• सुरू आहे पराभवानंतरचा ‘ब्लेम गेम’

     

    विधानसभा निवडणुकीतील महायुतीचा विजय आणि महाविकास आघाडीचा पराभव या दोन्हीचे विश्लेषण अजूनही सुरूच आहे. आधी ईव्हीएम मशीनविरोधात आवाज उठवल्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये या विश्लेषणाने आरोप-प्रत्यारोपांचे स्वरूप घेतले आहे. स्वबळावर लढण्याचे संकेत दिले जात आहेत. केवळ भाजपविरोधाची नकारात्मक भूमिका विरोधकांच्या अंगाशी येत आहे.

    विधानसभा निवडणुकीतील ‘न भूतो, न भविष्यति’ अशा पराभवामुळे बसलेल्या हादऱ्यातून महाविकास आघाडीची बडी नेतेमंडळी अजून सावरलेली नाहीत. निवडणुकीचा निकाल लागून दीड महिना होऊ गेला, राज्यात नवे मंत्रिमंडळ सत्तारूढ झाले, खातेवाटप झाले तरी महाविकास आघाडीतील नेत्यांना आपले नेमके काय चुकले याचा अजून पत्ता लागेनासा झाला आहे. निकालानंतरचे सुरुवातीचे दोन-तीन आठवडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ‘ईव्हीएम’च्या नावाने नेहमीप्रमाणेच खडे फोडले. थेट निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवण्यात आले. या आक्षेपांना निवडणूक आयोगाने पुराव्यासह उत्तर दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची वाचा बसली.

    शरद पवार यांच्यासारख्या जाणत्या नेत्यानेही ‘ईव्हीएम’बद्दल शंका उपस्थित करून पराभवामुळे आलेली हतबलता दाखवून दिली. आपले काय चुकले याचे आत्मचिंतन करण्याऐवजी ईव्हीएमच्या नावाने खडे फोडण्याचा मार्ग पत्करून मूळ प्रश्‍नाचे सुलभीकरण केले गेले. पवारांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे यांनी ईव्हीएमबद्दलच्या शंकांना तातडीने पूर्णविराम दिला. तरीही पवार साहेबांनी डॉ. बाबा आढावांच्या ईव्हीएम विरोधातील उपोषणाला पाठिंबा देऊन वातावरण गढूळच ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आता मात्र पवार साहेबांना आपल्या चुकीची जाणीव झाली असावी, असे मानण्यास जागा आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे आम्ही गाफील राहिलो, महायुतीने मात्र आपल्या चुका सुधारल्या, अशा शब्दांत पवार साहेबांनी पराभवाच्या कारणांचे विश्‍लेषण केले आहे.

    दुसरीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही पराभवाचे आपल्या परीने जाहीर विश्‍लेषण केले आहे. ‘जागावाटपाचा मुद्दा लवकर न सुटल्याने आम्हाला प्रचारासाठी फारच कमी वेळ मिळाला, आम्हाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही, अशी कारणे वडेट्टीवार यांनी दिली आहेत. पराभवाची कारणमीमांसा करताना वडेट्टीवार यांनी उबाठाचे नेते खा. संजय राऊत यांच्यावर शरसंधान केले. जागावाटपासाठी झालेल्या विलंबामागे षडयंत्र असावे, अशी शंकाही वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. उबाठा नेते संजय राऊत यांच्यावर दोषारोप करताना वडेट्टीवार यांनी आपल्याच पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांना म्हणजे नाना पटोले यांनाही टोला लगावला आहे.

    वडेट्टीवारांच्या कारणमीमांसेला खा. संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. हे उत्तर देताना त्यांनी जागावाटपाच्या दरम्यान झालेल्या घोळाची काही उदाहरणे देताना शरद पवार यांच्या पक्षालाही या घोळाबद्दल जबाबदार ठरवले आहे. खा. राऊत यांनी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वावरही टीकेचे बाण सोडले आहेत.

    पराभवाचे खापर एकमेकांच्या माथी फोडण्याचा हा असा खेळ चालू असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी या खेळाला चरचरीत फोडणी दिली आहे. ‘काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही आणि उबाठा शिवसेना जागी होत नाही’, असे म्हणत डॉ. कोल्हे यांनी महाविकास आघाडीतील लाथाळ्या कोणत्या थराला पोहोचल्या आहेत, हे दाखवून दिले आहे. पराभवाला कोणीच वाली नसतो आणि विजयाला अनेक बाप असतात, असे म्हटले जाते. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकमेकांवर दोषारोप सुरू केले आहेत. अर्थात हे अपेक्षितच होते. लोकसभा निवडणुकीतील ३१ जागांच्या यशामागे संविधान बदलासारख्या मुद्द्यांवर केलेला खोटा प्रचार आणि मुस्लिम समाजात निर्माण केलेला भयगंड यासारखे मुद्दे होते. अशा खोट्या प्रचाराचे आयुष्य अल्प असते, हे जाणून न घेता राज्यात महायुतीच्या विरोधात लाट आहे आणि या लाटेवर स्वार होत आपण सत्ता मिळवणारच, अशी स्वप्ने महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिवसाढवळ्या पडू लागली होती. आपल्या खोट्यानाट्या प्रचाराला अन्य मार्गांनी प्रभावी उत्तर दिले जाईल, याचा अंदाजही महाविकास आघाडीच्या नेत्यांना आला नाही. डॉ. कोल्हे यांनी काँग्रेस आणि उबाठा यांना एकाचवेळी अंगावर घेतल्यानंतर त्याची प्रतिक्रियाही त्याच पद्धतीने आली आहे.

    डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या पक्षापुरते पहावे, तुम्ही खासदार असलात तरी आमच्यावर बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही, असे उत्तर उबाठाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी दिले आहे. उबाठा गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत एकट्याच्या बळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. उबाठा गटाच्या दृष्टीने मुंबई महापालिका निवडणूक सर्वाधिक प्रतिष्ठेची असणार आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात काँग्रेसची असलेली हवा नंतरच्या सहा महिन्यांत गायब झाली. अशा काँग्रेसच्या साथीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणे फायदेशीर ठरणार नाही, हे उबाठा गटाच्या लक्षात आले असावे. ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ या म्हणीची आठवण ठेवत उबाठा गट महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहे, हे आता लपून राहिलेले नाही. एकमेकांशी काडीमोड घेताना काडीमोड घेण्यामागची कारणे सांगावी लागतात. महाविकास आघाडीच्या नेत्यांची सध्याची वक्तव्ये पाहता काडीमोडासाठीची पार्श्‍वभूमी तयार करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.

    महाराष्ट्रात या लाथाळ्या चालू असताना इंडी आघाडीचा घटक पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाने ही आघाडी विसर्जित करून टाकावी, असा सल्ला दिला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री डॉ. उमर अब्दुल्ला यांनी इंडी आघाडीचे विसर्जन करावे, असा सल्ला देताना काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.

    कोणत्याही तत्त्वांच्या नव्हे, तर केवळ भाजपविरोध या एकमेव नकारात्मक मुद्द्याच्या आधारे निर्माण झालेली महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय पातळीवरची इंडी आघाडी आपले अस्तित्व किती काळ टिकवू शकते, याचे उत्तर आगामी काळच देईल.

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी –नवशक्ति१४ जानेवारी २०२५)

    केशव उपाध्येमुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment