• दहशतवादी संघटना सक्रिय

    वेगवेगळ्या मार्गांनी दहशतवादी संघटना देशात अस्थैर्य माजविण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडेच बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यांमधून कोट्यवधींच्या रकमांची उलाढाल झाल्याचे निदर्शनास आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी १४ बेनामी खात्यांतून आरटीजीएसद्वारे पैसे पाठवण्यात आलेल्या २५५ कंपन्यांची यादीच प्रसिद्ध केली आहे. नक्षलवादी संघटनांबरोबर आता दहशतवादी संघटनाही भाजप सरकारविरोधात सक्रिय झाल्या आहेत.

    नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सत्तेतून हटवण्यासाठी विविध मार्गांनी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळत नाही हे पाहून विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शक्ती आता हिंसाचाराच्या साथीने असंतोष माजविण्याचे कारस्थान रचत आहेत. मालेगाव येथील काही बँकांच्या शाखांमध्ये अचानक जमा झालेल्या कोट्यवधींच्या रकमेचे प्रकरण उघडकीस आल्याने शहरी नक्षलवादी शक्तींच्या बरोबर दहशतवादी संघटनाही देशात अस्थैर्य माजविण्याचा कसा प्रयत्न करीत आहेत हे उघड झाले आहे. यातील दुर्दैवाचा भाग असा की भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील काँग्रेससह अनेक पक्ष या शक्तींना आपला वापर करू देत आहेत. मालेगाव येथील महाराष्ट्र बँक आणि नाशिक मर्चंट्स सहकारी बँकेच्या शाखांमध्ये बेरोजगार तरुणांच्या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे निदर्शनाला आल्यानंतर दहशतवादविरोधी तपास पथकाकडून याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. बेनामी खात्यांतून एखाद्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणे या वरवर फारशा गंभीर न वाटणाऱ्या प्रकारामागे दहशतवादी संघटनांचे लागेबांधे असावेत असा विचार प्रथमदर्शनी कोणाच्याही मनात येऊ शकणार नाही. मात्र या आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे दुबईपर्यंत पोहोचले असल्याचे आढळून आले आहे. मेहमूद भागड या व्यक्तीने २०१ बँक खात्यांचा वापर करून थोडेथोडके नव्हे तर १ हजार कोटींचे आर्थिक व्यवहार केले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या गंभीर आर्थिक गैरव्यवहाराचा भांडाफोड करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी १४ बेनामी खात्यांतून आरटीजीएसद्वारे पैसे पाठवण्यात आलेल्या २५५ कंपन्यांची यादीच प्रसिद्ध केली आहे. ही यादी पाहिल्यावर सरकार अस्थिर करण्यासाठी कोणत्या स्तरावर हालचाली सुरू आहेत याची कल्पना येऊ शकेल. ज्या लोकांच्या खात्यात अचानक मोठी रक्कम जमा झाली त्यांनीच तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य हळूहळू लक्षात येणे सुरू झाले. फक्त महाराष्ट्रातील बँक खात्यात बेनामी खात्यातून मोठ्या प्रमाणात पैसा आला नसून २१ राज्यांतील २५१ बँक खात्यांमध्ये या पद्धतीने रक्कम जमा करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात व्होट जिहादचे आवाहन करण्यात आले होते. तसे फतवे काढण्यात आले होते. मशिदींमधून धर्मगुरूंद्वारे महाविकास आघाडीच्या कोणत्या उमेदवारांना मतदान करायचे याच्या याद्याच जाहीर करण्यात आल्या होत्या.

    महाराष्ट्रात झालेल्या व्होट जिहादच्या आवाहनाचा फटका महायुतीला मोठ्या प्रमाणात बसला. धार्मिक आधारावर संघटित पद्धतीने मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या मौलवींना महाविकास आघाडीच्या एकाही नेत्याने विरोध केला नाही. व्होट जिहादच्या पॅटर्नमुळे महायुतीच्या १३-१४ उमेदवारांना कसे पराभूत व्हावे लागले याची संपूर्ण आकडेवारी यापूर्वीच प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती करणे योग्य ठरणार नाही. लोकसभेत व्होट जिहादच्या पॅटर्नला मिळालेल्या मोठ्या यशामुळे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सातत्याने कार्यरत असणाऱ्या अनेक मुस्लिम संघटनांना चेव चढला. विधानसभा निवडणुकीत अखिल भारतीय मुस्लिम वैयक्तिक कायदा मंडळाचे (मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड)चे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी मुस्लिम समुदायातर्फे अनेक मागण्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे केल्या. नोमानी यांनी महाविकास आघाडीकडे कोणत्या मागण्या केल्या आणि महाविकास आघाडीने त्या मागण्या मान्य केल्या, याचा गौप्यस्फोट विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यावेळचे उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मुस्लिम समाजाला अन्य मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) कोट्यातून दहा टक्के आरक्षण द्या, २०१२ ते २०२४ या दरम्यान राज्यात जेवढ्या दंगली झाल्या त्यातील मुस्लिम तरुणांच्या विरोधातील खटले काढून घ्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला, आदी सतरा मागण्या मुस्लिम उलेमांनी महाविकास आघाडीकडे अधिकृत पत्र देऊन केल्या होत्या. लोकसभेत मुस्लिम समाजाच्या ज्या लोकांनी भाजपला मतदान केले त्यांना शोधून काढा आणि त्यांच्यावर बहिष्कार घाला, असे आवाहनही सज्जाद नोमानी यांनी जाहीरपणे केले होते. म्यानमारमधील मुस्लिमांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी ११ ऑगस्ट २०१२ रोजी मुंबईत ‘रझा अकादमी’तर्फे भेंडी बाजार ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाला येणाऱ्यांची संख्या कमी असेल अशी माहिती मिळाल्याने पोलिसांनीही त्यानुसार बंदोबस्त लावला होता. परंतु, हा मोर्चा आझाद मैदानात पोहोचला तेव्हा हजारोंच्या संख्येने जमाव मोर्चात सामील झाला. काहीवेळानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली आणि जमावातून पोलिसांवरच दगडफेकीला सुरुवात झाली. परिस्थिती नियंत्रणात आणणे पोलिसांना कठीण जाऊ लागले. दगडफेकीचे रूपांतर दंगलीत झाले. यात अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. जमावाने दक्षिण मुंबईतील अमर जवान ज्योती स्मारकाची नासधूस केली. महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या अब्रूवर हात घातला गेला. अशा घटनांमधील आरोपींवरचे खटले काढून घेण्याची मागणी उलेमांनी केली आणि महाविकास आघाडीने ती मान्यही केली. निवडणुका जिंकण्यासाठी आपण कोणत्या थराला जात आहोत, याचे किती घातक परिणाम होतील, याची तमा महाविकास आघाडीने बाळगली नाही. शहरी नक्षलवादी कारवायांमध्ये सहभाग असलेल्या अनेक संघटना राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी कशा झाल्या होत्या याचे पुरावे पोलीस यंत्रणांना मिळाले आहेत. काठमांडू येथे शहरी नक्षलवादी संघटनांच्या म्होरक्यांच्या बैठकीत काय काय शिजले याची माहितीही हळूहळू बाहेर येत आहे. विरोधकांना भारतीय जनता पक्षाला विरोध करण्याचा हक्क संविधानानेच दिला आहे. मात्र हा विरोध करताना आपण देशविरोधी शक्तींच्या हातातील बाहुले बनणार नाही, याची दक्षता विरोधकांनी घ्यावी, एवढेच सांगणे आहे.

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी –नवशक्ति, 25 डिसेंबर २०२४)

    केशव उपाध्येमुख्य प्रवक्ता


  • You might also like

    No comments:

    Post a Comment