राजकीय विरोधकांबद्दल असभ्य भाषेत टीका टिप्पणी करण्याच्या प्रकारांना २०१४ नंतर ऊत आला. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांवर २०१४ मध्ये ते मुख्यमंत्री झाल्यानंतर गलिच्छ, शिवराळ भाषेत टीका करण्याचे प्रकार सुरु झाले, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणतात
२०२२ ला निरोप देताना "सह्याद्री"ला अनेक कटू आठवणींचेच स्मरण होत असेल. आधीच्या दोन वर्षांत राजकीय वैमनस्याने टोक गाठल्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीचे संचित २०२२ च्या नशिबी आले. महाराष्ट्राने असे वातावरण कधीही पाहिले नव्हते. २०२२ चा शेवट उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाच्या आवारात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या समोर केलेल्या त्राग्याने झाला. त्याआधी उद्धवरावांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरयष्टीच्या अनुषंगाने केलेली शेरेबाजी , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेशीमबागेत गेल्यानंतर ,"संघ कार्यालयामध्ये एकनाथ शिंदेंनी काही लिंबू वगैरे तर ठेवले नाहीत ना, याची तपासणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी करून घ्यावी, एकनाथ शिंदेंची नजर अतिशय वाईट आहे" अशा भाषेत केलेली टीका हे सारे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण किती खालच्या पातळीला गेले आहे याचीच साक्ष देणारे ठरले. महाराष्ट्राच्या उदार राजकीय संस्कृतीचे दाखले देशभर दिले जातात. या संस्कृतीला काळीमा फासण्याचे आणि महाराष्ट्राच्या राजकीय भूमीत विद्वेषाचे बी पेरण्याचे काम २०१४ पासून पद्धतशीरपणे चालू आहे.
विद्वेषाचे हे
बियाणे संकरीत आहे. या बियाणाला सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी दिले गेले, शेणखत घातले गेले, परिणामी या संकरीत बियाणाची झपाट्याने वाढ झाली. ही विषवल्ली आता
खुरपण्याची वेळ आली
आहे. महाराष्ट्राने अनेक राजकीय डाव , कुरघोड्या
पाहिल्या आहेत. मात्र हे डाव खेळताना, कुरघोड्या करताना असं विखारी
वातावरण कधी पाहिलं नव्हतं. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख आदींच्या मुख्यमंत्रीपदाच्या
कार्यकाळातही महाराष्ट्राने प्रतिस्पर्ध्याला कोंडीत पकडण्यासाठीचे खेळ, डावपेच अनुभवले. मात्र
त्या राजकीय स्पर्धेची पातळी इतकी विखारी कधीच झाली नव्हती. संयुक्त महाराष्ट्राच्या
आंदोलनात आचार्य अत्रे काँग्रेस नेत्यांवर तुफानी टीका करत असत. अत्रे यांची जाहीर सभेतील भाषणे आणि
मराठा मधील अग्रलेख यातून काँग्रेस नेत्यांचे कठोर भाषेत वाभाडे काढले जात असत. “चव्हाण, हिरे, देसाई... जनतेचे कसाई’ असे घणाघाती शीर्षक
आचार्य अत्रेंनी ‘मराठा’मध्ये दिले होते. याच अत्रे यांनी यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री
म्हणून दिल्लीला गेल्यानंतर विधानसभेत केलेल्या निरोप कार्यक्रमात सभागृहाच्या
डोळ्यात अश्रू आणणारे भाषण केले होते. ही महाराष्ट्राची राजकीय उदारमतवादाची श्रेष्ठ परंपरा होती. काळाच्या ओघात ही
परंपरा लुप्त झाल्याची खंत वाटते.
१९७७ मध्ये
आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर
त्यावेळचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या विरोधात काँग्रेस अंतर्गत
कुरघोड्यांना वेग आला. अपेक्षेप्रमाणे
शंकरराव चव्हाण यांची उचलबांगडी झाली मुख्यमंत्रीपदासाठी वसंतदादा पाटील आणि यशवंतराव
मोहिते हे दोघे स्पर्धक होते. काँग्रेस अंतर्गत निवडणूक होऊन त्यात वसंतदादांनी
बाजी मारली.
मात्र वसंतदादा आणि यशवंतराव मोहिते यांच्यातील संबंधात कटुता आली नाही. पुढे १९७८ मध्ये
झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने काँग्रेस आणि इंदिरा
काँग्रेस यांचे संयुक्त सरकार सत्तेत आले. वसंतदादा मुख्यमंत्री तर इंदिरा
काँग्रेस चे नाशिकराव
तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले. तिरपुडे हे यशवंतराव चव्हाण यांच्यावर सातत्याने टीका करतात , असे निमित्त करत यशवंतराव समर्थक आमदारांनी बंड करण्याच्या हालचाली सुरु
केल्या. या आमदारांचे
नेतृत्व शरद पवारांकडे होते. सरकारमधून बाहेर पडावे आणी जनता पक्षाच्या
पाठिंब्यावर पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी चाल खेळली
गेली. असे काही
घडते आहे याची चाहूल लागल्यावर वसंतदादांनी
थेट पवारांनाच या बाबत विचारणा केली होती. त्यावेळी पवारांनी आपण पक्षाबाहेर पडणार नसल्याचे
वसंतदादाना सांगितले होते. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार वसंतदादांच्या
मंत्रिमंडळाबाहेर पडले. पवारांचा हा वार वसंतदादांच्या जिव्हारी लागला होता. आपण मंत्रिमंडळाबाहेर
पडणार नाही , असे सांगणाऱ्या पवारांनी आपला विश्वासघात
केला, याचा सल वसंतदादांच्या मनात अनेक वर्षे होता. मात्र दादांनी हा सल
जाहीरपणे असभ्य भाषेत कधीच व्यक्त केला नाही.
पुढे पवार आपली
समाजवादी काँग्रेस विसर्जित करून इंदिरा काँग्रेसमध्ये आले. त्याच सुमाराला शंकरराव
चव्हाणांकडे पुन्हा मुख्यमंत्री पदाची सूत्रे आली. शंकरराव चव्हाणांनी त्यावेळी
उसाच्या वारेमाप
पिकाला आणि पाण्याच्या अनिर्बंध उपशाला आळा घालण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पातून
पाणी देण्याची
प्रचलित पद्धत बदलली. या निर्णयामुळे राज्यातील सहकारी साखर कारखानदार वसंतदादांच्या
नेतृत्वाखाली शंकररावांच्या विरोधात एकवटले. राजस्थानच्या राज्यपालपदाचा राजीनामा देत
वसंतदादा शंकररावांच्या विरोधात मैदानात उतरले होते. शंकररावांना हटवण्याची मागणी करताना
वसंतदादांच्या वाणीला कधीच असभ्यतेचा स्पर्श झाला नाही. ‘खंजीर’ प्रयोग विसरून वसंतदादांनी
शंकररावांना हटवून पवारांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली . उद्धवरावांनी दीपक केसरकर
यांच्या समोर केलेल्या त्रागा पाहिल्यावर वसंतदादांच्या संयमाचे स्मरण होते. केसरकरांसमोर
मनातली खदखद व्यक्त करताना उद्धवराव आपण फडणवीसांचा विश्वासघात करून मुख्यमंत्री झालो
ही बाब मात्र सहजपणे विसरले. मुख्यमंत्रीपद हातातून गेल्यामुळे उद्धवरावांची चिडचिड होणे समजू
शकते. मात्र ती कुठे व कोणत्या भाषेत व्यक्त करावी याचे भानही त्यांना ठेवता आले नाही. तसेच
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट
दिली. त्यानंतर
उद्धवरावांची प्रतिक्रिया त्यांच्या मनाचा कोतेपणा दाखवणारी होती. मुख्यमंत्रीपद
हातातून गेल्याचे
दु:ख उद्धवरावांना अजून पचवता आले नाही. सत्तेच्या राजकारणात पिछेहाट स्वीकारताना मनाचा मोठेपणा
दाखवावा लागतो. हा मोठेपणा उध्दवरावांच्या स्वभावात तसूभरही दिसत नाही. लहान मुलांच्या
खेळात ज्याच्या मालकीची बॅट असते तो मुलगा आपण आऊट झालो की बॅट घेऊन घरी जातो.
उद्धवरावांकडे पाहिले की अशा लहान खेळाडूचीच आठवण होते.
राजकीय विरोधकांबद्दल असभ्य भाषेत टीका टिप्पणी करण्याच्या प्रकारांना २०१४ नंतर ऊत आला.देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांवर २०१४ मध्ये ते मुख्यमंत्री झाल्यानंतर गलिच्छ, शिवराळ भाषेत टीका करण्याचे प्रकार सुरु झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैवाहिक जीवनाच्या संदर्भात अशाच खालच्या पातळीवर जाऊन शेरेबाजी केली जात होती. मात्र पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावरील गलिच्छ भाषेतील शेरेबाजीला कधीच उत्तर दिले नाही. ही शेरेबाजी त्यांनी शांतपणे सहन केली. नवीन वर्षात महाराष्ट्रातील राजकीय सहिष्णुता वाढीला लागावी हीच आई तुळजा भवानीकडे आणि पांडुरंगाकडे प्रार्थना.
(लेखाची पूर्वप्रसिद्धी – महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, ३ जानेवारी. २०२३)
केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता
No comments:
Post a Comment