• साहेबांची पश्चातबुद्धी

       

     

        "उद्धव ठाकरे यांचे मंत्रालयात न जाणे हे आपल्याला पटत नव्हते, असे पवारांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केले आहे. कोरोना काळात मुख्यमंत्री असलेल्या उद्धवरावांनी गावोगावी जाऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेणे अपेक्षित होते" आपला राजकीय निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे उठलेले काहूर हा लेख लिहिला जात असे पर्यंत शमले नव्हते. या लेखाचा विषय साहेबांचा राजीनामा आणि त्याचा निवडणुकीनंतर राज्यात घडलेल्या घडामोडींवर त्यांच्या चष्म्यातून प्रकाशझोत टाकला आहे. पवार साहेबांचा एका अर्थाने त्यांच्या चुकांचा कबुली जबाब म्हणावा लागेल. शरद पवार हे चाणाक्ष, धूर्त, धुरंधर,मुत्सद्दी, चलाख अशा अनेक गुणवैशिष्ट्यांनी गौरविले जाणारे व्यक्तीमत्त्व आहे. त्यांच्या राजकीय चातुर्याचे शेकडो दाखले महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आढळून येतात. राज्याच्या शेती, सहकार आणि शिक्षण या क्षेत्रातील जडणघडणीत पवार साहेबांचे योगदान लक्षणीय आहे. पवार साहेबांकडे स्वकीयांच्या आणि विरोधी पक्षांच्याही ‘कुंडल्या’तयार असतात. या कुंडल्यांचा केव्हा आणि कुठे वापर करायचा, याचे बीजगणित आणि अंकगणित पवारांकडे तयार असते. मुद्दा होता तो ‘लोक माझे सांगाती’ मधील पवारांच्या कबुली जबाबाचा.

        २०१९ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. भारतीय जनता पार्टी प्रणितमहायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार असे चित्र होते. निकालाच्या दिवशीच उद्धवराव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीचा विश्वासघात करत मुख्यमंत्रीपदासाठी पत्ते पिसणे चालू केल्याचे स्पष्ट झाले होते. मोठ्या प्रतिक्षेनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या साथीत महाविकास आघाडी नावाची अनैसर्गिक आघाडी सत्तेत आली आणि उद्धवराव ठाकरे यांनी स्वत: च्या गळात हो नाही करत मुख्यमंत्रीपदाची माळ कशी टाकायला लावली, हा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे त्याची पुन्हा उजळणी करत नाही. उद्धवराव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार हा राज्याच्या इतिहासातील काळा अध्याय म्हणून नोंद झाला आहे. उद्धवराव मुख्यमंत्री झाल्यानंतर तीन चार महिन्यांत कोरोना संकटकाळ सुरू झाला. या काळात देशातील सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले, सर्वाधिक संसर्गबाधित रुग्ण महाराष्ट्रातच आढळून आले. या काळात मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांनी आपल्या खुशाल चेंडू, बेपर्वा आणि निष्क्रीय कारभाराचे अनेक नमुने पेश केले. उद्धवरावांनी मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या काळात फक्त दोन- तीन वेळा मंत्रालयाला चरणस्पर्श केला. मंत्रालयाला दर्शन न देणाऱ्या उद्धवरावांची,‘घर कोंबडा’ म्हणून टवाळी झाली. घरात बसून महाराष्ट्रासारख्या राज्याचा कारभार चालवणाऱ्या उद्धवरांवांनी आपल्या वर्तनाचे कोडग्या पद्धतीने वारंवार समर्थनच केले. पवार साहेबांनी आपल्या आत्मचरित्रात उद्धवरावांच्या मंत्रालयात न जाण्याच्या वृत्तीबद्दल नापसंती व्यक्त केली आहे. ‘उद्धव ठाकरे यांचे मंत्रालयात न जाणे हे आपल्याला पटत नव्हते’, असे पवारांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केले आहे. कोरोना काळात मुख्यमंत्री असलेल्या उद्धवरावांनी गावोगावी जाऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेणे अपेक्षित होते. तेवढी कार्यक्षमता उद्धवरावांनी कधीही दाखवली नाही. त्यांच्या सरकारमधील आरोग्यमंत्री राजेश टोपे हे मात्र आरोग्य व्यवस्थेच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी, केंद्र सरकारकडून आलेल्या सुचनांनुसार आरोग्यसेवा प्रदान करण्यासाठी निर्धाराने कार्यरत होते.

