म्हणतां म्हणतां अजून एक वर्ष संपले. मागे वळून पाहताना संचिताची शिदोरी काय जमली याचा शोध घेऊ म्हटल. तस म्हटल तर मागच्या वर्षाप्रमाणेच हे पण एक वर्ष. तितकेच महिने, तितकेच दिवस, तितकेच वार…पण निसर्गही कमाल करतो. वर्ष तेच असल तरी प्रत्येकाचे अनुभव वेगळे. काही कमालीचे यशाच्या हिंदोळ्यावर आनंदी होत 'सेलिब्रेशन' करतायत तर काही अपयश, निराशेच्या खाईत वर्ष संपण्याची वाट पहात आहेत. यश-अपयश हे तर एकत्र चालणारे घटक. दिवसरात्र जसं अनिवार्य तसं असेल कदाचित. रात्रीच्या विश्रांतीनंतर माणूस ताजातवाना होऊन कामाला लागतो तस अपयशाच्या अनुभवातून तो यशाचा आनंद जास्त साजरा करीत असेल. त्यामुळे सर्वसामान्यांप्रमाणे माझ्याही वर्षाभराच्या शिदोरीत दोन्ही घटक होते. किंबहुना ते वर्षानुवर्षे शिदोरी तशीच भरत आलीय. या शिदोरीवर तर वाटचाल सुरू असते.
ही शिदोरी भरण्यास अनेकांचे हातभार लागले आहेत. अनेकवेळा आपणास विरोध/टीका करणारे हात, मन दिसतात पण आपल्याही नकळत आपल्याला शुभेच्छा देणारे, कौतुक करणारे हात दिसत नसतात. बिनचेहऱ्यांच्या या शुभेच्छा आपल्या पाठीशी निष्कामपणे उभ्या असतात. अनोळखी आणि ओसाड रस्त्यावर जात असताना रस्ता चुकलो हे लक्षात येत आणि गोंधळेल्या अवस्थेत रस्ता शोधत असताना त्या ओसाड माळरानावर अचानक कुणी भेटतात आणि नीट रस्ता दाखवतात. तात्पुरता धन्यवाद देऊन आपण तो चेहरा विसरून ही जातो. असेच अज्ञात चेहरे आणि मदतीचे हात आपल्या सोबत जीवनात दिशा दाखवत असतात. वर्ष संपत असताना या सर्व अनामिकांचे स्मरण केले नाही तर ती कृतघ्नता ठरेल.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अशीही काही माणसं संचिताप्रमाणे ठरल्याप्रमाणे टप्प्यावर येतात आणि आयुष्याला दिशा देऊन जातात. एक नवी दिशा देऊन जातात. त्यांची उपस्थिती तुमच भावविश्वात एक वेगळा रंग भरते. सर्वजण हे सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर यांच्याप्रमाणे असामान्य कतृत्वाची नसतात. मर्यादीत क्षमता आणि सर्वसाधारण बुध्दीमत्ता आणि सर्वसामान्य आयुष्य घेऊन येणाऱ्यांच्या असंख्य जणांचे आयुष्य अशा व्यक्तींमुळे बदलून जाते. आयुष्यात आमुलाग्र बदल घडतात. वाल्याचा वाल्मिकी होणे हे व्यापक उदाहरण असले तरी सर्वसामान्यांच्या आयुष्यात असेच छोटेमोठे बदल होत असतात. गांजलेल्या, निराश झालेल्यांचेच नाही तर साधारण आयुष्य जगणाऱ्यांना हा स्पर्श भेटतो आणि आयुष्याची दिशा बदलते. हे वर्ष संपताना अशाच 'परिस'व्यक्तींना नक्की धन्यवाद आणि आमंत्रण द्यावेसे वाटते. धन्यवाद हे आतापर्यंत या लोखंडाच सोनं करण्याचा प्रयत्न केलात म्हणून आणि आमंत्रण अशासाठी की या सोन्याला पैलू पाडणे बाकी आहे म्हणून.
‘या जगण्यावर शतश: प्रेम करावे,’ हे नुकतेच निधन पावलेले मंगेश पाडगावकर यांचे काव्य आज परत आठवतंय. याच कारण ज्या - ज्या वेळी निराश झालो, हताश झालो त्या - त्या वेळी लढायची एक नवी उर्जा त्याच अपयशातून पुन्हा मिळाली. ‘दुनिया उम्मीद पे है कायम है’ ही तर जगभावना. अनेकवेळा सकारात्मकता येते ती अपयशातून, अवहेलनेतून. जमत नाही कसं जमलंच पाहिजे नव्याने प्रयत्न करू ही भावना प्रबळ होत जाते. जमलेले विस्कटणारे, त्यावर पाणी टाकणारे आपल्या मागे आपली चेष्टा, टीका करणारे सर्व 'मित्र' आणि त्यांचे 'प्रेम' हे विसरून कसं चालेल. कदाचित आपल्या हातून अजून चांगलं घडाव यासाठीच त्यांनी आपली कृती सहजपणे न स्वीकारता पाणी फेरले असावे, अशा आपल्या प्रगतीसाठी दिवसरात्र धडपडणारे 'मित्र' आणि त्यांच खास 'प्रेम' याचीही आठवण या प्रसंगी ठेवली पाहिजे.
येणार वर्ष हे उत्तमच असेल. मी आशावादी आहे. पाडगावकरांच्या
कवितेतील ‘सांगा कसं जगायचं.. कण्हत कण्हत की हसत खेळत’ तर मी दुसरा
पर्याय स्वीकारणारा आहे. त्यामुळे नव वर्ष हे समृध्द करणार असेल. नवे अनुभव असतील, नव्या वाटा असतील. आयुष्य कसं जगावं हे सांगणारा
नवा मित्रही असेल. ज्ञान देणारा गुरुही असेल. प्रेम करणारे मित्रही असतीलच… हे
सारं सोबत घेत नव्या
वर्षात जाऊया… अपयशाचं, कडवट अनुभवाचं ओझं मागे टाकून
नव्या उर्जेने आजच्या मोबाईलच्या भाषेत बोलायच तर रिचार्ज होऊन नव्या वर्षात
जाऊया.. निसर्गही गात असतो… नव्या चाली एैकवत असतो.. तो सूर आणि ताल पकडण्याचा
प्रयत्न आपण करूया नवं गीत गाऊया.
(लेखाची पूर्वप्रसिद्धी
– प्रभात, 31
डिसेंबर 2015)
No comments:
Post a Comment