• एचएमव्ही, द वायर ची माघार आणि दिगू टिपणीस

     


        फडणवीस यांनी टाटा एअरबस आणि सॅफ्रन या दोन उद्योगांची महाराष्ट्राबाहेर पाठवणी करण्याचा कार्यक्रम महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात समारंभपूर्वक कसा झाला होता याचे कागदोपत्री पुरावेही महाराष्ट्रापुढे ठेवले. या दोन प्रकल्पांनी शिंदे फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्राबाहेर जाण्याचा निर्णय घेतला या एका बातमीरूपी '' टेस्ट ट्युब बेबी ''चा पर्दाफाश करताना एचएमव्ही या शब्दप्रयोगाचा वापर केला. 


        गेल्या काही दिवसांत राजकारण आणि पत्रकारितेच्या अनुषंगाने राज्याच्या सर्वच वर्तुळात खमंग चर्चा झडल्या. यानिमित्ताने आदर्श पत्रकारिता, पत्रकारितेची मूल्ये या शब्दांवर साचलेली धूळही झटकली गेली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी मंजूरच न झालेल्या प्रकल्पांनाही राज्याच्या माजी सत्ताधीशांनी ''सरोगसी'' द्वारे दिलेल्या जन्माची अद्भुत आणि सुरस कहाणी पुराव्यासकट महाराष्ट्राच्या जनतेपुढे ठेवली. ही कहाणी जनतेपुढे ठेवताना फडणवीस यांनी टाटा एअरबस आणि सॅफ्रन या दोन उद्योगांची महाराष्ट्राबाहेर पाठवणी करण्याचा कार्यक्रम महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात समारंभपूर्वक कसा झाला होता याचे कागदोपत्री पुरावेही महाराष्ट्रापुढे ठेवले. या दोन प्रकल्पांनी शिंदे फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्राबाहेर जाण्याचा निर्णय घेतला या एका बातमीरूपी '' टेस्ट ट्युब बेबी ''चा पर्दाफाश करताना एचएमव्ही या शब्दप्रयोगाचा वापर केला. हा शब्दप्रयोग पत्रकारितेविषयीची चर्चा आणखी खमंग होण्यास फोडणीसारखा ठरला. ही चर्चा झडत असतानाच द वायर या पोर्टलने एका बातमीबाबत ते वृत्त पोर्टलवरून हटविण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त प्रकाशित झाले. या निमित्ताने मार्गारेट ड्युरास या प्रख्यात फ़्रेंच लेखिकेने पत्रकारितेबाबत केलेल्या Journalism without a moral position is impossible. Every journalist is a moralist. It’s unavoidable. या वचनाचे स्मरण झाले. त्याच बरोबर जब्बार पटेलांच्या सिंहासन मधील दिगू टिपणीस नामक पत्रकाराच्या व्यक्तिरेखाही डोळ्यापुढे उभी राहिली.


        समाज माध्यमांचा वापर करत खऱ्या, खोट्याचा शहानिशा न करताच अनेक बातम्या प्रसवल्या जाण्याच्या सुगीच्या हंगामामुळे एकूणच बातमीदारी, पत्रकारितेच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले असतानाच गेल्या काही दिवसांतील या घडामोडी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाविषयी विचार मंथनास प्रवृत्त करणाऱ्या ठरल्या. सध्याचा चर्चेचा मुद्दा आहे तो राजकीय पक्षाला, एखाद्या सरकारला लक्ष्य करून केल्या जाणाऱ्या असत्य वार्तांकनाचा. शीर्षकात दाखला दिलेल्या द वायर या पोर्टलने अलीकडेच भाजपा च्या आयटी सेलचे राष्ट्रीय प्रमुख अमित मालवीय यांच्या संदर्भात काही बातम्या प्रसिद्ध केल्या. इन्स्टाग्राम वर प्रसिद्ध झालेल्या पोस्टवर श्री. मालवीय यांनी आक्षेप घेतला की अशा पोस्ट इन्स्टाग्रामवरून हटवल्या जातात, असे वृत्त द वायर ने प्रसिद्ध केले होते. मालवीय यांनी हे वृत्त खोडसाळ, आपली बदनामी करण्याच्या उद्देशाने प्रसिद्ध केले आहे असे सांगत या वृत्ताबद्दल द वायर च्या संपादकांना कायदेशीर नोटीस बजावली. द वायर विरुद्ध एफआयआर ही दाखल केला. द वायर ने खुलासा करत मालवीय यांच्याबद्दलचे वृत्त चुकीचे असल्याचे मान्य केले व मालवीय यांच्या बद्दलच्या बातम्या आपल्या पोर्टलवरून हटवत असल्याचे जाहीर केले. तथाकथित सेक्युलर माध्यम विश्वात द वायर ला मोठी प्रतिष्ठा आहे. या पोर्टलने आपल्या खुलाश्यात आपल्या बातमीदाराला मिळालेली माहिती चुकीची होती असा बचाव केला आहे. मालवीय यांच्या संदर्भातील ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्या स्वरूपातील बातम्या प्रसिद्ध करताना पत्रकाराने किमान त्याच्या सत्यतेची पडताळणी तरी करणे गरजेचे असते. हे भान वायरच्या बातमीदार मंडळींनी पाळले नाही. या पद्धतीच्या वार्तांकनातून आपण प्रसार माध्यमांच्या विश्वासार्हतेचा कडेलोट करीत आहोत. याचीही तमा या मंडळींनी बाळगली नाही.


        सत्ताधीशांच्या चुकांबद्दल त्यांना धारेवर धरणे, नोकरशाही च्या, व्यवस्थेच्या गफलती वेशीवर टांगणे हे पत्रकारितेचे अंगभूत कर्तव्यच आहे. हे कर्तव्य बजावत असताना आपल्या नैतिकतेची प्राणपणाने जपणूक करणे हेही पत्रकारांचे अंगभूत कर्तव्यच आहे. एखाद्या पक्षाला, त्या पक्षाच्या सरकारला लक्ष करून धादांत खोट्या बातम्या प्रसिद्ध करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. वानगी दाखल काही घटनांचा आढावा घेऊ. ४ वर्षापूर्वी छत्रपती संभाजी नगर (पूर्वीचा औरंगाबाद) येथील घाटी रुग्णालयात एक मुलगी खाटेवरील आपल्या वडिलांच्या शेजारी हातात सलाईनची बाटली घेऊन उभी असल्याचे छायाचित्र व त्या आधारे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर कोरडे ओढणारे वृत्त काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. राज्यात त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या साथीत सत्तेवर असणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामाना’ने हे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध केले होते. संभाजीनगर मधूनच प्रसिद्ध होणाऱ्या एका ख्यातनाम साखळी वृत्तपत्राने त्या वृत्ताची आणि छायाचित्राची सत्यता तपासून ते वृत्त धादांत असत्य असल्याचे सिद्ध केले. छायाचित्र काढण्यासाठीच आपल्याला हातात सलाईनची बाटली देऊन उभे करण्यात आले होते असा खुलासा त्या मुलीने केला होता. धृपदा गवळी असे त्या मुलीचे नाव होते. सरकारच्या विरोधात सनसनाटी बातमी प्रसिद्ध करण्यामागे असलेल्या हेतूविषयी साहजिकच शंका घेतल्या जातात. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर काही प्रकल्प राज्याबाहेर गेले असल्याचे वृत्त अलीकडेच प्रसार माध्यमांनी मोठा गाजावाजा करत प्रसिद्ध केले. हे वृत्त चुकीचे असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सज्जड पुराव्यानिशी केला होता. राज्याला बदनाम करण्यासाठीच या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या आणि त्यात काही ‘एचएमव्ही’ पत्रकारांचा समावेश होता. असे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. त्या विरोधात पत्रकार संघटनेच्या एका अध्यक्षाने लिहिलेला लेख समाज माध्यमातून प्रकाशित झाला. या लेखाच्या सुरुवातीस ‘राज्यातून अलीकडेच ५ उद्योग बाहेर गेले’ या वाक्याने करण्यात आली होती. या वाक्याला एका पत्रकारानेच आक्षेप घेत कोणते प्रकल्प केव्हा बाहेर गेले हे तारखेनिशी सांगा अशी विनंती पत्रकार संघटनेच्या अध्यक्षाला केल्यावर तशी कोणतीही माहिती सादर करण्यात संबंधिताला यश आले नाही. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात उद्योग बाहेर गेले असतील तर त्यावेळच्या विरोधी पक्षाने म्हणजे भारतीय जनता पार्टीने काय केले असा उलटा सवाल केला गेला. राज्यातून ५ उद्योग बाहेर गेले असे ठामपणे सांगताना त्यामागचा खरे-खोटेपणा तपासण्याची तसदीही या ज्येष्ठ पत्रकाराने घेतली नाही. या पत्रकाराला फडणवीस यांनी वापरलेला एचएमव्ही हा शब्दप्रयोग खटकला. हेच काही बातम्यांबाबत सुरू आहे. कोणतेही पुरावे नसताना शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात उद्योग बाहेर गेले अशा बातम्या लिहिणाऱ्या काही निवडक पत्रकारांचा ‘बोलविता धनी’ कोणी वेगळाच असावा अशी शंका साहजिकच घेतली जाणार.


