• 'घराणेशाही'पासून मुक्ती!

     


           लोकशाहीसमोरील सर्वांत मोठा धोका असलेल्या घराणेशाहीपासून ती वाचवणेहे पंतप्रधान मोदी यांचे पहिले ध्येय आहे. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पंतप्रधानांच्या या ध्येयाचा संदेश स्वीकारला आहे. लोकशाही घराणेशाहीच्या कचाट्यातून मुक्त झालीतर सामान्य जनताही या प्रयत्नांना दुवा देईल






         

               लोकशाही राज्यव्यवस्थेपुढील सर्वांत मोठा धोका कोणता, असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला विचारल्यास कदाचित वेगवेगळी उत्तरे पुढे येऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मात्र या प्रश्नावर एकच उत्तर देतात. 'घराणेशाही' हा लोकशाहीपुढील सर्वांत मोठा धोका आहे, हे मत ते गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मांडत आले आहेत. घराणेशाही संपविल्याखेरीज लोकशाही सुदृढ होणार नाही आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील लोकशाहीची फळे सर्वसामान्य माणसाला चाखावयास मिळणार नाहीत, हे पंतप्रधान मोदी यांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजकीय भूमिकेकडे पाहिले पाहिजे.


            भावनिकतेचे आवाहन करीत प्रादेशिक पक्ष ही सत्तेला चिकटून बसणारी बांडगुळे कधी झाली, हे लक्षातही आले नाही. अनेक राज्यांत प्रादेशिक पक्षांनी आपापल्या कुटुंबाचे बस्तान अशा काही जोमाने बसविले आहे, की राष्ट्रीय स्तरावरील पक्षांनादेखील त्या राज्यांत शिरकाव करणे अवघड झाले. भारतीय जनता पक्षाला गेल्या काही वर्षांच्या राजकारणात सातत्याने हा अनुभव येऊ लागल्यानंतर, प्रादेशिक पक्ष या संकल्पनेचा गांभीर्याने अभ्यास सुरू झाला, आणि एक गोष्ट स्पष्ट झाली. ती म्हणजे, प्रादेशिक पक्ष हे नाव राज्याराज्यांतील जनतेची अस्मिता जोपासणारे आणि गोंडस वाटत असले, तरी प्रत्यक्षात ते कोणा कुटुंबाच्या किंवा घराण्याच्या तालावरच नाचणारे असतात. या पक्षाच्या माध्यमातून सर्व स्तरांवरील सत्तेची सारी सूत्रे आपल्या कुटुंबांच्या किंवा घराण्याच्या हाती एकवटण्याचे राजकारण नेत्यांकडून सातत्याने होत असते. अगदी अलीकडे, दोन महिन्यांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर सडकून टीका केली. त्या आधी जेव्हा जेव्हा या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले, तेव्हा तेव्हा घराणेशाही आणि लोकशाही या संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट होती.


          राजकीय घराणेशाहीत देश, समाज, जनता यांच्याहूनही अधिक, कुटुंब, घराणे, नातेवाइक यांच्या हिताचाच विचार केला जातो. कुटुंब किंवा घराणे हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असतो. परिवाराच्या पुण्याईखेरीज असे पक्ष निवडणुकीचे राजकारण करूच शकणार नाहीत, अशी या पक्षांची भूमिका असते. साहजिकच, आपला पक्ष हाच समाजाचा तारणहार आहे आणि समाजाचे हित-अहित पाहणे ही आपल्या घराण्याची वारसा हक्काने चालत आलेली मक्तेदारी आहे, अशा समजुतीत या पक्षांचे नेते वावरतात. म्हणजे, प्रादेशिक पक्ष हे बऱ्याच अंशी घराणेशाहीचे दुसरे नाव असते. गेल्या काही वर्षांत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्याराज्यांत जोरदार मुसंडी मारण्यास सुरुवात केली. प्रादेशिकतेच्या नावाखाली कौटुंबिक पक्ष चालविणाऱ्या राजकीय पक्षांच्या विरोघात भाजपने आंदोलन केले. या राजकारणावर प्रादेशिक पक्षांनी जोरदार टीका केली. मोदींच्या भाजपला प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत, असा आरोप होऊ लागला. वस्तुस्थिती अशी आहे, की प्रादेशिक पक्ष नव्हे, तर त्यांच्या बुरख्याआडून फोफावलेली घराणेशाही संपविणे आणि घराणेशाहीच्या कचाट्यातून लोकशाही वाचवून त्यांच्या हाती एकवटलेल्या सत्तेची फळे सामान्यांपर्यंत पोहोचविणे, हा त्या राजकारणाचा गाभा होता.


