• डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी: भविष्यज्ञानी इतिहासपुरुष!

     


    देशाचे भवितव्य घडविणे, स्वातंत्र्याचे वारे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणे आणि स्वातंत्र्याचा अभिमान मनामनात जागविणे गरजेचे आहे, ही भावना सर्वच राजकीय पक्षांमध्ये असल्याने, स्वातंत्र्यानंतर जे अंतरिम सरकार स्थापन झाले, त्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांचे नेते याच भावनेने सामील झाले होते. या नेत्यांचे राजकीय विचार स्वतंत्र आणि परस्परांहून भिन्न होते, पण देशाला प्रगतीच्या, स्वातंत्र्याच्या नव्या मार्गावर घेऊन जाण्याबाबत सर्वांचे एकमत होते. मात्र, आपली राष्ट्रीय विचारधारा आणि वैचारिक बैठक यांमध्ये कोणतीच तडजोड करता देशाच्या अखंडत्वासाठी ज्यांनी आपले उभे आयुष्यच पणाला लावले, त्यामध्ये डॉ. मुखर्जी यांचा समावेश होता


    एक निस्सीम राष्ट्रभक्त, प्रखर वक्ता, कुशल संघटक, स्पष्टवक्ता राजकारणी, विद्वान शिक्षणतज्ज्ञ ही डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींची ओळख होती. दुर्दैवाने डॉ. मुखर्जी यांना दीर्घायुष्य लाभले नाही, पण शिक्षण, महिला सबलीकरण आणि तंत्रज्ञानाच्या वापराची नवी दिशा देशाला देण्यासाठी डॉ. मुखर्जी यांनी आपल्या अल्पायुष्यात जे काम केले, ते त्या काळात देशाच्या विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक नेत्यांच्या कल्पनेपलीकडचे होते. विशेषतः, विकासाच्या प्रक्रियेत जनतेचा सहभाग असायला हवा, असा आग्रह धरणारे ते त्या काळातील एकमेव नेता होते. केवळ राजकारणी नव्हे, तर प्रखर राष्ट्रवादी विचारांची बैठक असलेला एक द्रष्टा राजकीय नेता म्हणून डॉ. मुखर्जी यांनी आपले अल्पायुषी जीवन देशाचे भवितव्य घडविण्यासाठी अर्पण केले, पण तत्कालीन राजकारणाने त्यांचे द्रष्टेपण ओळखलेच नाही


    मुस्लीम लीग किंवा मोहम्मद अली जीना यांच्या मनातील विभाजनाच्या विचारांचा सुगावा सर्वात अगोदर लागल्यामुळे असेल, पण डॉ. मुखर्जी यांनी मुस्लीम तुष्टीकरणाच्या राजकीय परिणामांचे गांभीर्य स्पष्टपणे तत्कालीन नेत्यांसमोर मांडण्यात कुचराई केली नाही. अनुनयाचे राजकारण सुरू राहिले तर देशाचे तुकडे होतील आणि एक इस्लामी देश म्हणून भारतापासून अलग होण्याची विभाजनवाद्यांची इच्छा पूर्ण केल्याचे पाप आपल्या माथी बसेल, ही त्यांनी कितीतरी अगोदर वर्तविलेली भविष्यवाणी त्यांच्या जीवनास राजकीय दिशा देणारी ठरली


    डॉ. मुखर्जींच्या निर्भीड राष्ट्रवादी विचारांमुळे प्रभावित होऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1940 मध्ये त्यांना हिंदु महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त केले. त्याच दरम्यान ढाक्यामध्ये हिंदूंचे पूर्वनियोजित हत्याकांड सुरू झाले होते. हिंदूंनी आपल्या मालमत्ता सोडून पलायन करावे किंवा धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकारावा यासाठीचा तो एक नियोजनबद्ध कट होता. या संहारक कारवायांमुळे अस्वस्थ झालेल्या डॉ. मुखर्जींनी तातडीने ब्रिटीश मुख्य सचिवास पत्र लिहून तेथील परिस्थितीवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आणि परिस्थितीची पाहणी करण्यासाठी स्वतः ढाका येथे जाण्याची इच्छा व्यक्त केली. मुस्लीम लीगच्या प्रतिनिधींना परवानगी मिळाली, पण डॉ. मुखर्जींना मात्र ढाका येथे पाठविण्याची कोणतीच व्यवस्था केली गेली नाही. डॉ. मुखर्जींनी एका खाजगी विमानातून ढाका गाढले, अत्याचारपीडीत हिंदू कुटुंबांची भेट घेतली, त्यांना धीर दिला आणि परिस्थितीची संपूर्ण माहिती संकलित करून आपला निष्कर्ष काढला


    ढाक्याचा नवाबच तेव्हा तेथील मुस्लीम लीगचा अध्यक्ष होता. डॉ. मुखर्जींनी थेट त्याची भेट घेतली  आणि या हत्याकांडाच्या परिणामांचे गांभीर्य निर्भीडपणे त्याच्यापुढे मांडले. आपण स्वतः सर्व माहिती घेतली आहे, ती देशासमोर मांडणार आहोत, त्यानंतर जे काही परिणाम होतील, त्याची जबाबदारी मुस्लीम लीगला घ्यावी लागेल, अशा शब्दांत त्यांनी नवाबास खडसावले आणि नवाबाचे धाबे दणाणले. लगेचच बंगाल विधानसभेत या हत्याकांडाचे तीव्र पडसाद उमटले. डिसेंबर 1943 मध्ये अमृतसरमध्ये हिंदू महासभेच्या राष्ट्रीय अधिवेशनात अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. मुखर्जींनी काँग्रेसच्या मुस्लीम अनुनयाच्या बोटचेप्या राजकारणावर कडाडून हल्ला चढविला. मुस्लीम लीगला चुचकारण्यासाठी काँग्रेस सातत्याने त्यांच्यासमोर गुडघे टेकून स्वतंत्र राष्ट्राची त्यांची मागणी मान्य करणार असेल तर अखंड भारताचे ते दुर्दैव असेल आणि त्याचे दुष्परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला. 1944 मध्ये एके दिवशी, हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी आपण मोहम्मद अली जीना यांची भेट घेणार असे गांधीजींनी जाहीर केल्यावर डॉ. मुखर्जी अस्वस्थ झाले. या भेटीतून जीना यांचा अहंकार फुलविण्यापलीकडे काहीच निष्पन्न होणार नाही, या जाणीवेने त्यांनी गांधीजींना त्या भेटीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांची भेटही घेऊन तशी विनंतीही त्यांना केली, पण गांधीजींनी डॉ. मुखर्जींची विनंती अव्हेरली. गांधीजी आणि जीना यांची भेट झाली, मात्र, हिंदू-मुस्लीम ऐक्याची त्यांची इच्छा मात्र फलद्रुप झालीच नाही. उलट, पुढे फाळणीदरम्यानच्या अनन्वित अत्याचारात हिंदू समाज मोठ्या प्रमाणावर होरपळला


    गांधीजींच्या या भेटीवर नाराज असलेल्या डॉ. मुखर्जींनी त्याच वर्षी बिलासपूरमध्ये हिंदू महासभेच्या राष्ट्रीय अधिवेशनात गांधीजींवर थेट टीकास्त्र सोडले. देशातील बहुसंख्य मुस्लिमांना फाळणी नको आहे, फाळणी हा देशातील सांप्रदायिक तेढ मिटविण्याचा मार्ग नाही, असे डॉ. मुखर्जी वारंवार सांगत होते. फाळणीमुळे ही तेढ संपणार नाहीच, उलट त्याची धग पुढे वर्षानुवर्षे भारतास सहन करत रहावी लागेल. देशातही धार्मिक कलह वाढत जातीलच, पण भारतास कायम युद्धाच्या सावटाखाली वावरावे लागेल, असा स्पष्ट इशारा डॉ. मुखर्जी यांनी दिला होता. पाकिस्तानची निर्मिती हा केवळ काही नेत्यांचा हट्ट नाही, तर ती इस्लामीकरणाची एक व्यापक योजना आहे, त्यातून धार्मिक उन्मादाचे वातावरण धगधगत राहील, अशी एक धगधगीत भविष्यवाणी डॉ. मुखर्जी जेव्हा पोटतिडीकीने वर्तवत होते, तेव्हा काँग्रेसच्या तुष्टीकरण मोहिमांना मात्र वेग आला होता.


    फाळणी रोखण्याचे आपले प्रयत्न अपुरे ठरणार अशी हताश जाणीव झाल्यावर डॉ. मुखर्जींनी बंगाल, पंजाब आणि आसामातील हिंदुबहुल क्षेत्रे फाळणीतून वाचविण्यासाठी मोहीम हाती घेतली. व्यापक जनजागृती सुरू झाली आणि मार्च 1947 मध्ये बंगालमधील हिंदू प्रतिनिधी सभेने सर्वमताने एक प्रस्ताव संमत केला. डॉ. मुखर्जींच्या प्रयत्नांचे पडसाद उमटू लागले होते. बंगालमधील हिंदू बहुसंख्य असलेले प्रांत पाकिस्तानात कदापिही जाणार नाहीत, असा प्रस्ताव संमत होताच मुस्लीम लीगच्या सुऱ्हावर्दीनी स्वतंत्र संयुक्त बंगाल राज्यनिर्मितीचा प्रस्ताव ठेवला आणि डॉ. मुखर्जींनी त्यास विरोध करण्यासाठी प्रखर मोहीम उघडली. सुऱ्हावर्दींच्या या मायाजालात काँग्रेसने फसू नये, अशी गळ गांधीजींना घातली. एकीकडे जनतेत विरोधाची धग जागी ठेवण्याचे प्रयत्न सुरूच होते त्यास यश आले. अन्यथा, आज बंगाल आणि पंजाबमधील हिंदू बहुसंख्या असलेला प्रदेश देखील पाकिस्तानच्या नकाशावर दिसला असता


    डॉ. मुखर्जींच्या द्रष्टेपणाची ओळख तेव्हाच तत्कालीन ाँग्रेस नेत्यांना पटली असती, तर आज देशाचा नकाशा, राजकारण, राजकीय आणि सीमावर्ती भौगोलिक स्थिती, सारे काही वेगळेच दिसले असते. भविष्याचा स्पष्टपणे वेध घेत त्याच्या परिणामांचा इशारा देऊनही केवळ राजकारणापोटी सुरू झालेल्या अनुनयवादाचा बळी ठरल्याने देशाला काय भोगावे लागते, त्याची साक्ष आता वर्तमानकाळात पटू लागली आहे.


    (लेखांची पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स 6 जून 2021)

    केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्त







  • You might also like

    No comments:

    Post a Comment