• एकात्मता, समरसतेचा बंध दृढ करणारी निवड

     



    नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर राज्यकारभारातील अनेक प्रस्थापित चौकटी मोडण्यास प्रारंभ केला. या चौकटी रूढ होण्यामागे साचेबद्ध राजकीय गणिते असत. त्याचबरोबर सत्तेचा विशिष्ट दर्प, गंड आणि त्या अनुषंगाने आलेले हितसंबंध अबाधित राखण्याचाही सुप्त हेतू असे. नरेंद्र मोदी यांनी हेतुपूर्वक या चौकटी मोडणे चालू केले. केंद्र सरकारकडून दिले जाणारे पद्म पुरस्कारस्वातंत्र्य दिनानिमित्त करायच्या भाषणासाठी जनतेकडून सूचना मागवणे, विदेश दौऱ्याच्या माध्यमातून परदेशस्थ भारतीयांना भारताच्या विकास प्रक्रियेत सहभागी करून घेणे या सारख्या निर्णयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चौकटीबाहेर जाऊन कसा विचार करतात याची प्रचिती आली.

     

     'मन की बात' मधून जनतेशी संवाद असो की केंद्राच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद असो यातून सामान्य जनतेशी थेट जोडला जाणारा राज्यकर्ता हेच नरेंद्र मोदी यांचे रूप ठसठशीतपणे गेल्या आठ वर्षांत वारंवार समोर येते आहे. समाजातील उपेक्षित, वंचित घटकांचा सन्मान करणे हेही मोदी यांच्या कार्यपद्धतीचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येते. 2019 मध्ये कुंभ मेळ्यात गंगा नदीची स्वच्छता करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुवून त्यांना वंदन करून पंतप्रधानांनी समाजातील या दुर्लक्षित घटकांबद्दल सर्वांनीच कृतज्ञतेची भावना बाळगणे आवश्यक आहे असा संदेश दिला. वाराणसी येथे 6 महिन्यांपूर्वी काशी विश्वनाथ कॉरिडॉर च्या उद्घाटन प्रसंगी शिखा रस्तोगी या दिव्यांग महिलेला खाली वाकून नमस्कार करणारे पंतप्रधान मोदी हे सामान्य माणसाला म्हणूनच आपलेसे वाटतात.

     

    राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी जाहीर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपेक्षित समाज घटकांचा सन्मान करण्याच्या विचारधारेचा पुरस्कार होतो आहे. राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी समाजातील अत्यंत कर्तृत्ववान महिलेला उमेदवारी देऊन भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय एकात्मतेचा, सामाजिक समरसतेचा बंध अधिक बळकट केला आहे, यात तीळमात्रही शंका नाही. झारखंडमधील संथाल समाजाचे ब्रिटिशांविरुद्धच्या संग्रामात मोठे योगदान आहे. 1855 मध्ये संथाल समाजाच्या आदिवासी शेतकऱ्यांनी ब्रिटिश सरकारविरोधात उठाव केला. या बंडामुळे ब्रिटिश सरकार चांगलेच हादरले होते. वर्षानुवर्षे सामुदायिक शेती करणाऱ्या संथालांच्या जमिनीचे मालकी हक्क जमीनदारांना देण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने घेतला होता. त्याविरोधात बंड पुकारणाऱ्या संथाल शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या चळवळीची ठिणगी हळूहळू देशभर पसरली. अशा या लढाऊ जमातीच्या स्वातंत्र्य संग्रामातील अमूल्य योगदानाचा राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी घोषित करून गौरवच केला गेला आहे. आजवर या समाजाला देशाचे सर्वोच्च पद भूषविण्याची संधी प्राप्त झाली नव्हती. द्रौपदी मुर्मू यांना ही संधी स्व कर्तृत्वाने मिळाली आहे. या आधी त्यांना झारखंड च्या राज्यपालपदावर नियुक्त केले गेले तेंव्हा 'कोण ह्या' अशा आश्चर्यवाचक मुद्रेनेच त्यांची चौकशी केली गेली. राष्ट्रपतीपदासाठी अनेकदा उच्च शिक्षित, पुढारलेल्या जाती - जमातीचा प्रतिनिधी हे आजवर लावले गेलेले निकष द्रौपदी मुर्मू यांना लावले गेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुर्मू यांची निवड करण्याच्या निर्णयामागचा विचार राष्ट्रवादाची विचारधारा अधिक व्यापक करण्याचा आहे. नक्षलवादाची चळवळ ज्या दंडकारण्यात वेगाने पसरली, गोरगरीब आदिवासी जनतेला दिशाभूल करून, दहशतीच्या आधारे नक्षलवाद्यांनी वेठीस धरले त्या पट्ट्यातीलच एका महिलेला देशाचे सर्वोच्च पद भूषविण्याची संधी दिली जात आहे

     

    द्रौपदी मुर्मू यांनी जगण्यासाठीचा सामान्य माणसाचा खराखुरा संघर्ष अनुभवला आहे. परिस्थितीचे चटके त्यांनी विनातक्रार सोसले आहेत. मात्र त्याचा बाऊ करता विलक्षण धैर्याने त्या सार्वजनिक जीवनात वाटचाल करीत राहिल्या. व्यक्तिगत जीवनात सोसलेले चटके त्यांनी कधीच सार्वजनिक केले नाहीतअतिशय सामान्य परिस्थिती असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले . ओदिशा राज्य सरकारच्या पाटबंधारे, ऊर्जा खात्यात सहाय्यकपदाची नोकरी केल्यानंतर त्यांनी अनेक वर्षे शिक्षक म्हणून काम केले. या काळात त्यांनी स्त्री सक्षमीकरणासाठी केलेले कार्य गौरवास्पद आहे. पुढे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक, आमदार अशी त्यांची राजकारणातील वाटचाल ओदिशा च्या मंत्रिमंडळात संधी मिळेपर्यंत चालूच राहिली. आमदार आणि मंत्री म्हणून काम करताना त्यांना मोठा प्रशासकीय अनुभव मिळाला. राजकारणातील वाटचालीत त्यांच्यावर आजवर कधीच आरोप झाले नाहीत. जनसेवा महिला सक्षमीकरण याच ध्येयाने मार्गक्रमण करीत राहिलेल्या द्रौपदी मुर्मू यांना ओदिशा विधानसभेने 2007 मध्ये सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून गौरविले आहे. युवा पिढीने प्रेरणा घ्यावी असे व्यक्तिमत्व असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना राजकारणातील निष्कलंक वाटचालीमुळेच देशाचे सर्वोच्च पद भूषविण्याची संधी मिळाली आहे. भारतीय जनता पार्टीचे स्वतःचे संख्याबळ पाहता व अनेक विरोधी पक्षांनी दिलेला पाठिंबा पाहता मुर्मू यांची राष्ट्रपतीपदावरील निवड ही औपचारिकता ठरली आहे. या लेख प्रपंचनिमित्ताने श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा देतो.  

     

     

    (लेखांची पूर्वप्रसिद्धी लोकमत व लोकमत डिजीटल, 14 जुलै 2022)

     

    केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता


  • You might also like

    No comments:

    Post a Comment