• ...यांचे सध्याचे हिंदुत्व ‘डीपफेक’!



    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कारवाईची मागणी करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आपली यापुढील राजकीय कारकीर्द सोनिया गांधींची काँग्रेस आणि पवारसाहेब यांच्या इशाऱ्यानुसार चालत राहणार हेच ठरवले आहे का, अशी शंका भाजपच्या वतीने घेणारे टिपण...

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून मध्य प्रदेशातील एका प्रचारसभेत अयोध्या दर्शनासंदर्भात झालेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांना अचानक हिंदुत्वाचे स्मरण झाले. १९८७ मधील विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचारावेळी ‘हिंदुत्व’ शब्दाचा वापर केल्यामुळे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार त्या वेळच्या निवडणूक आयोगाने सहा वर्षांसाठी काढून घेतला होता. त्या वेळी जो न्याय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना लावला होता तो केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लावणार का, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. यानिमित्ताने उद्धव ठाकरेंना वंदनीय बाळासाहेब आणि बाळासाहेबांच्या विचारांची आठवण झाली, हेही नसे थोडके!

    याचे कारण नोव्हेंबर २०१९ पासून उद्धव ठाकरेंना वंदनीय बाळासाहेबांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा पूर्णपणे विसर पडला आहे. मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंना काँग्रेस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समोर वंदनीय बाळासाहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारसरणीच्या शस्त्रांचे समर्पण करावे लागले. हिंदुत्वाला कायमची सोडचिठ्ठी द्यायची या बोलीवरच काँग्रेस आणि पवारसाहेबांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवले होते, हा इतिहास आहे. हा इतिहास उद्धव ठाकरे यांना कदापि पुसून टाकता येणार नाही. सोनिया गांधींची काँग्रेस आणि शरद पवार यांच्या समोर लोटांगण घालावे लागलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतरही हिंदुत्वाचा सोयीस्कर विसर पडल्याची अनेक उदाहरणे आहेत.

    डिसेंबर १९८७ मध्ये विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. त्या वेळी विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराने अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी देशव्यापी आंदोलन सुरू केले होते. ‘सौगंध राम की खाते है, मंदिर वहीं बनाएंगे’ ही घोषणा त्या वेळी संपूर्ण भारतवर्षात दुमदुमू लागली होती. वंदनीय बाळासाहेबांनी राम जन्मभूमीवर प्रभू रामचंद्राच्या मंदिर उभारणीला नि:संदिग्ध पाठिंबा जाहीर केला होता. राम मंदिरासाठीचे आंदोलन, शाहबानो खटला याचा उल्लेख करत वंदनीय बाळासाहेबांनी त्या वेळी हिंदुत्वाचा जागर सुरू केला होता. हिंदुत्वाचा वापर प्रचारात केल्यामुळे विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणूक जिंकणारे डॉ. रमेश प्रभू यांची निवड न्यायालयाने रद्द ठरवली. मात्र वंदनीय बाळासाहेबांनी आपला हिंदुत्वाचा वसा अखेरच्या श्वासापर्यंत सोडला नाही. १९९२-९३ मध्ये मुंबईत झालेल्या धार्मिक दंगली, दाऊद इब्राहिमने पाकिस्तानच्या मदतीने मुंबईत केलेले बॉम्बस्फोट या सर्व घटनाक्रमामध्ये वंदनीय बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार झळाळून उठले होते.

    क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा विचार कुणाकडे गहाण टाकला नव्हता. याउलट उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर राहण्यासाठी हिंदुत्वाचा विचार विसरणे भाग पडले होते. ते मुख्यमंत्री असताना शर्जील उस्मानी याने महाराष्ट्रात येऊन हिंदू धर्मावर गरळ ओकली होती. त्याच्या मुसक्या आवळण्याची हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवली नव्हती. शर्जील उस्मानीचा कडाडून निषेध करण्याचे धैर्यही उद्धव ठाकरेंना दाखवता आले नव्हते. सत्तेसाठी असे अगतिक, दयनीय झालेले उद्धव ठाकरे आता हिंदुत्वाबद्दल बोलत आहेत, हा नियतीने त्यांच्यावर उगवलेला सूडच म्हणावा लागेल.

    वंदनीय बाळासाहेबांनी राम मंदिरनिर्मितीबरोबरच काश्मीरसाठीचे ३७० वे कलम रद्द करण्याच्या मागणीला आणि देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या मागणीला नेहमीच पाठिंबा दिला होता. अलीकडे समान नागरी कायद्याबाबत देशभर चर्चा सुरू झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया आली. या कायद्याला खणखणीत पाठिंबा देण्याऐवजी उद्धव ठाकरे काय म्हणाले हे त्यांच्याच शब्दांत पाहा... ‘‘देशातील लोकांनाही हाच प्रश्न पडला आहे की, समान नागरी कायदा म्हणजे काय? समान नागरी कायद्याचा अर्थ कुणाच्या लग्नापुरता ठेवायला आणणार असाल तर तो भाग वेगळा. कायद्यापुढे सगळे समान असतील तर तुमच्यातल्या भ्रष्टाचाऱ्यांनासुद्धा शिक्षा झालीच पाहिजे. मला वाटतं हा समान नागरी कायद्याचा अर्थ सर्वसामान्य जनतेला अभिप्रेत आहे.’’

    समान नागरी कायदा म्हणजे काय हे न समजण्याएवढे उद्धव ठाकरे हे दुधखुळे नाहीत. अन्य कायदे आणि समान नागरी कायदा याचा बादरायण संबंध लावताना उद्धव ठाकरेंनी आपण राहुल गांधींचे खऱ्या अर्थाने ‘वैचारिक’ साथीदार झालो आहोत, हे दाखवून दिले आहे. हिंदुत्ववाद सोडताना उद्धव ठाकरेंना इतके अघळपघळ व्हावे लागले हे पाहून साहजिकच वाईट वाटत होते. सत्तेत असताना मशिदींवरील बेकायदा भोंग्यांबाबतही उद्धव ठाकरेंनी बोटचेपी भूमिका घेतली होती.

    बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या ज्वलंत भूमिकेला मूठमाती देऊन शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला बांधण्याच्या हेतूनेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना भोंग्यांच्या मुद्द्यावर दुतोंडी मुखवटे चढविले होते. परिणामी उद्धव ठाकरे यांची अवस्था ‘मुँह मे हिंदुत्व, बगल में भोंगा’ अशी झाली होती. बाळासाहेब ठाकरे यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्या राहुल गांधींना जाब विचारण्याचे धाडसही उद्धवरावांनी दाखवले नाही.

    हिंदुत्व विचाराला सत्तेसाठी मूठमाती देणाऱ्या उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व आजच्या भाषेत बोलायचे झाले तर ‘डीपफेक’ आहे. डीपफेक ही संकल्पना आजच्या युगात ‘खोट्या, नकली व्हिडीओ’च्या संदर्भाने वापरली जात आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा अशाच नकली पद्धतीने वापरला. त्यांना वंदनीय बाळासाहेबांच्या कट्टर हिंदुत्वाशी काहीच देणेघेणे नाही आणि नव्हते. आपला नकली हिंदुत्वाचा मुखवटा टाकून आता ते हिंदुत्वविरोधी शक्तींचे साथीदार झाले आहेत. उद्धव ठाकरेंचा नकली मुखवटा दुसऱ्या कोणी बनवला नव्हता, त्यांनी स्वत:च आपला हिंदुत्वाचा डीपफेक चेहरा बनवून तो बाजारात आणला. म्हणूनच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेंनी केव्हाच गमावला आहे. आपली यापुढील राजकीय कारकीर्द सोनिया गांधींची काँग्रेस आणि पवारसाहेब यांच्या इशाऱ्यानुसार चालत राहणार, हे उद्धव ठाकरेंनी मनोमन स्वीकारले आहे.

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी लोकसत्ता, २१ नोव्हेंबर २०२३)

    केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता 

  • You might also like

    No comments:

    Post a Comment