• युद्धाआधीच शस्त्रे टाकणारे उद्धवराव आणि सत्तेचे महाभारत

     


    उद्धव ठाकरे यांनी युतीधर्म पाळला नाही. विचारधारेशी फारकत घेतली. त्यामुळेच शिवसैनिकांनी उठाव केला. उद्धव ठाकरेंना त्यांच्या या सत्तेसाठीच्या तडजोडीच्या धोरणाची किंमत मोजावी लागली.

        सर्वोच्च न्यायालयाच्या शिंदे-फडणवीस सरकारला घटनात्मक ठरवण्याच्या निर्णयाने अनेकांचा स्वप्नभंग आणि मुखभंगही झाला आहे. निकालादिवशी सकाळी अकरा वाजेपर्यंत सोळा आमदार अपात्र ठरणार आणि शिंदे- फडणवीस सरकार कोसळणार अशी भाकिते स्वयंघोषित ''रोखठोक'' कारांनी वर्तवली होती. गेले दोन, तीन महिने या मंडळींनी अशी भाकिते वर्तविण्याचा सपाटा लावला होता.या सर्वांना सर्वोच्च न्यायालयाने एका फटक्यात जमिनीवर आणले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरच्या प्रतिक्रिया, मत-मतांतरे दीर्घकाळ चालू राहतील. या निकालानंतर उद्धवराव ठाकरे यांनी नैतिकतेच्या नावाने भोकाड पसरले. असा कांगावा करण्यात त्यांच्यासारखा नटसम्राट महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात सापडणार नाही.

    सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील कायदेशीर, संविधानिक बाजू हळूहळू स्पष्ट होतील. या निकालाच्या कायदेशीर बाबींच्या तपशिलात न जाता या महाभारताचा कर्ता आणि करविता असलेल्या उद्धवरावांच्या कर्माचा विस्ताराने आढावा घेता येईल. पांडवांना, न्याय हक्क असलेले राज्य न मिळाल्याने महाभारत घडले, हे तुम्हा आम्हा सर्वांना माहित आहे. महाभारतातील दुर्योधन, दु:शासन ,शकुनीमामा सारखी अनेक पात्रे उद्धवरावांनी गेल्या अडीच वर्षात राज्याच्या राजकीय रंगभूमीवर एकट्याने वठवली. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे  वारंवार स्मरण होते.

     

    हिंदुत्वाच्या विचारधारेला तिलांजली

    १९९० च्या दशकात आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्त्वाचा झेंडा खांद्यावर घेतला. १९८७ मध्ये विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणुकीत हिंदुत्वाची ललकारी देत आदरणीय बाळासाहेबांनी शिवसेनेच्या डॉ. रमेश प्रभू यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. डॉ. प्रभू विजयी झाले. त्यांच्या निवडीला न्यायालयात आवाहन दिले गेले. न्यायालयाने प्रचारात  'हिंदुत्वा' चे आवाहन केल्यामुळे डॉ. प्रभू यांची निवड रद्द केली. मनोहर जोशी, सुभाष देसाई या सारख्या नेत्यांची निवडही याच कारणामुळे न्यायालयाने रद्द ठरवली होती. हिंदुत्त्वाचा वापर प्रचारात केल्याचे कारण देत त्यावेळच्या काँग्रेस सरकारने बाळासाहेब ठाकरे यांचा मतदान करण्याचा अधिकारही काढून घेतला होता. मात्र, आदरणीय बाळासाहेबांनी 'हिंदुत्वा' चा जयघोष थांबवला नाही. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते 'हिंदुत्वा' च्या विचाराधारेशी एकनिष्ठ राहिले. उद्धवरावांनी याच  'हिंदुत्वा' ला सत्तेसाठी तिलांजली दिली आणि काँग्रेस राष्ट्रवादीशी सोयरीक जमवली. भारतीय जनता पार्टीच्या साथीने निवडणूक लढवली. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नावाने तर विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने मते मागणारे उद्धवराव महाराष्ट्राने पाहिले आणि मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या हिंदुत्व विरोधी विचारांना साथ देणारे उद्धवरावही महाराष्ट्राने पाहिले. भारतीय जनता पार्टीशी केलेली दगाबाजी पसंत नसणाऱ्या  बाळासाहेबांच्या  शिवसैनिकांनी उठाव केल्यावर उद्धवरावांना जाग आली. त्यापुढचा अंक विधानसभेत होता.

    भारतीय जनता पार्टीशी दगाबाजी करण्याची भूमिका योग्य आहे , असे उद्धवरावांना ठामपणे वाटत असते तर उद्धवरावांनी राजीनामा द्यायलाच नको होता. पण तेवढी हिम्मत दाखविण्याऐवजी उद्धवरावांनी राजीनामा देऊन रणांगणातून पळ काढला. आपण दगाबाजी केल्याची चूक उद्धवरावांच्या अंतर्मनाला डाचत असावी असं म्हणण्याचं धाडस करणार नाही . कारण एवढं संवेदनशील मन असते तर युतीत निवडणूक लढवूनही काँग्रेस - राष्ट्रवादी बरोबर घरोबा करण्याचा कोडगेपणा त्यांनी केला नसता.  ''माझेच सहकारी माझ्याविरुद्ध उभे राहिल्यावर विश्वासदर्शक ठराव मांडणे नैतिकतेला धरून नव्हते , म्हणून मी राजीनामा दिला '', असला बाष्कळ युक्तीवाद उद्धवराव हल्ली करत आहेत. महाभारतात आपले चुलत बंधू , अन्य सगेसोयरे रणांगणात उभे दिसल्यावर अर्जुनाला त्यांच्याविरुद्ध लढायचं कसं असा प्रश्न पडला. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश मनुष्याच्या जगण्याचे सार आहे. कृष्ण म्हणतो , “ अर्जुना! क्षत्रिय म्हणून युद्ध करणे हे तुझं कर्तव्य आहे. ते तू केलेच पाहिजे. रणांगण सोडून गेलास तर लोक तुला पळपुटा म्हणतील. तू कर्माचा त्याग न करता, कर्मापासून मिळणार्‍या फळाचा त्याग कर! विजयासाठी युद्ध न करता, कर्तव्यासाठी युद्ध कर ''.

     उद्धवराव आपल्या भूमिकेशी प्रामाणिक असते तर त्यांनी रणांगणातून पळ न काढता जय - पराजयाचा विचार न करता विश्वासदर्शक ठराव मांडला असता. युद्धापूर्वी शस्त्रे टाकून पळालेले उद्धवराव सर्वोच्च न्यायालयात मात्र तातडीने गेले. “ आता मी जनतेच्या न्यायालयात लढेन ” असं म्हणण्याचा बाणेदारपणा त्यांनी दाखवला नाही. १९८८ मध्ये ठाणे महापौर निवडणुकीत एक मत फुटल्यानंतर आदरणीय बाळासाहेबांनी सर्व नगरसेवकांना राजीनामा द्यायला लावला होता. सत्तेची आपल्याला फिकीर नाही असं कृतीतून दाखवणारे बाळासाहेब कुठे आणि सत्तेसाठी भाजपाशी दगाबाजी करणारे उद्धवराव कुठे ?

     

    मानियेले नाही बहुमता....

       आता न्यायालयाच्या निकालातील ठळक मुद्दे पाहू - उद्धवरावांनी १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती , ती मागणी न्यायालयाने फेटाळली. विधानसभा अध्यक्षांची निवड रद्द करा ही उद्धवरावांची मागणीही न्यायालयाने फेटाळली आहे . आम्हाला पुन्हा सत्तेत आणा , ही मागणीही न्यायालयाने फेटाळली . शिंदे - फडणवीस सरकार अवैध आहे ही तुमची मागणीही न्यायालयाने मान्य केली नाही . असे असताना आमचाच विजय झाल्याची टिमकी उद्धवराव आणि त्यांचे सहकारी मारत आहेत.  महाभारतातीलच एका प्रसंगाची आठवण यानिमित्ताने होते आहे. युद्धात कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत रुतले.  ते बाहेर काढण्यासाठी कर्ण रथाखाली उतरला. त्याने धनुष्यबाण बाजूला ठेवले आणि रथाचे चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्णावर बाण सोडण्यास सांगितले. त्यावेळी कर्ण कृष्णाला म्हणाला होता , “ हाती शस्त्र नसलेल्या शत्रूवर घाव घालू नये असे धर्म सांगतो.”  त्यावेळी कृष्ण म्हणाला होता , '' एकट्या अभिमन्यूला सगळे कौरव एकत्र येऊन मारत होतात तेव्हा राधासुता तुझा हा धर्म कुठे गेला होता. पांडवांना फसवून त्यांचे राज्य हडप केले जात होते, त्यावेळी तुझा हा धर्म कुठे गेला होता? '' मोदींच्या नावावर मते मागून लोकसभेत १८ खासदार निवडून आणलेल्या उद्धवरावांना भाजपाशी काडीमोड घेताना नैतिकता आठवली नाही . असो. मुख्यमंत्रीपद मिळवण्याचा आग्रह कुटुंबातून होत होता त्यावेळी  “ सत्य असत्यासी मन केले ग्वाही , मानियेले नाही बहुमता ” या संतश्रेष्ठ तुकारामांच्या ओवीप्रमाणे उद्धवराव युती धर्माशी प्रामाणिक राहिले असते तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती .

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी –सकाळ पुणे आवृत्ती , १५  मे. २०२३)

    केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment