पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन
सिंदूर’द्वारे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर जोरदार प्रत्युत्तर दिले. मोदी
सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ व ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत विकसित
शस्त्रास्त्रांनी या मोहिमेत निर्णायक भूमिका बजावली. भारताची सहनशीलता संपली असून
आता दहशतवाद्यांवर कठोर कारवाईचा काळ सुरू झाला आहे. ही कारवाई केवळ सुरुवात असून, भारताची जागतिक सामर्थ्य म्हणून ओळख अधिक दृढ होत आहे.
पहलगाम येथील हिंदू हत्याकांडानंतर दोनच दिवसांनी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी हे हल्ले घडविणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या
शक्तींना कल्पनेपेक्षाही भयंकर शिक्षा करू, अशा मोजक्या शब्दांत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या.
पंतप्रधानांचे हे शब्द किती खरे ठरत आहेत, याचा अनुभव
पाकिस्तानचे राज्यकर्ते ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर घेत आहेत. भारत च्या रूपाने जगाच्या
पाठीवर आणखी एक सामर्थ्यशाली शक्ती अवतरली आहे, हेच ‘ऑपरेशन
सिंदूर’ ने सिद्ध केले आहे.
पहलगाम हत्याकांडानंतर ७ मे पर्यंतच्या १५ दिवसांच्या काळात
केंद्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे प्रयत्न प्रचंड जोमाने सुरू झाले
होते. पाकिस्तानचे पाणी कसलं बंद करता, पाकिस्तानवर हल्ला करा, ५६ इंचाची छाती आता गप्प का
बसली आहे, अशा पद्धतीची भाषाविरोधी नेते मंडळींनी, समाजमाध्यमांवरील मोदी विरोधकांनी सुरू केली होती. काही मंडळींनी, तर पहलगाम हल्ला घडवून आणला गेला, अशी शक्यता
वर्तवून आपल्या अकलेचे रिकामे भांडे वाजवून दाखवले होते. अजय राय सारख्या नेत्याने
राफेल विमानाच्या प्रतिकृतीला मिरची- लिंबू लटकावून मोदी सरकारवर नव्हे, तर हवाई दलाच्या क्षमतेवर शंका उपस्थित केल्या. युद्धासाठी नागरिकांनी
तयार रहावे, यासाठी जाहीर करण्यात आलेल्या मॉक ड्रिलचीही या
मंडळींनी यथेच्छ टिंगलटवाळी करून आपला मोदी विरोधाचा कंड शमवून घेतला होता. ही
सर्व मंडळी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू झाल्यानंतर वाचा बसल्यासारखी गप्प आहेत. केंद्र
सरकार एवढं काही करेल, या अपेक्षेत ही मंडळी नव्हती. भारतीय
सैन्याच्या कारवाईनंतर पाकिस्तानी दहशतवादी ठार झाल्याचे पुरावे नाहीत, असे म्हणत आपल्या अकलेचा 'किरण' प्रकाश पृथ्वीतलावर पाडण्याची घाई काही अभिनेत्यांना झाली होती. ‘लष्कर ए
तोयबा’, ‘जैश ए मोहम्मद’ आणि ‘हिज्बुल मुजाहिदीन’ या
दहशतवादी संघटनांच्या पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील तळांना अचूकपणे
उद्ध्वस्त करून भारतीय सैन्य दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केले आहे.
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यातील आणखी एक टप्पा पूर्ण झाला
आहे. हा टप्पा पार पाडल्यानंतर भारत थांबेल, अशी अनेक संरक्षण आणि राजकीय तज्ज्ञांची अटकळ होती. या सर्वांचे अंदाज
चुकवीत भारताने आपली मोहीम आणखी तीव्र केली आहे. ही कारवाई अटळ होती, ही परिस्थिती भारताने निर्माण केली नव्हती, हा
संघर्ष पाकिस्तानच्या लष्करशहांनी आणि त्यांच्यापुढे लोटांगण घालणाऱ्या पाकिस्तानी
राज्यकर्त्यांनी भारतावर लादला आहे. भारताने १९८०पासून पाकिस्तानने सुरू केलेल्या
अघोषित युद्धात बरेच काही भोगले आहे. १९८०च्या दशकांत खलिस्तानचे भूत उभे करून
अशांत केलेला पंजाब, त्यात इंदिरा गांधी, लष्करप्रमुख अरुणकुमार वैद्य, हरचरण सिंग लोंगोवाल
यांच्यासारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसह हजारो निरपराध सामान्य नागरिकांचा
गेलेला बळी, त्या पाठोपाठ आझाद काश्मीरची हाळी देत काश्मिरी
युवकांना भडकवत काश्मीर खोऱ्यात १९९०च्या दशकांत पेटवलेला हिंसाचार, त्यात बळी गेलेले हजारो सामान्य नागरिक, शेकडो
सुरक्षा दल जवान, पोलीस, मुंबईतला
१९९३चे बॉम्बस्फोट, २००१चा संसदेवरील हल्ला, २००८चा मुंबईवरील हल्ला, याशिवाय देशात अनेक ठिकाणी
केलेले बॉम्बस्फोट... एवढे सारे सामान्य भारतीयांनी भोगले आहे. दहशतवादी घटनांत
बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांचा आकांत पाहून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे बाप आणि
भारतातील पाकिस्तान समर्थक टाळ्या पिटायचे. याचा हिशोब केव्हा तरी चुकता व्हायला
हवाच होता, तो आता होतो आहे. आजवर दाखवलेल्या सहनशीलतेचा
कडेलोट पहलगाम निमित्ताने झाला आहे. या सिंदूर मोहिमेची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
मोदी सरकारने २०१४ नंतर 'मेड-इन-इंडिया' या मंत्राचा वापर करत देशातच अनेक शस्त्रास्त्रे, शस्त्रे
विकसित केली, जागतिक दर्जाची संरक्षण प्रणाली तयार केली,
क्षेपणास्त्रांच्या निर्मितीत गरुडझेप घेतली. २०१४ नंतर गेल्या दहा
वर्षांत राफेल आणि एस-४०० सारखी क्षेपणास्त्र प्रणाली सारखे खरेदी व्यवहार झाले.
हे व्यवहार मध्यस्था विना दोन्ही सरकारच्या दरम्यान झाले. मध्यस्थ, दलाल नसल्याने या व्यवहारांत दमडीचाही भ्रष्टाचार झाला नाही, एस -४००, राफेल यांचा वापर या मोहिमेत झळाळून उठला.
मेक इन इंडिया व आत्मनिर्भर भारत या दोन्ही कर्यक्रमा अंतर्गत भारताने
शस्त्रांच्या निर्मितीत मोठी प्रगती केलेली आहे.
मोदी पर्वात भारताने धनुष्य सारखी क्षेपणास्त्र प्रणाली
देशात विकसित झाली आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केला गेलेला अर्जुनसारखा
मुख्य लढाऊ रणगाडा, संपूर्ण भारतीय बनावटीचे तेजस
सारखे लढाऊ विमान अशी आत्मनिर्भर भारत मोहिमेद्वारे झालेली संरक्षण निर्मिती या
सिंदूर मोहिमेत अत्यंत प्रभावी ठरली आहे. गेल्या काही वर्षांपर्यंत सर्व
शस्त्रास्त्रे आयात करणाऱ्या भारताने २२ हजार कोटी रुपयांची शस्त्रे निर्यात केली
आहेत. आजवरच्या पाकिस्तानच्या उत्पाताचा सगळा हिशोब आता चुकता होतोय. यात ज्यांना
अपराध गंड बाळगायची हौस आहे, त्यांनी तो जरूर बाळगावा.
साक्षात श्रीकृष्णाने अधर्माचा नाश करण्यात काहीच गैर नाही, असे
'अभ्युथानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्' या शब्दांत आपल्याला सांगितले आहे. आजवर अनेक पिढ्यांनी दहशतवाद सहन केला
आहे. दहशतवाद रुपी शिशुपालाच्या अपराधाचा घडा केव्हा तरी भरणारच होता, निमित्त पहलगामचे झाले इतकेच.
(लेखाची पूर्वप्रसिद्धी –नवशक्ति, १३ मे २०२५)
केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता
No comments:
Post a Comment