केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच मुंबई दौरा
केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शिवसेनेबाबतची आपली भूमिका स्वच्छ शब्दांत मांडली.
‘ज्या शिवसेनेने २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाला दगा दिला त्या उद्धव ठाकरे यांच्या शिल्लकसेनेला क्षमा नाही’, अशा
अत्यंत स्पष्ट शब्दांत शहा यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. शहा यांच्या या
वक्तव्याला अनेक अर्थानी महत्त्व आहे. शिवसेना नेतृत्वाने त्या वेळी भाजप
नेतृत्वाने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द न पाळल्याने आम्ही युतीतून
बाहेर पडलो, अशी लोणकढी थाप मारली होती. पुढे
त्यांनी भारतीय जनता पक्षाशी दगाबाजी करत काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन
केले. शिवसेनेच्या नेतृत्वाने थातूरमातूर स्पष्टीकरण देत, त्या वेळी भाजपचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या अमित शहा यांच्या
उपस्थितीत मातोश्रीवर झालेल्या कथित बैठकीचा दाखला दिला होता. असा कोणताही शब्द
भाजप नेतृत्वाने शिवसेनेला दिला नव्हता, हे
शहा यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले होते.
एवढी मोठी दगाबाजी करूनही
शिवसेना नेतृत्वाचे समाधान झाले नाही. राज्यातील सत्तेचा गैरवापर करून शिवसेनेच्या
नेतृत्वाने भाजप नेत्यांवर,
कार्यकर्त्यांवर खोटे
गुन्हे दाखल करत सूडबुद्धीचे विकृत प्रदर्शन घडविले. अशा शिवसेना नेतृत्वाचा
यापुढील काळात थेट मुकाबला करण्याची भूमिका शहा यांनी मांडली. अपेक्षेप्रमाणे
शिवसेना नेतृत्वाला हे आव्हान पेलता आले नाही. आजवर भाजप नेतृत्वाने युती
टिकवण्यासाठी अनेकदा एक पाऊल मागे घेतले आहे, हे
विसरून शिवसेनेच्या नेतृत्वाने सत्तेसाठी दगाबाजी केली. भाजप नेतृत्वाने दगाबाजी
विसरून आपल्याशी पुन्हा मैत्री करावी, अशी
सेनेच्या नेतृत्वाची अपेक्षा असावी. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने १९८९ पासून
हिंदूत्वाची व्यापक भूमिका लक्षात घेऊन शिवसेनेबरोबरच्या जागावाटपात अनेकदा पडती
भूमिका घेतली. यानिमित्ताने भाजप-शिवसेना मैत्रीच्या इतिहासाचा आढावा घेणे
क्रमप्राप्त ठरते.
१९८४ च्या लोकसभा
निवडणुकीसाठी झालेली भाजप-सेनेची युती अल्पायुषी ठरली. १९८९ मध्ये भाजप आणि
शिवसेनेच्या नेतृत्वाने हिंदूत्वाच्या आधारावर युतीची घोषणा केली. त्या वेळी
लोकसभेच्या जागावाटपात भाजप मोठा भाऊ तर विधानसभेच्या जागावाटपात शिवसेना मोठा भाऊ
असे सोपे सूत्र ठरले. गेल्या काही वर्षांत उद्धव ठाकरे युतीत आम्ही सडलो, असे वक्तव्य वारंवार करत होते. सोयीचा इतिहास सांगणे, निवडक तपशील विसरणे, काही
बाबतीत रेटून खोटे बोलणे अशा तीन गोष्टी उद्धव ठाकरे यांनी अलीकडे आत्मसात केल्या
आहेत. जे निवडक विसरण्याची पद्धत आहे त्यासाठी आठवण करून देतो की तुमचा पक्ष
जन्माला येण्याआधी मुंबईत आमचे नगरसेवक होते, आमदारही
होते. १९८४ मध्ये लोकसभेची निवडणूक शिवसेनेने भाजपच्या चिन्हावर लढवली होती, शिवसेनेच्या नाही. मनोहर जोशी, जे नंतर मुख्यमंत्री झाले ते १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत
भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले होते. याच निवडणुकीत वामनराव महाडिकही भाजपच्या
चिन्हावरच लढले होते. भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ मध्ये झाली. शिवसेनेचा जन्म
होण्याच्या १५ वर्षे आधी जनसंघ राजकारणात आला होता.
१९८० मध्ये जनता पक्षात
फूट पडल्यानंतर भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. १९५१ ते १९७५ या काळात जनसंघ
देशात किती वाढला, १९८० नंतर भाजप किती वाढला आणि
शिवसेना १९६६ पासून आजपर्यंत राज्यात किती वाढली याचा शोध माजी मुख्यमंत्री आणि
त्यांच्या सल्लागारांनी घेण्यास हरकत नाही. भाजपशी युती होईपर्यंत शिवसेनेला मुंबई, ठाण्याखेरीज औरंगाबादचा अपवाद वगळला तर इतर कुठेही ओळख
मिळाली नव्हती. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार रामभाऊ म्हाळगी यांच्या निधनामुळे
१९८२ मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीत शिवसेनेने
काँग्रेसच्या उमेदवाराला पािठबा दिला होता. मात्र भारतीय जनता पक्षाचे जगन्नाथ
पाटील हे त्या निवडणुकीत निवडून आले होते. शिवसेनेची मदत नसतानाही भाजपने ठाण्याची
जागा जिंकून दाखविली होती,
हे आज मुद्दाम
सांगावेसे वाटते आहे. राजकारणात युती, आघाडी
अपरिहार्य असते. अशा आघाडय़ांचे, युतीचे
बरे-वाईट परिणाम दोन्ही पक्षांना भोगावे लागतात. युती, आघाडीमधून फक्त फायदाच मिळावा, वाटा फक्त आपल्याला मिळावा, घाटा
मित्राला व्हावा अशा अपेक्षेने उद्धव ठाकरे युतीकडे पाहतात, त्यामुळेच ते ‘आम्ही सडलो’ अशी भाषा वापरत असावेत.
१९९० मध्ये
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात पुण्यातील
शिवाजीनगर मतदारसंघ भाजप नेतृत्वाकडे मागितला. पुणे जिल्ह्यातून शिवसेनेचा एक तरी
आमदार निवडून यावा अशी बाळासाहेबांची इच्छा होती. त्याआधी शिवाजीनगर मतदारसंघातून
भाजपचे उमेदवार अण्णा जोशी यांनी १९८० आणि १९८५ अशा सलग दोन निवडणुकांत विजय मिळवला
होता. भाजपच्या हक्काच्या मतदारांची मोठी संख्या असलेला हा मतदारसंघ भाजप
नेतृत्वाने युती टिकवण्याचा व्यापक विचार डोळय़ांपुढे ठेवून शिवसेनेला दिला. २०१४
पर्यंत हा मतदारसंघ सेनेकडे होता. २०१४ मध्ये युती तुटल्यानंतर स्वतंत्रपणे लढावे
लागल्यावर भाजपने हा मतदारसंघ जिंकला. १९८२ मध्ये शिवसेना विरोधात असताना जिंकलेला
ठाणे लोकसभा मतदारसंघ १९९६ मध्ये सेनेच्या नेतृत्वाने मागून घेतला. भाजप
नेतृत्वाने हा हक्काचा मतदारसंघही शिवसेनेला दिला. तीच गोष्ट नाशिकची. हा लोकसभा
मतदारसंघही बाळासाहेब ठाकरेंच्या विनंतीमुळे भाजपच्या नेतृत्वाने शिवसेनेसाठी
सोडला. विधानसभेच्या १७१ जागा शिवसेनेकडे तर ११७ जागा भाजपकडे असे सूत्र ठरले
होते. १९९९ पासून १७१ जागा लढविताना विजय मिळणाऱ्या सेनेच्या जागांचे प्रमाण कमी
होत गेले. २००९ मध्ये सेनेला ४५ तर भाजपला ४६ जागा मिळाल्या होत्या. २०१४ मध्ये विधानसभा
निवडणुकीवेळी केवळ दोन जागांसाठी युती तोडणाऱ्या शिवसेनेच्या नेतृत्वाने आपली
राज्यातील ताकद कमी होत आहे, याचे
भान ठेवण्याचे सौजन्य दाखविले नाही. तरीही भाजप नेतृत्वाने समजूतदारपणा दाखवत २०१९
मध्ये शिवसेनेशी पुन्हा जमवून घेतले. पण ते भाजप नेतृत्वाला किती महागात पडले हे
महाराष्ट्राने अनुभवले आहे. राजकारणात नेहमीच विश्वासार्हतेला महत्त्व असते.
भारतीय जनसंघाने १९६७ मध्ये अकाली दलाशी युती केली. अकाली दलाने युती तोडेपर्यंत, म्हणजेच २०२० पर्यंत ती अभेद्य होती. २०२० च्या बिहार
विधानसभा निवडणुकीत नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलापेक्षा भाजपला अधिक जागा
मिळूनही भाजप नेतृत्वाने मुख्यमंत्रीपद नितीशकुमारांना दिले. तरीही त्यांनी भाजपची
साथ सोडली हा भाग निराळा. २००७ मध्ये कुमारस्वामींनी भाजपला दगा देत कर्नाटकचे
मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार दिला होता. भारतीय जनता पक्षाने आजवर मित्रपक्षाचा
असा घात केल्याचे एक तरी उदाहरण दाखवावे. हातातोंडाशी आलेली सत्ता हिरावून
घेणाऱ्या आणि नंतर सत्तेचा वापर करून भाजप नेत्यांमागे कारवाईचे सूडचक्र
लावणाऱ्यांशी त्याच पद्धतीने रणांगणात लढले पाहिजे, याबाबतचा
संभ्रम दूर करण्यासाठी अमित शहा यांनी नि:संदिग्ध भाषेत पक्षाची भूमिका स्पष्ट
केली आहे.
जाता जाता – २०१४ मध्ये
एकटे लढून विधानसभेच्या निवडणुकीत मुंबईत भाजपने शिवसेनेपेक्षा एक जागा अधिक (१५)
मिळवली होती. २०१७ च्या मुंबई पालिका निवडणुकीत भाजपने एकटय़ाने लढत ८२ जागा
मिळवल्या होत्या, (शिवसेनेपेक्षा फक्त चार कमी) हे
उद्धव ठाकरे यांनी विसरू नये.
(लेखांची पूर्वप्रसिद्धी लोकसत्ता
– १३ सप्टेंबर २०२२)
केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता
No comments:
Post a Comment