समजावून सांगितल्यावर राहुलबाबांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर लोटांगण घालत माफी मागितली. आपली घोडचूक मान्य केली. या महाशयाला बौद्धिक संपदा हक्क देऊन उपयोग नाही , अशी जगन्नियंत्याची इच्छा असेल तर आपण काय करणार , असं म्हणण्या इतपत या महाशयांचे वागणे बोलणे आहे.

     

        देशावर अनेक वर्षे सत्ता गाजवलेल्या घराण्याचे आपण प्रतिनिधी आहोत त्यामुळे आपल्याला कुणाचाही अपमान करण्याचा अधिकार मिळाला आहे, या थाटात महाशय वावरत असतात. आक्षेप त्यालाही नाही. आपण जे काही बोलतो, वागतो त्याचा अर्थच या महाशयांच्या बौद्धिक अवकाशात शिरू शकत नाही. त्यामुळेच पुढची रामायणं, महाभारतं घडतात. त्यांना शिक्षा सुनावण्याचे प्रकरण राहुलबाबांच्या नेहमीच्या वाईड बॉल टाकण्याच्या सवयीमुळे उद्भवले आहे. गांधी घराण्याचे चाहते, काँग्रेस समर्थक, विचारवंत, पत्रकार ही गोष्ट मान्य करणार नाहीत. २०१४ पासून विरोधी पक्षाच्या भूमिकेत गेल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या वलयाचा सामना करण्यासाठी आपण मोदींवर आक्रमक भाषेत टीका केली पाहिजे अशी समजूत करून राहुलबाबांनी आपल्या राजकीय अकलेचे भले मोठे भांडार खुले करण्यास सुरुवात केली. ज्या कायद्यामुळे राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले त्या कायद्यातील दुरुस्ती, त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल, हा निकाल रद्दबातल ठरवण्यासाठी डॉ.मनमोहन सिंग यांच्या सरकारने काढलेला वटहुकूम, हा वटहुकूम मुर्खपणाचा आहे, असे म्हणत त्याची प्रत पत्रकार परिषदेत जाहीरपणे फाडण्याचे राहुल गांधींचे कृत्य हा इतिहास एव्हाना सर्वांना ठाऊक झाला आहे. त्यामुळे त्याची पुनरुक्ती करण्याची आवश्यकता नाही. राहुलबाबांच्या या ‘हम करे सो कायदा’ वर्तनाकडे पाहिल्यावर त्यांच्या पणजोबांच्या वर्तनाचा इतिहास आठवतो.

     

    अमन का झंडा इस धरती पर

     

    किसने कहा लहराने न पाए

     

    ये भी कोई हिटलर का है चेला

     

    मार लो साथ जाने ना पाए!

     

    कॉमनवेल्थ का दास है नेहरु

     

        मार ले साथी जाने न पाए...” ख्यातनाम गीतकार मजरुह सुलतानपुरी यांनी या आपल्या कवितेतून पंडित नेहरूंवर टीका केली असा आरोप करत त्यावेळच्या मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यांना तुरुंगात टाकले होते. या कवितेबद्दल सुलतानपुरी यांनी माफी मागावी असे त्यांना तत्कालीन काँग्रेस सरकारकडून सांगितले गेले होते. मात्र सुलतानपुरी यांनी माफी मागण्यास नकार दिल्याने त्यांना तुरुंगात टाकले गेले. एक वर्षभर ते तुरुंगात होते. काँग्रेसचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरेंबाबतचे प्रेम किती मतलबी आहे , हे सिद्ध करण्यासाठी हे एकच उदाहरण पुरेसे ठरेल. आणीबाणीत विचार स्वातंत्र्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दिवसाढवळ्या गळा घोटणाऱ्या काँग्रेसने आज लोकशाहीच्या नावाने भोकाड पसरावे हा नियतीने काँग्रेसवर उगवलेला सूडच म्हणावा लागेल.आणीबाणीत पडद्यावर आलेला “आंधी” चित्रपटातील नायिकेच्या व्यक्तिरेखेचे इंदिराजींशी साधर्म्य आहे , असा संशय घेऊन या चित्रपटावर बंदी घातली गेली. न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेचे निमित्त करून आपण राहुलबाबांची प्रतिमा उजवळून टाकू असा भ्रम झालेल्या विचारवंत मंडळींना आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार हे अजून ध्यानात येत नाही . जनतेने राहुलबाबांची नेतृत्वाची म्हैस किती पाण्यात आहे हे २० वर्षे पाहिले आहे. म्हणूनच राहुलबाबांच्या प्रतिमेला कितीही ग्लो आणण्याचा प्रयत्न केला तरी पाटी कोरीच राहणार हे लक्षात घेणे पक्षाच्या आणि राहुलबाबांच्या हिताचे ठरेल. राजकारणाच्या अवकाशात राहुलबाबांचे अस्त्र झेपावू शकत नाही, हे वारंवार दिसूनही काँग्रेसला याच अस्त्राचा वापर करावा लागतोय, हे काँग्रेस चे दुर्दैव.

     

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी – महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, २७ मार्च . २०२३)

     

    केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता


  • You might also like

    No comments:

    Post a Comment