• पहिली बाजू : हा पराभवापूर्वीचा आकांत!

    उद्धव ठाकरेंनी स्वत:ला राजकीय एकारलेपणाच्या सर्वोच्च पातळीला का नेले याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार होणे गरजेचे आहे. त्यांच्या सध्याच्या वक्तव्यांमागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी डॉ. सिग्मंड फ्रॉइड यांनी मांडलेल्या ‘बिहेव्हिअर थेरपी’ आणि ‘कॉग्निटिव्ह थेरपी’ या दोन्ही पद्धतींचा आधार घ्यावा लागेल. स्वतचे वेगळेपण दाखविण्यासाठी त्यांना टोकाच्या वक्तव्यांचा आधार घ्यावा लागत आहे. या स्थितीला आपणच जबाबदार आहोत हे मात्र त्यांचे मन कदापि मान्य करणार नाही…



              शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे वैफल्य, अगतिकता आता रायगडाच्या टकमक टोकापर्यंत जाऊन पोहोचली आहे. संघाचे फडके देशावर फडकू देणार नाही, अशा विचार मौक्तिकांद्वारे उद्धवरावांनी आपल्या थोड्याफार राजकीय शहाणपणाचा कडेलोट केला आहे. मोठ्या पराभवाच्या शक्यतेने आणि आपल्या अस्तित्वाच्या भीतीने त्यांची भाषा, एकूणच वर्तन हाराकिरीकडे वाटचाल करत आहे, असे स्पष्टपणे दिसते. पराभवापूर्वीचा हा त्यांचा आकांत ४ जून रोजी आणखी वाढेल. असो! मुद्दा आहे उद्धव ठाकरेंनी स्वत:ला राजकीय एकारलेपणाच्या सर्वोच्च पातळीला का नेले हा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ओढून ताणून आणत उद्धवरावांनी आपले राजकारणातले मडके किती कच्चे आहे हे दाखवून दिलेच. स्वातंत्र्याला ७५ वर्षे होऊन गेल्यावरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल नियमित टीका टिप्पणी होत आहे. यातला मुख्य वाटा साम्यवादी, समाजवादी, काँग्रेस विचारसरणीतल्या विचारवंतांचा आणि या विचारसरणीच्या छत्रछायेत राहणाऱ्या पत्रकार, कलावंत मंडळींचा असतो.

    काँग्रेसनेही अशी भाषा वापरली नाही

    इंदिरा गांधींनी १९७५ मध्ये आणीबाणीत संघ स्वयंसेवकांना तुरुंगात डांबले, त्याआधी महात्मा गांधींच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली गेली होती, १९९२ मध्ये बाबरी मशिदीच्या पतनानंतर पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली गेली. यथावकाश ती उठवली गेली. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत काँग्रेस नेतृत्वानेही अशी भाषा कधी वापरली नव्हती. शाही इमाम, सैद शहाबुद्दीन, ओवैसी बंधू आदी नेते मंडळींनीही जी भाषा वापरली नव्हती ती भाषा वापरण्यापर्यंत उद्धव ठाकरे यांची मजल का गेली असावी, या मागच्या कारणांचा शोध राजकीय विश्लेषक वगैरे वर्गातील मंडळी घेतील की नाही ही शंका आहे. कारण हा वर्ग उद्धवरावांवर सध्या तुफान प्रेम करू लागला आहे. भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याबद्दल ताळतंत्र सोडून अद्वातद्वा बोलणारा एखादा नरपुंगव त्यांना हवाच असतो. हाच आपला तारणहार म्हणून ही मंडळी अशा नरपुंगवामध्ये आपली वैचारिक संपत्ती गुंतवतात. उद्धवरावांच्या गेल्या २१-२२ महिन्यांतील वर्तनाचा मानसशास्त्राच्या दृष्टीने शोध घेतला तर त्यांच्या वक्तव्यांमागची अपरिहार्यता कळू शकेल. मानसशास्त्र हा शब्द जाणीवपूर्वक वापरण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्धवरावांनी खंजीर खुपसून मिळवलेले मुख्यमंत्रीपदाचे आसन एकनाथ शिंदे या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा सच्चा पाईक असलेल्या शिलेदाराने अलगद काढून घेतले.

    ज्या विश्वासघाताच्या पायावर उद्धवरावांनी महाविकास आघाडीचा पाया रचला होता त्यामागे फक्त मुख्यमंत्रीपदाचा स्वार्थ होता. याच मुख्यमंत्रीपदाच्या जोरावर बेताल झालेले उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चिरंजीवांनी- आदित्य ठाकरे यांनी आपले भाजपविरोधातील काँग्रेसच्या आघाडीतील स्थान पक्के केले. हे आसन गेले, वंदनीय बाळासाहेबांना मानणारा कडवट शिवसैनिक सोडून गेला अशा स्थितीत उबाठांना काँग्रेस, शरद पवार यांच्यासारख्यांचे बोट धरून चालण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी यांच्याबाबत असभ्य भाषा वापरून आपला जनाधार वाढेल ही शक्यताही मावळत चालली.

     

    ‘मेथड इन मॅडनेस’

    आपल्या पिताश्रींनी निष्ठावंत साथीदारांच्या साहाय्याने वर्षानुवर्षे बांधलेली संघटना मोडीत काढल्याने काँग्रेस आणि शरद पवारांच्या सहानुभूतीदारांच्या बळावर लढण्याची वेळ उद्धवरावांवर आली. या बळावर आपली गुजराण होणार नाही हे जसजसे लक्षात येऊ लागले तसतसे उद्धवरावांचे वर्तन असाहाय्यतेकडे कलू लागले. इंग्रजीत ‘मेथड इन मॅडनेस’ या शब्दप्रयोगाचा अनेकदा वापर होतो. लोकांना वेडपट, विचित्र वाटू शकणारे पण अंतिमत: त्याचा फायदा होणार असे वर्तन या शब्दप्रयोगाद्वारे वर्णन केले जात असे. या आधारे उबाठांच्या वर्तनाचा मागोवा घेण्यात काही हशील नाही.

    १८७९ साली जर्मनीमध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू झाली. त्याच वेळी आधुनिक मानसोपचार पद्धती जन्माला आली. सिग्मंड फ्रॉइड यांनी अनेक नवीन संकल्पना मांडत या शास्त्राची मांडणी केली. डॉ. फ्रॉइड यांच्या मनोविश्लेषण पद्धतीनंतर, वर्तन-चिकित्सा म्हणजे ‘बिहेव्हिअर थेरपी’ तसेच चिंतन-चिकित्सा म्हणजे ‘कॉग्निटिव्ह थेरपी’ उपचार म्हणून वापरल्या जाऊ लागल्या. फ्रॉइड यांनी ‘सुप्त मनाचा सिद्धांत’ मांडला. माणसाला अधिकाधिक बोलायला लावून, भूतकाळ आठवायला प्रेरित करून त्याला पडणाऱ्या स्वप्नांचे विश्लेषण करणे म्हणजेच ‘मनोविश्लेषण’ ही पद्धती त्यांनी विकसित केली.

     

    वेगळेपण दाखविण्याची धडपड

    उबाठांच्या सध्याच्या वक्तव्यांमागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी डॉ. सिग्मंड फ्रॉइड यांनी मांडलेल्या या ‘बिहेव्हिअर थेरपी’ आणि ‘कॉग्निटिव्ह थेरपी’ या दोन्ही पद्धतींचा आधार घ्यावा लागेल. आपल्याला अस्तित्व टिकवायचे असेल तर काँग्रेस, शरद पवार यांच्याही पुढे जावे लागेल, असे अस्तित्वाच्या भीतीने ग्रासलेल्या उबाठांच्या मनात पक्के बसले आहे. भाजपविरोध सगळ्यांचाच आहे, मग माझे वेगळेपण काय हे दाखविण्यासाठी त्यांना अशा टोकाच्या वक्तव्यांचा आधार घ्यावा लागतो आहे. असे करून आपण देशभर मुस्लिमांचे मसिहा ठरू हा आशावाद त्यांच्या मनोव्यापारात अग्रस्थानी आहे, असे सिग्मंड फ्रॉइडच्या चिंतन चिकित्सेआधारे म्हणता येईल. या स्थितीला आपणच जबाबदार आहोत हे उबाठांचे मन कदापि मान्य करणार नाही. अखेरीस उरतो पर्याय कर्कशतेकडे जाण्याचा. आपला भाजपविरोध, हिंदुत्वविरोध तुमच्यापेक्षा कडवा, जहाल आहे हे सिद्ध करण्याच्या हट्टामुळे ते स्वत:हून टकमक टोकाकडे निघाले आहेत, असे म्हणण्यावाचून पर्याय नाही.

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी-लोकसत्ता ,२१ मे २०२४)

    केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment