• गोष्ट कारसेवेची,अटकेची अन् तो दिवस हुकल्याची…

     



    अयोध्येत आता भव्य राम मंदिर साकारत असताना अगणीत अ आठवणींचा इतिहास डोळ्यांसमोर तळरतोय. लाखो कारसेवकांच्या संघर्षातून, त्यागातून आणि बलिदानातून आज या भव्य मंदिराची पुनस्र्थापना होत आहे. कारसेवकांच्या आयुष्यातील सर्वाधिक आत्मीक समाधान देणारा हा दिवस आहे.

    महाविद्यालयात असताना सोलापुरात लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा आली होती. या यात्रेत लोक रस्त्यात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करत आणि त्यामुळे नियोजित वेळ टळून कित्येक तास उशिरा यात्रा सोलापुरात दाखल झाली होती. सोलापूर बस स्थानकापासून ते होम मैदानापर्यंत भव्य स्वागत आणि तेवढीच भव्य सभा झाली, ती आजही डोळ्यांसमोर आहे. भारावून टाकणारे ते वातावरण आठवले तरी अंगावर रोमांच येतो.

    मी तेव्हा अभाविपचे काम करायचो. आम्ही कॉलेजवर अनेक कार्यक्रम केले, उपक्रम राबवले होते. त्याचदरम्यान कानपूरला अभाविपचे राष्ट्रीय अधिवेशन होते. आम्ही सोलापुरातून काही कार्यकर्ते गेलो होतो. या अधिवेशनाला जोडूनच आम्ही अयोध्येला गेलो. ढाचाचा भाग वगळून काही बांधकाम सुरू झाले होते. आम्ही रामलल्लाचे दर्शन घेतले आणि सुरू असलेल्या कारसेवेत भागही घेतला. नंतर अयोध्येतून सोलापुरात परतल्यावर अजून जोमाने कामाला लागलो.

    सोलापूरहून ६ डिसेंबरच्या कारसेवेसाठी २ डिसेंबर रोजी कारसेवक जाणार होते. खरं तर या कारसेवेला जायचं, अशी तयारीही केली होती, पण दोन दिवस आधी माझ्याच महाविद्यालयावर आम्ही 'भगवा डे' आयोजित केला होता. जसे इतर दिवस टाय डे, रोज डे आदी असतात, तसा हा 'भगवा डे'. महाविद्यालयाच्या गेटवर विद्यार्थ्यांनी 'भव्य राम मंदिर व्हावे', या निवेदनावर सही करावी आणि कपाळावर त्या संकल्पाचा भगवा टिळा लावून आत जावे, असा हा 'भगवा डे' होता आणि त्याच वेळी माझे गेटवर भाषणही झाले. या उपक्रमाला उपस्थित मुले प्रचंड प्रतिसाद देत होती. सह्या वाढत होत्या, कॉलेजमध्ये भगवा टिळा लावलेली मुले सगळीकडे दिसत होती.


    पोलिसांनी घेतले ताब्यात..

    असेच सर्व नीट सुरळीत सुरू असतानाच अचानक पोलिसांची गाडी आली, समोरच मी होतो. पोलिसांनी आधी मला ताब्यात घेतले आणि काही कळायच्या आत पोलीस स्टेशनमध्ये नेले. माझ्या पाठोपाठ सोडवायला अभाविपसह परिवाराचे अनेक कार्यकर्ते धावत आले, पण तेव्हा सोलापूर हे संवेदनशील शहर होते. पोलिसांना कोणीतरी फोन करून सांगितले होते, आमच्या 'भगवा डे' कार्यक्रमाबद्दल. त्यातून त्यांनी कारवाई केली होती. पोलीस तसे सोडायला तयार नव्हते.

    दुसरा दिवस सुट्टीचा होता. न्यायलय बंद. आमचा मुक्काम तिथेच पण पोलिसांनी खूप चांगले सरकार्य केले. अखेर सुट्टीच्या न्यायालयातून जामिनावर आमची सुटका झाली. पण या गडबडीत २ डिसेंबरची अयोध्येला जाणारी गाडी हुकली अन् मुख्य कारसेवाही!

    अर्थात त्या दिवसाची कारसेवा चुकली म्हणून बैचेन होतो.. झोप नाही लागली.. पण मंदिर होणार हा अतूट विश्वास मात्र होता..तो आज सार्थ ठरतो


    (लेखाची पूर्वप्रसिद्धी – प्रहार, २० जानेवारी २०२४)

    केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment