• एकतंत्री, बेभरवशी नेतृत्वाला चाप; उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या 'राजकारणा'चा पर्दाफाश


    महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांत आणि त्याआधी जून २०२२ मध्ये घडलेल्या उलथापालथी राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणाऱ्या तर आहेतच, त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे या घडामोडींनी राज्यातील राजकारणाला गेल्या ४०- ४५ वर्षांत आलेला व्यक्तिकेंद्रीत, सरंजामशाही आणि बेभरवशी राजकारणाचा आलेला बाज संपुष्टात येण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याने आगामी काळात राजकारणात मोठे गुणात्मक बदल अपेक्षित आहेत. १९७८ पासून राज्याच्या राजकारणाचा अविभाज्य भाग बनलेल्याशरद पवारांच्या राजकारणाची वाटचाल कालबाह्यतेच्या दिशेने होऊ लागल्याचे या उलथापालथींतून दिसून येते.उद्धव ठाकरे यांच्या रूपाने २००० नंतर राज्याच्या राजकारणात पिताश्रींच्या कृपेने अवतीर्ण झालेल्या नेतृत्वाच्या मर्यादा उघड झाल्याने हे नेतृत्वही राज्याच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडण्याच्या दिशेत आहे. शरद पवार  आणि उद्धव ठाकरे  या दोन्ही प्रवाहांच्या राजकारणाचे बुरखे क्रमाक्रमाने फाटले गेल्याने या दोघांच्या रूपाने रिक्त होणारा अवकाश भरून कोण काढणार याचे उत्तर मिळण्यासाठी आणखी काही वर्षे जावी लागणार आहेत. अजित पवार  आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २ जुलै रोजी थेट मंत्रीपदाची शपथ घेतल्याने त्यानंतरचे आठ दिवस भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय आणि स्थानिक नेतृत्वावर प्रसारमाध्यमे, सहानुभूतीदार आणि अर्थातच विरोधक या मंडळींकडून मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. पक्षाचे कार्यकर्तेही काही प्रमाणात गोंधळले होते, हे मान्य करूनच पुढच्या मुद्द्यांकडे वळावे लागेल.   

    महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्याचे राजकारण १९६० ते १९८० आणि १९८०ते २०२३ अशा दोन टप्प्यांत ढोबळ मानाने विभागता येईल. १९६० ते १९८० ही २० वर्षे यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या मोठ्या ताकदीच्या काँग्रेस नेतृत्वाची होती. विरोधी पक्षांत भाई उद्धवराव पाटील, कृष्णराव धुळप, दाजीबा देसाई, एस. एम . जोशी, आचार्य अत्रे, उत्तमराव पाटील, रामभाऊ म्हाळगी अशी सत्ताधाऱ्यांना जेरीस आणणारी मंडळी होती. शेकाप, समाजवादी पक्ष यांच्या तुलनेत भारतीय जनसंघाची ताकद अल्प असली तरी जनसंघाची वाटचाल धिम्या पण निश्चित गतीने होत होती. सामूहिक नेतृत्वाचा तो काळ होता. यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व काँग्रेसमध्ये सर्वमान्य होते तरीही त्यांच्या नेतृत्वाची शैली सामूहिक नेतृत्वाचीच होती. काँग्रेस पक्ष १९७० नंतर इंदिरा गांधींच्या रूपाने व्यक्तिकेंद्रित राजकारणाकडे वळू लागला होता. वसंतराव नाईक यांना हटवून शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय इंदिरा गांधींनी घेऊन यशवंतराव चव्हाणांच्या सर्वमान्य नेतृत्वाला शह दिला.

    यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या तालमीत घडलेल्या शरद पवारांनी राज्यात १९७८ मध्ये नव्या राजकीय संस्कृतीला जन्माला घातले. आणीबाणीमुळे अप्रिय ठरलेल्या इंदिरा गांधी या राष्ट्रीय राजकारणातून बाहेर फेकल्या गेल्या आहेत, आता त्या पुन्हा पूर्वीच्या ताकदीने परतण्याची शक्यता नाही, असे आडाखे बांधत पवारांनी वसंतदादांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचले. तेव्हापासून पवारांच्या राजकरणाचा बेभरवशी हा स्थायीभावच बनला. एकाच वेळी अनेक दगडांवर पाय ठेवण्याने आपला मुत्सद्दीपणा, धूर्तपणा सिद्ध होतो हा त्यांचा समज भोवतालचे हितचिंतक, समर्थक यांनी दिवसेंदिवस दृढ करत नेल्यामुळे त्यांचे राजकारण पुढे-पुढे अधिकाधिक बेभरवशाचे होऊ लागले. राजकारणात दिलेल्या शब्दांना, आश्वासनांना मूल्य असते, याचा विसर त्यांना पडत गेल्याने त्यांचे राजकारण विशिष्ट परिघाबाहेर न पडता आल्याने आकुंचित होत गेले. भारतीय जनता पार्टीशी हिंदुत्वाच्या विचारसरणीमुळे हातमिळवणी करायचीच नाही, असा निर्धार जाहीर व्यासपीठांवर, पत्रकार परिषदांमध्ये बोलून दाखवणाऱ्या पवारांनी पक्षांतर्गत व्यासपीठावर मात्र भाजपाबरोबर जाण्याच्या प्रस्तावाला संमती दिली होती, हे अजित पवार  प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनीच जाहीर करून टाकल्याने पवारांच्या राजकारणाची कायम पाठराखण करणाऱ्या पुरोगामी पत्रकार, विचारवंतांची मोठी पंचाईत झाली आहे. शिवसेना जातीयवादी असल्याने या पक्षाशी कदापि समझोता नाही, असं म्हणणाऱ्या पवारांनीच २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंच्या साथीत मविआ आघाडी सरकारचा प्रयोग केला, हेही अजितदादा आणि भुजबळांनी दाखवून दिले. अजित पवार, भुजबळ, प्रफुल्ल पटेलांच्या भाषणातील उल्लेखांना अजूनही पवार साहेबांकडून उत्तर आलेले नाही. यावरून काय अर्थ निघतो हे पवारांना ठाऊक नसेल असं कसं म्हणता येईल?

    १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासून पवारांनी भारतीय जनता पार्टीला असलेला आपला प्रखर विरोध अनेकदा दाखवून दिला होता. राष्ट्रीय राजकारणाच्या पंगतीत याच आधारावर त्यांना ''मानाचे पान'' मिळाले होते. त्यांचा भाजपाविरोधाचा चेहरा आता पुरता फाटल्याने त्यांच्या राजकारणाची उरलीसुरली विश्वासार्हताही संपली आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या नाम महात्म्यावर राजकारणात आजवर तरलेल्या उद्धवरावांना आपली राजकीय समज आणि कुवत आता तरी कळाली असेल, अशी भाबडी अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. कारण आजवरचे त्यांचे राजकारण स्व- केंद्रीतच आहे. 

    राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने ठेवलेला प्रस्ताव भाजपाच्या नेतृत्वाने नाकारत शिवसेनेशी असलेली युती तोडण्यास नकार दिला होता, हे अजित पवारांनी सांगितल्याने भाजपाशी दगाबाजी करणाऱ्या उद्धवरावांचे डोळे उघडतील, असे मानण्यात अर्थ नाही. मुख्यमंत्रीपद मिळवण्याच्या लालसेने भाजपाला दगा देणारे उद्धवराव आणि वसंतदादांचा विश्वासघात करणारे पवार या एकाच चेहऱ्याच्या दोन बाजू ठरल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवाररुपी व्यक्तीकेंद्रित राजकारण करणाऱ्या घटकांचे नुकत्याच झालेल्या घडामोडींनी पुरते वस्त्रहरण झाले आहे. भविष्यात अशा व्यक्तिकेंद्रीत राजकारणाला महाराष्ट्रात स्थान मिळणार नाही , हा या घडामोडींचा अन्वयार्थ आहे.

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी –लोकमत ऑनलाइन, ११ जुलै २०२३)

    केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment