• इंदिराजी, राहुलबाबा आणि मातोश्री निवासी पिता पुत्र



        आता राहुलबाबांची राजकीय जाण किती उंचीची आहे याचे प्रत्यंतर गेल्या १०- १२ वर्षांत अनेकदा आले आहे. या महाशयांनी आपल्याच पक्षाच्या सरकारचा वटहुकूम पत्रकार परिषदेत फाडून आपल्या पक्षाच्या पंतप्रधानांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली.


        देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचे पणतू आणि जगातील मोजक्या धूर्त, मुत्सद्दी, धाडसी राजकारण्यांमध्ये ज्यांची गणना होते अशा इंदिराजी गांधी यांचे नातू राहुल गांधी हे सध्या भारत जोडो नामक यात्रेत आहेत. या यात्रेचा उद्देश साध्य करण्यासाठी त्यांनी कोणते प्रबोधन केले हे अजून त्यांच्या विचार मौक्तिकांचा तपशील जाहीर न झाल्याने समजू शकले नाही. तो विषय बाजूला ठेवूया, या यात्रेतून त्यांना जो राजकीय उद्देश साध्य करायचा होता त्याविषयी बोलू या.


        आता राहुलबाबांची राजकीय जाण किती उंचीची आहे याचे प्रत्यंतर गेल्या १०- १२ वर्षांत अनेकदा आले आहे. या महाशयांनी आपल्याच पक्षाच्या सरकारचा वटहुकूम पत्रकार परिषदेत फाडून आपल्या पक्षाच्या पंतप्रधानांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली. हे कृत्य म्हणजे आपला मास्टर स्ट्रोक मारला असून यातून आपली राजकीय उंची हिमालयाइतकी वाढणार आहे, असा त्यांचा समज मतदारांनी पुरता खोटा ठरवला. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर यांच्या ''राजकीय शहाणपणा' ची एक्स्पायरी डेट उलटून गेली आहे हे अनेकदा दिसले. जुलै २०१८ मध्ये या महाशयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा सभागृहात आलिंगन दिले होते , त्यावेळीही त्यांच्या झिलकऱ्यांना तो मास्टर स्ट्रोक वाटला होता, राफेल खरेदी प्रकरणावरून '' चौकीदार चोर है '' सारखी वक्तव्येही राहुलबाबाच्या भोप्यांना जबरदस्त परिणामकारक वाटली होती. सामान्य माणसाला मात्र त्यातून मनोरंजनापलीकडे काही वाटले नव्हते. आता त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना लक्ष्य करून मोठी राजकीय खेळी केली आहे, अशा समजात त्यांचे बगलबच्चे आहेत. यापूर्वीही त्यांनी सावरकरांबद्दल अशीच वक्तव्ये केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलही त्यांनी अशीच वक्तव्ये केली आहेत. काही राजकीय तज्ज्ञ मंडळींच्या मते सावरकरांना लक्ष्य करून राहुलबाबा काँग्रेसपासून दुरावलेली अल्पसंख्याक , मागासवर्गीयांची मतपेढी पुन्हा काँग्रेसकडे आणत आहेत. या युक्तीवादावर हसावे की रडावे हे कळत नाही. मतदारांनी राहुलबाबांना आजवर किती वेळा नाकारले आहे, याचा हिशोब यानिमित्ताने डोळ्याखालून घालायला हरकत नाही. २०१२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी राहुलबाबांच्या खांद्यावर सोपविण्यात आली होती. त्यावेळी या महाशयांनी उत्तर प्रदेश पालथा घातला होता. अजित सिंगांच्या लोकदलाशी युती करूनही काँग्रेसला फक्त २८ जागा मिळाल्या होत्या , २०१४, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा इतिहास नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही , २०१७ मध्ये राहुलबाबा आणि अखिलेश युती चमत्कार घडवणार असे भाकीत अनेक वर्षे काम केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांनीही वर्तवले होते. काँग्रेसच्या जागा थोड्याथोडक्यांनी नाही तर २१ ने कमी होऊन अवघ्या ७ वर आल्या. हे महाशय २०१९ मध्ये अमेठी लोकसभा मतदार संघातून पराभूत झाले. याखेरीज देशात गेल्या दहा बारा वर्षांत झालेल्या अनेक राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला आलेले अपयश राहुलबाबा आणि त्यांच्या मातोश्रींच्या नेतृत्वाचेच अपयश आहे. मतदारांनी इतक्या वेळेस नाकारलेला नेता जगाच्या पाठीवर नसेल. भारतीय मतदार मत देताना नेता पारखून घेतो , भारतीय मतदाराची जाण पक्की आहे , तो सहजासहजी कुणाला स्वीकारत नाही, हे अनेक निवडणुकीत दिसले आहे. त्याने राहुलबाबाचे नेतृत्व स्पष्टपणे नाकारले आहे. तरीही सावरकरांवर टीका वगैरेना मास्टर स्ट्रोक संबोधले जाते त्यावेळी काय प्रतिक्रीया द्यावी हे समजत नाही. असो.


        राहुलबाबांच्या राजकीय यशापयशाचा हिशोब मांडताना त्यांची इंदिरा गांधी नामक आजी वारंवार आठवत राहते. आणीबाणी सारखा त्यांचा निर्णय चुकला, त्याची फळेही त्यांनी भोगली, मात्र राजकारण या एकमात्र निकषावर इंदिराजी त्याकाळच्या सर्वात धूर्त, मुत्सद्दी राजकारणी होत्या हे मान्यच करावे लागते. अनपेक्षित चाली खेळून प्रतिस्पर्ध्यांना कोंडीत कसे पकडायचे यात त्यांचा हातखंडा होता. पण याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य माणूस '' बाई '' नामक नेतृत्वावर विश्वास टाकत होता. पक्षांतर्गत डावपेचात इंदिरा आज्जीने काँग्रेसच्या अनेक भीष्माचार्यांना कसे लोळवले याच्या कहाण्या राहुलबाबाला माहिती असतील . बँकांचे राष्ट्रीयीकरण , संस्थानिकांचे तनखे रद्द करणे या सारख्या निर्णयांतून इंदिराजी ''नेहरू कन्या '' या प्रतिमेतून बाहेर पडल्या आणि त्यांनी स्वतःचे नेतृत्व , राजकीय शहाणपण सिद्ध केले. १९७१ ची निवडणूक - गरीबी हटाव या नाऱ्यावर इंदिराजींनी जिंकली. मतदार असा विश्वास राहुलबाबावर टाकण्यास तयार नाही हे अनेकवेळा दिसले आहे. १९७७ मध्ये जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर इंदिरा गांधींच्या आणीबाणी काळातील निर्णयांची चौकशी करण्यासाठी शाह आयोग नेमला गेला. त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री चरणसिंग यांनी इंदिरा गांधींना अटक करण्याचा निर्णय घेतला. अटक करण्यासाठी पोलीस पथक त्यांच्या निवासस्थानी पोचल्यावर पत्रकार, छायाचित्रकार येईपर्यंत इंदिराजींनी अटक करवून घेतली नाही. याला म्हणतात राजकीय शहाणपण. हे सगळं राहुलबाबांना सांगूनही उपयोग नाही. कारण राजकीय शहाणपण अंगात असावे लागते , त्याचे धडे शिकवणी लावून शिकता येत नाहीत. राजीव गांधींकडे आईएवढे राजकीय चातुर्य नव्हते, मात्र त्यांच्या राजकीय शहाणपणाचे एवढे वाभाडे निघाले नव्हते.

     

        या राहुल बाबांच्या गळयात गळे घालण्यासाठी आदित्य ठाकरे जातीने गेले होते. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय समज अनेकदा सिद्ध झाली होती. रिडल्स वाद, मराठवाडा विद्यापीठ नामांतराला विरोध करत असताना पाकिस्तानच्या विजयानंतर भेंडी बाजारात फटाके फोडणाऱ्या शक्तींच्या विरोधात आवाज टाकणाऱ्या बाळासाहेबांनी पाहता पाहता आपला हक्काचा मतदार तयार केला. उद्धवरावांनी आपल्या पिताश्रींचा वारसा पुढे नेण्यासाठी यापद्धतीने रस्त्यावर उतरण्याचे धाडस कधी केले नाही . उद्धवरावांनी व त्यांच्या चिरंजीवांनी आजवर आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याखेरीज काय केले आहे ? राहुलबाबाला मिठ्या मारून उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंनी त्यांच्याकडे वंदनीय बाळासाहेबांसारखे राजकीय शहाणपण नाही हे पुन्हा एकवार सिद्ध केले आहे.

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी – महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन२१ नोव्हेंबर २०२२)

     केशव उपाध्येमुख्य प्रवक्ता

     

     

  • You might also like

    No comments:

    Post a Comment