          समाजातील सर्व क्षेत्रांत घराणेशाही दिसते. डॉक्टरची मुले डॉक्टर होतात, वकिलांची मुले वकिली करतात, अन्य क्षेत्रांतही परंपरागत व्यवसायांत घराणी दिसतात. असे असताना, राजकारणातील घराणेशाहीवरच अधिक टीका होते, असा आक्षेप घेतला जातो; पण अन्य क्षेत्रांतील घराणेशाही सत्ता प्रस्थापित करीत नाही. त्याच क्षेत्रात अन्य अनेकांना वावरण्यास मुभा असते. राजकारणातील घराणेशाही मात्र, अन्य कोणास तेथे शिरकाव करू देत नाही. सत्तेची सूत्रे आपल्या हाती एकवटण्यासाठी कोणतेही घराणे हाती असलेल्या सर्व शक्तीचा वापर करून अन्य सर्वांना अटकाव करू पाहते, तेव्हा अशी घराणेशाही लोकशाहीवरचे संकट ठरते.


          याबाबत पंतप्रधान मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी लातूरजवळील सभेत दिलेले उदाहरण स्पष्ट होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या घराणेशाहीवर जगणाऱ्या पक्षांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिकावे, असा टोला त्यांनी या सभेत मारला. बाळासाहेबांनी सत्तेच्या राजकारणातही ठाकरे या आडनावाचा दरारा निर्माण केला, आपले स्थान निर्माण केले; पण स्वतः कधीही सत्तेत सहभागी न होता, त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना सत्तेचे स्थान दिले. त्यांच्या या कर्तृत्वामुळेच, ठाकरे घराण्यावर राजकीय घराणेशाहीचा ठपका बसला नव्हता. अगदी अलीकडे, मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या आधीच्या पिढ्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला, तेव्हा राज्यातील अनेक जाणत्यांना ठाकरे घराण्यातील बाळासाहेबांपर्यंतच्या पिढ्यांच्या निस्पृह घराणेशाहीचा नक्कीच अभिमान वाटला असेल.


          'माझा बाळ आज मी जनतेच्या हवाली करत आहे,' असे उद्गार शिवसेनेच्या स्थापनाप्रसंगी प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले आणि उपस्थितांनी आनंदाने बाळासाहेबांना नेता म्हणून स्वीकारले. पुढे बाळासाहेबांनी सत्तेत थेट सहभागी न होता, सामान्य शिवसैनिकास अनेक पदांची संधी देत मोठे केले; त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला वलय आले. एका क्षणी बाळासाहेबांनी याच प्रेमाच्या अधिकारातून, एका सभेत उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना सांभाळण्याची साद जनतेला घातली. बाळासाहेबांवरील प्रेमातून जनतेनेही त्यास प्रतिसाद दिला; कारण सत्तेच्या कोणत्याही पदाच्या वाऱ्यासही उभे राहायचे नाही, हा बाळासाहेबांचा पण जनतेस माहीत होता. ठाकरे घराण्याचा राज्याच्या सत्ताकारणावर अंकुश असल्यामुळे, घराणेशाहीतून सत्ता गाजविणाऱ्या प्रस्थापित घराण्यांवरही त्यांचा वचक आहे, हे जनतेस ठाऊक होते. शिवसेनाप्रमुखांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारले, पुत्रास मंत्रिपद दिले आणि आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात घराणेशाहीचे प्रतिबिंब स्पष्ट उमटविणाऱ्यांना महत्त्वाचे स्थान दिले. बाळासाहेब ठाकरे यांनी सत्ताकारणाबाबत पाळलेल्या कटाक्षावर पहिले प्रश्नचिन्ह इथे उमटले.


         गेल्या दोन महिन्यांतील महाराष्ट्राच्या घडामोडी पाहता, घराणेशाहीच्या जोरावर सत्ताकारण गाजवू पाहणाऱ्या प्रस्थापितांना मोठे हादरे बसले. सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होणे, ही बाब घराणेशाहीतून सत्ता गाजविणाऱ्यांच्या पचनी पडलेली नाही, हेही दिसले. भाजप हा विरोधकांना संपवू पाहत असल्याचा कांगावा याच पक्षांचे नेते करत आहेत. प्रत्यक्षात, विरोधी पक्षांची झूल पांघरून सत्तेवर कब्जा मिळवू पाहणाऱ्या घराण्यांची मक्तेदारी संपविण्याच्याच प्रयत्नांचा हा एक भाग आहे. लोकशाहीसमोरील सर्वांत मोठा धोका असलेल्या घराणेशाहीपासून लोकशाही वाचवणे, हे पंतप्रधान मोदी यांचे पहिले ध्येय आहे. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पंतप्रधानांच्या या ध्येयाचा संदेश स्वीकारला आहे. या कार्यकर्त्यांनी लोकशाही घराणेशाहीच्या कचाट्यातून मुक्त केली, तर सामान्य जनताही या प्रयत्नांना दुवा देईल. म्हणूनच, यापुढे सत्ताकारणात जेथे जेथे घराणेशाही बस्तान बसवू पाहील, तेथे तेथे असेच प्रयोग होणार, यात शंका नाही.

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी   महाराष्ट्र टाइम्स, 09 ऑगस्ट 2022)


     केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता 

     

     

     

  • You might also like

    No comments:

    Post a Comment