महाराष्ट्रातले अडीच वर्षांचे ठाकरे सरकार गडगडल्यापासून
महाविकास आघाडीची वैचारिक अडीचकी पुरती बिघडून गेली. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत
जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला दिलेला बहुमताचा स्पष्ट कौल झुगारून महाविकास आघाडी
सरकार स्थापन केले गेले, तेव्हा राष्ट्रवादीच्या
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, ‘आमच्याकडे तीन पक्ष
आहेत. अकेला देवेंद्र क्या करेगा?’ तब्बल अडीच वर्षांनंतर
त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, ‘फडणवीसांचा
भरवसा धरू नका. ते कधी पोहोचवून येतील, ते तुम्हाला समजणारही
नाही!’
फडणवीस ही काय चीज आहे, हे जयंत पाटील यांनीच
एका मुलाखतीत सांगून टाकले. ‘बहुमत हातात होते, फक्त शपथ
घेणे बाकी होते. मात्र, ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांना
उपमुख्यमंत्री बनवण्यात आले. तरीही देवेंद्र फडणवीस यांना एवढे सोपे समजू नका. ते
गोड बोलतात, गोड हसतात. मात्र, त्यांना
साधे समजू नका..’
फडणवीस यांची राजकीय कारकीर्द नव्वदच्या दशकाच्या मध्यात सुरू
झाली. तेव्हापासून त्यांनी त्यांच्या राजकीय पक्षासाठी आणि निवडून आलेले प्रतिनिधी
म्हणून अनेक नेतृत्व भूमिका बजावल्या आणि प्रत्येक जबाबदारी पार पाडताना
नेतृत्वाची क्षमताही सिद्ध केली. महाविद्यालयीन विद्यार्थिदशेत अभाविपचे सक्रिय
कार्यकर्ते, १९९२ साली वयाच्या २२
व्या वर्षी नागपूरचे नगरसेवक, पाच वर्षांनंतर, १९९७ मध्ये २७ व्या वर्षी नागपूरचे महापौर आणि १९९९ पासून महाराष्ट्राच्या विधानसभेत
नागपूरचे प्रतिनिधित्व करत आता महाराष्ट्राचे क्षमतावान नेतृत्व हा देवेंद्र
फडणवीस यांच्या कर्तृत्वाचा आलेख आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेतील सर्वांत मोठ्या पक्षाचे नेते
म्हणून फडणवीस यांची ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून
नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून महाराष्ट्राच्या विकासाचे राजकारण हा त्यांचा
ध्यास बनला. ३० जानेवारी २०१५ रोजी त्यांनी अंमलात आणलेली ‘मुंबई नेक्स्ट’ योजना
देशाच्या आर्थिक राजधानीचे जागतिक, आर्थिक आणि मनोरंजन
केंद्रात रूपांतरित करण्याचा रोडमॅप म्हणून ओळखली जाते. त्यांच्या कल्पनेतून १५
सप्टेंबर २०१५ रोजी नागपुरात राज्याच्या पोलिस दलाचे डिजिटलायझेशन करण्याच्या
महत्त्वाकांक्षी योजनेचा जन्म झाला आणि भारतातील पहिले गुन्हे-गुन्हेगारी ट्रॅकिंग
नेटवर्क (सीसीटीएनएस) स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनले.
फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाखाली महाराष्ट्र सरकारने
नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन वेसाठी एक उपक्रम प्रस्तावित केला. महाराष्ट्राच्या
ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना देणारा हा महामार्ग २०१५ मध्ये प्रस्तावित
करण्यात आला होता आणि २०१९ पुन्हा सत्तेवर आल्यानंतर या स्वप्नाची पूर्ततेच्या
दिशेने वाटचाल सुरू झाली. मुंबई आणि नागपूरदरम्यान सुरक्षित आणि जलद प्रवास सक्षम
करण्यासाठी बांधल्या गेलेल्या समृद्धी महामार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी झाला आणि
वेग वाढला.
अनाथांच्या शिक्षणासाठी आणि सरकारी नोकऱ्यांसाठी खुल्या
प्रवर्गात एक टक्का सरकारी आरक्षणाचे धोरण आखणारे करणारे महाराष्ट्र हे आघाडीचे
राज्य ठरले आहे. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही अनाथ अमृता करवंदे यांना नोकरी
नाकारण्यात आल्याची कैफियत लक्षात घेऊन फडणवीस यांनी नव्या धोरणाचा ध्यास घेतला
आणि अनाथ असल्याचे अधिकृत प्रमाणपत्र धारण
करणाऱ्यास या आरक्षणाचा लाभ मिळणे सोपे झाले.
राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी आणि शाश्वत शेतीच्या
विकासासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ योजना आखून पहिल्या टप्प्यातच १०८ टक्के
उद्दिष्टपूर्ती केली. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतून ३४०२२ कोटी
रुपयांच्या कर्जमाफीने संपूर्ण महाराष्ट्रातील ८९ लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी मराठवाड्यात ४२०० कोटींचा वॉटर ग्रीड
प्रकल्प सुरू झाला.
महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास हा फडणवीस यांच्या राजकारणाचा
गाभा आहे. त्या ध्यासाच्या पूर्ततेसाठी प्रत्येक माणूस जोडणे हे त्यांचे ध्येय
आहे. त्यांच्या राजकारणाचा साधा आणि स्वच्छ अर्थही एकच आहे. महाराष्ट्राचा विकास!
वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा!
(लेखाची
पूर्वप्रसिद्धी –लोकमत ऑनलाइन, २२ जुलै २०२३)
केशव
उपाध्ये, मुख्य प्रवक्ता
No comments:
Post a Comment