काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी अलिकडेच ‘भारत जोडो’ यात्रेच्या
समारोपप्रसंगी देशाच्या विद्यमान राजकीय स्थितीविषयी मतप्रदर्शन केले. ‘दहशतवादा
विरुद्धच्या लढाईत मी माझे वडिल आणि आजी गमावली आहे. मोदी आणि अमित शाह यांना माझे
दु:ख काय कळणार?’ असे
युवराजांचे ‘मौक्तिक’ होते.
काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी अलिकडेच ‘भारत जोडो’
यात्रेच्या समारोपप्रसंगी देशाच्या विद्यमान राजकीय स्थितीविषयी मतप्रदर्शन केले.
‘दहशतवादा विरुद्धच्या लढाईत मी माझे वडिल आणि आजी गमावली आहे. मोदी आणि अमित शाह
यांना माझे दु:ख काय कळणार?’ असे
युवराजांचे ‘मौक्तिक’ होते. युवराजांच्या या चिंतनामुळे देशाच्या स्वातंत्र्य
लढ्यापासून पंजाब, काश्मीरमधील दहशतवाद आणि पाकिस्तान
पुरस्कृत दहशतवाद्यांनी गेल्या २०-२५ वर्षात घडवलेल्या हिंसक घटनांचा पट
डोळ्यासमोर आला. सुरुवात पंजाबपासून करू. सुमारे २० वर्षे पंजाबने दहशतवादाची धग
अनुभवली. अकाली दलाचे पंजाबमधील वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी काँग्रेसच्या त्या
वेळच्या राष्ट्रीय नेतृत्वाने जर्नेल सिंग भिंद्रनवाले नामक भस्मासूर कसा जन्माला
घातला, याचे असंख्य पुरावे इतिहासाच्या पानात सापडतात.
शेकडो निरपराधी खलिस्तानी दहशतवाद्यांच्या हिंसाचारात बळी पडले. भिंद्रनवालेंचे
बाटलीतून बाहेर आलेले भूत पुन्हा बाटलीत ढकलण्यासाठी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात
लष्कर घुसवण्याचा निर्णय त्यावेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी घेतला.
ऑपरेशन ‘ब्ल्यू स्टार’द्वारे सुवर्ण मंदिरात लपलेल्या दहशतवाद्यांचा बिमोड केला
गेला. या कारवाईचा बदला श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हत्येने घेतला गेला. हे सूड
चक्र तेवढ्यावर थांबले नाही. ऑपरेशन ‘ब्ल्यू स्टार’वेळी लष्करप्रमुख असणार्या जनरल
अरुणकुमार वैद्य यांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली. इंदिरा गाधी यांच्या हत्येनंतर
देशभरात अनेक ठिकाणी दंगली उसळल्या. दिल्लीतील दंगलीमध्ये शेकडो शीख बांधवांचा बळी
गेला. या दंगलीमागे काँग्रेसच्या एच.के.एल भगत, सज्जनकुमार,
जगदीश टायटलर या नेत्यांचा कसा हात होता हे चौकशी आयोगात
निष्पन्न झाले. दंगलीची चौकशी करण्यासाठी व आरोपींना शिक्षा करण्यासाठी त्यावेळी
सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने काहीच हालचाल केली नाही. जनरल अरुणकुमार वैद्य,
पंजाब केसरीचे संपादक लाला जगत नारायण, १९८९
मध्ये पंजाबात मोगा येथे दहशतवाद्यांनी संघ शाखेवर केलेल्या गोळीबारात ठार झालेले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे २५ स्वयंसेवक, दिल्ली दंगलीत
बळी पडलेले निरपराध जीव यांच्याबद्दल युवराजांनी चकार शब्द उच्चारला नाही. जनरल
अरुणकुमार वैद्य यांनीही इंदिरा गांधींप्रमाणेच देशासाठी बलिदान दिले. त्यांच्या
बलिदानाचे विस्मरण युवराजांना झाले.
स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांची झूंज देणार्या अनेक
क्रांतीकारकांनी हौतात्म्य पत्करले. स्वातंत्र्य सावरकरांसह अनेक स्वातंत्र्य
सैनिकांनी अंदमानच्या तुरुंगात अनन्वित छळ सहन केला. सावरकरांच्या घराची अक्षरश:
राखरांगोळी झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव या क्रांतीकारकांनी देशासाठी आपल्या आयुष्याचा होम केला.
त्यांच्या कुटुंबियांचे दु:ख हे युवराजांच्या दु:खाइतकच मोठ आहे. स्वातंत्र्य
प्राप्तीनंतर काँग्रेसने अनेक वर्षे देशाची सत्ता उपभोगली. मात्र नेताजी
सुभाषचंद्रांच्या लढ्याचे यथोचीत स्मारक उभारून त्यांना मानवंदना देण्याची बुद्धी
काँग्रेसला कधी झाली नाही. मोदी सरकारने अलिकडेच दिल्लीत इंडिया गेटजवळ नेताजी
सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारून स्वातंत्र्य प्राप्तीतील त्यांच्या
योगदानाला अभिवादन केले. स्वातंत्र्य लढ्यात आणि देश उभारणीत फक्त नेहरू-गांधी
कुटुंबियांचे योगदान आहे, असे देशाला गेली 75 वर्षे भासवले जात होते. आपली आजी आणि आईच्या त्यागाचे स्मरण करताना
नेताजी सुभाषचंद्र बोस, भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासह असंख्य क्रांतीकारक
आणि सर्वसामान्य स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांनी भोगलेल्या दु:ख आणि
यातनांबद्दल युवराजांनी सहवेदना व्यक्त केली असती तर इंदिराजी आणि राजीवजी यांच्या
बलिदानाचे मोल कमी झाले नसते. मात्र देशासाठी फक्त नेहरू-गांधी कुटुंबानेच त्याग
केला आहे, हे वारंवार सांगण्याची आणि त्याचे भांडवल
करण्याची सवय युवराजांच्या पक्षाला लागली आहे.
भिंद्रनवाले आणि खलिस्तानचा भस्मासूर जन्माला घालताना आपण
देशाच्या सुरक्षेपुढे कोणते आव्हान उभे करत आहोत, याची त्यावेळच्या काँग्रेस नेतृत्वाला
कल्पना नसेल. मात्र राजकारणामुळेच पंजाब प्रश्न निर्माण झाला, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्याचे पितृत्व काँग्रेस आणि इंदिरा गांधी
यांच्याकडेच होते, हे नाकारता येणार नाही. पंजाब मधील
दहशतवाद आटोक्यात आणण्यासाठी २० वर्षे जावे लागली. दिल्ली दंगलीत बळी पडलेल्या
निरपराध शीख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची माफी मागावी, असा
विचार युवराजांच्या मनात आला नाही. इंदिराजी आणि राजीव गांधी यांच्या
हौतात्म्याचे मोल कोणीच नाकारणार नाही. मात्र या हौतात्म्याचा गौरव करताना,
देशासाठी फक्त आम्हीच दु:ख भोगले, त्याग
केला याचे कीर्तन वारंवार करताना इतरांच्या बलिदानाचे मोल आपण कमी करत आहोत,
याचे भान राहुल गांधी बाळगतील, अशी
अपेक्षा करणे त्यांची आजवरची वक्तव्ये पाहता भाबडेपणाचे ठरेल. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी किंवा भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्याने इंदिरा गांधी अथवा राजीव
गांधी यांच्या हौतात्म्याबद्दल अनुद्गार काढले नाहीत, असे
असताना युवराजांनी त्यांच्यावर भाष्य करणे अनुचित होते. स्वातंत्र्य लढ्याचा आजवर
एकाकी इतिहास सांगून आणि देशाच्या जडणघडणीत फक्त एका कुटुंबाचा वाटा आहे, असे समजून या घराण्यातील व्यक्तींची नावे शंभराहून अधिक संस्थांना दिली
गेली. अनेक सरकारी पुरस्कार या कुटुंबातील व्यक्तींच्या नावाने दिले जात होते. हे
ओझे हळूहळू दूर करण्यास प्रारंभ झाला आहे. सामान्य माणसालाही स्वातंत्र्य लढ्यात
आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देश घडवण्यासाठी एका विशिष्ट कुटुंबाव्यतिरिक्त
योगदान दिलेल्यांच्या कर्तृत्वाचा परिचय होऊ लागला आहे. अशा स्थितीत भविष्यकाळात
आपल्या कुटुंबाची ओळख तरी राहिल का? अशी धास्ती
युवराजांना वाटू लागली असावी का अशी शंका येण्यास जागा आहे. असे चिमखडे नकोत ,
हे सांगणारा प्रॉम्प्टर युवराजांना लवकरात लवकर भेटो , हीच इच्छा.
(लेखाची
पूर्वप्रसिद्धी – महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, ०६ फेब्रुवारी. २०२३)
केशव उपाध्ये, मुख्य
प्रवक्ता
No comments:
Post a Comment