• महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणारी निवडणूक


    यावेळची विधानसभा निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरणारी आहे. 'देशात सर्वाधिक प्रगत राज्य' असा लौकिक मिळवलेल्या महाराष्ट्राचे भवितव्य या निवडणुकीत ठरले जाईल, असे सध्याचे एकंदरीत चित्र आहे. महाविकास आघाडीचा अडीच वर्षांचा कारभार आणि सत्ता गेल्यानंतरच्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीने विविध मुद्द्यांवर घेतलेल्या भूमिका, त्याचे होऊ शकणारे दूरगामी परिणाम, राज्याची सामाजिक-धार्मिक वीण उसवणाऱ्या शक्तींना महाविकास आघाडीकडून मिळणारे पाठबळ अशी पार्श्‍वभूमी यावेळच्या निवडणुकीला आहे. म्हणूनच ही निवडणूक महाराष्ट्राचे भवितव्य ठरविणारे आहे, असे म्हणावे लागते.



    राज्यभर दिवाळीची धामधूम सुरू असताना राज्यात घडलेल्या काही घटना आणि महाविकास आघाडीकडून विशेषत: उद्धव ठाकरे यांच्याकडून व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया पाहिल्यावर महाराष्ट्राचा धार्मिक सलोखा मतांसाठी नष्ट करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न चालू आहेत, असे म्हणावेसे वाटते. मुंबई परिसरातील एका गृह प्रकल्पामध्ये दिवाळी साजरी करण्यास प्रतिबंध करण्याचा प्रयत्न झाला. काही दिवसांपूर्वी रत्नागिरी येथे विजयादशमीच्या निमित्ताने निघालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन अडवण्याचा प्रयत्न झाला. लोकसभा निवडणुकीतील ‘वोट जिहाद’ला मिळालेल्या यशामुळे उन्मत्त झालेल्या धर्मांध शक्तींची हिंमत सातत्याने वाढू लागली आहे. वर उल्लेख केलेल्या दोन्ही घटनांतील संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. या दोन्ही घटनांबाबत उबाठा गटाचे प्रमुख यांनी निषेधाचा एक शब्द काढण्याची हिंमत दाखवलेली नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी १९८०च्या दशकात पाकिस्तान जिंकल्यावर भेंडीबाजारात फटाके उडवणाऱ्या शक्तींवर कठोर टीका करत आपल्या प्रखर राष्ट्रवादी विचारसरणीचे दर्शन घडवले होते. उबाठा गटाचे प्रमुख यांनी आपल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारसरणीला केव्हाच तिलांजली दिली आहे. पण वंदनीय बाळासाहेबांनी वाढविलेल्या शिवसेनेला त्याच धर्मांध शक्तींच्या दावणीला बांधण्याचे पातक उबाठा गटाचे प्रमुख करत आहेत. दिवाळी साजरी करण्यास प्रतिबंध करणाऱ्या शक्तींना वंदनीय बाळासाहेबांनी कृतीतून अद्दल घडविली असती. निवडणुकीत विजय मिळवायचा असेल, तर आपल्याला मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मते आवश्यक आहेत, अशी समजूत करून घेऊन उबाठा गटाचे प्रमुख यांनी या समाजातील धर्मांध शक्तींपुढे लोटांगण घातले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम समाजातील मंडळींना सेना भवनावर बोलावून त्यांच्याकडे मतांची याचना केली होती. पूर्वी झालेले विसरून मुस्लिमांनी आम्हाला साथ द्यावी, असे साकडे या धर्मातील निवडक प्रमुख मंडळींना उद्धव ठाकरेंनी घातले होते. काँग्रेस आणि शरद पवार यांच्याकडून धर्मांध शक्तींविरोधात भूमिका घेण्याची अपेक्षा कोणालाच नाही; मात्र काँग्रेस आणि शरद पवार यांनी मुस्लिम समुदायाची आजवर केली नसेल एवढी हुजरेगिरी उबाठा गटाचे प्रमुख करत आहेत.

    १९९२ मध्ये झालेल्या मुंबई दंगलीत वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसेनेने घेतलेली भूमिका महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला ठाऊक आहे. धर्मांध शक्तीचा अनुनय केल्याचे अनेक घातक परिणाम देश भोगत आहे. तरीही फक्त मतांच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादाच्या विचारांपासून फारकत घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारचा अडीच वर्षांचा कारभार महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरला. राज्यकारभाराची माहिती नसल्याने आणि मुळात विकासाची दृष्टीच नसल्याने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी असताना केलेल्या बेपर्वाईमुळे सॅफरन, टाटा एअरबससारखे प्रकल्प महाराष्ट्रातून अन्य राज्यात स्थलांतरित झाले. मोठमोठे प्रकल्प आल्याशिवाय राज्याच्या विकासाला गती येत नाही, हे लक्षात आल्यामुळे प्रत्येक राज्यातील सरकार आपल्या राज्यामध्ये औद्योगिक गुंतवणूक व्हावी, यासाठी जोरदार प्रयत्न करत असते. आपल्या राज्यात उद्योग यावा यासाठी देशातील आणि विदेशातील कंपन्यांना पायघड्या घातल्या जातात. जमीन, पाणी, वीज यात अनेक सवलती देऊन औद्योगिक गुंतवणूक आपल्याकडे खेचण्याचे जोरदार प्रयत्न विविध राज्य सरकारांकडून होत असतात. त्यासाठी राज्याच्या प्रमुखाला म्हणजे मुख्यमंत्र्याला जातीने लक्ष घालावे लागते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मोठमोठे प्रकल्प महाराष्ट्रातून अन्य राज्यांमध्ये स्थलांतरित झाले. हे प्रकल्प महाराष्ट्रात राहावेत, यासाठी उद्धव ठाकरे यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षं चाललेल्या सरकारचे पितृत्व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे होते; मात्र शरद पवार यांनीही उद्धव ठाकरे यांच्या कारभाराला आळा घालण्याचे, उद्धव ठाकरेंना समजुतीचे चार शब्द सांगण्याचे प्रयत्न केले नाहीत. अडीच वर्षांत मंत्रालयात दोन-तीन वेळाच आलेल्या मुख्यमंत्री ठाकरेंबद्दल शरद पवार यांनी आपल्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्र पुस्तकात सौम्य शब्दात नापसंती व्यक्त केली आहे.

    काँग्रेसने कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत मतदारांवर आश्‍वासनांचा पाऊस पाडला होता. या आश्‍वासनांना भुलून या राज्यातील मतदारांनी काँग्रेसला सत्ता दिली; मात्र सत्तेत आल्यानंतर काँग्रेसला एकही आश्‍वासन पूर्ण करता आले नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मत द्या आणि दरमहा ८ हजार रुपये भत्ता मिळवा, असे आश्‍वासन काँग्रेसने गोरगरीब महिलांना दिले होते. त्यासाठी महिलांकडून फॉर्मही भरून घेतले होते. संविधानात बदलसारखा खोटा प्रचार, लबाड आश्‍वासने, धर्मांध शक्तींपुढे लोटांगण अशी काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची नीती आहे. मतदारराजाला संविधानात बदलसारख्या खोट्या प्रचारामागील वास्तव कळाले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील मतदार उद्धव ठाकरे-काँग्रेस आणि शरद पवारांच्या आघाडीला सत्तेच्या जवळपासही फिरकू देणार नाही, असा विश्‍वास आहे.

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी –नवशक्ती,०५ नोव्हेंबर २०२४)

    केशव उपाध्येमुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment