• जया अंगी कोतेपण

    विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. महाविकास आघाडीचे तीन प्रमुख घटक- शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे- हे नव्या राजकीय परिस्थितीत कोणती भूमिका घ्यावी, या संभ्रमात सापडले आहेत. काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी बाकांवर बसण्याशिवाय पर्याय नाही, मात्र सर्वाधिक अडचणीत उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष उभा ठाकला आहे. विरोधी पक्षनेतेपद स्वीकारायचे की वेगळा मार्ग धरण्याचा विचार करायचा, या द्विधा मनःस्थितीत उद्धव ठाकरे दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची पुढील वाटचाल कशी असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे राजकारण नव्या वळणावर येऊन ठेपले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस आणि उबाठा या तीन घटकांना या वळणावर आपण नेमक्या कोणत्या भूमिकेत राहावे या पेचात पाडले आहे. महाविकास आघाडीच्या या तिन्ही घटक पक्षांत उद्धव ठाकरेंपुढचा पेच सर्वार्थाने वेगळा आहे. काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना राजकारणाच्या या वळणात विरोधी बाकांवरची भूमिका बजावण्याखेरीज अन्य भविष्य नाही. उद्धव ठाकरेंना मात्र या वळणात सर्वाधिक संभ्रमित करून टाकले आहे.

    सर्वात जास्त आमदार या नात्याने उबाठा हा विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष ठरतो. काँग्रेस आणि शरद पवार साहेबांनी संमती दिली, तर उबाठाला विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदही मिळू शकते; मात्र उद्धवराव ठाकरे विरोधी पक्षनेतेपदाच्या भूमिकेत जायचे की नाही याचा निर्णय घेऊ शकले नाहीत, असे त्यांची वक्तव्ये आणि हालचालींवरून वाटू लागले आहे.

    राज्यात पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता येणार या स्वप्नात असलेल्या उद्धवरावांना मतदारांनी दिलेल्या दणक्यातून अजूनही जमिनीवर येता आलेले नाही. आपले अवघे २० आमदार निवडून यावेत यापेक्षा महायुतीला २३२ जागा मिळाव्यात याचा उबाठांना जबरदस्त धक्का बसला आहे. राजकारणातले चढउतार पचविण्याची त्यांची क्षमता नाही, हे अनेकदा दिसले आहे. १९९९ ते २०१४ या काळात उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पक्षाच्या साथीने विरोधी पक्षातच होते. त्यावेळी सलग १५ वर्षं विरोधी पक्षात काढताना उद्धवरावांना फारशा अडचणी आल्या नाहीत. कारण २०१३पर्यंत शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे हयात होते.

    प्रकृतीअभावी वंदनीय बाळासाहेब त्यावेळी जाहीर सभा वगैरे स्वरूपात फारसे सक्रिय नव्हते. तरीही महत्त्वाच्या राजकीय निर्णयांचे पालकत्व वंदनीय बाळासाहेबांकडेच असे. त्या काळात वंदनीय बाळासाहेबांनी आणि प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या भाजप नेतृत्वाने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठीचे युतीचे जागावाटप निश्चित केले होते. या जागावाटप समीकरणात बदलत्या परिस्थितीत लवचिकपणे बदल करणे यालाच राजकीय शहाणपण म्हणतात. १९९०नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत वंदनीय बाळासाहेबांनी भाजपबरोबरच्या जागावाटपात अनेकदा आग्रही भूमिका घेतली; मात्र यातून युती तुटणार नाही, याचीही खबरदारी घेतली; मात्र उद्धवरावांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीपासून स्वाभिमानाऐवजी अहंकाराचेच प्रदर्शन करीत आपल्या कोत्या मनोवृत्तीचे वारंवार दर्शन घडविले.

    राजकारणात युती, आघाड्या अपरिहार्य असतात. अशा आघाड्यांचे, युतीचे बरेवाईट परिणाम दोन्ही पक्षांना भोगावे लागत असतात. युती, आघाड्यांमधून फक्त फायदाच मिळावा, वाटा फक्त आपल्याला मिळावा, घाटा मित्राला व्हावा, अशा अपेक्षेने उद्धवराव युतीकडे बघत असल्यामुळे त्याचे फळ उबाठा सेनेला अपरिहार्यपणे मिळाले आहे. २०१४ विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यावरही भाजप नेतृत्वाने शिवसेना नेतृत्वावर कडवट टीका करणे टाळले होते. त्या निवडणुकीत भाजपला १२३ जागा मिळाल्या होत्या. २०१७च्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना वेगवेगळे लढले. शिवसेनेला ८४ जागा मिळाल्या, तर भाजपनेही ८२ जागा जिंकून आपली मुंबईतील ताकद दाखवून दिली. जागावाटपाची चर्चा चालू असताना 'तुमची औकात फक्त ६० जागांची आहे', अशी दर्पोक्ती शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी केली होती. २०१२मध्ये युतीत असताना भाजपला ३१ जागा मिळाल्या होत्या. २०१७मध्ये भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढल्यामुळे भाजपच्या पारड्यात मुंबईकरांनी घसघशीत ८२ जागांचे दान टाकले. हा इतिहास सांगण्याचे कारण उबाठांची राज्याच्या राजकारणात झालेली कोंडी. मुंबई महापालिका हा उबाठांचा जीव की प्राणाचा विषय. ही निवडणूक स्वबळावर लढा, असा आग्रह उबाठांचे काही सहकारी धरू लागले आहेत; मात्र त्यावर काय निर्णय घ्यावा हे उबाठांना कळेनासे झाले आहे.

    आता उबाठांना नाइलाजाने पदरात पडलेले विरोधी पक्षाचे पात्र प्रामाणिकपणे वठवायचे की, महाविकास आघाडीतून बाहेर पडून आपला सवतासुभा उभा करायचा, या प्रश्नाने संभ्रमात टाकले असल्याचे दिसते आहे. महाविकास आघाडीत राहून काँग्रेस आणि राशपच्या साथीत सजग विरोधकाची भूमिका निभावण्याची मोठी संधी आली आहे; मात्र या संधीचे सोने कसे करायचे हे माहीत नसल्याने आणि माहीत झाले, तरी तशी इच्छाशक्ती नसल्याने उद्धवराव आणि त्यांचे सहकारी महाविकास आघाडीत नांदण्याची आपली इच्छा नसल्याचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या सूचित करीत आहेत. माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार समारंभाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थिती लावल्यानंतर उद्धवराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यावर उबाठा सेनेपुढे आपण कोणत्या दिशेने जायचे हा पेच पडल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले आहे. उबाठांनी आपल्या राजकीय अपरिपक्वतेमुळेच स्वतःचा हॅम्लेट करून घेतला आहे.

    मराठी माणसांसाठी लढणारी संघटना बांधत असताना बाळासाहेबांनी प्रचंड संघर्ष केला. या संघटनेला मराठी माणसांच्या हिताकरिता कार्यरत असणारी व्यवस्था बनवताना बाळासाहेबांनी लढाऊ कार्यकर्त्यांचे मोहोळ उभे केले. बाळासाहेबांच्या करिष्म्याच्या आणि पुण्याईच्या बळावर आपल्याला राजकारणात कायम टिकता येणार नाही, हे प्राथमिक शहाणपणही त्यांच्याकडे नव्हते. बाळासाहेबांनी राजकारणात जे काही स्थान मिळवले ते स्वकष्टार्जित होते. बाळासाहेबांचा हा वारसा पुढे न्यायचा असेल, तर आपल्याला त्याहीपेक्षा अधिक कष्ट उपसावे लागतील, राजकारणातले पेच-डावपेच शिकावे लागतील, जनतेसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून सामान्य माणसासाठी संघर्षाची पावले टाकावी लागतील, हे लक्षात न घेता आजवर आपल्याच चौकटीत राहणाऱ्या उद्धवरावांना ५ वर्षं विरोधात कशी काढायची हे कळेनासे झाले आहे. थेट शरद पवारांनाच लक्ष्य करून त्यांनी आपली हतबलता दाखवून दिली आहे.

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी –नवशक्ति१८ फेब्रुवारी २०२५)

    केशव उपाध्येमुख्य प्रवक्ता


  • You might also like

    No comments:

    Post a Comment