पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी या गंभीर प्रसंगात राजकारण केल्याची टीका झाली. मोदी सरकारने तातडीने बैठक घेतली, तर काँग्रेसने दिशाभूल करणारे वक्तव्य केले. ‘घर का भेदी लंका ढाये’, अशी हिंदीमध्ये म्हण आहे. याचा अर्थ बाह्य शत्रूंपेक्षा देशात राहणारे देशविरोधी लोक हेच शत्रूपेक्षा धोकादायक असतात, असा आहे. काँग्रेस नेत्यांची वक्तव्ये पाहिल्यावर या म्हणीचे स्मरण होते.
पहलगाम
येथील हल्ल्यानंतर सर्वसामान्य माणूस सरकारच्या पाठीमागे एकमुखाने उभा राहिल्याचे
चित्र दिसून आले. या हल्ल्याला आपले सरकार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे
खणखणीत उत्तर देतील, याबाबत सामान्य माणसाच्या मनात
कोणतीच शंका नाही. याचे कारण २०१६ आणि २०१९ मध्ये अशाच पद्धतीने झालेल्या दहशतवादी
हल्ल्यांना भारताने पाकिस्तानच्या भूमीत घुसून प्रत्युत्तर दिले होते. पंतप्रधान
मोदी हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेतील, याबाबत सामान्य भारतीय निश्चिंत आहे. २००८ मध्ये मुंबईसारख्या महानगरात
घुसून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी शेकडो निरपराध भारतीयांची हत्या केली होती.
त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या मनमोहन सिंग सरकारने पाकिस्तानचा निषेध
करण्याखेरीज काहीच केले नव्हते. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निरपराध नागरिकांना ते
हिंदू आहेत ना, याची खात्री करूनच ठार मारले. ही माहिती
हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनीच दिली. दहशतवाद्यांनी फक्त हिंदू
नागरिकांना लक्ष्य केले, ही गोष्ट यातून अधोरेखित झाली.
यावरूनही शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्याने तसेच विजय
वडेट्टीवार या काँग्रेस नेत्याने राजकारण करावे, यासारखी
दुर्भाग्याची दुसरी गोष्ट नाही.
युद्धात
आणि दहशतवादी हल्ल्यासारख्या संकटात संपूर्ण देश केंद्र सरकारच्या मागे खंबीरपणे
उभा राहतो, असे चित्र आपल्या देशाने अनेकदा पाहिले आहे.
१९७१ मध्ये बांगलादेश मुक्तीसाठी लढा सुरू झाल्यानंतर त्या लढ्याला बळ देण्याचा
निर्णय त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतला होता. त्यावेळी इंदिरा
गांधी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी चर्चा करून त्यांना परिस्थितीची कल्पना
दिली होती. त्यावेळी अटलजींनी, ‘सरकारच्या निर्णयाला
जनसंघाचा पूर्ण पाठिंबा असेल’, असे इंदिराजींना स्पष्टपणे
सांगितले होते. त्या स्थितीत पक्षीय मतभेद दाखवणे हे देशविरोधी कृत्य ठरले असते,
याची जाणीव अटलबिहारी वाजपेयी यांना होती. सरकारच्या अन्य धोरणांवर
संसद आणि अन्य व्यासपीठांवरून आपण आवश्यक टीका करू, मात्र
बांगलादेश मुक्ती संग्रामावरून पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यानंतर इंदिरा
गांधी सरकारच्या पाठीमागे उभे राहणे, हे प्रत्येक
राष्ट्रप्रेमी नागरिकाचे कर्तव्यच आहे, या भावनेतून जनसंघाने
इंदिरा गांधींच्या सरकारला पूर्ण पाठिंबा दिला होता. पक्षहितापेक्षा देशहित मोठे,
असे बाळकडू जनसंघाच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना मिळालेले आहे.
याच भावनेतून १९६५ मध्ये पाकिस्तानबरोबरच्या युद्धावेळी त्यावेळचे पंतप्रधान
लालबहादूर शास्त्री यांच्या मागे जनसंघ उभा आहे, अशी ग्वाही
दीनदयाल उपाध्याय यांनी जाहीरपणे दिली होती. दुर्दैवाने सध्याच्या काँग्रेस
नेतृत्वाकडे व्यापक राष्ट्रवादी दृष्टीचा अभाव असल्याचे चित्र दिसते आहे.
पहलगाम
हल्ल्याबाबत मोदी सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावून सर्व विरोधी पक्षांना
पहलगाम हल्ल्यानंतरच्या परिस्थितीची तसेच केंद्र सरकारच्या भूमिकेची माहिती दिली
होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी १९९१ ते १९९३ या काळात देशाचे संरक्षण मंत्रिपद
भूषविले आहे. अनेक वर्षे राष्ट्रीय राजकारणात वावरत असल्यामुळे पवार साहेबांना अशा
प्रसंगात विरोधी पक्षीयांनी कशा भूमिकेत सरकारच्या पाठीमागे उभे राहायचे असते, याची पूर्ण कल्पना आहे. पवार साहेबांनी पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या
नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेतली. ‘दहशतवाद्यांनी धर्म विचारून नागरिकांना ठार
मारले’, असे हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी
सांगितले. असे पवार साहेबांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते; मात्र प्रत्यक्षात अतिरेक्यांनी तसे केले का, याबाबत
आपल्याला माहिती नाही, अशी मखलाशी करण्यास पवार साहेब विसरले
नाहीत. हिंदू धर्मीयांची वेचून हत्या केली गेली नाही, असे
सांगण्याचा प्रयत्न पवार साहेबांसारख्या नेत्याने का करावा, याचे
उत्तर काही केल्या मिळत नाही. दुसरीकडे काँग्रेस नेतृत्वाने आपल्या अकलेचे पुरते
दिवाळे वाजले आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवर ‘सर तन से जुदा’च्या धरतीवर पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांचा चेहरा नसलेले छायाचित्र प्रसिद्ध केले गेले. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर
पंतप्रधान नरेंद्र मोदी गायब झाले आहेत, अशी टीका काँग्रेसने
या छायाचित्राच्या माध्यमातून केली होती.
दहशतवादी
हल्ल्याचे वृत्त कळताच पंतप्रधान मोदी हे आपला परदेश दौरा अर्धवट टाकून भारतात
परतले. विमानतळावरून आपल्या निवासस्थानी न जाताच पंतप्रधानांनी तेथे बैठका
घेतल्या. पंतप्रधानांनी अशा स्थितीत आपण कोणाशी काय चर्चा केली, हे सांगावे अशी काँग्रेसची अपेक्षा असावी. चहूबाजूंनी टीका झाल्यावर
काँग्रेसने ‘एक्स’वरील आपली पोस्ट मागे घेतली. विजय वडेट्टीवार यांनी आपल्या
अकलेचे तारे याही स्थितीत तोडले. ‘नागरिकांचा धर्म विचारून त्यांना ठार करण्याएवढा
वेळ दहशतवाद्यांकडे नसतो, असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी
केले.
‘घर का भेदी लंका ढाये’, अशी हिंदीमध्ये म्हण आहे.
याचा अर्थ बाह्य शत्रूंपेक्षा देशात राहणारे देशविरोधी लोक हेच शत्रूपेक्षा
धोकादायक असतात, असा आहे. काँग्रेस नेत्यांची वक्तव्ये
पाहिल्यावर या म्हणीचे स्मरण होते. आपल्या वक्तव्याने कोणत्याही स्थितीत देशाचे
नुकसान होता कामा नये, याचे भान काँग्रेस नेतृत्वाला
राहिलेले नाही. भारतीय जनता पक्षाला राजकारणात विरोध करणे हे विरोधी पक्षांचे
कर्तव्यच आहे; मात्र हा विरोध करताना त्याला देशविरोधाची
किनार लागू नये, याची दक्षता प्रत्येकाने घ्यावयाची असते.
भाजपला विरोध करताना काँग्रेसला देशहिताचा विसर पडला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री
आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानशी
युद्ध नको, यासारखी भूमिका जाहीरपणे घेतली आहे. पाकिस्तानचे
भारतातील छुपे समर्थक हाच देशापुढील मोठा धोका आहे, यात शंका
नाही.
(लेखाची पूर्वप्रसिद्धी – नवशक्ति, ०६ मे २०२५)
केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता
No comments:
Post a Comment