• महाराष्ट्राच्या उदारमतवादी परंपरेत माती कोणी कालवली?

         


       

    भाजपाच्या पुण्यातील प्रवक्त्याला घरात घुसून मारहाण करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोणत्या संस्कृतीचे पुरस्कार करत होते, नवनीत राणा या महिला खासदाराला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणारे उद्धव सैनिक कोणत्या संस्कृतीचे समर्थक आहेत , याचे उत्तर या निमित्ताने मिळावे हीच अपेक्षा.


    अलीकडेच काही जणांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या उदारमतवादी परंपरेबाबत पुन्हा चर्चा सुरु झाली. ''घड्याळा'च्या काट्यावर चालणाऱ्या अनेक पत्रकार विचारवंतांना कंठ फुटला. या विचारवंतांना आणि पत्रकारांना ''घडयाळाचा गजर'' झाल्याप्रमाणे अशा वेळेसच नेमकी जाग येते. मित्रपक्षातील ''संजया'' च्या येड....., चु......वगैरे गोमूत्र शिंपडून शुद्ध केलेल्या वक्तव्याकडे ही मंडळी धृतराष्ट्रही लाजेल अशा पद्धतीने 'डोळेझाक' करतात हा भाग वेगळा. आपल्या ''सुप्रिय'' नेतृत्वाबद्दल काढलेल्या उद्गारांचा राग येऊन काही मंडळींनी त्यांचे सर्वोच्च नेते ज्या उदारमतवादी संस्कृतीचे सतत दाखले देतात, त्यांनी दिलेली ''विद्या'' विसरून अत्यंत ''सभ्य'' पद्धतीने तोडफोड, शिवीगाळ वगैरे करून आपला निषेध व्यक्त केला.


    या निमित्ताने महाराष्ट्रातील सभ्य राजकीय संस्कृती कोणी प्रदूषित केली याचा विचारवंत, पत्रकार मंडळींनी आढावा घ्यायला हरकत नाही. या आढाव्याचा निष्कर्ष काय आला याचे प्रामाणिक उत्तर त्यांनी दिले नाही तरी चालेल, पण आढावा तरी घ्यावा अशी इच्छा आहे. असो, मूळ मुद्द्याकडे येऊया. राजकीय मतभेद बाजूला ठेवून मैत्रीसंबंध जपण्याची, सभ्य, सुसंस्कृत वर्तनाची महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे. १९६६ सालच्या विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनातली गोष्ट आहे. कम्युनिस्ट आमदार कॉ. कृष्णा देसाई यांची लक्षवेधी सभागृहात पुकारली गेली होती. कॉ. देसाई आपल्या लहान मुलाला घेऊन आले होते. लक्षवेधी पुकारली गेल्याचे कळल्यावर त्यांना तातडीने सभागृहात जाणे भाग होते. त्याच वेळी त्यांना समोर जनसंघाचे आमदार रामभाऊ म्हाळगी दिसले. कॉ. देसाई यांनी रामभाऊंना आपल्या लहान मुलाला सांभाळण्यास सांगितले. कॉ. देसाई अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ सभागृहात बोलत होते, तो पर्यंत रामभाऊ म्हाळगी यांनी लहान मुलाचा छान सांभाळ केला. जनसंघ आणि कम्युनिस्ट या पक्षातले राजकीय मतभेद किती टोकाचे होते आणि आहेत हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. असे असताना कॉ. देसाई यांनी हक्काने, अत्यंत निर्मळतेने म्हाळगींना मुलाचा सांभाळ करण्याची आज्ञा दिली. राजकीय मतभेदापलीकडच्या मैत्रीतला हा हक्क कमालीच्या प्रेमाने म्हाळगी यांनी बजावला. सभागृहात एकमेकांवर तुटून पडणारी आमदार मंडळी कामकाज संपल्यावर एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून मनमोकळ्या गप्पा मारत असतानाचे दृश्य पूर्वी अनेकदा पहायला मिळत असे. असे हे मोठ्या मनाचे राजकीय वातावरण कोणी प्रदूषित केले याचा शोध घ्यायला सुरुवात केली तर तपास करणारे पथक बारामतीची गोविंदबाग आणि बांद्र्याच्या मातोश्रीपर्यंत नक्कीच माग काढेल. तेंव्हा अनेकांची पंचाईत होऊन जाईल. फार लांब जाण्याची गरज नाही. ५-६ वर्षांपूर्वी राज्यात मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन ऐन भरात होते. देवेंद्र फडणवीस हे त्यावेळी मुख्यमंत्री होते. काल परवा ज्या सुप्रिय नेतृत्वाबाबत काढलेल्या उद्गारांमुळे महिला वर्गाचा, स्त्री शक्तीचा अपमान झाला असा टाहो फोडला गेला त्याच महिला खासदाराना, देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ''आरक्षण मागतो आहे, तुमची बायको नाही '' असे उद्गार काढले होते, त्यावेळी स्त्री शक्तीचा अपमान झाल्याची खंत कोणालाच वाटली नाही. मुख्यमंत्री असताना देवेन्द्र फडणवीस यांच्याबद्दल आणि कुटुंबियांबद्दल समाज माध्यमातून वापरलेली शिवराळ भाषा अनेक विचारवंत, पत्रकारांना कधी खटकलीच नव्हती.


    यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या उदारमतवादी संस्कृतीचे बिनीचे शिलेदार समजले जातात. ते मुख्यमंत्री असताना समाजवादी पक्षाचे एस. एम. जोशी विरोधी पक्षनेते होते. विधानसभेत एका विषयावर एस. एम जोशी यांनी विचारलेल्या प्रश्नाला संबंधित खात्याच्या मंत्र्याने उत्तर दिले होते. मात्र त्याने समाधान न झाल्याने जोशी यांनी तोच प्रश्न तिसऱ्यांदा विचारला. त्यावर त्या मंत्र्याने ,''दोनदा उत्तर देऊनही तुमच्या डोक्यात शिरत नाही का'' असे उत्तर दिले. जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला असे उत्तर ऐकविले गेल्याने मुख्यमंत्री असलेले यशवंतराव अस्वस्थ झाले. त्यांनी तातडीने एस. एम. जोशी यांची माफी मागितली होती. आपल्या विरोधकांबद्दल या पद्धतीने आदर दाखवण्याचा मोठेपणा यशवंतरावांकडे होता. त्यांचे शिष्य म्हणविणाऱ्या पवार साहेबांनी राजकारणापलीकडचे मैत्र अनेकदा जपले आहे. पण काहीवेळा त्यांचाही तोल सुटतो. दक्षिण महाराष्ट्रातील साखर कारखान्यां विरुद्ध राजू शेट्टी , सदाभाऊ खोत यांनी ऊसाच्या भावासाठी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनामुळे दक्षिण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी आणि काँग्रेस समर्थक सहकारी साखर कारखानदारांची कोंडी झाली होती. त्यावेळी पवार साहेबांनी '' कोण हा राजू शेट्टी, त्याची जात काय, आपल्या जातीच्या कारखानदाराविरुद्ध तो आंदोलन करत नाही ' असे उघडउघड जातीवाचक वक्तव्य केले होते. अशा वक्तव्यातून कोणती सभ्य संस्कृती जोपासली जाते हे साहेबांनाच ठाऊक . मुद्दा हा आहे की, सुप्रिया सुळे यांच्याबद्दलच्या वक्तव्यामुळे ज्या मंडळींनी राजकारणातली सभ्यता संपली असल्याचा टाहो फोडला त्या मंडळींनी पूर्वी सभ्यता आणि सुसंस्कृततेबद्दलचे प्रेम का दाखवले नाही. सुळे यांच्याबद्दलचे उद्गार मुळीच समर्थनीय नाहीत. कंगना रनौत , केतकी चितळे यांच्याबद्दल जे काही बोलले गेले ते या विचारवंत, पत्रकार मंडळींना सभ्य वाटत होते का हा खरा प्रश्न आहे. उद्धवराव व त्यांचे मुखपत्र देशाच्या पंतप्रधानांवर नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असताना जी भाषा वापरते त्यावेळी या मंडळींची विवेकशक्ती कुठे पेंड खायला जाते , हा संशोधनाचा मुद्दा आहे. भाजपाच्या पुण्यातील प्रवक्त्याला घरात घुसून मारहाण करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोणत्या संस्कृतीचे पुरस्कार करत होते, नवनीत राणा या महिला खासदाराला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणारे उद्धव सैनिक कोणत्या संस्कृतीचे समर्थक आहेत , याचे उत्तर या निमित्ताने मिळावे हीच अपेक्षा .


            (लेखाची पूर्वप्रसिद्धी – महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, १४ नोव्हेंबर २०२२)

             केशव उपाध्येमुख्य प्रवक्ता




  • You might also like

    No comments:

    Post a Comment