• काँग्रेसचा ‘सोरोसा’ यसिस

     

    संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आणून संसदेत देशापुढील प्रश्‍नांची, समस्यांची चर्चाच होऊ न देण्याचे धोरण काँग्रेसने गेल्या दहा वर्षांत अवलंबले आहे. देशाच्या सत्तेचा मक्ता फक्त आणि फक्त आपल्याकडेच आहे, या काँग्रेसच्या समजुतीला मतदारांनी दिलेल्या धक्क्यातून काँग्रेसचे नेतृत्व अजून सावरलेले नाही. सलग तीनवेळा मतदारांनी नाकारल्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाने त्यातून थोडे तरी शिकायला हवे होते.

    मतदारांनी नाकारल्याचा राग काँग्रेसचे संसद सदस्य संसदेच्या कामकाजावर काढत आहेत. यावेळच्या हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी विरोधकांनी गोंधळ घातल्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वपक्षीय सदस्यांची बैठक बोलावून संसद कामकाज शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन विरोधकांना केले होते. ते आवाहन विरोधकांनी काही काळ स्वीकारले आणि विरोधक पुन्हा आपल्या मूळ पदावर आले. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जॉर्ज सोरोस या अमेरिकेतील उद्योगपतीचे काँग्रेस नेतृत्वाबरोबरचे लागेबांधे उघड करत यासंदर्भात काँग्रेसने खुलासा करावा, अशी मागणी केली. नड्डा यांच्या मागणीनंतर काँग्रेसच्या नेतृत्वाची वाचाच बसली. त्यातून बचाव करण्यासाठी काँग्रेस नेतृत्व पुन्हा संसद कामकाज बंद पाडण्याच्या जुन्याच खेळावर उतरले आहे.

    जॉर्ज सोरोस या अमेरिकतील अब्जाधीश उद्योगपतीचे नाव गेल्या काही वर्षांपासून भारतविरोधी वक्तव्यांमुळे जगभर गाजते आहे. भारतातील घडामोडींवरून भारत हा मुस्लिमविरोधी देश बनत असल्याचे संतापजनक वक्तव्य सोरोस यांनी केले होते. बांगलादेश, पाकिस्तान यासारख्या देशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत हे सोरोस महाशय चकार शब्दही काढत नाहीत. याच सोरोस महाशयांनी मोदी सरकार अस्थिर करण्यासाठी एक बिलियन डॉलर एवढी रक्कम खर्च करण्याची तयारी जाहीरपणे दर्शविली होती. बांगलादेशमध्ये अलीकडे झालेल्या घडामोडींनंतर हिंदूंच्या सामूहिक कत्तली करण्यात आल्या. हिंदूंची घरेदारे जाळण्यात आली. सोरोस आणि पाश्‍चिमात्य जगतातील एकाही विचारवंताने, उद्योगपतीने, राजकीय नेत्याने, पत्रकाराने बांगलादेशमधील हिंदूंवरील हिंसाचाराचा साधा निषेधही केला नाही. भारताला सहिष्णूतेचे धडे देणारे विदेशी विचारवंत बांगलादेश आणि पाकिस्तानला तिथल्या हिंदूंचे रक्षण करा, असे सांगण्याचे धाडस करत नाहीत. असो. मुद्दा होता सोरोस यांच्या भारतविरोधी भूमिकेचा. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची या ना त्या कारणाने बदनामी करणे हा एकमेव कार्यक्रम घेऊन जॉर्ज सोरोस जगभर वावरत असतात. ‘फोरम ऑफ डेमोक्रॅटिक लीडर्स इन एशिया पॅसिफिक’ नामक संस्थेला जॉर्ज सोरोस यांच्या फाऊंडेशनकडून अर्थसहाय्य केले जाते. ही संस्था आशिया खंडातील विविध घडामोडींविषयी सातत्याने भाष्य करत असते. श्रीमती सोनिया गांधी या संस्थेच्या सहअध्यक्षा आहेत. या संस्थेकडून काश्मीरला स्वातंत्र्य मिळवून देण्याची भाषाही केली जाते. सोरोस यांच्या भारतविरोधी कार्यक्रमाचा भाग म्हणून या संस्थेकडून काश्मीरच्या स्वातंत्र्याला समर्थन दिले जाते. या संस्थेच्या सहअध्यक्षा असलेल्या सोनिया गांधी यांनी या संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या भारतविरोधी वक्तव्यांबद्दल चुकूनही नापसंती व्यक्त केलेली नाही. स्वातंत्र्यानंतर हिंसाचारामुळे अनेक वर्षे धगधगत असलेले काश्मीर गेल्या काही वर्षांत शांत होऊ लागले आहे. अनेक देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत काश्मीरमध्ये शांततेत मतदान झाले. अतिरेक्यांच्या धमक्यांना भीक न घालता काश्मीरच्या जनतेने मोठ्या प्रमाणात मतदान केले. काश्मीरमधील मतदानामुळे भारताविरुद्ध अपप्रचार करणाऱ्या पाकिस्तानला धक्का बसणे साहजिक आहे. या संस्थेच्या भारतविरोधी भूमिकेबद्दल काँग्रेसच्या नेतृत्वाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आल्यानंतर या मागणीला उत्तर देण्याचे धाडस काँग्रेस नेतृत्वाला दाखवता आले नाही.

    भारतात अशांतता आणि अस्थिरता निर्माण करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय शक्ती कार्यरत आहेत. तीन वर्षांपूर्वी दिल्लीजवळ झालेल्या शेतकरी आंदोलनावेळी पर्यावरण आणि हवामान क्षेत्रात काम करणारी ग्रेटा थनबर्ग हिचे टूलकिट ट्वीट भारतविरोधी शक्तींचा सहभाग दर्शविणारे होते. आता काँग्रेस नेतृत्वाने जॉर्ज सोरोस यांच्याकडून अर्थसहाय्य होणाऱ्या ‘फोरम ऑफ डेमोक्रॅटिक लीडर्स इन एशिया पॅसिफिक’ या संस्थेशी असणाऱ्या संबंधांबाबत जाहीर खुलासा करणे आवश्यक आहे. सोरोस फाऊंडेशनकडून देणगी मिळणाऱ्या ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’ या संस्थेचा उपाध्यक्ष सलील शेट्टी हा राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी झाला होता. सोरोस आणि काँग्रेसचे लागेबांधे किती जवळचे आहेत, हेच यातून दिसून येते. सोनिया गांधी आणि जॉर्ज सोरोस यांच्यातील संबंधाची वाच्यता झाल्यानंतर काँग्रेसने या मुद्द्यापासून लक्ष वळविण्यासाठी राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्याविरुद्ध अविश्‍वास ठराव मांडण्याची खेळी केली आहे. कोंबडा झाकला तरी सूर्य उगवायचा राहत नाही, हे काँग्रेस नेतृत्वाला ठाऊक नाही. काँग्रेस नेतृत्व आणि भारतविरोधी जॉर्ज सोरोस यांच्यातील लागेबांधे जगजाहीर झाल्यामुळे हबकलेले काँग्रेस नेतृत्व संसदेत गोंधळ घालण्याचा हुकूमी पत्ता घेऊन आपला पलायनवाद पुन्हा दर्शवित आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांना सोरोस यांच्या संदर्भातील भूमिका स्पष्ट करताना एवढे भय का वाटावे, हेच कळेनासे झाले आहे. श्रीमती सोनिया गांधी यांच्या सासू श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असताना वारंवार ‘परकीय हात’ या शब्दाचा वापर करीत असत. त्यांच्या सरकारविरोधात कोणी काही बोलले की, त्यामागे इंदिरा गांधींना परकीय हात दिसत असे. आता त्यांच्या सुनेने जाहीरपणे परकीय हाताशी हातमिळवणी केली आहे, हा कोणता योग समजावा? काँग्रेस नेतृत्व या ‘सोरोसा’ यसिसवर कोणता उपचार करते हे आता बघायचे.

    ता.क.- डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात सत्तेत असताना ‘इंधनाच्या बदल्यात अन्नधान्य’ नामक घोटाळा झाला होता. त्यावेळी नटवर सिंग हे परराष्ट्र मंत्री होते. इराकला मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी ‘इंधनाच्या बदल्यात अन्नधान्य’ ही योजना सुरू केली होती. भारतानेही त्यात सहभाग घेतला होता. केंद्र सरकारकडून दिल्या गेलेल्या अन्नधान्याच्या मोबदल्यात इराककडून ऑईल बाँड देण्यात आले होते. हे ऑईल बाँड केंद्र सरकारच्या नावाने देण्याऐवजी काँग्रेस पक्षाच्या नावाने दिले गेले होते, असे उघड झाल्यानंतर नटवर सिंग यांना राजीनामा देण्यास सांगितले गेले. नटवर सिंग यांनी ‘वन लाईफ इज नॉट इनफ’ या आत्मचरित्रात काँग्रेस नेतृत्वाने आपल्याला कसे बळीचा बकरा बनवले याचा तपशीलवार उल्लेख केला आहे. काँग्रेसच्या परकीय हाताच्या लागेबांध्याची ‘पाळेमुळे’ खोलवर रुजलेली आहेत, हेच पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे.

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी –नवशक्ति१८  डिसेंबर २०२४)

    केशव उपाध्येमुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment