• गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र फेव्हरेट डेस्टिनेशन!

       महाराष्ट्राने २०२४-२५ मध्ये विक्रमी १.६५ लाख कोटी परकीय थेट गुंतवणूक आकर्षित केली आहे, जी देशातील एकूण गुंतवणुकीच्या ४० टक्के आहे. ही ऐतिहासिक कामगिरी स्थिर धोरणे, सक्षम नेतृत्व आणि उत्कृष्ट पायाभूत सुविधांचा परिणाम आहे. राज्यातील औद्योगिक विकास, कुशल मनुष्यबळ आणि प्रगत दळणवळण व्यवस्था गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. या गुंतवणुकीमुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल.

       व्यापार उद्यमात गुंतवणूक हवी असेल, तर आधी पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतात, हे मोदी सरकारचे सूत्र आता सकारात्मक परिणाम दाखवत आहे. देशाच्या आर्थिक नकाशावर आपला ठसा कायम ठेवत महाराष्ट्राने परकीय थेट गुंतवणुकीच्या शर्यतीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. महाराष्ट्रातून उद्योगधंदे परराज्यात चालले आहेत, ही बिनबुडाची कोल्हेकुई परकीय थेट गुंतवणुकीच्या ताज्या आकड्यांनी बंद तर केली आहेच, शिवाय राज्याची नाहक बदनामी करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकत महाराष्ट्र टॉपवरच असल्याचे सिद्ध केले आहे.

              जगभरातील उद्योगविश्वाच्या नजरा आकर्षित करणारा हा पराक्रम म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवरील विश्वास, स्थिर धोरणे आणि सक्षम यंत्रणेचा परिपाक आहे. विरोधकांच्या काळात आत्मग्लानी आलेल्या राज्याला पराभूत मानसिकतेतून बाहेर काढत महायुती सरकारने नवी झळाळी प्राप्त करून देण्यासाठी अथक परिश्रम घेतल्यानेच हे साध्य होऊ शकले आहे. राज्याला सुखावणारे हे आकडे पाहताना थोडेसे मागे वळून पाहिल्यास ‘मेक इन इंडिया’पासून ‘मेक इट इन महाराष्ट्र’पर्यंतचा प्रवास यशस्वी ठरवण्यासाठी कसा भक्कम पाया घातला गेला याचीही नोंद घ्यावी लागेल. या परकीय थेट गुंतवणुकीमुळे राज्याने पुन्हा भारताच्या आर्थिक मांडणीत आपले स्थान भक्कम केले आहे. यातून स्थानिक रोजगार निर्मितीला हातभार लागणार आहे.

            महाराष्ट्राने २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण १,६४,८७५ कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक आकर्षित केली. ही गुंतवणूक देशात आलेल्या एकूण ४,२१,९२९ कोटी रुपयांपैकी तब्बल ४० टक्के आहे, ही तर विशेष कौतुकास्पद बाब. गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात ३२ टक्क्यांनी अधिक गुंतवणूक झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात (जानेवारी ते मार्च २०२५) शेवटच्या तिमाहीत २५,४४१ कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. हे वर्ष महाराष्ट्रासाठी विक्रमी ठरले आहे. मागील तपशील पाहिला तर मागील दहा वर्षांतील सर्वोच्च परकीय गुंतवणुकीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. विशेष म्हणजे, हा उच्चांक आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांतच ओलांडला गेला आहे. म्हणूनच ही ऐतिहासिक आणि विक्रमी गुंतवणूक आहे.

            महाराष्ट्राच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकमध्ये ५६,०३० कोटी रुपये थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे. म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य महाराष्ट्राचा निम्मा आकडाही गाठू शकलेले नाही. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत ५१,५४० कोटी, तर गुजरातमध्ये हे प्रमाण ४७,९४७ कोटी आहे. म्हणजेच महाराष्ट्र निर्विवाद आघाडीवर आहे.

             परकीय गुंतवणूकदार महाराष्ट्राकडे आकर्षित होण्याची अनेक कारणे आहेत. त्या कारणांमुळेच महाराष्ट्र हे भारतातील गुंतवणुकीसाठी एक लोकप्रिय ठिकाण झाले आहे. महाराष्ट्रात औद्योगिक विकास, पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ यांसारख्या विविध क्षेत्रांत गुंतवणूक करण्यास अनेक संधी आहेत. महाराष्ट्र हे देशातील असे अग्रेसर औद्योगिक राज्य आहे, ज्याचे राज्याच्या सकल राज्य उत्पादनात १४ टक्क्यांहून अधिक योगदान आहे. मुंबई हे भारतातील सर्वात मोठे आणि आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्स्चेंजचे (मुंबई रोखे बाजार) ठिकाण आहे. राज्यात चांगले रस्ते, रेल्वे आणि विमानतळ नेटवर्क आहे, ज्यामुळे वाहतूक आणि संपर्क साधणे सोपे होते.

             राज्यात विविध उद्योगांसाठी आवश्यक असलेले पाणी, वीज, जमीन आणि जागा उपलब्ध आहे. राज्यात उच्चशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ आहे. गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन आणि अनुदान उपलब्ध आहे. व्यवसायासाठी इथे अनुकूल असे उद्योगस्नेही वातावरण आहे. राज्यात मजबूत कनेक्टिव्हिटी आणि ग्राहकांची भरभक्कम मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीसाठी अनेक संधी आहेत. औद्योगिक विकास, पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि इतर फायद्यांमुळे हे राज्य गुंतवणुकीसाठी एक योग्य ठिकाण आहे. त्याचप्रमाणे राज्यात दळणवळणाची साधने विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत.

            राज्यातील उत्तम भौगोलिक आणि आर्थिक परिस्थिती, अद्ययावत तंत्रज्ञानाची उपलब्धता पाहता महाराष्ट्र गुंतवणूक करण्यास उत्तम पर्याय आहे. राज्यातील तांत्रिक कुशल मनुष्यबळ मोठ्या संख्येने आहे. तरुण-तरुणींना वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यावर राज्य सरकारने भर दिला आहे. त्यांच्या कौशल्याचा उपयोग महाराष्ट्रात उद्योग उभारू इच्छिणाऱ्या उद्योगांना होत आहे. कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा तसेच महिलांचा विकास आणि परकीय गुंतवणुकीचे क्षेत्र अशा सात पैलूंनी राज्याचा विकास होत असल्याने राज्य हे दिवसेंदिवस उद्योगपूरक होत चालले आहे. या गुंतवणुकीतून उदयास येणारे उद्योग हे केवळ मुंबई-पुणे-नाशिकपुरते मर्यादित न राहता, अन्य प्रांतांमध्येही त्यांचा विस्तार होईल. त्यातून आजवर राहिलेला प्रादेशिक असमतोल दूर करण्यावर सरकारचा भर आहे. परकीय थेट गुंतवणुकीने या सगळ्या प्रक्रियेला अधिक प्रमाणात चालना मिळेल. येत्या काळात आर्थिक विकासाची गंगा सर्वदूर पोहोचून राज्याची भरभराट कायम राहील, यात शंका नाही. त्यामुळे भविष्यात आणखी मोठ्या गुंतवणुकीचे स्वागत करण्यास महाराष्ट्र सज्ज आहे.


    (लेखाची पूर्वप्रसिद्धी –नवशक्ति०३ जून २०२५)

    केशव उपाध्येमुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment