• पहिली बाजू : कुणी अंबानी घ्या, कुणी अदानी घ्या..

     



    नरेंद्र मोदी नामक नेतृत्वाने गेल्या नऊ वर्षांत उभ्या केलेल्या लोकप्रियतेचा माहोल सहन न झाल्याने नैराश्याचा झटका आलेली मंडळी आपल्या आजूबाजूला मुबलक संख्येने सापडतील.मोदींच्या लोकप्रियतेचे गमक लक्षात न घेता खोटी माहिती दारूगोळा समजून उडविली जाते. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, अनिल अंबानींनंतर आता गौतम अदानी प्रकरणातही हेच होत आहे, पण सामान्य भारतीय माणूस असल्या बिनबुडाच्या आरोपांवर विश्वास ठेवत नाही..


    नरेंद्र मोदी नामक नेतृत्वाने गेल्या नऊ वर्षांत उभ्या केलेल्या लोकप्रियतेचा माहोल सहन न झाल्याने नैराश्याचा झटका आलेली मंडळी आपल्या आजूबाजूला मुबलक संख्येने सापडतील. सामान्य माणसाला मोदी एवढे आपलेसे का वाटू लागले, याचे उत्तर नरेंद्र मोदी यांच्या प्रतिस्पर्ध्याना, मोदींना कडाडून विरोध करणाऱ्या विचारवंत, पत्रकारांना अद्याप सापडलेले नाही. चक्रधरस्वामींच्या दृष्टांत पाठातील, हत्ती आणि सात आंधळय़ांच्या कथेप्रमाणे काँग्रेस आदी भाजपविरोधक, विचारवंत, पत्रकार मंडळी आपापल्या बुद्धीप्रमाणे मोदींच्या लोकप्रियतेचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, हे करत असताना आपलेच म्हणणे खरे असा दुराग्रह धरून त्यानुसार डावपेच आखले जात आहेत. आपल्या प्रत्येक डावपेचात मोदी अडकणारच, असा विश्वास या मंडळींना असतो. हा विश्वास प्रत्येक वेळी अनाठायी ठरतो, हा भाग वेगळा. मोदींना आणि भाजपाला अडकवण्यासाठी टाकलेल्या जाळय़ात आपणच फसण्याची वेळ विरोधकांवर वारंवार येते. एवढे होऊनही या विरोधी मंडळींना शहाणपण येत नाही. त्यामुळे त्याच त्या चाली पुन:पुन्हा खेळल्या जातात. काही विरोधकांच्या मते मोदींच्या लोकप्रियतेचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांची स्वच्छ प्रतिमा. या प्रतिमेवर आघात केल्यास आपण त्यांना निवडणुकीच्या मैदानात पराभूत करू शकू, असे आडाखे बांधत मोदींच्या प्रतिमाभंजनाचे प्रयत्न केले जातात.नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या उद्योगपतींनी भारतातून पलायन केल्यानंतर मोदी विरोधकांनी बेंबीच्या देठापासून आरडाओरड करत वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. या दोघा उद्योगपतींना मोदी सरकारनेच संरक्षण दिल्याचे बेलगाम आरोप करत काँग्रेस, डाव्या पक्षांनी आणि त्यांच्या समर्थक आणि विचारवंत, विश्लेषकांनी मोदींच्या विरोधात मोहीम उघडली. या दोन्ही उद्योगपतींच्या मालमत्तांचा लिलाव करत थकीत कर्ज वसुली करताना कोणतीही दया-माया न दाखवत मोदी सरकारने आपल्यावरचे आरोप किती तकलादू होते, हे दाखवून दिले. हा बार फुसका ठरल्यानंतर राफेल विमान खरेदीतील कथित गैरव्यवहाराचा गाजावाजा करत युवराज राहुलबाबा आणि त्यांचे पाठीराखे नव्या दमाने मैदानात उतरले होते. त्यावेळी राहुलबाबांनी राफेल खरेदी व्यवहार करताना मोदी सरकारने अनिल अंबानींवर मेहेरनजर दाखविल्याचा आरोप केला होता. आपण मोदींना कसे अडकवले आहे, असा भाव राहुलबाबा आणि त्यांच्या गोतावळय़ाच्या चेहऱ्यावर दिसत होता. सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण नेले गेले. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून मिळालेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली आणि राफेल विमानांच्या खरेदीत कोणताही गैरव्यवहार झाला नव्हता, असा निर्वाळा दिला. एवढी सणसणीत थप्पड खाऊनही विरोधकांना अजून शहाणपण आलेले नाही.


    १९७० च्या दशकात घडलेले नगरवाल प्रकरण, त्या आधी पंडित नेहरूंच्या काळात झालेला आयुर्विमा महामंडळातील मुंदडा प्रकरण, बोफोर्स आणि मनमोहन सिंग पंतप्रधान असताना १० वर्षांत झालेले कोळसा खाणींसारखे घोटाळे, अशा इतिहासाचा धनी असलेला काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारासारखा मुद्दा घेऊन मैदानात उतरण्याचा प्रयत्न करत आहे, हा काळाने काँग्रेसवर उगवलेला सूड म्हणावा लागेल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काका हाथरसी या प्रख्यात हिंदी कवीच्या काव्य पंक्ती उद्धृत केल्या. ‘आगा-पिछा देखकर क्यों होते गमगीन, जैसी जिसकी भावना, वैसा दिखे सीन.’ या काका हाथरसींच्या काव्यपंक्ती काँग्रेसची सध्याची अवस्था वर्णन करण्यास पुरेशा समर्थ आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्याला कोंडीत पकडणे सोपे नाही, हे अजून राजकारणाच्या ‘केजी’तील राहुलबाबासारख्या अनेक विद्यार्थ्यांना कळलेले नाही. त्यामुळेच सादळलेल्या सुरुंगाच्या दारूला वात लावून पेटवण्याचे प्रयत्न वारंवार होत आहेत.भारतीय जनमानसावरील नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या गारुडामागची पार्श्वभूमी लक्षात न घेता प्रत्येक निवडणुकीआधी चाली खेळल्या जातात, आरोपांच्या फैरी झाडल्या जातात. नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता टिकून आहे, ती सर्वसामान्य माणसांशी जोडल्या गेलेल्या कल्याणकारी योजनांमुळे. पंतप्रधान आवास, उज्ज्वला, पंतप्रधान किसान मान-धन, मातृत्व वंदना यासारख्या अनेक योजनांमध्ये लाभार्थीच्या बँक खात्यात अर्थसहाय्य डीबीटी पद्धतीने थेट जमा होत आहे. गेल्या आठ वर्षांत २७ लाख कोटी एवढी प्रचंड रक्कम मोदी सरकारकडून विविध योजनांच्या लाभार्थीच्या बँक खात्यांत जमा करण्यात आली. भारतीय जनतेला अशा पद्धतीने सरकारी योजनांचे अर्थसहाय्य थेट मिळण्याचा अनुभवच नव्हता. सरकारी योजनांचे अनुदान मिळण्यासाठी शासकीय कार्यालयात महिनोनमहिने खेटे घालण्याचा आणि हक्काचे पैसे मिळवण्यासाठी सरकारी अधिकारी, दलाल, मध्यस्थ यांच्या पुढे ‘दक्षिणा’ ठेवण्याचा अनुभव गाठीशी असलेली भारतीय जनता मोदी सरकारवर विश्वास ठेवत आहे, ती याच कारणामुळे.


    करोनाकाळात अर्थचक्र मंदावल्यामुळे हातावर पोट अवलंबून असणाऱ्या कोटय़वधी श्रमिकांपुढे आता जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला होता. त्या काळात मोदी सरकारने गरीब कल्याण अन्न योजना सुरू करून गोरगरीबांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न सोडवला. सरकार दरबारी एक पैसाही खर्च न करता वेगवेगळय़ा योजनांचे लाभ मिळाल्याने आजवर उपेक्षित- वंचित राहिलेला वर्ग विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी सक्षम झाला. त्यामुळेच हा वर्ग नरेंद्र मोदींचे नेतृत्व विश्वासार्ह मानतो. काँग्रेसच्या अनेक वर्षांच्या राजवटीत लाभार्थीपर्यंत लाभ न पोहोचता ते मध्यस्थांनी लाटले, त्यामुळे काँग्रेसची विश्वासार्हता लयाला गेली. राहुलबाबा आणि त्यांच्या मातोश्री ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणी जामिनावर आहेत. सामान्य माणूस बोलत नसला, वाचत नसला तरी त्याला कोण किती पाण्यात आहे, हे चांगले ठाऊक आहे. सामान्य भारतीय माणूस असल्या खोटय़ा, बिनबुडाच्या आरोपांवर विश्वास ठेवत नाही. मोदींच्या लोकप्रियतेचे हे गमक लक्षात न घेता खोटी माहिती दारूगोळा समजून उडविली जाते. अदानी प्रकरणातही हेच होत आहे. वारंवार फजिती करून घेणाऱ्या या मंडळींची अवस्था पाहिली की तुकारामांच्या एका ओवीचे स्मरण होते.


    गयाळाचें काम हिताचा आवारा।

    लाज फजितखोरा असत नाहीं॥१॥

    चित्ता न मिळे तें डोळां सलों येतें।

     असावें परतें जवळूनि॥ध्रु॥

     

     (लेखाची पूर्वप्रसिद्धी –लोकसत्ता, १४ फेब्रुवारी. २०२३)

     केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता



  • You might also like

    No comments:

    Post a Comment