• म्हणून मी यंदा 'होली' खेळणार नाही !

    होय मी 'होली' खेळणार नाही. !!


    कोणी म्हणेल की तुझ्यावरील एक दिवस रंग न पडल्याने ना करपलेल्या जमिनीवर हिरवाई येणार ना रिकाम्या हापश्याला पाणी पाझरणार. हे जितक खर तितकंच या स्थितीततही माझ्यातील संवेदनाही शांत बसू देत नाही कारण पाणी टंचाईच दुःख काय असत हे मी भोगलय.. मैलोनमैल पाण्याचा शोध आणि त्यासाठी करावी लागणारे पायपीट काय असते हे मी अनुभवल आहे.जसा जसा मार्च संपतोय तस तसं दुष्काळाचा दाह वाढतोय, पाण्याअभावी दिसणारं भयाण चित्र धडकी भरवणार आहे.

    आटलेल्या नद्या, विहीरी, तळ गाठलेली धरणे, करपलेल्या जमिनी, ओसाड माळरान आणि रणरणत उन्हात पाण्याचा शोधात रानोमाळ फिरणारे सर्वसामान्य हे आजच चित्र आज सोशल मिडीयाच्या आणि अन्य वाहिन्यांमुळे समोर येत असले तरी काही जणांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे असेच चित्र आहे.

    दुष्काळाने केवळ जमिनी करपत नाहीत तर अनेकांचे आयुष्य करपत. रणरणत उन आणि ओसाड माळरान ही काहींच्या पाचवीलाच पुजलेली असते. पाणी भरताना घागरभर पाण्यासाठीची होरपळ ही त्यावेळची वणवण नसते तर आयुष्यभाराच दुखण्याची वणवण देऊन जात असते. हापश्याचा दांडा मारताना जाणारे हात आणि खांदे, घागरी कमरेवर घेऊन दुखणाऱ्या कंबरा या भागातील सर्रास दिसणार वास्तव आहे. सर्वकाही सोडून पाण्याभोवती फिरणारी कुंटुब तर इथे पावलापावलावर दिसतात.

    मी हे सगळं भोगलय कारण माझंही विद्यार्थी जीवन असेच पाणी भरण्यात गेलय. मुळात मी कायम दुष्काळीच असणाऱ्या सोलापूरचा, त्यातून परिस्थितीने आम्हाला एका अशा भागांत नेऊन वसवलं होत की ना तिथे पाण्याची सोय, ना रस्ते. खरं तर या भागांत जाईपर्यंत ना कधी विहीर पाहिली होती ना हापशावर हापसून पाणी आणलं होत. घागर, कळशी उचलण्याचा प्रसंगच कधी आलेला नव्हता. पण या भागांत आलो आणि अनुभवली पाणी यात्रा. तोटी फिरवली की पाणी पडणारा नळ असण्याचा प्रश्नच नव्हता. पाणी आणायच ते आजूबाजूच्या बोअर अथवा विहीरीतून. या बोअरिंगच पाणी आटायला सुरूवात व्हायची आणि मग सुरू व्हायची आमची पाण्यासाठी पायपीट.  परिक्षा असो अथवा आजारपण आमची सुटका नसायची.


    दिवसाचा दिनक्रम ठरायचाच पाण्याच्या वेळेवर. आज कुठून पाणी आणायच यावर सकाळच्या चहावर सुरू व्हायची. कारण आदल्या दिवशी जिथून पाणी आणलं तिथे आज पाणी असेलच याची शाश्वती नसायची. असलीच तर गर्दी रांगा याचा अंदाज घ्यावा लागयचा. कोणत्या बोअरला पाणी किती यांवर चर्चा रंगायच्या. बोअरना अक्षरक्ष दोरखंड बांधून ठेवला जायचा का तर त्यात पाणी साठव म्हणून. पाणी संपल की दांडा जड व्हायचा. मारणाऱ्याचे हात भरून यायचं. कशाबश्या आपल्या घागरी भरल्या की काय सुटल्याचा आनंद व्हायचा.

    मग सायकलच्या कॅरीअरला जाड दोरीचा विशिष्ट पध्दतीने फास अडकवून दोन घागरी ठेवल्या जायच्या त्यांवर एक कळशी आणि मग सायकल वर घागरी टाकून मग पाणी यात्रा सुरू व्हायची. सोबत सायकल पकडायला एखादा भिडू मिळाला तर मग सीटवर पण दोन घागरी आणि मधल्या दांडीवर दोन घागरी अश्या तब्बल ७ घागरी घेऊन ही यात्रा निघायची. भिडू रोज मिळण्याची शक्यता कमी मग तीन घागरीची यात्रा. रस्ते नव्हतेच. खाचखळग्यातून भरलेल्या घागरी सायकल संभाळत घरी आणण ही एक मोठी कला असायची. मुळात या दोन घागरी उचलून सायकलच्या कॅरेजवर ठेवणे हाच पहिला धडा असायचा मग ते दोन्ही पायात सायकल पकडून कॅरीअरवरची स्प्रिंग मागे खेचून त्यांवर कळशी हंडा ठेवणे हे दुसरे दिव्य.

    दोन पाच मैलांवरून खाचखळग्यातून हे पाणी आणताना एक सर्कस करावी लागत असे. तोल गेला की नुसत पाणी सांडणार नाही तर घागरी पण चेमटणार मग घरचे चेमटवणार हा पण एक तणाव असायचा. इथे स्त्री पुरूष, मुलगा मुलगी, लहान मोठा भेद नसतो. सकाळी उठलो की पाणी यात्रा हे प्रत्येत घरात ठरलेल असायच. त्यातून महत्तप्रयासाने एखादा टॅंकर सुरू व्हायचा. पण तो कधी येणार याची कधीच नक्की वेळ नसायची. टँकर येण्याच्या ठिकाणी भांडी ठेवायची. तोही मध्यरात्रीच उगवायचा. अर्धवट झोपेत, डोळे चोळत, अंधारात ठेचकाळत पाणी भरण्यासाठी लोकांची घावपळ सुरू असायची. त्यातून घागर पुढे मागे करण्यावरून रांगेत भांडण ठरलेली. पिण्यासाठी लांबवर नळ असण्या-या एका घरातून महिना १० रूपये दराने दोन घागरी पाणी मिळायचे पण ते सुध्दा अशा उपकाराने देत की जणू तो आम्हाला फार मोठा अपराधातून वाचवत असावा.
    आनंद, दुःख, खेळ, काम, परीक्षा, लग्न सगळं काही या पाण्याभोवती ठरायच. कालांतरानं घरात नळ आले पण तोपर्यंत आमच बालपण आणि महाविद्यालयीन जीवन पाण्यासाठी वणवण फिरण्यात रापून गेलं होत. पाण्याच्या घड्याळ्यावर फिरताना अनेक आनंदाचे प्रसंग हुकले होते. सगळेजण सण साजरे करत असायचे, आमचे मित्र खेळात रमलेले असायचे पण आम्ही पण पाण्याच्या सायकली वाहण्यात अडकलेले असायचो. पण पाण्याच मोल त्यातून शिकलो.

    आज मुंबईतही पूर्ण नळ सोडायला हात कधी धजत नाही. ना कधी हाॅटेलमध्येही ग्लासातल पाणी टाकायचा मोह होतो. घरी फोन केला कि पहिला प्रश्न असतो पाण्याच काय? आजही या पाणी टंचाईच्या बातम्या पाहिल्या की ते दिवस आठवतात.

    हे दिवस यायला जसं निसर्ग जबाबदार आहे तसा आपणही काही प्रमाणात जबाबदार आहोत. पाणी अमूल्य आहे निर्माण करता येत नाही हे कधी लक्षात घेतले नाही त्यातून मन मानेल तस आपण पाणी उधळत राहीलो. आज मराठवाड्यासारखी पाणी टंचाई नसेल कदाचित मुंबईत, पण हे संकट येणारच नाही याची खात्री कोणी देऊ शकत नाही. म्हणूनच वेळीच सावरायला हवे.

    एक होळी कोरडी गेली तर व्यक्तीगत आयुष्यात काही फरक पडणार नाही पण पाणी वाचवा मोहिमेला पाठबळ लाभेल. जागांचा अंधार दूर होणार की नाही माहित नाही पण माझ्यापुरता तरी मी दिवा घेऊन चालणार..म्हणूनच मी नाही करणार होळी यंदा...


    - केशव उपाध्ये
  • You might also like

    No comments:

    Post a Comment