शिवसेनेतील सध्याच्या घडामोडी, या घडामोडींनंतर झालेले राजकीय
नाट्य याकडे पाहताना शिवसेना नामक संघटनेचा गेल्या 56 वर्षातला चढउताराचा आणि
खाचखळग्याचा प्रवास डोळ्यासमोर येतो. काही वर्षे मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रातही
ज्या नावाची दहशत होती त्या दहशतीची, सामर्थ्याची अशी लक्तरे निघणे हे कोणाचं
प्राक्तन आहे याचा विचार करण्याची ही वेळ आहे.
राजकीय अभीनिवेश बाजूला ठेवून या घडामोडींकडे पाहिले तर
नेतृत्वाचा अहंकार एखाद्या संघटनेच्या अस्तित्वापुढे कसा प्रश्नचिन्ह उभा करतो
याचा पट डोळ्यासमोर येतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कार्यपद्धती
समाजातील एका विशिष्ट वर्गाला कधीच पसंद पडली नव्हती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी
संघटनेच्या स्थापनेपासून मोजक्या आणि कर्तृत्ववान सहकाऱ्यांबरोबर विश्वासाचा बंध
जपला होता. दत्ताजी नलावडे, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी, मनोहर जोशी, लीलाधर डाके
आदी सहकाऱ्यांशी नित्य विचार विनिमय करत बाळासाहेबांनी शिवसेनेची संघटनात्मक
कार्यपद्धती रूढ केली. अनेक वर्षे बाळासाहेबांनी जपलेल्या या चौकटीला उद्धव
रावांच्या कार्यकाळात तडा गेला. सामान्य सैनिकांच्या सुखदु:खात सहभागी होणारे बाळासाहेब, मीनाताई आणि
आमदारासारख्या लोकप्रतिनिधींच्या दूरध्वनींना प्रतिसाद देण्याचे सौजन्यही न
दाखवणारे उद्धवराव हा सेनेचा गेल्या 20 वर्षातील उतरत्या भाजणीचा प्रवास आहे.
विश्वासू सहकाऱ्यांचे अष्टप्रधान मंडळ हे बाळासाहेबांच्या संघटनात्मक नीतीचे आदर्श
उदाहरण होते. या विश्वासू सहकाऱ्यांशी विचार विनिमय करत शिवसेनेने स्थानीय लोकाधिकार
समिती सारखी भूमिपुत्राच्या हक्कासाठी लढणारी संघटना उभी केली. मुंबई, ठाणे
परिसरातील केंद्र, राज्य सरकारी सेवेत तसेच राष्ट्रीयकृत बँका, सरकारी महामंडळे,
सरकारी कंपन्या यात मराठी माणसाचा बिनधोक प्रवेश होण्यासाठी लोकाधिकार समितीने
सनदशीर मार्गाने लढे दिले. मुंबईत
वर्षानुवर्षे सेनेचा पाया मजबूत राहण्यासाठी लोकाधिकार समिती सारखे उपक्रमच
कारणीभूत ठरले.
उद्धवरावांकडे संघटनेची सूत्रे आल्यावर बाळासाहेबांच्या विश्वासू शिलेदारांना बाजूला काढण्याचा कार्यक्रम चालू झाला. ‘नवा गडी, नवे राज्य’ या न्यायाने उद्धवरावांनी आपला चमू निवडण्यास कोणाचीच हरकत नव्हती.
मात्र, हे करताना बाळासाहेबांनी जपलेली विचार विमर्शाची कार्यपद्धती हेतूपूर्वक
बाजूला सारली गेली. आपल्या नेतृत्वाला आव्हान मिळू नये या हेतूने सख्या चुलत आणि
मावस भावालाही संघटनेत बेदखल केले गेले. संघटनेत एकछत्रीय अंमल निर्माण झाल्यावर
कार्यपद्धतीत अहंकाराचा शिरकाव झाला. 2004 साली भास्कर जाधव या आमदाराला मातोश्रीत
प्रवेश ही करू न देण्याचा उद्दामपणा प्रत्ययास येऊ लागला. तोपर्यंत निष्ठावंत
शिवसैनिक असलेले जाधव मातोश्रीच्या दरवाजा बाहेर कसे ढसाढसा रडले होते याची प्रसार
माध्यमांच्या प्रतिनिधींना आठवण असेल.
‘तुका म्हणे नरका घाली अभिमान, जरी
होय अंगी गर्व ताठा, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला.’ या तुकारामाच्या ओवीनुसार
अहंकाराचे वारे डोक्यात भिनलेल्या उद्धव रावांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनाही
अनेकदा हेतुपूर्वक अवमानित केले. केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या
मैत्रिच्या नात्यामुळे आणि युती टिकवण्याच्या धोरणामुळे भाजपा नेतृत्वाने या घटनांना
प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला नाही. बाळासाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने मराठी
माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी विविध मार्गाने लढे देतानाच सामान्य माणसाच्या
दैनंदिन प्रश्नांवरही मदतीस जाणारी सैनिकांची ‘शाखा’रूपी साधीसोपी कार्यपद्धती प्रत्यक्षात आणली. सामान्य माणसाने कोणत्याही अडचणी
शिवसेनेच्या शाखेत घेऊन जाव्यात आणि त्याचे निराकरण करून घ्यावे, हा दंडकच
बाळासाहेबांच्या काळात पडला होता. उद्धवरावांच्या कार्यकाळात संघटनावाढीसाठी
कोणताही लोकोपयोगी उपक्रम हाती घेतला गेला तर नाहीच पण शाखांद्वारे जनतेचे प्रश्न
सोडवण्याची हक्कांची जागाही हळूहळू निकालात काढली गेली.
अल्बर्ट आइनस्टाइन असे म्हणाले
आहेत की, “knowledge and ego are directly related, less the
knowledge, greater the ego.” उद्धवरावांच्या कार्यपद्धतीत
याचेच प्रत्यंतर गेले 20 वर्षात अनेकदा आले. नुकत्याच झालेल्या राज्यसभा
निवडणुकीपूर्वी देवेंद्रजी फडणवीस यांनी निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रस्ताव दिला
होता. मात्र, सेना नेतृत्वाने सत्तेच्या बळावर आपण अपक्ष आमदारांनाही वश करू या फाजील
आत्मविश्वासापोटी फडणवीसांचा प्रस्ताव नाकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ही
अवमान करणारी भाषा सेना नेतृत्व अहंकारापोटी वापरू लागले. विश्वासघाताने मिळवलेले
एका राज्याचे मुख्यमंत्रीपद एवढे डोक्यात गेले की, नरेंद्र मोदी यांच्या सारख्या
विश्वव्यापी बनलेल्या नेतृत्वाला ही आव्हान देण्याचा प्रयत्न होऊ लागला. या
अहंकाराची परिणती राज्यसभा आणि विधान परिषद अशा लागोपाठच्या दोन पराभवात झाली. राज्यसभा
आणि विधान परिषद निवडणुकीत प्राधान्य क्रमाने येण्याच्या मत पद्धतीचा संबंध थेट
बुद्धी चातुर्याशी आहे. अहंकारामुळे याचे ही विस्मरण झाले त्यामुळे, गाजावाजा करत
उभा केलेला तिसरा उमेदवार पराभूत होताना पाहण्याची वेळ सत्तारूढ शिवसेनेवर आली.
देवेंद्रजी नी, “move in the silence, only speak when it’s time to say checkmate” याचा प्रत्यय आणून दिला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ‘चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रूचीस आले.’ सेनेतील सध्याच्या घडामोडी पाहता सेना नेतृत्व अहंकारामुळे बुद्धीचातुर्यास ही कसे पारखे झाले आहे, हेच ठसठशीतपणे दिसले.
केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता
No comments:
Post a Comment