• अशा उधार उसनवारीतून संसार किती काळ चालेल?

     


    वाडवडिलांनी आपल्या कष्टाद्वारे नावारूपाला आणलेला व्यवसाय ऐतखाऊ वारसदार काही दिवसांतच डुबवतो. काही दिवस शिल्लक मालमत्ता विकून, हवेलीची खांड, दांड विकून, सोनं - नाणं मोडून, शेतातली झाडं विकून, पुढं शेतीही विकून ऐतखाऊ दिवस काढतो. सगळं संपलं की मग उधार उसनवारीवर काही दिवस ढकलतो. बाजारातली पत संपली की, त्याचे खायचे प्यायचेही वांदे होतात. आपल्या कर्तृत्वाने खात्या पित्या घराचे दिवाळे काढणाऱ्या खुशालचेंडू, दिवट्यांप्रमाणे काँग्रेस आणि शिवसेनेच्या युवराजांची अवस्था झाली आहे.


             एकेकाळी संपूर्ण देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसला, तर अनेक वर्षे मुंबईवर ताबा ठेवणाऱ्या शिवसेनेला आपल्या कार्यक्रमांसाठी गर्दी जमविण्याकरिता एकमेकांची मदत घेण्याची वेळ आली आहे. उघड्यापाशी नागडं गेलं, थंडीनं कुडकुडलं, अशी म्हण आहे. या म्हणीची यथार्थता पेंग्विन सेना आणि काँग्रेस यांनी एकमेकांना धाडलेल्या आवतनातून पटते. काँग्रेसच्या युवराजांनी भारत जोडो नामक यात्रा काढली आहे. त्या यात्रेला आजवर मिळालेला "प्रचंड" प्रतिसाद पाहून युवराजांच्या चेल्या चपाट्यांनी महाराष्ट्रात यात्रा आल्यावर गोळा करण्यासाठी नामी शक्कल सुचवली आहे. तुम्ही आमच्या युवराजांच्या यात्रेला माणसं पाठवा, आम्ही तुम्हाला दसरा मेळाव्याला माणसं पाठवून मदत करू. व्यापार -व्यवसायात "बार्टर" नामक व्यवहार असतो तसाच काहीसा हा व्यवहार आहे असं म्हणायला हरकत नाही.

    खिशात जनसामान्यांच्या विश्वासाची दमडी राहिली नसल्यानं काँग्रेस आणि पेंग्विन सेनेला बार्टरच्या आश्रयाला जाण्याची वेळ आली आहे. ही वेळ आपापल्या कर्माने दोघांनी ओढवून घेतली आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी करताना काय काय झेललं आहे, याची साक्ष देणारे मोजके शिवसैनिक सध्या हयात असतील. छगनराव भुजबळही वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेच्या वाढीसाठी केलेले प्रयत्न सांगू शकतील. तशी बुद्धीही "सरस्वती" ने त्यांना दिली आहे. असो. लाठ्या,काठ्या झेलत शेकडो शिवसैनिकांनी ही संघटना बांधली.

     

              मुंबापुरीतील सामान्य मराठी माणसावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात शिवसैनिक पेटून उठत. संघटना बांधण्यासाठी शाखा (म्हणजे शिवसेनेचे कार्यालय) पद्धतीचा अवलंब केला गेला. शिवसेनेची शाखा म्हणजे अडल्या नाडल्या, गांजलेल्या, व्यवस्थेने पिडलेल्या गोरगरीब मराठी माणसाचे हक्काचा आधार असे. शाखाप्रमुख हा संघटनेचा कणा होता. वामनराव महाडिक, दत्ताजी नलावडे, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी, दत्ताजी साळवी, सतीश प्रधान असे एक ना अनेक नेते, कार्यकर्ते शिवसेनेसाठी, बाळासाहेबांसाठी छातीचा कोट करून उभे राहण्यासाठी एका पायावर तयार असत.

     

    वंदनीय बाळासाहेबांचे निवासस्थान लढवय्या शिवसैनिकांसाठी हक्काचे आश्रयस्थान होते. राजकीय कार्यक्रमाबरोबरच बाळासाहेबांनी, मीनाताईंनी कमालीच्या आपुलकीने, अकृत्रिम स्नेहाच्या बळावर जोडलेल्या शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे शिवसेना नावारूपाला आली. कधी काळी मुंबई - ठाण्यापुरती मर्यादित असलेली सेना पाहता पाहता राज्यव्यापी झाली, राज्याची सत्ताही ताब्यात घेण्याएवढी बलशाली बनली. अशा या संघटनेची सूत्रे आपल्या हातात घेताना बाळासाहेबांच्या वारसदाराने वर्षानुवर्षे जपलेली शाखाप्रमुख, शाखा ही साखळीच मोडून काढली. कार्यकर्त्यांना भेटण्याच्या प्रथाही बंद झाल्या. आपल्याच हाताने शिवसेना नामक बहरलेल्या डेरेदार वृक्षावर करवत चालवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर आज ही अवस्था ओढवली आहे. भारतीय जनता पार्टी बरोबर असलेली हिंदुत्वाची युती तोडून हिंदुत्वाचा द्वेष करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आघाडी करून सत्ता पदरात पाडून घेताना यांनी शिवसेनेची केलेली फरपट कट्टर शिवसैनिकांनी अनुभवली आहे. १९९५ साली युतीचे मुख्यमंत्रीपद असताना शिवसेनेत असलेला जोश आणि गेल्या ३ वर्षांत मुख्यमंत्रीपद असताना उत्साह, जोश हरवलेले सैनिक यांच्यातील फरक बोलका आहे.


             काँग्रेसच्या युवराजांबद्दल काय बोलावे ? असा "नग" शोधूनही सापडणार नाही. आपल्याच पक्षाच्या पंतप्रधानाने काढलेला अध्यादेश पत्रकार परिषदेत टराटरा फाडून टाकणाऱ्या या चिरंजीवांनी काँग्रेसची उरली सुरलीही घालवून टाकली. राजीव गांधींचे राजकीय आकलन त्यांच्या मातोश्रीच्या तुलनेत खुपच कमी होते. मात्र त्यांच्या व्हिजनबद्दल कुणी शंका घेत नव्हते. युवराज आपल्या अकलेचे तारे तोडून मनोरंजनाचा कार्यक्रम अखंड चालवीत आहेत. गुलाम नबी आझाद सारखा नेता काँग्रेस मधून बाहेर पडला तो युवराजांना वैतागूनच. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वडिलांपासून चव्हाण - नेहरू- गांधी कुटुंबाचा स्नेह होता. अशा कुटुंबातील पृथ्वीराज चव्हाण राहुल गांधी अध्यक्ष नकोत, असे म्हणतो त्यावेळी त्यांना युवराज किती गुणाचा आहे हे लक्षात आले असेलच ना. अशा युवराजांना यात्रेसाठी गर्दी जमवावीच लागणार. एकमेकांना मदतीचा हात देऊन हे दोघे आपली लाज वाचविण्यापुरती गर्दी जमवतीलही.अशी उसनवारी करून दोन चार दिवस निघतील. मात्र त्यापुढे काय ? पण एवढा विचार करण्याची क्षमता दोघांकडेही नसल्याने त्यांना त्याचेही काही वाटणार नाही.

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी – महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, ४ ऑक्टोबर २०२२)

    केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment