• अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ

     



    समाजमाध्यमे तसेच ओटीटी व्यासपीठावरून प्रसारित होणारा मजकूर किंवा कार्यक्रमांवर येणारी बंधने म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर येणारी गदा नाही. उलट ही माध्यमे समाजविरोधी शक्तींच्या हाती जाऊ नयेत आणि अधिक विश्वासार्ह व्हावीत, यासाठी प्रयत्न चालू आहेत...


          ओटीटी (ओव्हर द टॉप) व्यासपीठावरून प्रसारित होणाऱ्या मालिका, चित्रपट, माहितीपटांच्या नियमनासाठी केंद्र सरकारने नुकतीच नियमावली जाहीर केली. ओटीटी व्यासपीठावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत तक्रारी गेल्या. संसदेतही याबाबत प्रश्न उपस्थित केले गेले. याची दखल घेत केंद्र सरकारने ही नियमावली तयार केली. अलीकडेच 'तांडव' या वेब सिरीजमधील काही दृश्यांबाबत विविध माध्यमांतून बरीच नाराजी व्यक्त केली गेली. तांडवच्या निर्मात्याने 'त्या' दृश्यांबद्दल माफी मागितली. ओटीटी व्यासपीठावरील कार्यक्रमांसाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलींमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला जाणे अपेक्षितच होते. याच निमित्ताने सोशल मिडीयासह ओटीटीसारख्या माध्यमांना प्रगल्भ स्वातंत्र्य हवे की बेजबाबदार स्वातंत्र्य हवे, या मुद्द्यावर प्रामुख्याने ही चर्चा केंद्रित व्हायला हवी. मात्र, त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने कोणाला गंभीर चर्चा करण्यात रस आहे, असे दिसत नाही.

          सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि ओटीटी व्यासपीठ यांच्या स्वनियमनाचा उद्देश ठेवून केंद्र शासनाने ही नियमावली तयार केली. वृत्तपत्रे, नभोवाणी, दूरचित्रवाणी, चित्रपट, नाटक अशा सर्व माध्यमांतून होणाऱ्या आविष्काराचे नियमन करण्यासाठी जशा यंत्रणा आहेत, त्याच पद्धतीने या नव्या माध्यमांच्या नियमनासाठी यंत्रणेची गरज आहे. हातातल्या मोबाईलमुळे करमणूक आणि सोबत अभिव्यक्तीचे अवकाश प्रत्येकाच्या हाती आले आहे. याचा वापर कोणत्या पद्धतीने करायला हवा, हा ज्याच्या त्याच्या विवेकबुद्धीचा प्रश्न आहे, त्यात सरकारने पडू नये, असे म्हणणाऱ्या महाभागांनी झोपेचे सोंग घेतले असावे. एकच उदाहरण देता येईल. 26 जानेवारीला शेतकऱ्यांची दिल्लीत ट्रॅक्टर परेड निघाली होती. या परेडमध्ये काही आंदोलकांनी पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घातल्याची दृश्ये दाखविली जाऊ लागली आणि राजदीप सरदेसाई यांनी 'पोलिसांच्या गोळीबारात एक आंदोलक शेतकरी ठार' असे ट्विट केले. दिल्लीतील आंदोलक समाजमाध्यमांचा प्रचंड वापर करीत होते. ट्विटरवरून त्यांच्या आंदोलनाचा प्रचार सुरू होता. त्याच सुमारास शेतकऱ्यांच्या नावाखाली आंदोलन करणारे काही आंदोलक बेभान होऊन लाल किल्ला परिसरात घुसले होते, पोलिसांवर अमानुष हल्ला चढवत होते. अशा तप्त वातावरणात सरदेसाईंचे ट्विट आले, 'पोलिसांच्या गोळीबारात एक आंदोलक शेतकरी ठार'. केवळ पोलिसांच्या संयमाने त्या दिवशी दिल्लीत काही अघटित घडले नाही. सोशल, डिजिटल माध्यमांच्या जबाबदार स्वातंत्र्याची गरज अधोरेखित करणारी ही घटना होती. अनेक वर्षे पत्रकारितेच्या राष्ट्रीय क्षेत्रात व्यतीत करणारी व्यक्ती कोणतीही खातरजमा न करता समाजस्वास्थ्य बिघडेल, अशा पद्धतीचे ट्विट करते, तेव्हा त्या व्यक्तीच्या हेतूंबद्दल शंका उपस्थित होते.

            आविष्काराचे प्रकटीकरण करणाऱ्याच्या हेतूंबद्दलच शंका उपस्थित करण्यासाठी अनेक संधी ओटीटी व अन्य माध्यमांनी दिल्या आहेत. या माध्यमांचा कोण कोण वापर करतो आहे, याची एकत्रित माहितीच कोठे उपलब्ध नाही. बातम्या आणि ताज्या घडामोडींचे विश्लेषण करणारी अनेक यू ट्यूब वाहिन्या सुरू झाल्या आहेत. अगदी ग्रामीण भागातही या यू ट्यूब वाहिन्यांनी धुमाकूळ घातला आहे. सगळीच वाईट आहेत, असा याचा अर्थ नाही, काही उत्तम पत्रकारिताही करीत आहेत. या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या अनेक घडामोडी काही मिनिटांच्या अवधीत तुमच्यापर्यंत पोहचविल्या जातात. हे प्रसारण केवळ बातम्या देणे, मनोरंजन करणे या निखळ हेतूने असेल, तर  कोणाची काहीच हरकत असणार नाही. मात्र, विशिष्ट राजकीय, सामाजिक आणि धार्मिक हेतूंनी वार्तांकन केले जात आहे, खोट्या बातम्या, अफवा पसरवल्या जात आहेत. अशी कितीतरी उदाहरणे गेल्या काही दिवसात घडली.

              या माध्यमांवर सध्या कोणाचेच नियंत्रण नाही. वृत्तपत्रांत एखादी चुकीची बातमी येऊन एखाद्या व्यक्तीची / संस्थेची बदनामी झाली, चारित्र्यहनन झाले, तर त्या वृत्तपत्राला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी लागते. कारण अशा बाबींमध्ये वृत्तपत्रांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी 'प्रेस कौन्सिल' नामक यंत्रणा आहे. सध्याच्या या नव्या माध्यमांकरिता अशी कोणतीच यंत्रणा नाही. अलीकडेच भाजपच्या एका महिला नेत्याची बदनामी करण्याच्या उद्देशाने तिची छायाचित्रे विकृत पद्धतीने समाजमाध्यमांवर पसरविण्यात आली. काही वर्षांपूर्वी एका ज्येष्ठ इतिहासकाराच्या निधनाची बातमी एका दूरचित्रवाणी वाहिनीच्या लोगोचा खुबीने वापर करून प्रसारित केली जात होती. जामिया मिलिया विद्यापीठात काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारात समाजमाध्यमांद्वारे पेरलेल्या खोट्या बातम्यांचा मोठा वाटा होता. अशा अनिर्बंधतेला अटकाव करणे, हे सरकारच्या नियमावलीचे उद्दिष्ट आहे.

          नव्या माध्यमांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी या नियमावलीत काय आहे, हे तरी समजावून घेतले पाहिजे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला कोणतीही आक्षेपार्ह माहिती काढून टाकावी लागणार आहे. तसेच, डिजिटल माध्यमांना इलेक्ट्रॉनिक मीडियाप्रमाणेच स्वतःचे नियमन करावे लागणार आहे. सोशल मीडियावरील माहितीची तीन स्तरीय तपासणी, महिलांविरोधातील आक्षेपार्ह पोस्ट 24 तासांत हटविणे, सोशल मीडिया कंपन्यांना चुकीची माहिती टाकणाऱ्याचे नाव सांगण्याचे बंधन, अशा नव्या अटी असतील. नव्या माध्यमांचा वापर करून हिंसाचार, धार्मिक उन्माद पसरवू पाहणाऱ्या प्रवृत्तींना आता चाप बसेल. एखाद्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे दुसऱ्याच्या हानीस कारणीभूत ठरू नये, या तत्त्वानुसार ही नियमावली आहे.

          सोशल मीडिया कंपन्यांना येणाऱ्या तक्रारींची नोंद करून घेण्यासाठी एक व्यवस्था उभारावी लागणार आहे. या कंपन्यांना तक्रारींची खातरजमा करणे आदी प्रक्रियेसाठी अधिकारी व अन्य यंत्रणा तयार करावी लागेल. येणाऱ्या तक्रारीचा 15 दिवसात निपटारा करावा लागेल. न्यायालय आणि सरकारने एखाद्या आक्षेपार्ह मजकुरासंदर्भात माहिती मागविल्यावर त्या मजकुराच्या, छायाचित्राच्या मूळ स्रोतांची माहिती तातडीने कंपन्यांना पुरवावी लागेल. तसेच किती तक्रारी आल्या, त्यावर कोणती कारवाई झाली, याचा अहवाल दर महिन्याला सादर करण्याचे बंधन सोशल मीडिया कंपन्यावर असेल. ओटीटी, डिजिटल या दोन्ही माध्यमांतील कंपन्यांना त्यांच्या कार्यक्रमांबाबत आलेल्या तक्रारी निवारण्यासाठी व्यवस्था करावी लागेल. ओटीटी प्लॅटफॉर्म कंपन्यांना स्वनियमन यंत्रणा (सेल्फ रेग्युलेटरी बॉडी) तयार करावी लागेल. हे मंडळ किमान सहा सदस्यांचे असेल व या मंडळाचे प्रमुख सर्वोच्च व उच्च न्यायलयाचे माजी न्यायमूर्ती असतील. तसेच माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे त्याची नोंद करावी लागेल. याशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर दाखविण्यात येणाऱ्या मजकुरासंदर्भात वयानुसार 13 पेक्षा अधिक वयोगटासाठी, 16 पेक्षा अधिक वयोगटासाठी आणि प्रौढांसाठी अशा श्रेणी तयार कराव्या लागतील.

            खरेतर या गोष्टींचे स्वागत व्हायला हवे. 'फेक न्यूज'च्या विरोधात पुरोगामी मंडळी बराच आरडाओरडा करीत असतात. पण या 'फेक न्यूज'ला आळा घालण्यासाठी काही निर्णय घेतले, तर लगेच अभिव्यक्ती स्वांतत्र्यावर गदा आल्याचा कांगावा सुरू होतो. सोशल मिडीया व ओटीटी ही नवी, पण परिणामकारक माध्यमे आहेत. त्याचा समाजविरोधी घटकासाठी वापर होता कामा नये, हीच सर्वांची भूमिका असली पाहीजे.

     

    (लेखांची पूर्वप्रसिद्धी महाराष्ट्र टाइम्स, 11 मार्च 2021)

    केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता. 


  • You might also like

    No comments:

    Post a Comment