• 'एनडीए' चा विजयी फंडा ; 'घमंडीया' कडे 'नो अजेंडा' !


    लोकसभा निवडणुकीचे बिगुल मोठ्या दिमाखात वाजले आहे. निवडणुकीच्या रिंगणातील वातावरणही चांगलेच तापले आहे. एकीकडे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील 'एनडीए' तर दुसरीकडे काँग्रेस प्रणित 'आयएनडीआयए' म्हणजेच 'घमंडीया' आघाडी! एकीकडे विकसित भारताचा संकल्प आणि त्याचे नियोजन, तर दुसरीकडे जागावाटपासाठी हाणामाऱ्या, मोदीद्वेषाने पेटलेले अतृप्त नेते ! एकीकडे भारताचे २०४७ पर्यंतचे नियोजन, तर दुसरीकडे फक्त आणि फक्त 'मोदी हटाव' चा अजेंडा! एकीकडे शिस्तबद्ध, नियोजनपूर्वक सर्वच क्षेत्रातील सक्षमीकरणासाठी परिपक्व आणि परिपूर्ण नियोजन तर दुसरीकडे गांधी - नेहरू घराण्याच्या तथाकथित कर्तृत्वाचा पाढा वाचत, भावनिक आवाहन करीत मते मिळवण्याचा प्रयत्न! थोडक्यात काय, एकीकडे विकासकामांचे आणि विकसित भारताचे, देशाच्या उज्ज्वल भवितव्याचे चित्र, तर दुसरीकडे शिव्याशाप, टीका टिप्पणी, कटकारस्थाने, टोमणे आणि अल्पसंख्यांकांच्या  तुष्टीकरणाचा एक कलमी अजेंडा !

          देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी गेल्या दहा वर्षात बदलून टाकलेला भारताचा चेहरा मोहरा, हा सध्या भारतीय मतदारांमध्येच नव्हे तर अवघ्या जगात चर्चेचा विषय ठरला आहे आणि मा. मोदीजींच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक देश आर्थिक सक्षमीकरणाकडे निघाले आहेत. तेराव्या क्रमांकावरून भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकापर्यंत आणणाऱ्या मा. मोदींजींच्या नेतृत्वाखालील सध्याच्या 'एनडीए' सरकारने आगामी पाच वर्षात देशाची अर्थव्यवस्था जगात पहिल्या तीन क्रमांकात नेण्याचे शिस्तबद्ध नियोजन केले आहे. विरोधी आघाडीकडे आर्थिक नियोजनाचा कोणताच विकल्प नाही. किंबहुना, (चुकून) त्यांची आघाडी निवडून आली तर देशाचा गाडा कसा  हाकायचा, याबाबतही त्यांची चर्चा नाही. अनेक 'भावी' पंतप्रधान त्या आघाडीमध्ये मिरवत आहेत, त्यांच्याकडे ना विकासाचा संकल्प आहे, ना मा. मोदीजींना विकल्प आहे ! फक्त घराणेशाही, स्वार्थी राजकारण आणि भ्रष्टाचारासाठी सत्ता मिळवून देशाची विल्हेवाट कशी लावायची, याचे भरपूर नियोजन आहे.

     

    मा. मोदीजींचे विकसित भारताचे स्वप्न!

     

         मा. मोदीजीनी वर्षांपूर्वी हातामध्ये देशाची सूत्रे घेतल्यानंतर एकही दिवस सुट्टी न घेता फक्त देशाचा विकास, देशातील तळागाळातील नागरिक, गोरगरीब, महिला, भगिनी, बळीराजा, कष्टकरी, वृद्ध आणि परदेशात अडचणीत आलेल्या भारतीयांची काळजी हाच दिनक्रम राबवल्याचे संपूर्ण देश उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. संपूर्ण देशातील परिस्थितीचा आणि राजकीय वातावरणाचा फेरफटका मारला तर सर्वत्र मा. नरेंद्रजी मोदी यांची विकासाची प्रचंड लाट दिसते. या विकास कामांच्या जोरावरच 'एनडीए' ने  'आपकी बार, चारसौ पार' चा नारा देऊन ही लोकसभा निवडणूक लढवण्याचा चंग बांधा आहे. खरे तर हा नारा देशातील तमाम जनतेनेच दिला आहे, आणि सध्याच्या सरकारला ४०० च्या पुढे जागा देण्याचा निश्चय देखील केला आहे, हे वेगळे सांगण्याची मुळीच गरज नाही. काही वृत्तवाहिन्यांचे मतदानपूर्व चाचणीचे तपशील बाहेर पडले असून बहुतेकांनी मा. मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ४००+ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, तर काहींनी ३८०+ जागा मिळतील असे म्हटले आहे. एकूण काय, प्रचंड बहुमत मिळणार आहे, याची खूणगाठ जनतेनेच  बांधली आहे!

     

    विकसित भारतासाठी कामांची जंत्री !

     

    मा. मोदीजी सध्या दक्षिण भारताच्या दौऱ्यावर आहेत. या भागामध्ये खरे तर यापूर्वी भारतीय जनता पार्टीची फारशी ताकद नव्हती. पण, यावेळी जो अनुभव येत आहे, जी गर्दी जमत आहे, त्यावरून देशानेच ४०० आकडा पार नेण्याचे ठरवले आहे, याची प्रचिती येते. गोरगरीब जनतेसाठी मा. मोदीजींनी नेहमीच दूरदृष्टी ठेवून पाऊल पुढे टाकले आहे. गेल्या दहा वर्षात देशातील २५ कोटीपेक्षा जास्त नागरिकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. काँग्रेसने पूर्वी 'गरिबी हटाव' चा नारा दिला, पण जनतेऐवजी त्यांच्या नेत्यांचीच गरिबी हटली! म्हणूनच आपल्या १४० कोटी कुटुंब सदस्यांसाठी आपण दिवस-रात्र काम करीत आहोत हे मा. मोदीजींचे विधान थेट गोरगरिबांच्या हृदयाचा ठाव घेत आहे. गोरगरिबांपासून ते देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याबाबत प्रत्येक गोष्टीत सजगता, सज्जता हे मा. मोदी यांचे वैशिष्ट्य कोणी डोळ्याआड करू शकत नाही.

           कृषी, शिक्षण, संशोधन, संरक्षण, अवकाश, आयटी क्षेत्र असो, प्रत्येक ठिकाणी या सरकारने उचललेली पावले देशासाठी इतर राष्ट्रांपेक्षा काकणभर सरस ठरली आहेत आणि साधलेला विकास युवक, युवती, महिलांसाठी पथदर्शक ठरला आहे. या दहा वर्षांच्या काळात कोणतेही क्षेत्र मागे राहिलेले नसून प्रत्येक ठिकाणी भारताने उत्तुंग झेपच घेतली आहे.

             शेतकरी आणि कृषी क्षेत्र हा तर भारताचा कणाच आहे, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मा.  मोदीजींनी देशातील ग्रामीण भागातील जीवन सुसह्य व्हावे म्हणून अथक प्रयत्न केले असून विकासही साधला आहे. घरोघरी शौचालय, गॅस, घरापर्यंत पाणीपुरवठा, शेतकऱ्यांना रोखीने देण्यात येणारी मदत, बी-बियाणे आणि खतांवर अनुदान, कर्जांसाठी भरीव योजना अशा ग्रामीण विकासकामांचा पाढा वाचावा तेवढा थोडाच आहे. शहरी भागांसाठी मेट्रो, वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी रस्त्यांचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण, खास युवकांसाठी रोजगार आणि शिक्षणाच्या अनेक संधी या काळात उपलब्ध झाल्या आहेत. देशाचा चौफेर विकास हे आदर्शवत काम मा. मोदीजींच्या सरकारने अग्रक्रमाने केले असून सर्वसामान्य नागरिकालाही ते भावले आहे. ग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन,त्यासाठी छोटी कर्जे, स्वावलंबन, यामुळे विरोधी घमंडीया आघाडीचा जळफळाट सुरू आहे. त्यामुळे नको त्या मुद्द्यांना महत्त्व देऊन सरकारवर आणि भारतीय जनता पार्टीसह मित्र पक्षांवर तोंडसुख घेणे सुरू आहे. प्रत्येक सूज्ञ मतदाराच्या हे लक्षात येण्यासारखे आहे.

     

    मा. मोदीजींच्या पत्रात सर्व काही..

     

    आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मा. मोदीजींनी देशातील नागरिकांना पत्र पाठवले असून त्यात एकूणच त्यांची दूरदृष्टी आणि विकसित भारताचे स्वप्न साकारण्याची क्षमता दाखवली आहे. हे पत्र म्हणजेच सर्व काही, असेच म्हणावे लागेल. 'मेरे प्रिय परिवारजन,' असे म्हणत त्यांनी या पत्रात संपूर्ण विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी जनतेला आवाहन केले आहे. ते म्हणतात, माझ्या आणि तुमच्या नात्याला आता एक दशक पूर्ण झाले आहे. जनतेचे सहकार्य कायम मिळणार, याचा विश्वास आहे. राष्ट्र निर्माणासाठी रात्रंदिवस आम्ही कष्ट घेत आहोतच आणि हीच मोदीची गॅरंटी आहे देशातल्या 140 कोटी कुटुंबीयांचा विश्वास त्यांनी दिलेले भरभरून समर्थन, यामुळे हे नाते घट्ट झाले आहे. ते इतके घट्ट आहे की, शब्दांमध्ये व्यक्त करणे अवघड आहे. देशातील कुटुंबीयांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणे, हीच या सरकारची मोठी उपलब्धी आहे. गोरगरीब,शेतकरी, तरुणाई आणि महिला यांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी या सरकारने अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे आणि त्याचे परिणाम आज संपूर्ण देशाला दिसून येत आहेत... असे हे अत्यंत भावनिक पत्र आहे.

     

            एकूणच विकसित भारताचा दावा त्यांनी या पत्रामध्ये केला असून जीएसटी, कलम ३७०, महिलांसाठी नारीशक्ती वंदन विधेयक आणि तीन तलाक याचीही माहिती दिली आहे. तसेच आपल्या तिसऱ्या वेळच्या कार्यकाळात जनतेकडून समर्थन आणि सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांनी लोकसभेसाठी ४०० जागांवर विजय मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे. सरकारचा हा विकासाचा अजेंडा २०४७ पर्यंत पूर्ण होईल, असा दावा त्यांनी केला आहे.

     

    विरोधकांचा 'नो अजेंडा' !

     

           या पार्श्वभूमीवर विरोधी आघाडी कडून जनतेची केवळ दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. जागावाटपात एकमत नाही,  समोर काहीही अजेंडा नाही. फक्त केंद्रीय मंत्र्यांना घालून पाडून बोलणे, नको त्या गोष्टींचे नॅरेटिव्ह' पसरवणे, हाच त्यांचा मुख्य अजेंडा झाला आहे. या  निवडणुकीचा आणि मतदारांचा विचार केला तर एक गोष्ट निश्चित जाणवते, ती म्हणजे एनडीए आघाडीचा प्रचार हा पूर्णपणे होकारात्मक आणि विकासकामांवर किंवा विकसित भारतावर आधारित आहे. या उलट घमंडीया आघाडी ही फक्त देश दुबळा कसा राहील, निराशा, नकारात्मक दृष्टिकोन आणि सगळीकडे नन्नाचा पाढा वाचत सुटली आहे. जनताच आता ठरवेल, की एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा जिंकून द्यायच्या आहेत आणि देशाची उत्तुंग भरारी पुढील काही वर्षात पाहायची आहे.

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी –नवशक्ती, २० मार्च २०२४ )

    केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment