• वीरः सदा जयत्येव, नृपतिः शूर एव च

     

    पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ने भारताने आपली लष्करी ताकद सिद्ध केली. वॉशिंग्टन पोस्ट आणि न्यूयॉर्क टाइम्ससारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही पाकिस्तानचे दावे फेटाळले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने कठोर इशारा दिला. दहशतवादाविरोधात भारताने जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू केले असून, विरोधी पक्षांनाही सहभागी करून घेतले आहे. बदलत्या भारताचा आत्मविश्वास आणि सैन्यबल यामुळे जगभर भारताचा दबदबा वाढत आहे.

    गेल्या आठ दिवसांतील अत्यंत वेगाने घडलेल्या घडामोडींचा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या सारीपाटावर मोठा परिणाम होणार आहे. या घडामोडींतून बदलत्या भारताची ताकद साऱ्या जगाला दिसली, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय राजकारण यापुढे महाशक्तींच्या लहरीनुसार एकांगी पद्धतीने चालणार नाही, हेही भारताने दाखवून दिले. शौर्यवान सैन्यदल आणि कणखर राष्ट्रप्रमुख असा संगम ज्या देशात होतो तो देश कोणतेही संकट सहज परतवून लावतो, हेच या घडामोडीतून दिसले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर भारत थांबेल, अशी पाकिस्तानची आणि महासत्तांचीही अटकळ होती. ही अटकळ खोटी ठरवत भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानच्या हवाई तळांवर असा जबरदस्त हल्ला चढविला की, पाकिस्तानचे राज्यकर्ते, लष्करशहा, चीनची लालभाई मंडळी हडबडून गेली. “ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानच्या ११ हवाई तळांवर तुफानी मारा केला. पाकिस्तानच्या ६ हवाई तळांवर हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले. भारतीय हल्ल्यात कोणतेही नुकसान झाले नाही” हा पाकिस्तानचा दावा वॉशिंग्टन पोस्टसारख्या जागतिक प्रतिष्ठित वृत्तपत्राने खोटा ठरवला आहे. भारतीय विमाने पाकिस्तानच्या हद्दीत १०० मैलांपेक्षा जास्त अंतरावर पोहोचली होती, असे वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तांकनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. वॉशिंग्टन पोस्टने २७ उपग्रह छायाचित्रांची पडताळणी केली. त्याच्या आधारेच वॉशिंग्टन पोस्टने पाकिस्तानचा दावा खोटा ठरवला. वॉशिंग्टन पोस्टने पाकिस्तानच्या तीन महत्त्वाच्या एअरबेस हल्ल्यानंतरच्या स्थितीची माहिती आपल्या बातमीत दिली आहे. रावळपिंडीतल्या नूर खान एअरबेसवर पाकिस्तानची दोन नियंत्रण केंद्रे नष्ट झाली आहेत. नूर खान एअरबेसवरही मोठा हल्ला झाला, असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.

    सहा एअरबेस, तीन हँगर्स, दोन रनवे आणि एअरफोर्सचे चार मोबाइल टॉवरचे नुकसान झाले, असे उपग्रहांद्वारे प्राप्त झालेल्या छायाचित्रांच्या आधारे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे. त्या आधी न्यूयॉर्क टाइम्सनेही भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या हवाई तळांच्या झालेल्या नुकसानीबाबत वृत्तांकन केले होते. पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयापासून आणि पंतप्रधान कार्यालयापासून सुमारे १५ मैल दूरवर असलेल्या नूर खान हवाई तळ, भारताने हल्ला केलेले सर्वात अवघड लष्करी लक्ष्य होते व रहीम यार खान एअरफील्ड, सरगोधा एअरबेस, जागारुर आणि सियालकोट एअरबेससारख्या स्थळांवर देखील भारताने हल्ले केले, असे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले होते.

    १३ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील आदमपूर येथील हवाई तळाला भेट देऊन सैन्यदलाच्या जवानांशी संवाद साधला. हाच तळ नष्ट केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. त्याच तळाला भेट देऊन आणि तेथे सैन्य दलाच्या जवानांसमोर भाषण करून पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला. यावेळी पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला आणि पाकिस्तानच्या मागे ताकद उभी करणाऱ्या सर्व शक्तींना खणखणीत इशारा दिला. “भारताने केवळ आपली लष्करी कारवाई पुढे ढकलली आहे. जर पाकिस्तानने पुन्हा दहशतवादी कारवाया किंवा लष्करी दुःसाहस दाखवले, तर आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ. आमच्या अटी-शर्तींवर, आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. आपण शत्रूला सतत जाणीव करून देत रहावे की, हा एक नवीन भारत आहे. या भारताला शांतता हवी आहे, पण जर मानवतेवर हल्ला झाला, तर युद्धाच्या आघाडीवर शत्रूचा नाश कसा करायचा हे देखील या भारताला चांगलेच माहीत आहे. पुन्हा दहशतवादी हल्ला केलात तर तुमचा विनाश होईल” इतक्या स्पष्ट शब्दांत भारताने पाकिस्तानला खडसावले आहे. त्यातून पाकिस्तानचे राज्यकर्ते खरेच धडा घेतात का हे भविष्यकाळात कळेलच. “पाकिस्तानने अण्वस्त्रांची भीती दाखवू नये. आम्ही त्याला भीक घालत नाही”, हे पंतप्रधान मोदी यांचे आदमपूर येथील वक्तव्य बरेच काही सांगून जाणारे आहे. युद्धबंदी करत भारताने अमेरिकेची कथित मध्यस्थी मान्य केली, असा टाहो काँग्रेसच्या चेल्यांनी आणि मोदी विरोधकांनी फोडला होता. आपण भारत-पाक संघर्षात युद्धविराम घडवून आणला नाही, असे वक्तव्य करून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातल्या अनेकांची तोंडे बंद करून टाकली. सिंधू जल करार स्थगितच राहील, असे जाहीर करून भारताने पाकिस्तानला कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही, हेही दाखवून दिले आहे. त्या पाठोपाठ भारताने राजनैतिक पातळीवर आणखी एक मुत्सद्दी चाल खेळली आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात पाकिस्तानची भूमिका, पहलगाम हिंदू नरसंहार आणि भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दलची माहिती विविध देशांना देण्यासाठी मोदी सरकारने विविध पक्षांच्या खासदारांना वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री शशी थरूर आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यासह विरोधी पक्षांचे काही निवडक खासदार या मोहिमेचे नेतृत्व करणार आहेत. प्रत्येक पथकासोबत परराष्ट्र मंत्रालयाचा एक वरिष्ठ अधिकारी व अन्य सहकारी असणार आहेत. यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाला जगभरात व्यापक पाठिंबा मिळेल. राजकीय मतभेद ओलांडून देशहितासाठी भारत एकत्र असल्याचा संदेश जगाला दिला जाईल. “वीरः सदा जयत्येव, नृपतिः शूर एव च” राजाने आपल्या सैन्यदलाच्या मागे ठामपणे उभे रहायचे असते, असे सैन्य रणांगणावर कोणालाही पराभूत करते, असा या श्लोकाचा भावार्थ आहे. तूर्तास इतकेच.

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी –नवशक्ति२० मे २०२५)

    केशव उपाध्येमुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment