• काँग्रेसचा संशयास्पद प्रवास

     

    आपल्या अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी यांनी भारतातील सद्यपरिस्थितीबाबत काही मते व्यक्त केलीत. त्यांच्या या वक्तव्यांना वस्तुस्थितीचा आधार नाही. भारतीय नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य नाही, हे विधान म्हणजे खोटी, विखारी टिप्पणी आहे. भारतात सर्वधर्माच्या नागरिकांना त्यांच्या धर्मपालनाचे स्वातंत्र्य आहे. याबाबतचा काँग्रेसचाच इतिहास विपरीत आहे.

     


    काँग्रेसचे युवराज राहुल गांधी हे अलीकडेच अमेरिका दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी नेहमीप्रमाणे अकलेचे अनेक तारे तोडले. भारतात संविधानिक संस्था सरकारच्या दबावाखाली आहेत, धार्मिक आधारावर भारतात अनेकांचा छळ होतो, अशा आशयाची काही विधाने राहुल गांधींनी केली. भारतातील राजकीय आणि सामाजिक स्थितीविषयी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याने विदेशात जाऊन मत प्रदर्शन करण्यास काहीच हरकत नाही. मात्र अशी टीका टिप्पणी करताना आपण देशविरोधी शक्तींच्या हातात कोलीत देऊ नये, एवढे भान घटनात्मक पद भूषविणाऱ्या व्यक्तीने ठेवायलाच हवे. सत्तेसाठी उताविळ झालेल्या राहुल गांधींना असा परिपक्वपणा त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत क्वचितच दाखविता आला आहे. अमेरिकेतील एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भारतात सामान्य नागरिकांना आपले धार्मिक स्वातंत्र्य उपभोगता यावे, यासाठी विविध पातळ्यांवर संघर्ष चालू आहे. सरकार आणि सत्ताधारी पक्षाकडून हिंदू धर्मीय सोडून अन्य सर्व धर्मीयांचा छळ केला जात आहे, असे राहुल गांधींना म्हणायचे होते. या अनुषंगाने बोलताना भारतात शीख सुमदायाच्या नागरिकांना पगडी, हातात कडे घालून सार्वजनिक जीवनात वावरता येत नाही, गुरुद्वारामध्ये जाता येत नाही, अशी अत्यंत खोटी, विखारी टिप्पणी राहुल गांधींनी केली. मोदी सरकार आणि सत्ताधारी भाजपमुळे भारतातील अल्पसंख्यांक नागरिक संकटात सापडले आहेत, असे चित्र रंगविण्याचा अश्लाघ्य प्रयत्न राहुल गांधींनी केला. भारतात धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांक नागरिकांवर अनन्वित अत्याचार होत आहेत आणि आपणच याविरोधात ठामपणे उभे आहोत, असे अमेरिकतील भारतीय नागरिकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न राहुलबाबा करत होते.

    भारतात सर्वधर्माच्या नागरिकांना मुक्त धार्मिक स्वातंत्र्य आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य भारतीयाला राजकीय आणि सामाजिक स्थितीविषयी सरकार व अन्य संबंधितांविरुद्ध मोकळेपणाने टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे, याचा अनुभव १३० कोटी भारतीय नागरिक दररोज घेत असतात. अनेक काँग्रेस नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खुलेआम असभ्य भाषेत यथेच्छ शिवीगाळ करत असतात. नरेंद्र मोदी यांना जनरल डायर, तुघलक, औरंगजेब यांसारख्या उपमा देताना काँग्रेस नेत्यांना भारतात सरकारी यंत्रणेकडून अटकाव केला जात नाही. खुद्द राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप अनेकदा केले. राफेल विमान खरेदी व्यवहारात कसलाही गैरव्यवहार झाला नाही. त्यामुळे राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप करू नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाला सांगावे लागले. हा आदेशही राहुलबाबांनी धुडकावला होता. त्याबद्दल त्यांना सर्वोच्च न्यायालयात मुकाटपणे माफीही मागावी लागली. भारतात शीख सुमदायांच्या नागरिकांना पगडी घालून गुरुद्वारात जाता येत नाही, या राहुल गांधींच्या विधानाला नामचीन खलिस्तानवादी अतिरेकी पन्नू याने तातडीने सहमती दर्शविली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात शीख धर्मीयांवर कायमच अत्याचार होत आहेत. राहुल गांधी यांनी शीख धर्मीयांच्या मनातील भावना बोलून दाखवल्या, असे म्हणत पन्नू यांनी आपली खलिस्तानवादी भूमिका पुनश्च अधोरेखित केली. भारतात शीख धर्मीयच काय, पण कोणत्याही नागरिकावर धार्मिक आचार- विचारांची बंधने नाहीत, हे सांगण्यासाठी कोणा दिव्यदृष्टी असलेल्या राष्ट्रपुरुषाची गरज नाही. भारतात धर्माच्या आधारावर सर्वसामान्य नागरिकांवर बंधने असती तर सीएए कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीतील शाहीनबागमध्ये आंदोलकांना दोन-तीन महिने रस्ता अडवता आला नसता. याच आंदोलकांनी पोलिसांवर कसा गोळीबार केला हे दिल्लीकरांनी पाहिले आहे. तीन वर्षांपूर्वी शेतकरी आंदोलकांनी दिल्लीत लाल किल्ल्यावर चढाई करून खलिस्तानचा झेंडा कसा फडकवला, हेही दिल्लीकरांनी पाहिले आहे. त्यावेळी पोलिसांना तसेच सुरक्षा दलांना बळाचा वापर करता आला असता. पण मोदी सरकारने बळाचा वापर टाळला. पन्नूने ज्या वेगाने राहुल गांधींच्या विधानांना पाठिंबा दिला ते पाहता त्यामागे भारत विरोधी शक्तींचे अदृश्य पाठबळ दिसून येते. काँग्रेसच्या इतिहासात डोकावून पाहिले तर देशविरोधी शक्तींना मिळालेल्या पाठिंब्याची अनेक उदाहरणे सापडतील. १९८४ मध्ये भोपाळ येथे युनियन कार्बाईड या बहुराष्ट्रीय कंपनीत झालेल्या गॅस गळतीमुळे हजारो निरपराध नागरिकांना प्राण गमवावे लागले. शेकडो नागरिकांना आजन्म अंधत्व आले. या गॅस गळतीला जबाबदार असणाऱ्या कंपनीचे प्रमुख वॉरन अॅण्डर्सन यांच्याबद्दल तेथील जनतेत संतापाची लाट उसळली. काहीजणांनी त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रारही नोंदविली. अॅण्डर्सन यांना अटक करण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांचे पथक गेले होते. मात्र त्यावेळी पंतप्रधान असलेल्या राजीव गांधी यांनी या अॅण्डर्सन महाशयांना तातडीने अमेरिकेत पाठविण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांना दिले होते. वरून आदेश येताच अॅण्डर्सन यांना लाल दिव्याच्या गाडीतून विमानतळावर नेण्यात आले. तेथून सरकारी विमानाने त्यांना दिल्लीला पाठविण्यात आले. गॅस गळतीत प्राण गमवाव्या लागलेल्या हजारो भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांच्या दुःखाची पर्वा न करता केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या डबल इंजिन सरकारने अॅण्डर्सनला सुखरूप मायदेशी पोहचविले. हा देशद्रोहाचा सर्वोत्तम नमुना होता

    राजीव गांधी पंतप्रधान असतानाच बोफोर्स या स्वीडिश बनावटीच्या तोफांचा खरेदी व्यवहार भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे जगभर गाजला. अनेक वर्षांच्या चौकशीनंतर बोफोर्स तोफा खरेदी गैरव्यवहारात इटलीचा नागरिक क्वात्रोची याच्याविरुद्ध केंद्रीय गुप्तचर विभागाने आरोपपत्र दाखल केले. मनमोहन सिंग सरकार सत्तेत असताना इंटरपोलकडून क्वात्रोची याला अर्जेंटिनामध्ये अटक करण्यात आली.

    सीबीआयला ही माहिती तातडीने कळविली गेली. मात्र मनमोहन सिंग सरकारने क्वात्रोचीच्या प्रत्यार्पणासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात जाणूनबुजून दिरंगाई केली. परिणामी हा क्वात्रोची भारताच्या ताब्यात कधीच येऊ शकला नाही. हा पन्नू ज्या खलिस्तानची भाषा करतो त्याच मागणीसाठी भारताविरुद्ध जवळपास युद्ध पुकारणारा जर्नेल सिंह भिंद्रनवाले याला राहुल गांधींच्या आजीने आणि काकाने म्हणजे इंदिरा आणि संजय गांधी यांनी कसे खतपाणी घातले होते, याचे हजारो पुरावे उपलब्ध आहेत. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत शेकडो शीख नागरिकांची निघृण कत्तल करण्यात आली. ही कत्तल करण्यात एच. के.एल. भगत, जगदीश टायटलर, सज्जन कुमार या काँग्रेस नेत्यांचा हात होता हे न्यायालयात सिद्ध झाले. या कत्तलीचे तेव्हाचे पंतप्रधान आणि राहुल गांधींचे पिताश्री राजीव गांधी यांनी समर्थनही केले होते. शीख धर्मीयांना भारतात स्वातंत्र्य नाही, असे म्हणताना राहुल गांधींना हा इतिहास कदापि आठवणार नाही. पन्नूने राहुल गांधींच्या सुरात सूर मिसळावा याचे मुळीच आश्चर्य वाटत नाही. कारण काँग्रेसचा इतिहासच देशविघातक शक्तींशी असलेल्या संशयास्पद संबंधांमुळे डागाळलेला आहे.

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धीनवशक्ती२४ सप्टेंबर २०२४)

    केशव उपाध्येमुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment