गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यानंतर येणारा हा दुसरा वाढदिवस. आजही महाराष्ट्रातील कार्यकर्ते गोपीनाथ मुंडे यांचे नाव काढताच गहिवरतात. महाराष्ट्राच्या भूमीने प्रत्येक काळात अनेक नेते दिले. या नेत्यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक चांगले निर्णय घेत राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. काही देण्याचा प्रयत्न केला. मात्र काही जणांनी आपला ठसा समाजावर कायमस्वरूपी उमटवला. सत्तेच्या वर्तुळाशी या नेत्यांचे देणेघेणे नसते. सत्तेने येणाऱ्या लोकप्रियतेचे या मंडळींना महत्त्व नसते. सत्ता असो, अथवा नसो, लोकांमध्ये या नेत्यांचे स्थान मोठे राहिले. गोपीनाथ मुंडे यांचे नाव या अशा नेत्यांमध्ये येते.
गोपीनाथ मुंडे यांचा प्रवास म्हणजे केवळ एका सर्वसामान्य कुटुंबातल्या एका व्यक्तीचा नाही तर हा प्रवास आहे एका विचाराचा. राजकारणात असूनही सामाजिक प्रश्नांवर गुळमुळीत भूमिका न घेणाऱ्या राजकीय नेत्याचा, उपेक्षितांच्या संघर्षाचा चेहरा असलेल्या नेत्याचा; युनोसारख्या व्यासपीठावर भूमिका मांडायला मिळाली तरी मातीशी नाते न सोडलेल्या नेत्याचा. पक्षाचा केवळ विस्तारच नाही तर त्याला सर्वव्यापी करण्याचा ध्यास घेतलेल्या, सतत लोकांशी संवाद साधत असलेल्या नेत्याचा प्रवास होता.
इनमिन साडेचार वर्षांचा युतीचा कालखंड सोडला तर मुंडेंचं सर्व राजकीय जीवन हे विरोधी पक्षात गेलं. पण त्यांच्या भोवतालचं वलय मात्र कायम राहिलं ते एखाद्या सत्ताधाऱ्याला पण मत्सर वाटावा असं. राजकीय नेत्याचं यशस्वीपण हे नेहमी त्याच्या दारात असणाऱ्या चपलांवरून ओळखावं असं आपल्याकडे म्हटलं जातं. या निकषावर तर मुंडे साहेबांसारखा यशस्वी लोकनेता विरळाच म्हणायला हवा.
लोकवैभवाची श्रीमंती ही सहज मिळालेली नव्हती. संघर्ष हा त्यांचा स्थायीभाव होता. केवळ लोकानुनयी राजकारण करायला त्यांचा विरोध होता. खरं तर राजकीय लोकांना सामाजिक भूमिका घेताना अनेक वेळा अडचण होत असते. महागाई, भ्रष्टाचार अशा विषयांवर आंदोलने करण्यात काही अडचण नसते; पण सामाजिक विषयावर भूमिका घ्यायची वेळ आली की मात्र राजकीय नेते अनेक वेळा गोलमोल भूमिका घेतात. पण मुंडेंचा हा स्वभाव तसा नव्हता.
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा विषय आला त्या वेळी भाजपने नामांतराच्या बाजूने भूमिका घेतली. इतकेच नव्हे त्या वेळी गोपीनाथराव मुंडे साहेब मराठवाड्यात, नामांतर झाले पाहिजे हे सांगण्यासाठी फिरले. त्या वेळच्या सामाजिक वातावरणात हे सोपं नव्हतं.
दुसरा प्रसंग मंडल आयोगाच्या वेळी देशात असेच वातावरण होते, पण मुंडे साहेबांनी आग्रहाने मंडल समर्थनार्थ भूमिका मांडली. युती सरकारच्या काळात गणपती दूध पिण्याची अफवा पसरली होती. महाराष्ट्रात सर्वजण तेव्हा गणपती दूध पितो हे सांगत होते, तेव्हा माझा गणपती दूध पीत नाही हे त्यांनी सांगितले.
अगदी गेल्या लोकसभेत भटक्या विमुक्तांची जनगणना झाली पाहिजे हे ठासून सांगणारे त्यांचे भाषण. त्यांच्यातलं वेगळेपण सांगत होते. उपेक्षितांचा ते आवाज बनले, समाजातल्या कोणत्याही घटकावर अन्याय झाला की मुंडे त्याविरोधात आवाज उठवायचे. घटना लहान असो की मोठी, तात्काळ धाव घ्यायचे. कोठेवाडीसारखं अलीकडच्या काळातील अत्याचार प्रकरण असो की गोवारी हत्याकांडाचा मुद्दा. मुंबई-पुणे महामार्गावर पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार असो सर्वात प्रथम मुंडे तिथे पोहोचलेले असायचे. पूर्ण माहिती घेऊन ते विधानसभेत जोरदार आवाज उठवायचे. विधानसभेलाही मुंडेंच्या मतांची दखल घ्यावी लागत असे.
सर्वसामान्यांनाही मुंडे यांचा आधार वाटायचा. अनेक प्रकारची माणसं त्यांच्याकडे प्रश्न घेऊन यायची. प्रत्येकाशी ते बोलायचे. त्यांच्या कार्यालयात कॉर्पोरेटमधला टायबूटवाला आणि कुठल्या तरी खुर्द - बुद्रुकमधला मुंडासे, पागोटेवाला या दोघांनाही समान वागणूक मिळायची. येणाऱ्या प्रत्येकाशी दोन शब्द तरी बोललं पाहिजे हा त्यांचा नियम होता. त्यातून घड्याळ पुढे पळायचे.लोकांना भेटण्यात आणि त्यांची कामे मार्गी लावण्यात मग्न असलेल्या मुंडेंना वेळेची आठवण करून दिली की, "माझ्या वेळेपेक्षा सामान्य कार्यकर्त्याची वेळ महत्त्वाची आहे म्हणून त्याचं काम होऊ दे, मग आपण निघू” असे ते सांगायचे. येणारी कामे पण भन्नाट असायची. नोकरी नाही, धंद्याला बँक कर्ज देत नाही इथपासून ते एखादा येऊन भेटायचा आणि सांगायचा, "साहेब, जावई लेकीला नीट वागवत नाही, तुम्ही काही सांगा.' आणि प्रथमच भेटत असलेल्या त्या गृहस्थाच्या जावयाला मुंडे फोन लावायचे आणि "ती माझी मुलगी आहे, नीट सांभाळ' असा प्रेमाने दम द्यायचे. हा गृहस्थही साहेबांना धन्यवाद देत निघून जायचा. जनतेत त्यांना रमलेलं आवडायचं. हीच त्यांची ऊर्जा होती.
राजकीय संघर्ष तर पराकोटीचा होता. 1992 मध्ये विरोधी पक्षनेता झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात आवाज उठवला. त्या वेळी शरद पवारांच्या विरोधात संघर्ष करण्यावरून त्यांना अनेकांनी वेगवेगळे सल्ले दिले. पवारांविरुद्ध लढणे म्हणजे मुंडे दगडावर डोकं आपटून घेत आहेत, असे अग्रलेख वर्तमानपत्रात आले होते, पण मुंडेंनी जिद्द सोडली नाही आणि नंतर झालेला सत्तांतराचा इतिहास ज्ञात आहे. अनेक वेळा अपयश आले तरी मुंडे पुन्हा जिद्दीने कामाला लागायचे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस होता. निकाल अपेक्षेप्रमाणे नव्हता. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार हे स्पष्ट झाल्यामुळे भाजप प्रदेश कार्यालयावरसुद्धा एक निराशा दिसत होती. मुंडे साहेब दुपारी 4 च्या सुमारास दाखल झाले. आमचे सगळ्यांचे चेहरे पाहून आमच्या पाठीवर थाप मारून म्हणाले, चला, उद्यापासून परत कामाला लागायचे. कार्यालयात बसून सगळ्यांना फोन केले; जिंकलेल्यांचे अभिनंदन तर पराभूत झालेल्यांचे चांगलं लढलास म्हणून सांत्वन केले. मुंडे साहेब म्हणजे ऊर्जा आणि परिस्थितीशी सतत केलेला संघर्ष. सहकार क्षेत्रात भाजप नाही पण त्यात खरी ताकद आहे हे त्यांनी ओळखले आणि त्यातून सहकारी साखर कारखाना सुरू केला. महाराष्ट्रातील एक आदर्श कारखाना म्हणून या कारखान्याकडे पाहिले जाते.
आयुष्यभर संघर्ष करणारा हा नेता अचानकपणे सोडून
गेला. त्यांची संघर्षाची प्रवृत्ती माहीत असल्यानेच की काय, मृत्यूने त्यांना थोडीही उसंत दिली नाही. आज गोपीनाथराव मुंडे साहेब
आपल्यात नाहीत; पण सुदैवाने त्यांचा वारसा जिद्द, ऊर्जा आणि आशावाद या रूपाने आमच्यात आजही आहे आणि कायम राहील. त्यांच्याच
तालमीत तयार झालेली फळी त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यास सज्ज आहे.
(लेखाची
पूर्वप्रसिद्धी – दिव्य मराठी, 12
डिसेंबर 2015)
No comments:
Post a Comment