• चीन प्रेमाचा काँग्रेसी उमाळा”

     

    भारतातील कोणत्या शक्तींना ‘यूएसएड’च्या माध्यमातून निधी मिळाला? काही दिवसांपूर्वी जॉर्ज सोरोस या अब्जाधीश उद्योगपतीने वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून भारतात अनेक संघटना, संस्था यांना निधी दिल्याचे जाहीर झाले होते. सॅम पित्रोदा, जॉर्ज सोरोस आणि यूएसएड ही भारतविरोधी साखळी विविध माध्यमातून भारताच्या विकासाच्या गतीमध्ये अडथळे आणण्याचे काम करत आहे, असे या घडामोडींतून स्पष्ट होते.


    भारताला चीनकडून कोणत्याच प्रकारचा धोका नसून भारताने चीनबरोबरचे सहकार्य वाढविले पाहिजे” हे कोणा चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याचे वक्तव्य नसून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांचे हे बोल आहेत. “भारताने आक्रमक व्हावे असे चीनबरोबरचे कोणतेही वादाचे विषयच नाहीत,” असेही पित्रोदा यांनी सांगून टाकले आहे. काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनीही पित्रोदा यांच्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चीनवर स्तुतिसुमने उधळली होती. त्यामुळे पित्रोदा यांनी आपल्या पक्षाची भूमिका नव्याने मांडली आहे, असेच म्हणावे लागते. पित्रोदा यांच्या मुक्ताफळानंतर देशभर संतापाची लाट उसळली. परिणामी काँग्रेस नेतृत्वाने तातडीने खुलासा करत पित्रोदा यांच्या मतांशी पक्ष सहमत नसल्याचे सांगून टाकले. पण यातून काँग्रेस नेत्यांना चीनविषयी मनातून किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा दिसून आले. मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षाला विरोध करीत असताना काँग्रेस नेते चीनसारख्या देशाची भलामण करू लागले आहेत. पित्रोदा जे काही बोलले ते अत्यंत निषेधार्ह आहे. काँग्रेस नेतृत्वाचे चीनबरोबर असलेले लागेबांधे काँग्रेसला चीनकडून मिळालेल्या देणग्यांमुळे स्पष्ट झाले होते. पित्रोदा यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या पावलावर पाऊल टाकत आपला देशविरोधी दृष्टिकोन दाखवून दिला आहे. गेल्या १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सर्वांगीण प्रगती करत असताना आणि आंतरराष्ट्रीय पटलावर आपले मजबूत स्थान निर्माण करत असताना अनेक देश आणि विदेशी शक्तींचे हितसंबंध धोक्यात आले आहेत. त्यामुळे या बड्या शक्ती भारताच्या विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. मनमोहन सिंग सरकार सत्तेत असताना ७ ऑगस्ट २००८ रोजी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसशी करार केला होता. त्या करारावर काँग्रेस पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांनी तर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शी जिनपिंग यांनी स्वाक्षरी केली होती. या करारातील माहिती काँग्रेस अथवा गांधी परिवाराने कधीच सार्वजनिक केली नाही.

    चीनने पाकिस्तानलाही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अनेकदा सहकार्य केले आहे. अशा चीनला शत्रू समजू नका, तो आपला मित्र देश आहे, असा सल्ला सॅम पित्रोदा यांनी दिला आहे. चीनमध्ये वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या, अन्य प्रसारमाध्यमे यांच्यावर अनेक बंधने आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांना चीनमध्ये वार्तांकन करण्यास बंदी केली जाते. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाविरोधात तेथील सामान्य माणसाला आपले मत खुलेपणाने व्यक्त करता येत नाही. चीनमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर किती बंधने आहेत, हे साऱ्या जगाला ठाऊक आहे. असे असताना युवराज राहुल गांधी यांनी भारतापेक्षा चीनमध्ये प्रसारमाध्यमांना अधिक स्वातंत्र्य आहे, असे वक्तव्य जाहीरपणे केले होते. चीनचे संरक्षणमंत्री अचानक गायब झाले, चीनचे परराष्ट्रमंत्री असेच अचानक गायब झाले. चीनमधील सर्वात मोठी कंपनी असलेल्या अलिबाबा कंपनीचा प्रमुखही रहस्यमयरीत्या बेपत्ता झाला. या घटनांबाबत चीनमधील कम्युनिस्ट राजवटीकडून कसलेही स्पष्टीकरण दिले गेले नाही.

    मोदी सरकारने गेल्या १० वर्षांत चीनबरोबर चांगले संबंध निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे. मात्र चीनबरोबर चांगले संबंध निर्माण करत असताना भारताच्या स्वाभिमानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हे मोदी सरकारने चीनला अनेकदा ठणकावून सांगितले आहे. ५ वर्षांपूर्वी चीनच्या सैन्याने लडाखमधील गलवान खोऱ्यात घुसखोरी केली होती. चीनच्या सैन्याची घुसखोरी भारतीय सैन्याने प्रचंड प्रतिकार करत रोखली. या संघर्षात भारताचे २० जवान हुतात्मा झाले. अशा चीनबरोबर मित्रत्वाचे संबंध निर्माण करण्याचा सल्ला पित्रोदांनी दिला आहे. चीनबरोबर आपले शत्रुत्व नाही, असे म्हणणाऱ्या पित्रोदा यांनी २० भारतीय जवानांच्या हौतात्म्याचा अवमानच केला आहे. गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या घुसखोरीविरोधात लढताना भारतीय जवानांनी आपल्या प्राणाची पर्वा केली नाही. तरीही त्यावेळी काँग्रेस नेतृत्वाने भारतीय लष्कराच्या शौर्याबाबत शंका उपस्थित केली होती. काँग्रेसला भारतीय लष्कराचा अपमान करण्याची सवय आहे. मोदी सरकारला विरोध करताना आपण भारतीय लष्कराचा अवमान करून जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा मलिन करत आहोत, याचेही भान काँग्रेस नेतृत्वाने कधीच ठेवले नाही.

    राजीव गांधी फाऊंडेशनला चीन दूतावासाकडून मिळालेले अर्थसहाय्य, काँग्रेसने चीनच्या कम्युनिस्ट पक्षाबरोबर केलेला करार याच्या मोबदल्यात राहुल गांधी, सॅम पित्रोदा हे चीनच्या आरत्या ओवाळत आहेत. चीन सरकारकडून अर्थसहाय्य मिळाल्याचे राजीव गांधी प्रतिष्ठानने आपल्या वार्षिक आयकर विवरण पत्रातच कबूल केले आहे. चीनकडून देणगी मिळाल्यावर राजीव गांधी प्रतिष्ठानने भारत आणि चीनमधील उद्योगांना तंत्रज्ञान हस्तांतरण यासारख्या विषयावर अभ्यास प्रकल्प सुरू केले होते. २००९- १० मध्ये प्रतिष्ठानने दिलेल्या फेलोशिपद्वारे मोहम्मद साकिब यांनी भारत-चीन यांच्यातील मुक्त व्यापार कराराची व्यवहार्यता तपासणारे संशोधन केले.

    मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारतातील संस्था आणि संघटनांना मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य केले होते, असे अलीकडेच उघडकीस आले आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच हा आरोप केला आहे. बायडेन प्रशासनाने भारताच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी २१ दशलक्ष डॉलर एवढा प्रचंड निधी खर्च केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. अमेरिकेच्या करदात्यांचा पैसा अशा पद्धतीने खर्च करण्याचा अधिकार बायडेन प्रशासनाला कोणी दिला, अशा शब्दांत ट्रम्प यांनी भारतविरोधी शक्तींच्या कारवायांवर प्रकाशझोत टाकला आहे. भारतातील कोणत्या शक्तींना ‘यूएसएड’च्या माध्यमातून निधी मिळाला? काही दिवसांपूर्वी जॉर्ज सोरोस या अब्जाधीश उद्योगपतीने वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून भारतात अनेक संघटना, संस्था यांना निधी दिल्याचे जाहीर झाले होते. सॅम पित्रोदा, जॉर्ज सोरोस आणि यूएसएड ही भारतविरोधी साखळी विविध माध्यमातून भारताच्या विकासाच्या गतीमध्ये अडथळे आणण्याचे काम करत आहे, असे या घडामोडींतून स्पष्ट होते.

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी –नवशक्ति२५ फेब्रुवारी २०२५)

    केशव उपाध्येमुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment