पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देशातील मुस्लीम
धर्मियांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला मुस्लिम समुदायाला दिला आहे.
मुस्लीम समुदायाने मुल्लामौलवींच्या प्रभावाखाली न येता स्वतंत्रपणे विचार करावा,
असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसचा मुस्लीम अनुनय देशासाठी घातक
आहे, याकडेही मोदी यांनी लक्ष वेधले आहे.
लोकसभा
निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील
काही आश्वासनांचा उल्लेख करत या पक्षाचा मुस्लीम अनुनयवादी दृष्टिकोन या समुदायाला
आणि देशालाही घातक आहे, असे सांगितले होते. काँग्रेस
जाहीरनाम्याच्या संदर्भात पंतप्रधानांच्या मुस्लीम धर्मियांसंदर्भातील टिप्पणीमुळे
राजकीय वर्तुळात आणि प्रसार माध्यमात चर्चा सुरु होणे अपेक्षित होते. कारण आजवर
एखाद्या धर्माला उद्देशून अशी टिप्पणी मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत कधीच केली
नव्हती. या पार्श्वभूमीवर मुस्लीम समाजातील काही मुल्ला-मौलवींनी भाजपाविरोधात
मतदान करण्यासाठी काढलेल्या फतव्यांकडे पहायला हवे.
पंतप्रधान
मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुस्लीम धर्मियांच्या संदर्भात
काही महत्त्वाची विधाने केली आहेत. ही विधाने स्वातंत्र्योत्तर काळात हिंदू-
मुस्लीम धर्मियांत विविध कारणांमुळे निर्माण झालेल्या दुराव्याच्या परिप्रेक्ष्यात
पहायला हवीत. कितीही नाकारले तरी गेल्या ७५ वर्षांत देशाच्या या दोन प्रमुख
धर्मियांमधील सलोख्याच्या वातावरणाला अनेक तडे गेले आहेत, हे नाकबूल करुन चालणार नाही. या ७५ वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेऊन
पंतप्रधानांनी मुस्लीम समुदायाला आत्मपरीक्षणाची कडवट मात्रा दिली आहे.
‘आम्ही मुस्लिमांच्या किंवा इस्लामच्या विरोधात नाहीत. मुस्लीम समुदायातील
सुशिक्षितांनी आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार करुन आत्मचिंतन करावे. आपण
आपल्या मताच्या जोरावर कुणाला सत्तेत बसवू शकतो किंवा कुणाला सत्तेतून खाली खेचू
शकतो, या प्रकारची विचारसरणी मुस्लीम समाजाने बाळगू नये. या
धर्मातील लोकांनी वेठबिगारासारखे कोणाच्या दबावाखाली वागू नये आणि आपली प्रगती
थांबवू नये’, असे खडे बोल पंतप्रधानांनी या मुलाखतीत सुनावले
आहेत. हिंदू-मुस्लीम धर्मियांमधील गेल्या ७५ वर्षांतील संबंधांचा धांडोळा घेतला तर
पंतप्रधान मोदी यांनी जखमेच्या मुळाशीच हात घातला आहे, असे
म्हणावे लागते. आपला देश वेगाने प्रगती करत आहे, विकसित
देशांशी स्पर्धा करत आहे. असे असताना मुस्लीम समुदाय मागे का राहत आहे, याची कारणे तुम्हाला शोधाविशी का वाटत नाहीत? असा
प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी मुस्लीम धर्मियांना विचारला आहे. आपण प्रथमच या
पद्धतीने मुस्लीम समुदायाला आवाहन करत आहोत, असे सांगत
पंतप्रधानांनी आमच्या सरकारच्या कार्यकाळात तुम्हाला सरकारी योजनांचे फायदे मिळाले
नाहीत का? असाही सवाल केला. मुस्लीम धर्मियांना आजवर मतपेढी
म्हणून वागवणाऱ्या या धर्माच्या ठेकेदारांना आणि या धर्मियांच्या मतांच्या जोरावर
सत्ता भोगणाऱ्या काँग्रेससह अनेक पक्षातील प्रस्थापितांना पंतप्रधान मोदी यांचे
कडवे बोल पचणार नाहीत. काँग्रेसच्या काळात या धर्मियांच्या वाट्याला आलेला विकास
आणि मोदी सरकारच्या काळात या धर्मियांमधील शोषित, वंचित,
गोरगरिब वर्गाला मिळालेला विकास योजनांचा लाभ याची तुलना केल्यावर
या धर्मातील नागरिकांनी आपला खरा तारणहार कोण, याचा विचार
जागरूक होऊन करण्याची नितांत गरज आहे. या धर्माच्या ठेकेदारांनी या समुदायाला
मतपेढी म्हणून वापरताना आपले उखळ पाढरे करुन घेतले. मात्र गेल्या ७५ वर्षात हा
समुदाय अपेक्षित प्रगती का करु शकला नाही, असा प्रश्न
विचारण्याचे धाडस या धर्मातील सुशिक्षितांनी कधी केले नव्हते. कडवट आणि कर्मठ
विचारसरणीच्या मुठभर मंडळींनी संपूर्ण समुदायाला दहशतीच्या छायेत ठेवले आहे. या
दहशतीच्या छायेत राहून तुम्ही प्रगती करु शकणार नाही, असे
सांगत पंतप्रधानांनी या धर्मियांतील सुजाण आणि सुशिक्षितांना पुढच्या पिढीच्या
भवितव्याचा विचार करण्याचे केलेले आवाहन या समुदायाचे भले करण्याच्या प्रामाणिक
हेतूनेच केले आहे.
१९८६
मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शहाबानो या महिलेला पोटगी देण्याचा आदेश दिल्यानंतर
मुस्लीम धर्मातील कर्मठ आणि पुराणमतवाद्यांनी तत्कालीन राजीव गांधी सरकारवर दबाव
आणून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रद्द करण्यासाठी तेव्हाच्या सरकारला घटना
दुरुस्ती करण्यास भाग पाडले. तर मोदी सरकारने या धर्मातील तिहेरी तलाकसारखी
मुस्लीम महिलांवर अतोनात अन्याय करणारी प्रथा बंद केली. रामजन्मभूमीसारख्या
प्रश्नातही या धर्मातील कट्टरतावाद्यांनी घेतलेली भूमिका देशातील धार्मिक सामंजस्य
बिघडवण्यास कारणीभूत ठरली. गेल्या २५-३० वर्षांत पाकिस्तानने भारताला अस्थिर
करण्यासाठी दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून केलेले षडयंत्र आणि त्याला आपल्याच
देशातील काही घटकांकडून मिळालेली साथ हाही हिंदू-मुस्लीम धर्मियांतील संबंधाचा
विखारी आयाम आहे. या धर्मियांतील तरुणांना याच देशाविरुद्ध जिहाद करण्यासाठी
चिथावले जात असताना बहुतांश राजकीय पक्षांनी आणि एकूणच व्यवस्थेने त्याकडे केलेले
दुर्लक्ष या बाबी या समुदायाबद्दलचा दृष्टिकोन अधिक दूषित करणाऱ्या ठरल्या आहेत.
ही
व्यापक पार्श्वभूमी लक्षात घेता पंतप्रधान मोदी यांनी या समुदायातील शिक्षितांना
या धर्माच्या ठेकेदारांविरुद्ध उभे ठाकण्याचे केलेले आवाहन अनेक अर्थाने
महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेससारख्या देशाची सत्ता अनेक वर्षे भोगणाऱ्या पक्षाने
आपल्यासाठी काय केले? आज हाच पक्ष आपल्याला पुन्हा आश्वासने
देतो आहे, मग या आश्वासनांवर भुलून मतदानाला बाहेर पडायचे का?
असा खडा सवाल पंतप्रधान मोदी यांनी विचारला आहे. पंतप्रधान आवास
योजना, स्वच्छतागृह बांधणी, मुद्रासारख्या
स्वयंरोजगाराच्या योजना याचा फायदा लाखो मुस्लिमांना झाला आहे. पंतप्रधान मोदी
यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या आपल्या काश्मीर दौऱ्यात तेथील लाभार्थींशी
संवाद साधला होता. या संवादात अनेक मुस्लीम तरुण-तरुणी तसेच महिला मोदी सरकारमुळे
आपल्याला झालेल्या फायद्यांबद्दल भरभरुन बोलत होते. याच मुलाखतीत पंतप्रधानांनी या
समुदायाला भारतीय जनता पक्षाबद्दलचे गैरसमज दूर करण्याचे आवाहन केले. तुम्ही
स्वत:हून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये मिसळलात तर तुम्हाला कुणीच बाजूला करणार नाही,
कोणाला धर्माच्या आधारावरुन त्रास देणे ही आमची संस्कृती नाही,
त्यामुळे तुम्ही कोणाला घाबरु नका, अशा शब्दात
पंतप्रधानांनी या समुदायाला आश्वस्त केले. पंतप्रधानांचा हा मनमोकळा संवाद आणि
त्याचवेळी त्यांनी दिलेली कडवट मात्रा या समुदायाला आत्मचिंतनासाठी प्रवृत्त करेल
अशी आशा आहे.
(लेखाची पूर्वप्रसिद्धी- नवशक्ती,१४ मे २०२४)
केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता
No comments:
Post a Comment