        या पार्श्वभूमीवर डॉ.जब्बार पटेल यांच्या सिंहासन चित्रपटातील निळू फुले यांनी रंगविलेल्या दिगू टिपणीस नामक पत्रकाराच्या व्यक्तिरेखेचे स्मरण होते. या दिगू टिपणीसच्या राजकीय नेते मंडळींमध्ये मोठ्या ओळखी-पाळखी असतात. मुख्यमंत्र्यांपासून सर्व ज्येष्ठ सत्ताधारी मंडळी आणि विरोधी मंडळींमध्ये त्याची उठबस असते. चित्रपटातील अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे हे मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचे सतत डावपेच खेळत असतात. या डावपेचातील एक चाल म्हणून ते अर्थमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतात. ही बातमी दिगू टिपणीसला एका आमदाराकडून अगोदरच कळलेली असते. मात्र लगोलग ती प्रसिद्ध करण्याची घाई न करता दिघू विश्वासराव दाभाडे यांच्याशी संपर्क साधतो. आपण राजीनामा दिल्याचे मान्य करताना विश्वासराव दाभाडेंचे पात्र दिगू ला ती बातमी प्रसिद्ध न करण्याची गळ घालतात. मात्र दिगू टिपणीस ती विनंती अव्हेरतो आणि दाभाडेंच्या राजीनाम्याची बातमी प्रसिद्ध करतो.


        दिगू टिपणीसचे वार्तांकन आणि सध्याचे वार्तांकन यातला फरक ज्याने त्याने ओळखून घ्यावा. अर्थात सर्वच मंडळी या पद्धतीने वार्तांकन करतात असे नाही. निखळ आणि निष्पक्ष वार्तांकन हे सतीचे वाण पेलणारे बातमीदार आजही मोठे संख्येने आहेत. द वायरच्या माफिनाम्याबद्दल मध्यम क्षेत्रातील कर्त्या-सवरत्या मंडळींनी अजून तरी मत प्रदर्शन केलेले नाही. सॅफ्रन नामक उद्योगाची फॅक्टरी एक वर्षापूर्वीच हैदराबाद येथे सुरु झाल्याचे वृत्त अनेक ख्यातनाम वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले होते. तरीही हा उद्योग शिंदे-फडणवीस सरकारच्या काळातच महाराष्ट्रातून बाहेर गेल्याच्या बातम्या छातीठोकपणे दिल्या गेल्या. यातून कोणती पत्रकारिता सिद्ध झाली, हे ज्याने-त्याने ठरवावे.


    (लेखाची पूर्वप्रसिद्धी – महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, ०८ नोव्हेंबर २०२२)

    केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment