• मोदी सरकार : संकल्पस्थितीतून सिद्धीपर्वाकडे...

     

    पंतप्रधान मोदी यांच्या कारभाराला एक दशक पूर्ण झाले आहे. या दशकभरात त्यांनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून अकरा भाषणे केली. या भाषणांचा आढावा घेतला तर आधीच्या भाषणांमध्ये केलेले संकल्प पूर्णत्वाला गेलेले दिसतात. जागतिक मंचावर भारताची नवी सक्षम प्रतिमा निर्माण होत आहे. आता स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षापर्यंत समृद्ध भारताचा संकल्प साकार करायचा आहे. त्यासाठी जनतेच्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि ते मिळेल याची खात्रीही आहे.



    दहा वर्षांपूर्वी, २०१४ मध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधून केलेले पहिले भाषण आणि यंदाच्या स्वातंत्र्यदिनी केलेले अकरावे भाषण म्हणजे गेल्या दहा वर्षांत देशातील जनतेच्या, प्रशासन यंत्रणेच्या आणि एकूणच देशाच्या आर्थिक, सामाजिक, औद्योगिक व सर्वांगीण वाटचालीचा एक व्यापक आढावा ठरला आहे. गेल्या दहा वर्षांत झालेली देशाची वाटचाल, मानसिकतेतील बदल, जागतिक मंचावर देशाला लाभत गेलेली प्रतिष्ठा आणि वेगवेगळ्या क्षेत्रांत प्रत्यक्ष दिसणारी विकासाची अभिमान चिन्हे यांचा एक पट पंतप्रधान मोदी यांच्या दहा भाषणांचा आढावा घेताना स्पष्टपणे उमटतो.

    २०१४ च्या स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरील पहिले भाषण ६५ मिनिटांचे होते. या भाषणात त्यांनी देशाच्या भविष्यातील वाटचालीचे, जनतेच्या व यंत्रणांच्या मानसिकतेत अपेक्षित असलेल्या बदलांचे आणि सरकार म्हणून निश्चित केलेल्या वाटचालीचे संपूर्ण चित्र रेखाटले होते. त्यानंतरच्या प्रत्येक स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यातील त्यांच्या भाषणांच्या साखळीचे दुवे जोडले, तर यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून त्यांच्या पहिल्या भाषणातील अपेक्षांच्या व उद्दिष्टांच्या पूर्तीकडे वाटचाल होत असल्याच्या समाधानाचे प्रतिबिंब दिसते. त्यांच्या पहिल्या भाषणात सरकारच्या वाटचालीची दिशा स्पष्ट करताना पंतप्रधानांनी एक महत्त्वाची बाब अधोरेखित केली होती. आम्ही बहुमताच्या जोरावर मनमानी करणार नाही, तर बहुमताच्या रूपाने देशाने दिलेल्या जनादेशाचा आदर करून सहमतीच्या जोरावर देशाला प्रगतीच्या दिशेने नेऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. या वाटचालीत त्यांनी जनतेकडून सहकार्याची अपेक्षा केली होती. प्रशासनाला संयमी कानपिचक्या देऊन मानसिकता बदलण्याचे आवाहन केले होते आणि आजपर्यंत कधीही लाल किल्ल्यावरून उल्लेख झाला नव्हता, त्या स्वच्छतेच्या चळवळीचे महत्त्वही त्यांनी आपल्या त्या पहिल्या भाषणातून अधोरेखित केले होते. त्यानंतरच्या स्वातंत्र्यदिनी बोलताना, एक पाऊल पुढे टाकण्याचे सुतोवाच केले. देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार करताना, त्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा असल्याची बाब त्यांनी नोंदवली होती. केवळ देशालाच नव्हे, तर जगालाही सोबत घेऊन मानवमात्राचा विकास करण्याचा व्यापक संकल्प त्यांनी त्या भाषणात व्यक्त केला, पण त्याच वेळी, देशाच्या संरक्षणाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा परखड इशाराही दिला होता. देशाच्या सीमा सुरक्षित राखण्यासाठी असलेल्या कटिबद्धतेची ग्वाही देतानाच, देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी सुनावले होते. २०१६ च्या स्वातंत्र्यदिनी सरकारच्या जनतेशी असलेल्या बांधिलकीची जाणीव व्यक्त करताना, शासनयंत्रणांच्या संवेदनशीलतेचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. या यंत्रणा संवेदनशील असल्या पाहिजेत, पण तसे दिसत नाही, असेही पंतप्रधानांनी परखडपणे सुनावले. आपल्या पहिल्या भाषणातील इशाऱ्याचा आपल्याला विसर पडलेला नाही, याकडेही त्यांनी यंत्रणांचे लक्ष वेधले. जनतेची, यंत्रणांची मानसिकता बदलत आहे. त्यामुळे जुन्या मानसिकतेची जळमटे झटकून टाकली पाहिजेत, ‘चलता है’, ‘मला काय त्याचे’ ही मानसिकता बदलली पाहिजे, असा इशारा दोन वर्षांनंतर पुन्हा देताना, आपल्या उद्दिष्टांची आणि त्यांच्या पूर्ततेच्या वाटचालीची दिशा स्पष्ट असल्याची जाणीवही त्यांनी करून दिली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देश एक केला. आता ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ ही आपली सामाजिक आणि सामूहिक जबाबदारी असून स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतर मानसिकता बदलत असली तरी गतिमान व्हायला हवे, याची जाणीव त्यांनी करून दिली. पहिल्या भाषणात जाहीर केलेली ‘जनधन योजना’ देशात रुजत होती, घराघरांतील धुराच्या चुली जाऊन तिथे गॅसच्या जोडण्या दिल्या जात होत्या. साठ वर्षांत देशातील केवळ १४ कोटी लोकसंख्येपर्यंत पोहोचलेल्या गॅस जोडण्यांच्या संख्येत मोदी सरकारच्या पहिल्या ६० आठवड्यांत चार कोटी नव्या गॅस जोडण्यांची भर पडली होती. स्वातंत्र्यानंतर कित्येक दशके बँक व्यवहारांपासून दूर राहिलेल्या २१ कोटी कुटुंबांना जनधन खात्याद्वारे बँक व्यवहारांशी जोडले गेले होते. देशातील जनतेने मोदी यांच्या संकल्पांची पूर्तता करण्याकरिता उचललेले हे सहकार्याचे पाऊल महत्त्वाचेच म्हणावे लागेल.

    गेल्या दशकभरातील भारताची प्रगतीच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल देशाच्या इतिहासात नोंदवावी लागेलच. पण याच काळात देशाला जागतिक शक्ती बनविण्याच्या नव्या संकल्पाची बीजेदेखील मूळ धरू लागली आहेत. यासाठी जनतेची साथ हवी, असे आवाहन मोदी यांनी २०१६ च्या स्वातंत्र्यदिनी केले आणि नव्या वाटचालीचे पहिले पाऊल पडले. नव्या भारताचा संकल्प जाहीर करतानाच, २०२२ पर्यंत हा संकल्प पूर्ण करण्याकरिता २१ व्या शतकात जन्मलेल्या युवा पिढीला पंतप्रधानांनी पुढे येण्याची साद घातली. देशाच्या प्रगतीचे भागीदार व्हा, असे आवाहन केले. ‘चलता है’ मानसिकतेचे युग संपल्याचे जाहीर करून बदलत्या भारताची वाटचाल सुरू झाल्याची ग्वाही दिली. दहशतवादाला चोख उत्तर देण्याची हिंमत दाखविणारा भारत आता नव्याने उभारी घेत असल्याचे सर्जिकल स्ट्राइकनंतर सिद्ध झालेच होते.

    सन २०१४ ते २०१९ हा मोदी सरकारच्या कारकीर्दीच्या पहिल्या पर्वाचा काळ म्हणजे, जनतेच्या आकांक्षापूर्तीचा आणि स्वप्ने साकारण्याचा काळ ठरला. ‘सबका साथ, सबका विकास’ हा या वाटचालीचा मंत्र होता आणि नव्या आत्मविश्वासाच्या जाणिवा जाग्या होत होत्या. मुस्लीम महिलांना दिलासा देणारा एक क्रांतिकारी निर्णय घेऊन मोदी सरकारने तीन तलाक प्रथा इतिहासजमा केली. दहशतवादाच्या विरोधातील संघर्ष तीव्र करण्यासाठी कायद्यात कठोर सुधारणा करण्यात आल्या आणि नव्या पर्वाची पूर्वतयारी पूर्ण झाली. मात्र, २०२० चे वर्ष जागतिक महामारीमुळे काळवंडले. मात्र या संकटाच्या वेळीही देशाच्या वसुधैव कुटुम्बकम या सांस्कृतिक भावनेची ओळख जगाला करून देण्याची संधी मोदी सरकारने साधली. स्वच्छ भारत मोहिमेपासून सुरू झालेली एक विकास यात्रा, स्टार्टअप इंडिया, जीएसटी, न्यू इंडिया, आयुष्यमान भारत, वोकल फॉर लोकल, लखपती दीदी, विश्वकर्मा योजना, अशा अनेक कल्याणकारी योजनांच्या आखणीपासून पूर्ततेच्या प्रवासाचे टप्पे पूर्ण करून आता नव्या प्रवासास सिद्ध झाली आहे.

    आता नव्या पर्वाच्या प्रारंभी, जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. देशातील १४० कोटी लोकसंख्येने निर्धारपूर्वक विकासाच्या वाटचालीची दिशा निश्चित केली तर कितीही मोठी आव्हाने पेलता येतात आणि स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षापर्यंत समृद्ध भारताचा संकल्प साकार करता येतो, असा आत्मविश्वास देशात रुजला आहे. आज संपूर्ण जगात काहीसे अस्थैर्याचे वातावरण आहे. जागतिक स्थिती झाकोळलेली आहे, पण भारताच्या दृष्टीने मात्र हा सुवर्णकाळ ठरू पाहात आहे. ही संधी कोणत्याही स्थितीत गमावून चालणार नाही, हा मोदी सरकारचा निर्धार हा त्यांच्या तिसऱ्या पर्वाचा संकल्प आहे. कारण ही जनतेची इच्छा आहे. जनतेची स्वप्ने पूर्ण करणे हाच आपला संकल्प आहे, अशी ग्वाही मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात देशाला दिली होती. या सुवर्णकाळातील प्रत्येक संधीचा लाभ घेत स्वप्ने आणि संकल्पांसह आगेकूच केली तर २०४७ पर्यंत स्वर्णिम भारताचे स्वप्न साकार होईल, हा पंतप्रधानांचा विश्वास आहे आणि त्यांच्या या विश्वासाला आता जनतेची साथ मिळणार आहे.

     

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी –नवशक्ती,२० ऑगस्ट २०२४)

    केशव उपाध्येमुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment