“साहेब किती थोर” अशा स्वरात भोप्यांच्या आरत्या सुरु
झाल्यात. या कॅनव्हासवर पवारांच्या १९६७ ते २०२३ या छप्पन वर्षाच्या कारकिर्दीकडे
पाहिले की त्यांच्या राजकारणाला विश्वासार्हतेचं ''खत''
न मिळाल्यानेच त्यांची वाटचाल मर्यादितच राहिली , असं म्हणावंसं वाटतं.
आदरणीय
शरद पवार यांचे राजकारणातले ज्येष्ठत्व , त्यांचा
मुत्सद्दीपणा याबाबत त्यांच्या सदैव प्रेमात पडलेली मंडळी नेहमीच भरभरून लिहित
असतात. साहेबांना राजकारणात काहीही अशक्य नाही , हा अनेक
पत्रकार, विचारवंत मंडळींचा आवडता सिद्धांत. ९० च्या दशकांत
तर राज्यात सूर्य उशीरा उगवला तरी त्यात साहेबांचा हात असणार, असं बोलले जात असे. पक्षातील आपल्या विरोधकांचा साहेबांनी कसा काटा काढला,
याचे किस्से पत्रकार आणि त्यांची समर्थक मंडळी रंगवून सांगत असतात.
पवारांची शेती आणि अन्य विषयातील जाण, प्रशासनावरची पकड
याबाबतही ही मंडळी रकाने भरून लिहित असतात. साहेबांची शेती विषयातली हुकुमत ,
प्रशासनाला काबूत ठेवण्याचे त्यांचे कौशल्य निर्विवाद आहे. मात्र
एवढे होऊनही पवारांना राजकारणात अपेक्षित मजल का मारता आली नाही याचं प्रामाणिक
उत्तर शोधण्याचा प्रयत्न त्यांचे समर्थक करत नाहीत. पवार साहेबांची आजवरची
राजकारणातील वाटचाल, त्यांना मिळालेली पदे, त्यांचा दबदबा याकडे तटस्थ वृत्तीने पाहण्याची त्यांच्या समर्थकांची आणि
काही पत्रकारांचीही तयारी नसते. साहेब सध्या पुन्हा चर्चेत आले आहेत ते २०१९ मध्ये
विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या घडामोडींबाबत, देवेंद्र
फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीबाबत तसेच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे
यांच्याविरुद्ध बंड पुकारण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे. आपणच अजितदादांना
भाजपाकडे पाठवले होते , असे पवारांनी नुकतेच सांगून टाकले
आहे. त्यामुळे ''साहेब किती थोर'' अशा
स्वरात भोप्यांच्या आरत्या सुरु झाल्यात. या कॅनव्हासवर पवारांच्या १९६७ ते २०२३
या छप्पन वर्षाच्या कारकिर्दीकडे पाहिले की त्यांच्या राजकारणाला विश्वासार्हतेचं ''खत'' न मिळाल्यानेच त्यांची वाटचाल मर्यादितच राहिली
, असं म्हणावंसं वाटतं.
तर
मुद्दा होता साहेब काय बोलले ह्याचा . उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला सोडचिट्ठी
दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उद्धवरावांना जय महाराष्ट्र
केला. उद्धवराव आणि त्यांचे सहकारी एकनाथराव शिंदे यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, असा टाहो वारंवार फोडत असतात. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी १९७८ मध्ये शरद पवारांनी वसंतदादा पाटील सरकार खाली खेचण्यासाठी
केलेल्या बंडाचा दाखला दिला. वसंतदादांचे सरकार पाडताना आणि मुख्यमंत्रीपद
मिळवताना जनता पक्षाशी पवारांनी केलेली हातमिळवणी म्हणजे मुत्सद्देगिरी ठरत असेल
तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात केलेला उठाव म्हणजे गद्दारी कशी ठरू
शकते असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. त्यावर बोलताना
साहेबांनी ,’’ आम्ही जनसंघाबरोबर सरकार स्थापन केले होते आणि
जनसंघाचे उत्तमराव पाटील हे त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते, फडणवीस त्यावेळी शाळेत असल्याने त्यांना या गोष्टी ठाऊक नाहीत ‘’ अशा
उपहासात्मक स्वरात शेरेबाजी केली. मुळात साहेब दादांचा विश्वासघात करून जनता
पक्षाबरोबर पाट लावतात , ती मुत्सद्देगिरी ठरते , मग एकनाथ शिंदेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी उद्धव ठाकरेंची साथ सोडली तर
ती गद्दारी कशी ठरते , असा फडणवीसांचा प्रश्न होता. त्याला
योग्य उत्तर देता येत नसल्याने साहेबांनी गाडी बाह्यवळणावर नेली. त्यातही त्यांनी
तपशिलाच्या चुका केल्या. साहेबांची स्मरणशक्ती हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चिला
गेलेला विषय आहे. शाळा, कॉलेजातल्या सवंगडी मंडळींना अनेक
वर्षांनंतर नावानिशी ओळखणाऱ्या साहेबांना त्यावेळच्या घडामोडींचे एवढ्या लवकर
विस्मरण कसे झाले, याचेच आश्चर्य वाटते. पवारांच्या
नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये उत्तमराव पाटील नव्हे तर पवारांचे सहकारी माजलगाव
( जि. बीड ) चे सुंदरराव सोळंके हे उपमुख्यमंत्री होते तर उत्तमराव महसूल मंत्री
होते. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव
ठाकरेंना काँग्रेस - राष्ट्रवादीची साथ सोडण्यास अनेकदा सांगितले होते.
उद्धवरावांनी त्याकडे लक्ष न दिल्याने शिंदे आणि त्यांचे सहकारी भाजपबरोबर पुन्हा
आले. शरदरावांच्या बंडामागे असा तात्विक आधार नव्हता. साहेबांनी दादांना पूर्णपणे
बेसावध ठेवले होते.
१९७८
मध्ये शरद पवार आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सरकारमधून बाहेर पडण्याच्या हालचाली
करत आहेत याची कुणकुण वसंतदादांना लागली होती. त्यावेळी दादांनी थेट पवारांनाच कशी
विचारणा केली आणि पवारांनी दादांना आपला सरकारमधून बाहेर पडण्याचा अज्जिबात विचार
नसल्याचे कसे ठामपणे सांगितले आणि अवघ्या काही तासांतच पवार दादांच्या
मंत्रीमंडळातून कसे बाहेर पडले, याचे साक्षीदार
असलेले ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांनी याबाबतचे किस्से अनेकदा जाहीरपणे
सांगितले आहेत.
पवारांच्या
विश्वासार्हतेवर या एका घटनेने लागलेला डाग अजूनही पुसू शकलेला नाही. वसंतदादांना
आपली खुर्ची विश्वासघाताने काढून घेतल्याचे मोठे दु:ख झाले होते. ती भावना दादांनी
जाहीरपणे बोलून दाखवलीही होती. १९८० मध्ये विधानसभा निवडणुकीत इंदिरा कॉंग्रेसला
बहुमत मिळाल्यानंतर आपल्याला एक दिवसासाठी तरी मुख्यमंत्री करा , अशी विनंती वसंतदादांनी इंदिरा गांधींना केली होती. १९८० नंतर समाजवादी
कॉंग्रेस च्या रूपाने राज्यात कॉंग्रेसला आव्हान देणाऱ्या पवारांनी ‘ अंगाला राख
फासून हिमालयात जाईन पण कॉंग्रेस मध्ये जाणार नाही, ‘’ असं
वक्तव्य जाहीरपणे केले होते. १९८६ मध्ये पवार पुन्हा निमूटपणे कॉंग्रेसमध्ये
परतले. १९७८ नंतर पवारांच्या नावाभोवती कायमच विश्वासार्हतेचे प्रश्नचिन्ह उभे
राहिले. ‘’ केसभर गजरा अन गावभर नजरा ‘’ अशी ग्रामीण भागात म्हण आहे. साहेबांच्या
राजकारणाकडे याच म्हणीच्या पार्श्वभूमीवर पाहिले गेले. राज्यात त्यामुळेच त्यांना
पूर्वी समाजवादी व नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रुपात राज्याची सत्ता स्वबळावर
मिळवता आली नाही.राजकीय वर्तुळात नव्हे तर सामान्य माणसाच्या मनातही पवारांना आपल्याबद्दल
विश्वास निर्माण करता न आल्यानेच त्यांना राज्याची सत्ता एकट्याच्या जीवावर
प्राप्त करता आली नाही. एनटीआर , देवीलाल, मायावती ,ममता बॅनर्जी, मुलायमसिंग
यादव, जगन मोहन रेड्डी , चंद्राबाबू,
नवीन पटनाईक अशा अनेक नेत्यांनी आपापल्या राज्यात कॉंग्रेसला चीतपट करत
वर्चस्व प्रस्थापित केले. पवारांना ती किमया करता आली नाही त्यामागचे कारण
त्यांच्या बद्दल सामान्य माणसाच्या मनातही कधीच विश्वासाची भावना निर्माण होऊ शकली
नाही. भगवदगीतेतील,'' यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः।
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् '' हा श्लोक
पवारांच्या राजकारणाला बरोब्बर लागू पडतो. पवार कॉंग्रेस मध्ये परतल्यावर कॉंग्रेस
चे बळ वाढेल असे बोलले जात होते . झाले उलटेच १९९० च्या विधानसभा निवडणुकीत
पवारांच्या नेतृत्वाखाली लढताना कॉंग्रेसला १४० जागा मिळाल्या, स्पष्ट बहुमतही मिळाले नाही. पवारांचा पक्ष विलीन झाल्याने कॉंग्रेसच्या
आमदारांची संख्या २०० पेक्षा अधिक होती. ९५ मध्ये तर कॉंग्रेसची सत्ताच गेली.
आता
साहेबांच्या कथित गुगली कडे जाऊ. आपला पुतण्याच विरोधात उभा राहिल्याची कबुली '' लोक माझे सांगाती '' या आत्मचरित्रात साहेबांनी दिली
होती. आता त्याला आपण पाठवल्याचे सांगून '' साहेब जिंदा हैं ''
हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न पवारांनी केलाय. या गुगलीतून आपली
उरलीसुरली विश्वासार्हता संपेल याचंही भान त्यांना राहिलेलं नाही . असो. अनेक
प्रादेशिक पक्षांना स्वबळावर सत्ता मिळवता आली. पण राष्ट्रवादी कॉंग्रेस ला
राज्यात स्वबळावर सत्ता मिळवता आली नसल्याची खंत अजितदादा पवारांनी अलीकडेच व्यक्त
केली होती. खुद्द पुतण्यानेच आपल्या पक्षाचे मूल्यांकन केल्यावर आपली राजकारणातली
उपयोगीता किती आहे याचे साहेबांनी स्व मुल्यांकन करावे एवढीच अपेक्षा आहे.
(लेखाची पूर्वप्रसिद्धी – महाराष्ट्र
टाइम्स ऑनलाइन, ०४ जुलै २०२३)
केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता
No comments:
Post a Comment