नरेंद्र
मोदी हा राजकारणातील विश्वासार्हतेचा सर्वात मोठा ब्रँड आहे, हे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी दाखवून दिले.
विधानसभा
निवडणूक निकालांच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असभ्य उद्गार काढण्याची स्पर्धा सुरु झाली
होती. अनेक वर्षे देशाची सत्ता घराण्यात असल्याने अंगात मुरलेला सरंजामदारीपणा
राहुल गांधींच्या उक्तीतून बाहेर आल्याचे सर्वांनी ऐकले. महाराष्ट्रातही
कॉंग्रेससमर्थक भाजप व मोदी यांच्याविरुद्ध मुक्ताफळे उधळत होते.
या
सर्वांना मतदारांनी चांगलाच झटका दिला. मध्य प्रदेशातील विक्रमी विजयाबरोबरच
राजस्थान, छत्तीसगड या राज्यांतही खणखणीत
विजय मिळवत भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील मोठ्या विजयाची
तुतारी फुंकली आहे.
मतदारांनी
नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांच्या घोषणापत्रांवर आपल्या विश्वासाची मोहोर
उमटवली आहे. नरेंद्र मोदी हा राजकारणातील विश्वासार्हतेचा सर्वात मोठा ब्रँड आहे, हेही या निकालांनी दाखवून दिले आहे. निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी
वाटपावरून झालेल्या कुरबुरी, मध्यप्रदेश - राजस्थानमध्ये
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर न करता निवडणूक लढवणे यामुळे या दोन्ही राज्यांत
भाजपला जबरी फटका बसणार अशी हवा प्रसारमाध्यमांतील काही जणांनी पसरवली होती.
मध्य
प्रदेशने तर सर्व विक्रम तोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवराजसिंह चौहान
यांच्या ‘गरीब कल्याण योजनां’वर आपला विश्वास प्रकट केला आहे. जरा आकडेवारी बघू
या. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान
आणि तेलंगण या चार राज्यांमधील २०१८ च्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला
एकूण ६३८ पैकी २९९ जागा मिळाल्या होत्या आणि भाजपला ६३८ पैकी १९८ जागा मिळाल्या
होत्या.
या निवडणुकीत भाजपला ६३८ पैकी ३३७ अर्थात (+)१३९ जागा जास्त मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला ६३८ पैकी २३४ जागा मिळाल्या आहेत. म्हणजे ६५ जागा काँग्रेसने गमावल्या आहेत. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत या चार राज्यांमध्ये स्कोअर होता भाजप ० आणि काँग्रेस ३, तर २०२३ विधानसभा निवडणुकीचा स्कोअर आहे भाजप- ३ (या तिन्ही ठिकाणी काँग्रेस जिंकली होती) आणि काँग्रेस १. त्यात २०१९ लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड जिंकूनही काँग्रेस पक्ष लोकसभेत कसाबसा ५० चा आकडा गाठू शकला होता.
भाजपची
मतांची टक्केवारी या चारही राज्यांमध्ये वाढली आहे. मध्यप्रदेश मध्ये ७.८१%, छत्तीसगडमध्ये १३.०३%, राजस्थान मध्ये ३.८५% तर
तेलंगणात ६.८९% अशी भाजपची मतांची टक्केवारी वाढली आहे. काँग्रेसची मतांची
टक्केवारी या तीनही राज्यांत घटली आहे, केवळ तेलंगणात मतांची
टक्केवारी वाढली आहे.
डिसेंबर
२०१८ ते मार्च २०२० असे १६ महिने वगळले तर २००५ पासून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रिपद
भूषविणाऱ्या शिवराजसिंह यांच्या नेतृत्वाची या निवडणुकीत सर्वात मोठी कसोटी होती.
२००५ ते २०१८ या काळात अनेक कल्याणकारी योजना सुरु करून त्यांनी मध्य प्रदेशचा
चेहरामोहरा बदलून टाकला होता.
एकेकाळी
‘बिमारू’ अशी संभावना केली गेलेल्या या राज्याने सर्वाधिक कृषी विकास दर असलेले
राज्य असा लौकिक मिळवला होता. पंजाब, हरियाणाला मागे टाकत मध्य प्रदेश हे
गव्हाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य बनले ते शिवराजसिंह यांच्या धोरणांमुळेच.
गेल्या
साडेतीन वर्षांत शिवराजसिंह सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले. मध्य
प्रदेशने पीक विमा योजनेमध्ये ४९ लाख दाव्यांची एकत्र भरपाई देत २०-२१ , २१- २२ या दोन वर्षांत ७ हजार ६१८ कोटींची पीकविमा भरपाई शेतकऱ्यांच्या
बँक खात्यांत जमा झाली. कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार डिसेंबर २०१८
ते मार्च २०२० या काळात सत्तेवर असताना पीक विमा योजनेचा राज्य सरकारचा वाटा भरलाच
गेला नव्हता.
शिवराजसिंह सरकारने शेतकऱ्यांना विनाव्याज कर्ज उपलब्ध करून दिले. शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजापोटी २०२२अखेरपर्यंत २९ हजार कोटी रु. शिवराजसिंह सरकारने बँकांकडे भरले. ‘मुख्यमंत्री लाडली बहना’ योजना आणि ‘मुख्यमंत्री लाडली लक्ष्मी योजना’ या शिवराजसिंह सरकारच्या योजना कमलनाथ सरकारने बंद केल्या होत्या. त्या शिवराजसिंह सरकारने पुन्हा सुरु केल्या.
शेतकऱ्यांना स्वस्त वीज मिळावी म्हणून ३० हजार कोटी इतके मोठे अनुदान दिले. यामुळे शेतकऱ्यांना स्वस्त दरात आणि मुबलक प्रमाणात वीज मिळू लागली आहे. त्याचा फायदा शेतीमाल उत्पादन वाढण्यात झाला आहे. ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ केंद्र सरकारचे सहा हजार रु. आणि शिवराजसिंह सरकारचे चार हजार असे १० हजार रु. शेतकऱ्यांना मिळत आहेत.
त्यामुळेच
ग्रामीण भागातून भारतीय जनता पक्षाच्या खात्यात भरघोस मतदान जमा झाले आहे.
राजस्थानमध्ये नेतृत्वाच्या विषयावर भाजपमध्ये मोठे मतभेद असल्याने त्याचा फटका
भाजपला बसणार, काँग्रेसला फायदा होणार असं चित्र रंगवलं
गेलं होतं. राजस्थानच्या मतदारांवर नरेंद्र मोदी यांचे गारुड अद्याप कायम आहे,
हे दाखवत मतदारांनी तेथे सर्व शंका, कुशंकांना
विराम देत भारतीय जनता पक्षाला पुन्हा सत्तेत आणले आहे.
छत्तीसगडमध्ये
काँग्रेस जिंकणार असेच चित्र होते. खरं तर बघेल सरकारच्या भ्रष्ट कारभाराला जनता
वैतागली होती. ऐन निवडणुकीत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा ‘महादेव ॲप’ गैरव्यवहार
बाहेर आला. छत्तीसगडमध्ये सर्व अंदाज
चुकीचे ठरवत भाजपने सत्ता मिळवली आहे. तेलंगणमध्ये कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली
नसली तरी मतांची टक्केवारी वाढली आहे. जागाही वाढल्या आहेत.
‘विमाने’
जमिनीवर!
कर्नाटकमधील
विजयामुळे राहुल गांधी आणि काँग्रेसच्या समर्थक विचारवंतांची विमाने फारच हवेत
गेली होती. आता २०२४ चा विजय नक्की अशी स्वप्ने त्यांना पडत होती. त्यांची
हवेतली विमाने पाहून काँग्रेसचे वैचारिक
पोटभाडेकरू उद्धव ठाकरे, संजय राऊत यांची हेलिकॉप्टरे अंतराळात
चंद्राभोवती घिरट्या घालू लागली होती. आणखी वर्षभराने कोणाकोणाला तुरुंगात टाकायचं
याच्या याद्या तयार करण्याचे काम त्या दोघांनी हाती घेतले होते. जनतेने त्या
सर्वांना जबरदस्त दणका देऊन जमिनीवर आणले आहे.
(लेखाची पूर्वप्रसिद्धी – सकाळ पुणे आवृत्ती आणि सकाळ ऑनलाइन, ०५ डिसेंबर २०२३)
केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता
No comments:
Post a Comment