        एका रूग्णालयाच्या पाहणीसाठी गेलेल्या टोपे यांनी तेथील अडचणींबाबत मुख्यमंत्री असलेल्या उद्धवरावांना दूरध्वनी केला होता मात्र आपल्या सहकारी मंत्र्याचा त्या संकटाच्या काळातही दूरध्वनी न घेण्याचा उद्दामपणा उद्धवरावांनी दाखवला होता. पवार साहेब मुख्यमंत्री असताना लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १९९३ मध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठी प्राणहानी आणि वित्तहानी झाली. त्या संकटाला तोंड देताना पवार साहेबांनी आपल्या कार्यक्षमतेचा प्रत्यय दिला होता. अशा पवार साहेबांना कोरोना संकटकाळातील उद्धवरावांच्या निष्क्रीय आणि अकार्यक्षम कारभाराचे वावगे वाटले नाही याचे आश्चर्य वाटते. पवार साहेबांसारख्या प्रशासनाची नस ठाऊक असणा-या नेत्याने त्यावेळीच उद्धवराव ठाकरे यांना या बेपर्वाई बद्दल दोन शब्द सुनावण्याची गरज होती. मात्र पवार साहेबांनी त्यावेळी गप्प राहणेच पसंत केले. पवार साहेबांकडे राज्यातील सर्व नेत्यांच्या ‘कुंडल्या’ तयार असतात. याचा उल्लेख प्रारंभी केलाच आहे. उद्धवराव ठाकरेंची राजकीय आकलन शक्ती, त्यांच्या बुद्धीचा आणि प्रवृत्तीचा आवाका पवार साहेबांना माहित नव्हता, यावर कोण विश्वास ठेवणार? तरीही पवार साहेबांनी केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ नयेत, यासाठी उद्धव ठाकरे नावाचं अकार्यक्षम आणि कर्तृत्वहीन गाठोडे महाराष्ट्रावर लादले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देण्यास काँग्रेसचे नेतृत्व तयार नव्हते. पवार साहेबांनी आपला मुत्सद्दीपणा पणास लावत. काँग्रेस नेतृत्वाला महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यास भाग पाडले. शिवसेनेची सुत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर उद्धवरावांनी मुंबई महापालिकेच्या कारभाराची सुत्रेही आपल्याकडेच राहतील, याची खबरदारी घेतली. मुंबई महापालिकेचे कारभारी म्हणून उद्धवरावांनी कोणते कर्तृत्व दाखवले आहे, याची बित्तमबातमी पवार साहेबांकडे असणार. असे असतानाही पवार साहेबांनी भारतीय जनता पार्टीचा विश्वासघात करून बाहेर पडलेल्या उद्धवरावांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी आपले सारे चातुर्य पणाला लावले. उद्धवराव मुख्यमंत्री असताना पवार साहेब त्या सरकारचा कारभार चालवण्यात आणि त्या सरकारला मार्गदर्शन करण्यात सक्रीय भूमिका बजावतील, अशीच अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र उद्धवरावांनी मुख्यमंत्री असताना पवार साहेबांना आणि काँग्रेस नेतृत्वाला खुंटीला टागूंन ठेवले होते. गत आयुष्यातील चुकांची कबुली देण्याची प्रथा एका धर्मात रूढ आहे. धर्मगुरू पुढे उभे राहून आपल्या हातून घडलेल्या चुकांची कबुली, ‘कन्फेशन’ नावाने परिचित आहे. पवारांनी उद्धरावांना मुख्यमंत्री बनवून केलेल्या चुकीची अंशत: कबुली या आत्मचरित्रातून दिली आहे. मात्र एवढ्याने पवार साहेबांच्या चुकीचे क्षालन होणार नाही. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटावेळी मुख्यमंत्री असलेल्या पवार साहेबांनी मुंबईतील धार्मिक सलोखा टिकून राहावा यासाठी मुस्लिम वस्तीतही बॉम्बस्फोट झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली होती. खुद्द पवारांनीच अलिकडे आपण ही माहिती हेतूपूर्वक दिली होती, याची कबुली दिली होती. बाळासाहेब यांच्याबरोबर सहज संवाद साधता येत होता. मात्र उद्धवरावांबरोबर असा सदज संवाद साधण्यात अडचणी येत होत्या, असेही पवार साहेबांनी आत्मचरित्रात नमूद केले आहे. ‘मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी अशा प्रकारच्या कोणत्याही हालचाली दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून होत नाहीत त्यामुळे मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम द्यायला हवा’ असेही पवार साहेबांनी आत्मचरित्रात म्हंटले आहे. उद्धवराव आणि त्यांचे चेले चपाटे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा आणि ती गुजरातच्या घशात घालण्याचा मोदी सरकारचा डाव असल्याचा आरोप वारंवार करतात. पवार साहेबांच्या या खुलाशामुळे उद्धवरावांचा या विषयातील खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे. महाभारतात पुत्राच्या अतिव प्रेमापोटी धृतराष्ट्राने पांडवांचा राज्यावरील हक्क नाकारला आणि दुर्योधनाकडे राजपुत्र पद जाईल अशी व्यवस्था केली. उद्धवरावांना मुख्यमंत्रीपद देण्याची चूक धृतराष्ट्राच्या चुकीएवढीच मोठी होती, हे महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या जनतेने अनुभवले. त्यामुळेच पवारांच्या आत्मचरित्रातील पातकक्षालनाला महत्त्व उरत नाही.  साहेबांची पश्चातबुद्धी पाहिली की संतश्रेष्ठ तुकोबांच्या या ओवीचे साहजिकच स्मरण होते .

     

    आहाकटा मग करिती गेलिया ।आधी ठावा तया नाही कोणा

    आधी चुकी मग घडे आठवण । तुका म्हणे जन परिचये

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी – महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, ०८  मे. २०२३)

    केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment