लोकसभा निवडणूक काही दिवसांतच जाहीर होईल . या निवडणुकीत
मतदार राजा नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीला मोठ्या
बहुमताने सलग तिसऱ्यांदा सत्तेवर बसविणार याची द्वाही केंव्हाच फिरली आहे . अनेक
जनमत चाचण्यांमधून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला जनतेची निर्वीवाद पसंती
असल्याचे दिसून आले आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी मोठा
गाजावाजा करून तयार केलेल्या इंडी आघाडीचे केंव्हाच तीन तेरा वाजले आहेत. अरविंद
केजरीवाल यांनी दिल्ली , पंजाब
मध्ये काँग्रेसला नगण्य जागा देऊ केल्या आहेत. दिल्लीत काँग्रेसला फक्त एक जागा
देऊ करून केजरीवालांनी आपण काँग्रेसला जमेत धरत नाही हेच दाखवून दिले आहे. पंजाब
मध्ये आपने सर्वच्या सर्व म्हणजे १३ जागा स्वबळावर लढविण्याचे घोषित केले आहे.
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला अवघ्या दोन जागा देऊ केल्या आहेत.
मायावती यांनी या अगोदरच इंडी आघाडीत न जाता स्वतंत्रपणे लढण्याचे जाहीर केले आहे.
किमान समान कार्यक्रम वगैरे वगैरे कागदी घोडे सध्या नाचले तरी जागावाटपाचा मुद्दा
येईल तेंव्हा हे ऐक्य केवळ भाजपा विरोध या एकमेव मुद्द्यावर आहे हे दिसेल आणि
अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी विरोधी मंडळींत सुंदोपसुंदी सुरु होईल हे
निश्चित.
यावेळच्या निवडणुकीचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस
यावेळी प्रथमच गांधी घराण्या व्यतिरिक्त चेहरा घेऊन या निवडणुकीत उतरणार आहे. इंडी
आघाडीची सूत्रे मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी
झाला. राहुल किंवा प्रियांका यांच्याकडे इंडी आघाडीची सूत्रे नको असा निर्णय
काँग्रेसला घेणे भाग पडले आहे. राहुल गांधींना मतदारांनी सलग दोन लोकसभा
निवडणुकांमध्ये नाकारले आहे. यावेळी पुन्हा हा चेहरा घेऊन जाणे योग्य नाही याची
जाणीव काँग्रेसला झालेली दिसते आहे. सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेशातून लोकसभा
निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे . त्यांनी अलीकडेच राजस्थानातून
राज्यसभेसाठी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे . सोनिया गांधी रायबरेली मधून लढणार
नाहीत ,
युवराज राहुलही अमेठीतून लढण्याचे धाडस दाखविणार नाहीत. ते
पुन्हा वायनाड च्या आश्रयाला जाण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस नेतृत्वाने लोकसभेचे
युद्ध सुरु होण्यापूर्वीच मैदान सोडलेले आहे, असा याचा अर्थ. १९५२ ते १९६२ अशा सलग ३ लोकसभा निवडणुका
पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिंकल्या होत्या . नंतर पंडित
नेहरूंच्या नेतृत्वाची उतरती कळा सुरु झाली . त्यामागच्या कारणांमध्ये आता जाण्यात
हशील नाही.
मुद्दा हा आहे की अनेकवर्षे सत्ता भोगलेल्या काँग्रेसला
गांधी घराण्याच्या प्रभावातून बाहेर पडावे लागले आहे . नरेंद्र मोदी यांनी गेल्या
१० वर्षांत काँग्रेसच्या घराणेशाही च्या राजकारणावर कठोर प्रहार केले. काँग्रेस
मधूनही गांधी घराण्याच्या मक्तेदारी विरुद्ध काही वर्षांपूर्वी उठाव झाला होताच.
स्वातंत्र्य लढ्यात अनेक नेत्यांचे , क्रांतिकारकांचे योगदान असूनही एकाच घराण्याला स्वातंत्र्य
मिळण्याचे श्रेय दिले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या
क्रांतिकारकालाही काँग्रेस राजवटीत दुर्लक्षित केले गेले. मोदी सरकारने नेताजींचे
दिल्लीत भव्य स्मारक उभारून त्यांच्या लढ्याचा यथोचीत गौरव केला. केंद्रात व अनेक
राज्यांत काँग्रेसचीच अनेक वर्षे निरंकुश सत्ता असल्याने सरकारी संस्था , पुरस्कार यांना गांधी घराण्यातील व्यक्तींचीच नावे देण्याचा
सपाटा लावला गेला होता. शेकडो सरकारी संस्थाना गांधी घराण्यातील व्यक्तींची नावे
दिली गेली. १९९१ ते १९९६ या काळात देशाला कठीण आर्थिक कालखंडातून बाहेर काढणाऱ्या
नरसिंह राव या सच्च्या काँग्रेसजनाने पंतप्रधान असताना गांधी घराण्यापुढे मान
तुकाविण्यास नकार दिला होता . त्यामुळे राव यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव
दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात येऊ दिले गेले नाही. याच राव यांचा मोदी
सरकारने अलीकडेच भारतरत्न देऊन गौरव केला.
१९७८ ते ऑक्टोबर २०२३ या ४५ वर्षांत ६ वर्षांचा अपवाद वगळला
तर गांधी घराण्याकडेच पक्षाचे अध्यक्षपद होते . ९२ ते ९८ या काळात नरसिंह राव , सीताराम केसरी यांच्याकडे अध्यक्षपद होते. स्वातंत्र्यपूर्व
काळापासून १९७० च्या दशकापर्यंत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी साठी तसेच अनेकदा
अध्यक्षपदासाठीही निवडणुका झाल्याचा इतिहास आहे . इंदिरा गांधींनी पक्षाची सारी
सूत्रे स्वतः कडे ठेवून आपल्याला विरोध करणार नाहीत अशाच नेते मंडळींच्या
नियुक्त्या राष्ट्रीय कार्यकारिणी , कार्यसमितीवर केल्या गेल्या. तीच पद्धत राजीव आणि सोनिया
गांधींनी चालू ठेवली . काँग्रेस कार्यकारिणीची ची दुसऱ्यांदा निवडणूक१९९७ मध्ये
सीताराम केसरी यांच्या अध्यक्षतेखाली कलकत्ता (आता कोलकाता) च्या अधिवेशनात झाली.
या निवडणुकीत अहमद पटेल, जितेंद्र
प्रसाद,
माधव राव सिंधिया, तारिक अन्वर, प्रणव मुखर्जी, आर. के. धवन, अर्जुन सिंग, गुलाम नबी आझाद, शरद पवार आणि कोटला विजया भास्कर रेड्डी विजयी झाले.१९९८
मध्ये सोनिया गांधी यांना अध्यक्ष करतेवेळी सीताराम केसरी यांनी अध्यक्षपदाचा
राजीनामा देण्यास नकार दिला होता , त्यावेळी त्यांना स्वच्छता गृहात कोंडून ठेवले गेले होते .
एका वयोवृद्ध नेत्याला अत्यंत हीन वागणूक देण्यात आली होती . पक्षांतर्गत
लोकशाहीचा गळा घोटल्याने , गांधी
घराण्याच्या मर्जीनुसार पक्ष चालविला जाऊ लागल्याने पक्षाची दारुण अवस्था झाली .
१९९१ मध्ये राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर नरसिंह राव
यांची ज्येष्ठता पाहून त्यांच्याकडे पंतप्रधानपद व काँग्रेस अध्यक्षपद सोपविले
गेलं . श्री. राव हे अन्य नेत्यांप्रमाणे आपल्याला विरोध करणार नाहीत अशी सोनिया
गांधींची अपेक्षा होती . नरसिंह राव यांनी १९९२ मध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या
निवडणुका घेतल्या होत्या . त्यावेळी प्रदेश समित्यांच्याही निवडणुका झाल्या होत्या
. १९९२ मध्ये, अखिल भारतीय
काँग्रेसचे चे राष्ट्रीय अधिवेशन तिरुपती येथे झाले. त्या काळात काँग्रेसचे
अध्यक्ष असलेले पीव्ही नरसिंह राव यांनीही काँग्रेस कार्यकारिणीच्या निवडणुका
घेतल्या होत्या. आपले कार्यकर्ते निवडणूक जिंकतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. निवडणुकीनंतर अर्जुन सिंह, शरद पवार, राजेश
पायलट असे त्यांचे विरोधकही विजयी झाले. मात्र सोनिया गांधी अध्यक्ष झाल्यानंतर ही
पद्धत बंद झाली. पक्षांतर्गत लोकशाहीचा गळा घोटून एका घराण्याच्या मर्जीनुसार
चालवला जाणारा हा पक्ष खऱ्या अर्थाने सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा व्हावा ही
अपेक्षा या निवडणुकीच्या निमित्ताने पूर्ण झाली तर देशाची लोकशाही आणखी समृद्ध
होणार आहे.
(लेखाची पूर्वप्रसिद्धी – महाराष्ट्र टाइम्स , १९ फेब्रुवारी २०२४)
केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता
No comments:
Post a Comment