नितीशकुमारांनी अलीकडेच आपल्या मूळ सौभाग्याच्या म्हणजे
लालूप्रसादांच्या नावाने मळवट भरला आहे. नवा मळवट भरायचा म्हणजे आधीचं कुंकू पुसून
टाकायला हवं. नितीशभौंनी भारतीय जनता पार्टीच्या नावाने 5 वर्षांपूर्वी लावलेला कुंकवाचा टिळा पुसून टाकला आहे. उतरत्या वयातही
वारंवार मळवट बदलण्याची नितीशकुमारांची हौस मोठी विलक्षण म्हणावी लागेल. असे करून
आपली मुळात कमी झालेली विश्वासार्हता आणखी संपवून टाकण्याचा आत्मघात करीत आहोत,
याची जाणीव त्यांना नसेल असे म्हणता येणार नाही. जॉन सी. मॅक्सवेल
हा प्रख्यात अमेरिकी लेखक म्हणतो की, Credibility is a leader's currency.
With it, he or she is solvent; without it, he or she is bankrupt. विश्वासार्हता नसलेला नेता राजकीयदृष्ट्या दिवाळखोर असतो, हे मॅक्सवेलचे निरीक्षण मर्मभेदी आहे. भारतातील अनेक नेत्यांना हे उमगलेले
आहे, तरीही सत्तालोभापोटी ही मंडळी निगरगट्टपणे राजकीय
विश्वासघात वारंवार करीत राहतात.
नितीशकुमार, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा 'मसावि' काढायचा झाला तर तो 'विश्वासार्हतेचा
अभाव' असाच निघेल. 1978 मध्ये
वसंतदादांचे सरकार पाडून मुख्यमंत्री बनलेल्या पवारांना त्यानंतरच्या कारकीर्दीत
दोन वेळा मुख्यमंत्रीपद, केंद्रात संरक्षण, कृषी यासारखी महत्त्वाची खाती मिळूनही त्यांना विश्वासार्हता परत मिळवता
आलीच नाही. राज्यात 1999 ते 2014 अशी
सलग 15 वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या पवारांच्या पक्षाला याकाळात
झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकदाही दोन आकडी जागा मिळवता आल्या नाहीत. विधानसभा
निवडणुकीत 2004
साली मिळवलेल्या 71 जागा ही पवारांच्या पक्षाची आजवरची सर्वोच्च
कामगिरी. पवारांना महाराष्ट्रात स्वबळावर कधीच सत्ता मिळवता आलेली नाही. एन.टी.
रामाराव, देवीलाल, चंद्राबाबू नायडू,
ममता बॅनर्जी, मायावती, मुलायमसिंग
यादव, जगनमोहन रेड्डी, के.चंद्रशेखर
राव यासारख्या नेत्यांनी आपापल्या राज्याचे मुख्यमंत्री पद स्वबळावर मिळवले.
मात्र, पवारांना ही किमया कधीच करता आली नाही. याचे
कारण त्यांना जनमानसात विश्वासार्हता कधी मिळवताच आली नाही. सत्तेसाठी काहीही करू
शकणारा नेता अशी पवारांची प्रतिमा तयार झाली आहे.
उद्धव ठाकरे हे पवारांच्याच कळपात शिरले. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी 1985 नंतर सातत्याने हिंदुत्ववादी आणि कॉंग्रेस विरोधी भूमिका घेतली. या भूमिकेशी त्यांनी हयात असेपर्यंत कधीच तडजोड केली नाही. सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करताना राम की रोम अशा टोकदार भाषेत त्यांनी सोनियांना विरोध केला होता. 1990 नंतर बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांना आपल्या टीकेचे लक्ष्य केले होते. बाळासाहेबांनी पवारांवर प्रखर हल्ला चढवत 1995 मध्ये राज्यात शिवसेना-भारतीय जनता पार्टीची सत्ता आणण्यात मोठी भूमिका बजावली. उद्धव ठाकरे यांनी मात्र हिंदुत्ववादी भूमिकेला केवळ आणि केवळ मुख्यमंत्रीपदासाठी तिलांजली दिली. भाजपा नेतृत्वाने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, अशी लोणकढी ठोकून उद्धवरावांनी राष्ट्रवादी - काँग्रेसबरोबर सोयरीक जमविली. उद्धवरावांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात काँग्रेस- राष्ट्रवादीकडून हिंदुत्वाचा वारंवार अवमान झाला. मात्र सत्तेच्या मोहापोटी उद्धवरावांनी हिंदुत्वाचा अपमान गिळला. नवाब मलिक यांनी दाऊद टोळीशी संगनमत करून कोट्यवधींची मालमत्ता बळकावली. याच आरोपाखाली ते तुरुंगाची हवा खात आहेत. अशा मलिकांना मंत्रीपदावरून काढण्याची हिंमत मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी दाखवायला हवी होती. त्यासाठी सत्ता पणाला लावण्याचे धैर्य त्यांनी दाखवले नाही. देशद्रोही दाऊद टोळीची मालमत्ता वाचवण्यासाठी मलिकांनी दाऊद टोळीला साह्य केले याचे सज्जड पुरावे उपलब्ध आहेत. बाळासाहेबांनी दाऊद टोळी आणि राष्ट्रविरोधी शक्तींविरोधात जहाल भाषेत केलेली भाषणे अजूनही महाराष्ट्राची जनता विसरली नाही. त्याच बाळासाहेबांचा वारस म्हणविणाऱ्या उद्धवरावांनी 'ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार' करण्याची शिवसेनेची भूमिका चुटकीसरशी गुंडाळून टाकली.
अखिल समाजवादी परिवार मळवट बदलण्याच्या खेळात प्रसिद्ध आहे. काँग्रेस
विरोधाची प्रखर भूमिका घेऊन ज्या डॉ. राममनोहर लोहिया यांनी विरोधी पक्षांची आघाडी
उभारण्यात पुढाकार घेतला, त्या लोहियांच्या वारसदारांनी बिनदिक्कतपणे
काँग्रेसच्या पाठिंब्यावर केंद्रात, अनेक राज्यात सत्ता
उपभोगली. नितीशकुमार याच बेभरवशी समाजवादी परिवाराचा वारसा पुढे नेत आहेत. 1996-97 मध्ये
काँग्रेसच्या पाठिंब्यावर देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल हे काँग्रेसच्या
पाठिंब्यावरच पंतप्रधान झाले. ज्येष्ठ समाजवादी नेते मधु लिमये यांचा काँग्रेस
विरोध किती प्रखर होता हे आज वयाच्या सत्तरीत व त्यापेक्षा अधिक वयाच्या मंडळींना
आठवत असेल. 1979 मध्ये दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून
मधु लिमये यांनी आग्रही भूमिका घेतल्यामुळे मोरारजी देसाई सरकार कोसळले. त्यानंतर
इंदिरा गांधी यांच्या पाठिंब्याने चरण सिंग यांना पंतप्रधान करताना मधु लिमये आणि
राज नारायण यांच्यासारख्या अनेक समाजवादी नेत्यांनी आपला कडवा काँग्रेस विरोध ''गंगार्पण'' केला.
1990 च्या दशकांत प्रबळ असणाऱ्या जनता दलाची सत्ता बिहारमध्ये आणण्यात लालूप्रसादांबरोबर नितीशकुमारांचाही मोठा वाटा होता. लालू प्रसादांचा मनमानी कारभार सहन न झाल्याने नितीश कुमार यांनी जॉर्ज फर्नांडीस यांच्या साथीत समता पार्टीची स्थापना केली. या समता पार्टीने पुढे लालूंच्या विरोधात भारतीय जनता पार्टीशी युती केली. समता पार्टी (पुढे याचे रूपांतर संयुक्त जनता दलात झाले) व भारतीय जनता पार्टीने लालू प्रसादांच्या जंगलराज विरोधात 12-13 वर्षे सातत्याने संघर्ष केला. भाजपा आणि संयुक्त जनता दलाला 2005 मध्ये लालू परिवाराची सत्ता हटवण्यात यश मिळाले. 2013 मध्ये भारतीय जनता पार्टीने 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केले. या मुद्यांवरून नितीश कुमारांनी भाजपाशी काडीमोड घेतला. सत्ता टिकवण्यासाठी नितीश यांनी लालूप्रसादांचा पाठिंबा स्वीकारण्यात हयगय दाखवली नाही. लालूप्रसादांच्या राजवटीत बिहारमध्ये जंगलराज सुरू आहे, अशी भूमिका घेणाऱ्या आणि लालूप्रसादांविरोधात रान पेटवणाऱ्या नितीश कुमारांना आपल्या पूर्वीच्या भूमिकेचा सहज विसर पडला. लालू-नितीश युती असतानाही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडीने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये 31 जागा जिंकत दणदणीत यश मिळवले. त्यावेळी नितीश कुमारांना लोकसभेच्या फक्त 2 जागा जिंकता आल्या होत्या. पुढे 2015 ची विधानसभा निवडणूक नितीश-लालू युतीने जिंकली. लालू प्रसादांनी अधिक जागा जिंकूनही नितीश कुमारांकडे मुख्यमंत्रीपद सोपवले.
2017 मध्ये नितीश कुमारांनी पुन्हा कोलांटउडी मारत लालूप्रसादांना
सोडचिट्ठी दिली आणि ते भारतीय जनता पार्टीच्या साथीत आले. 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 74 तर
नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दलाला 43 जागा मिळाल्या
होत्या. तरीही भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेतृत्वाने नितीश कुमारांकडेच
मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतला. भाजपा नेतृत्वाने एवढा मनाचा मोठेपणा
दाखवूनही नितीश कुमारांनी पुन्हा भाजपाबरोबरची युती तोडून लालू परिवाराच्या छावणीत
दाखल होण्याचा निर्णय घेतला. लालू परिवारानेही नितीश कुमारांना आपल्या पंखांखाली
घेतले. 'ऐसा एक ही नहीं सगा जिसको नितीशने ना ठगा' अशी जहरी टीका करणारे लालूपुत्र तेजस्वी यांनी पुन्हा नितीश कुमारांशी
घरोबा करण्याचा निर्णय घेऊन टाकला. अर्थात मागचा अनुभव लक्षात घेता लालू परिवार
नितीश कुमारांवर विसंबून राहणार नाही. लालू परिवाराच्या आणि आपल्या चेल्यांच्या 'फाईल' बंद करण्यासाठी लालू परिवाराने नितीश
कुमारांना पाठींबा दिला आहे. हे काम झाले की नितीश कुमारांचा 'मोरया' होणार हे निश्चित आहे.
या कोलांटउड्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे वेगळेपण म्हणूनच उठून दिसते. 1979 मध्ये दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा समाजवादी परिवाराने उपस्थित केल्याने त्यावेळच्या जनसंघाने रा. स्व. संघाशी असलेले संबंध तोडण्यास नकार दिला. 1990 मध्ये राम मंदिराच्या मुद्द्यावरून व्ही.पी. सिंग सरकारला दिलेला पाठिंबा भाजपा नेतृत्वाने काढून घेतला. 1998 मध्ये सत्ता टिकवण्यासाठी तडजोडी करण्यास नकार दिल्यामुळे अटलजींचे सरकार एका मताने पडले. 2014 मध्ये सत्तेवर आल्यावर मोदी सरकारने राम मंदिर बांधणी, 370 वे कलम रद्द करणे ही आपली आश्वासने पूर्ण केली. सत्ता येते आणि जाते विचारधारेशी तडजोड कदापी शक्य नाही, हे सिद्ध करणारे भाजपा नेतृत्व म्हणूनच वर्षानुवर्षे आपली विश्वासार्हता टिकवून आहे.
(लेखाची पूर्वप्रसिद्धी – लोकमत डिजीटल, 16 ऑगस्ट 2022)
No comments:
Post a Comment