-
कुपोषणाच्या शास्त्रशुद्ध मोजमापासाठी मुले आणि
बालकांचे वजन, उंची मोजणे आवश्यक असते. मात्र तसे न करता
दूरध्वनीवर दिलेल्या उत्तरांच्या आधारे निर्देशांक निश्चित करणे अनाकलनीय म्हणावे
लागेल.
जागतिक भूक निर्देशांकाच्या प्रसिद्ध झालेल्या
यादीमुळे मोदी सरकार आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधकांनी नेहमीप्रमाणे अपुऱ्या
माहितीच्या आधारावर अपप्रचार सुरु केला. अनेक माध्यमातून, अनेक पद्धतीने मोदी सरकारला आणि भारतीय जनता पार्टीला बदनाम
करण्याचा विडा उचललेल्या मंडळींनी थयथयाट करणे सुरु केले. हा निर्देशांक निश्चित
करण्यासाठी वापरलेली पद्धत, या पद्धतीचे
निकष याचा साकल्याने विचार करून त्या आधारे निष्कर्ष काढण्याऐवजी त्रोटक माहितीचा
वापर करून त्याच्या आधारावर मोदी सरकार आणि भारतीय जनता पार्टी बद्दलचा विखार, आकस व्यक्त करण्याची स्पर्धाच लागल्याचे चित्र दिसले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सशक्त, समृद्ध
राष्ट्र म्हणून उदयास येत असलेल्या भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी अनेक शक्ती
कार्यरत आहेत. त्या शक्तींनी अहवालातील निष्कर्ष आपल्या सोयीने वापरत मोदी सरकारला
बदनाम करण्याची आपली हौस भागवून घेतली. हा अहवाल तयार करताना वापरण्यात आलेली
कार्यपद्धती सदोष असल्याने त्या आधारे तयार होणारा अहवाल वास्तव आणि तथ्यांशी
फारकत घेणारा असणार हे अपेक्षितच होते. या सर्वेक्षणासाठी ८ प्रश्न विचारले जातात
आणि ३ हजार प्रतिसाद कर्त्यांच्या उत्तराच्या आधारावर कुपोषणाच्या शास्त्रशुद्ध
मोजमापासाठी मुले आणि बालकांचे वजन, उंची मोजणे
आवश्यक असते. मात्र तसे न करता दूरध्वनीवर दिलेल्या उत्तरांच्या आधारे निर्देशांक
निश्चित करणे अनाकलनीय म्हणावे लागेल.
कोरोना संकट काळात देशातील मजूर, कष्टकरी, कामगार, छोटे व्यावसायिक, विक्रेते या
मोठ्या वर्गावर उपासमारीचे संकट उभे राहिले होते. कोरोना प्रसाराला अटकाव
करण्यासाठी टाळेबंदी जाहीर करणे अपरिहार्य होते. टाळेबंदीमध्ये हातावर पोट
असणाऱ्या मंडळीच्या पोटावर पाय आला त्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या
वर्गाला डोळ्यापुढे ठेवत केंद्र सरकार तर्फे गरीब कल्याण अन्न योजना सुरु केली.
हातावर पोट असणाऱ्यांना स्वस्त धान्य दुकानांच्या यंत्रणांद्वारे दर महा ५ किलो
गहू, तांदूळ, डाळी मोफत
देण्याच्या या योजनेने गोर-गरीब, वंचित
वर्गाला उपासमारी पासून रोखले. मोदी सरकारच्या या योजनेची दखल जागतिक बँकेनेही
घेतली. विरोधी पक्षातील अनेक मंडळी नोटा छापा आणि रोख रकमेचे अर्थसहाय्य द्या, अशी मागणी उच्चरवाने करीत होती. मोदी सरकारने या पद्धतीने
वंचित, उपेक्षित वर्गाला सहाय्य देण्याऐवजी त्यांच्या
पोटाला अन्न देण्यास प्रधान्य दिले. नोटा छापून अर्थसहाय्य करणाऱ्या काही देशांची
अर्थव्यवस्था आता चांगलीच अडचणीत आली आहे, हा वेगळा भाग तो स्वतंत्र लेखाचा विषय होईल. चुकीच्या
निकषांवर तयार करण्यात आलेला निर्देशांक हा भारताला बदनाम करण्याच्या खेळीचाच एक
भाग आहे. जनतेची अन्य सुरक्षेची आणि पोषण विषयक गरज मोदी सरकार कडून पूर्ण होत
असताना, गरीब कल्याण अन्न योजनेसारखी योजना ८० कोटी
जनतेसाठी उपकारक ठरली असताना त्याकडे दुर्लक्ष करणारा हा अहवाल भारतातील स्थितीचे
वास्तव चित्र प्रकट करत नाही. निर्देशांक निश्चित करताना कुपोषण, मुलांची/बालकांची कमी वाढ, अल्प पोषण आणि बाल मृत्यू असे चार निकष लावले जातात. यापैकी
कमी वजन आणि बाल मृत्यू हे घटक थेट भुकेशी संबंधित नाहीत. अनुवंशिकता, वातावरण, स्वच्छता आदी
घटक कमी वजन आणि बाल मृत्यूशी संबंधित आहेत. देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये
कुपोषितांची संख्या किती आहे. ५ वर्षाखालील वयोगटातील मुलांमध्ये उंची न वाढण्याचे
प्रमाण किती आहे. याच वयोगटातील मुलांचा मृत्युदर किती आहे आणि या मुलांचा योग्य
पद्धतीने शारीरिक विकास न होण्याची समस्या किती प्रमाणात आहे. हे निकष लावताना
त्याचे मापन करण्याची पद्धती शास्त्रीय असणे आवश्यक आहे.
ज्या ४ निकषांच्या आधारे हा निर्देशांक तयार होतो
त्यातील बाल मृत्यू आणि उंची न वाढण्याची समस्या या निकषांचा विचार केला तर
भारतातील या संदर्भातील परिस्थिती सातत्याने सुधारते आहे असे आढळून आले आहे. केवळ
३ हजार लोकांचे दूरध्वनीवर मत विचारून घेऊन हा अहवाल तयार केला गेला आहे. भारताची
विशाल लोकसंख्या लक्षात घेता या सर्वेक्षणासाठी ३ हजार मुलाखतीचे नमुने अपुरे
ठरतील याचे भान सर्वेक्षण करणाऱ्या यंत्रणेने बाळगलेले दिसत नाही. या निर्देशांकात
भारताच्या पुढे नेपाळ आणि पाकिस्तानचा क्रमांक आहे हे वाचून आश्चर्याचा धक्का
बसल्यावाचून राहत नाही. पाकिस्तानमधील सामान्य जनतेच्या विदारक स्थितीच्या बातम्या
वारंवार झळकतात. असे असताना या गरीब पाकिस्तानकडे एवढ अन्न-धान्य कुठून आलं असा
प्रश्न कुणाच्याही मनात येऊ शकेल. नेपाळचीही तीच स्थिती आहे. या दोन देशांना
भारतापेक्षा चांगली क्रमवारी कोणत्या निकषावर मिळाली असेल असा सवाल विचारणे
अस्थानी ठरणार नाही. पाकिस्तानमध्ये नैसर्गिक आपत्ती आल्यास त्या देशाकडून
भारताकडे मदतीची याचना केली जाते. गत काळात नेपाळमध्ये झालेल्या नैसर्गिक
आपत्तीवेळी भारतानेच आपल्या या शेजाऱ्याला सहकार्य केले होते. या पार्श्वभूमीवर
जागतिक भूक निर्देशांकात नेपाळ आणि पाकिस्तान भारतापेक्षा पुढे आहेत, या अहवालातील निष्कर्षावर विश्वास ठेवणे अवघड जाते. केंद्र
सरकारकडून अन्न-धान्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. मोदी सरकारने तर
अन्न-धान्याची आजवरची विक्रमी खरेदी केली आहे. कोरोना काळात सुरु केलेली पंतप्रधान
गरीब कल्याण अन्न योजना मोदी सरकारने अजूनही चालू ठेवलेली आहे. पाकिस्तान, नेपाळ या देशांच्या सरकारकडे अशा योजना राबवण्यासाठी निधी
असेल अशी सूतराम शक्यता नाही. जागतिक भूक निर्देशांक ठरविण्यासाठी जे निकष
वापरण्यात आले होते ते निकष अयोग्य असल्याचे स्पष्ट मत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल
रिसर्चने नोंदविले आहे. प्रत्येक देशातील परिस्थिती, लोकांच्या खाण्याच्या सवयी, हवामान वेगवेगळे असते. त्यामुळे भूक निर्देशांक ठरविण्यासाठी
प्रत्येक देशाचे स्वतंत्र निकष असले पाहिजेत. या अहवालात पंतप्रधान गरीब कल्याण
अन्न योजनेकडे करण्यात आलेले दुर्लक्ष आश्चर्यकारक आहे. आपल्या देशातील
लोकसंख्येला अन्न-धान्याचा पुरवठा करण्यास भारत समर्थ ठरत नाही. हे दाखवण्याचा
खटाटोप या सारख्या अहवालातून होतो. भूकेच्या विषयातही या पद्धतीचे राजकारण व्हावे
यासारखे दुर्दैव ते कोणते?
(लेखाची पूर्वप्रसिद्धी – महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, २४ ऑक्टोबर २०२२)
केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता
वस्तूस्थिती दडवणारा भूक निर्देशांक
Keshav Upadhye
October 24, 2022
No comments:
Post a Comment