• तुका म्हणे न ऐकती, सांगितले वायां जाती



    राहुलबाबांना आपला अकलेचा माठ पूर्णपणे रिकामा आहे , हे दाखविण्याची वारंवार हुक्की का येते याचे कोडे उलगडणे अवघड आहे. विनायक दामोदर सावरकर नामक धगधगत्या अंगाराचे तेज राहुलबाबांच्या बौद्धिक अवकाशाला झेपणे एकूण कठीणच आहे. आपल्या बुद्धीला झेपेल एवढे बोलावे हे या गृहस्थास दाढी पिकूनही लक्षात येत नसेल तर बुद्धीचे वाटप करणाऱ्या परमेश्वराचीच ही चूक भूल आहे असं म्हणावं लागतं.


    '' मैं गांधी हूं, सावरकर नहीं, माफी नहीं मांगूंगा '' ,असं म्हणून आपण जागतिक दर्जाचे वगैरे क्रांतिकारक , समाजसुधारक , नेते वगैरे असल्याचा आव नेहरू - गांधी घराण्याचे थोर वारस आणि अमेठीचे पराभूत युवराज चि. राहुल गांधी यांनी आणला आहे. राहुलबाबांना आपला अकलेचा माठ पूर्णपणे रिकामा आहे , हे दाखविण्याची वारंवार हुक्की का येते याचे कोडे उलगडणे अवघड आहे. विनायक दामोदर सावरकर नामक धगधगत्या अंगाराचे तेज राहुलबाबांच्या बौद्धिक अवकाशाला झेपणे एकूण कठीणच आहे. आपल्या बुद्धीला झेपेल एवढे बोलावे हे या गृहस्थास दाढी पिकूनही लक्षात येत नसेल तर बुद्धीचे वाटप करणाऱ्या परमेश्वराचीच ही चूक भूल आहे असं म्हणावं लागतं. ज्या कोणा सल्लागारांच्या सांगण्यानुसार हे चिरंजीव मुक्ताफळं उधळत असतात त्या सल्लागारांनी सावरकरांविषयी दस्तुरखुद्द महात्मा गांधींचे मत काय होते हे जाणून घेण्याचे कष्ट आपल्या बुद्धीला दिले नाहीत. ते कष्ट घेतले असते तर समस्त काँग्रेसप्रेमी विचारवंतांचे , पत्रकारांचेही डोळे थोडेफार उघडण्यास मदत झाली असती. Collected Works of Mahatma Gandhi: e-book, Publication Division, GOI, खंड ५९, पान क्र. ३८४ वर महात्मा गांधींनी स्वातंत्र्य सैनिक एम.आर. जयकर यांना २५ फेब्रुवारी १९३३ रोजी पाठविलेल्या पत्रात सावरकरांच्या समाजकार्याविषयी गौरवोद्गार काढले आहेत.


    १९३१ मध्ये सावरकरांनी रत्नागिरीत पतित पावन मंदिर उभारून समाज सुधारणा कार्यात लक्षणीय योगदान दिले होते. हे मंदिर सुरु करून सावरकरांनी मोठे समाज कार्य केले आहे असा उल्लेख महात्माजींनी या पत्रात केला होता . हे पत्र सावरकरांना देण्यासही महात्मा गांधींनी जयकर यांना कळवले होते. याच पुस्तकात अनेक ठिकाणी महात्मा गांधींना सावरकरांविषयी वाटणारा आदर , आत्मीयता जाणवते. सावरकरांच्या हिंदू महासभेचे अधिवेशन बिहारमध्ये घेण्यास त्यावेळच्या बिहार सरकारने बंदी केली होती. त्या निर्णयाचा निषेध करणारे पत्रक महात्मा गांधींनी २७ डिसेम्बर १९४१ रोजी प्रसिद्ध केले होते. त्या प्रसिद्धी पत्रात महात्माजींनी सावरकरांचा उल्लेख वीर सावरकर असा केला आहे. (Collected Works of Mahatma Gandhi: खंड ८१ , पान क्र. ३९१- ३९२) राहुलबाबाच्या आज्जीने म्हणजे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासाठी वैयक्तिक ११ हजार रुपयांची देणगी दिली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील टपाल तिकिटाचे प्रकाशन इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाच त्यांच्या सरकारतर्फे करण्यात आले होते. त्यांच्या सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील माहितीपट तयार केला होता.

     

    सावरकरांच्या स्वातंत्र्य लढयातील योगदानाबाबत वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलही याचपद्धतीची वक्तव्ये करणे ही राहुलबाबांची आणि काँग्रेसची अपरिहार्य गरज बनली आहे, असे दिसते. राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसचे कालबाह्य होत जाणे आणि काँग्रेसला न जुमानता ममता बॅनर्जी , चंद्रशेखर राव , अरविंद केजरीवाल यासारख्या प्रादेशिक सरदारांनी आपापला सवतासुभा उभारल्यामुळे आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याचा अंदाज आल्याने राहुलबाबा आणि त्यांच्या मातोश्रींना सावरकरांसारखे मुद्दे हाती घेण्याचा सल्ला त्यांच्याभोवतीच्या कोंडाळ्याने दिला असावा. अशा मुद्द्यांतून आपल्याला कोणता राजकीय लाभ होईल याचे गणीत मांडण्यासाठी युवराजांच्या मेंदूकडे तेवढी शिबंदी नाही हेच पुनः पुन्हा दिसून येते. Fools rush in where angels fear to tread ( शहाणीसुरती माणसे जे धाडस करू इच्छित नाहीत ते धाडस अकलेचे वांदे असलेली मंडळी करतात) या वचनाचे राहुलबाबांकडे पाहिले की नेहमीच स्मरण होते.


    राहुलबाबांच्या ‘अगाध’ ज्ञानाबद्दल लेखणी झीजवण्याचा मुळीच हेतू नाही. मात्र या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशासाठी दिलेल्या योगदानाचा परिचय नव्या पिढीला होणे आवश्यक आहे. त्यासाठीच भारतीय जनता पार्टीने सावरकर गौरव यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. सावरकरांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अतुलनीय आहे. या योगदानाची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. दुर्दैवाने सावरकरांच्या योगदानाची योग्य ती दखल स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास लिहिताना घेतली गेली नाही. ब्रिटीश सरकारकडून ५० वर्षाची काळ्यापाण्याची शिक्षा सुनावली गेल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानच्या तुरुंगात पाठवण्यात आले. अंदमानच्या तुरुंगात भारतातून पाठवण्यात आलेल्या कैद्यांचा अनन्वित छळ केला जात असे. काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना अंदमानच्या तुरुंगातील कोठडीच्या भिंतीवर कमला हे महाकाव्य लिहिणारे सावरकर हे अद्भुत प्रतिभेचे धनी होते. ‘तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण’ असे स्वातंत्र्य देवीला सांगणारे सावरकर राहुलबाबांना आणि त्यांच्या झिलकऱ्यांना समजणे अवघडच आहे. तुरुंगाच्या भिंतीचा कागद करून आणि काटे, खिळ्यांची लेखणी करून कमला नावाचे खंडकाव्य लिहिणाऱ्या सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्य समराचा इतिहास कथन करणारी १८५७ चे स्वातंत्र्य समर, सहा सोनेरी पाने ही ग्रंथ संपदाही निर्माण केली. माझी जन्मठेप हे आत्मवृत्त, संन्यस्त खड्ग, उ:शाप ही नाटके, छत्रपती शिवरायांची ‘जयदेव जयदेव शिवराया’ यासारखी आरती, सागरा प्राण तळमळला सारखे काव्य ही सावरकरांच्या अलौकिक प्रतिभेची साक्ष देणारी साहित्य संपदा आहे. लिहून दिलेली भाषणे वाचणाऱ्या आणि प्रॉम्प्टरचे ऐकून पोपटपंची करणाऱ्या राहुलबाबाच्या बुद्धीला सावरकरांची ही महती झेपणे अवघडच आहे. अंदमानातून रत्नागिरीत आल्यावर समाज सुधारण्याचे अजोड कार्य हाती घेणाऱ्या सावरकरांनी हिंदू धर्मातील जाती-भेद निर्मुलनासाठी अहर्निश प्रयत्न केले. त्यावेळच्या विलायतेत जाऊन बॅरिस्टर पदवी संपादन करणाऱ्या सावरकरांनी सशस्त्र क्रांतीचा प्रखर पुरस्कार केला होता. आपल्या कुटुंबाचा, घरादाराचा होम करणाऱ्या सावरकर कुटुंबाची पात्रता राहुलबाबांना समजावून सांगण्याची आमची इच्छा नाही. यानिमित्ताने एक बोधकथा आठवते . एकदा गाढव वाघाला म्हणते , गवत पिवळे असते. वाघ म्हणतो काहीही बोलतोस काय , गवत हिरवं असतं. दोघातला वाद जंगलाच्या राजाकडे म्हणजे सिंहाकडे जातो. सिंह स्मितहास्य करतो आणि सर्वांसमोर सांगतो की गाढव बरोबर बोलतो आहे . गवत पिवळंच असतं. सिंह वाघाला एक वर्षाची शिक्षा करतो. गाढव आनंदाने जंगलात निघून जाते. आपल्याला शिक्षा सुनावण्याचे कारण वाघ सिंहाला विचारतो. सिंह म्हणतो, गवत हिरवंच असतं, पण तरीही तू एका गाढवा बरोबर वाद घालत बसून स्वतःच वेळ वाया घालवलास म्हणून तुला शिक्षा दिली. तुकोबांनी अशा मंडळींचे सार्थ वर्णन केले आहे .

     

    मूर्ख बैसला कीर्तनीं | न कळे अर्थाची करणी ||

     

    घुबड फिरे चोहींकडे | न कळे नामाचे पवाडे ||

     

    तुका म्हणे न ऐकती | सांगितले वायां जाती ||

     

    अधिक सांगणे न लगे .

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी – महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, ०३ एप्रिल. २०२३)

    केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment