विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १४८ जागा लढवून १३२
जागांवर विजय मिळवला, तर
भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना या महायुतीला २८८ पैकी २३२ असे घवघवीत यश मिळाले. या
दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महाविजयी अधिवेशन झाले. यानिमित्ताने १९५१
ते १९८०,
१९८० ते २०२४ या जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाच्या ७३
वर्षांच्या वाटचालीचा आढावा.
भारतीय जनता पक्षाचे अहिल्यानगर जिल्ह्यातील साईबाबांच्या
शिर्डी भूमीत नुकतेच महाविजयी अधिवेशन झाले. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता
पक्षाने १४८ जागा लढवून १३२ जागांवर विजय मिळवला, तर भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना या महायुतीला २८८ पैकी २३२ असे
घवघवीत यश मिळाले. या दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथील अधिवेशनाला
महाविजयी अधिवेशन संबोधले गेले होते. यानिमित्ताने १९५१ ते १९८०, १९८० ते २०२४ या जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाच्या ७३
वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणे संयुक्तिक ठरेल. १९५१ ते १९७७ या काळात
महाराष्ट्रात जनसंघाचे अस्तित्व प्रचंड संघर्षानंतरही लक्षणीय म्हणावे, असे नव्हते. त्या काळातील सामाजिक परिस्थितीमुळे आणि
काँग्रेस कम्युनिस्ट, समाजवादी
विचारधारेतील प्रसारमाध्यमे, विचारवंत-शिक्षितांच्या
व्यवस्थेकडून जनसंघावर हिंदुत्वाचा शिक्का मारून हा पक्ष प्रस्थापित राजकीय
व्यवस्थेत अस्पृश्य ठरेल, अशी
काळजी घेतली गेली. भटजी आणि शेठजींचा पक्ष अशा शब्दांत हेटाळणी होऊनही जनसंघाने
काँग्रेस,
कम्युनिस्ट आणि समाजवादी विचारधारांशी लढत देत आपले अस्तित्व निर्माण केले. १९७२च्या निवडणुकीत
जनसंघाने १२७ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी फक्त पाच जागांवर जनसंघाला विजय
मिळाला होता. आजच्या महाविजयाच्या मागे जनसंघाच्या रूपात कार्यकर्त्यांनी केलेला
महासंघर्ष आहे, याचे विस्मरण भाजप
नेतृत्वाने कधीच होऊ दिले नाही. ज्या अहिल्यानगर जिल्ह्यात महाविजयी अधिवेशन झाले, त्या जिल्ह्यात सूर्यभान वहाडणे, अण्णासाहेब कदम पाटील, राजाभाऊ झरकर यासारख्या अनेकांनी पराभूत होण्याची भीती न
बाळगता पक्षाचे अस्तित्व राखण्यासाठी लोकसभा, विधानसभा निवडणुका लढविल्या होत्या.
भारतीय जनता पक्षाने १९८०नंतरच्या आपल्या वाटचालीत आपल्या
अस्तित्वासाठी प्रखर संघर्ष केला. या संघर्षात विचारधारेशी तडजोड करण्याचे पातक
पक्षनेतृत्वाने कधीच केले नाही. १९८०मध्ये ‘कमळ’ या चिन्हावर पहिली विधानसभा
निवडणूक लढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने १४ जागा मिळवल्या. १९८५मध्ये या जागा १६वर
पोहचल्या. १९८५ ते १९९० ही पाच वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने
संक्रमणाची होती. शरद पवार यांनी १९८०पासून काँग्रेस विरोधातील राजकारणाचा अवकाश
व्यापला होता; मात्र स्वबळावर सत्ता
मिळवता येत नाही, हे
लक्षात आल्यावर पवार साहेबांनी समाजवादी काँग्रेसचा गाशा गुंडाळला आणि
काँग्रेसच्या वळचळीला जाऊन बसणे पसंत केले. या सुमारास राम जन्मभूमी आंदोलनामुळे
हिंदुत्वाचे वारे वाहू लागले होते. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी
हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला. याच विचारधारेच्या आधारावर भाजप आणि शिवसेना
यांची युती झाली. शरद पवार काँग्रेसमध्ये गेल्यामुळे महाराष्ट्रात विरोधी पक्ष
संपून जातील, हे राजकीय विश्लेषकांचे
भाकीत भाजप-शिवसेना युतीने साफ खोटे ठरविले. १९९०च्या निवडणुकीत भाजपने ४२ जागा
मिळवल्या. १९९५च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने १३५ जागा जिंकत राज्याची सत्ता
मिळवली. या निवडणुकीत भाजपच्या जागा ६५पर्यंत जाऊन पोहचल्या. १९८५ ते १९९५ ही
भाजपची १० वर्षांची वाटचाल अनेक अर्थाने उल्लेखनीय ठरली. शेटजी-भटजींचा पक्ष हा
आपल्यावरील अनेक वर्षांचा टिळा पुसून भारतीय जनता पक्षाने विविध जाती समूहांची
गणिते जमवून सामाजिक जुळणी केली. ही सामाजिक जुळणी पक्षाच्या वाढीस प्रामुख्याने
कारणीभूत ठरली. उत्तमराव
पाटील,
लक्ष्मणराव मानकर यासारख्या अनेक ज्येष्ठांच्या
मार्गदर्शनाखाली गोपीनाथ मुंडे, अण्णा
डांगे,
ना. स. फरांदे, पांडुरंग फुंडकर, अरुण अडसड यांनी विविध आंदोलने उभारत भाजपचा पाया विस्तारण्यासाठी अथक
प्रयत्न केले. कापूस
उत्पादकांचे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे आंदोलन या दोन आंदोलनांनी
महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांत भाजपची ओळख पोहोचली. ग्रामीण भागात
जाती-जमातींच्या बेरीज-वजाबाकीची घट्ट वीण लक्षात घेऊन भाजपचा संघटनात्मक विस्तार
करण्यासाठी पक्षनेतृत्व अखंड कार्यरत होते. या प्रयत्नांचे फळ सध्या महाविजयाच्या
रूपाने आम्ही अनुभवत आहोत.
२०१४ नंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे देशाबरोबरच
महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकीय समीकरणे मोडीत निघाली. २०१४पासून सलग तिसऱ्या वेळेस १००पेक्षा अधिक जागा
मिळवण्याची कामगिरी भाजपने करून दाखवली आहे. धुरंधर, मुत्सद्दी अशी विशेषणे लावत पत्रकारांनी डोक्यावर घेतलेल्या
शरद पवारांना समाजवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने एकदाही शतकी मजल मारता
आलेली नाही. काँग्रेसला १९९०नंतर एकदाही १०० जागा जिंकता आलेल्या नाहीत. या
पार्श्वभूमीवर भाजपच्या कामगिरीकडे पाहिले पाहिजे. हा महाविजय एका रात्रीत
साकारलेला नाही. संघटना उभी
करण्यासाठी वर्षानुवर्ष
घेतलेली मेहनत, चिकाटीचे हे दृश्य
स्वरूपातील फळ आहे. अनेक वर्ष सत्तेत राहूनही राज्याचे मूलभूत प्रश्नही सोडवू न
शकलेल्या काँग्रेस आणि शरद पवार यांची विश्वासार्हता संपुष्टात
आल्यावर केंद्रातील आणि राज्यातील सरकारच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकासाचे नवे
मापदंड स्थापित केल्यामुळेच भाजपची स्वीकारार्हता वाढली आहे. सरकारच्या कामगिरीला संघटन
शक्तीची टिकाऊ जोड असल्यामुळेच सलग तीनदा १००पेक्षा अधिक जागा मिळवण्याची किमया
भाजपला करता आली आहे.
(लेखाची
पूर्वप्रसिद्धी –नवशक्ति, २१ जानेवारी २०२५)
केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता
No comments:
Post a Comment